प्रिय जिवलगा ❤❤
✍©️जया पाटील
प्रिय जिवलगा .......
आज आपल्या लग्नाचा बारावा वाढदिवस ... आपण सोबत बांधलेल्या रेशीमगाठी सोबत घेतलेले सातफेरे ... एकमेकांना सात जन्म सोबत राहण्याचे दिलेले वचन ..सगळे काही आज डोळ्यांपुढे तरळत आहे ...
तु मात्र माझी साथ अर्ध्यावर सोडून निघुन गेलास ... पण तुझी शेवटची भेट ती मात्र डोळ्यांत आजही पाणी आणते माझ्या ... !
आपला अनीश दोन महिन्यांचा होता. काही दिवसांच्या सुट्टीवर तु घरी आला होता..पण युद्धाची घोषणा झाली आणि सर्व सैनिकांना सीमेवर परत बोलावणे आले.
जाताना तु सांगून गेलास ...
अनु.... माहित नाही गं ..पुन्हा आपली भेट होईल की नाही पण ...तुझ्या ह्रिदयात मात्र मी नेहमीच असेल. तुझ्या मनात ह्रिदयात मला नेहमी जिवंत ठेव. जेव्हा माझी तुला आठवण येईल त्यावेळेस मला एक छानसे पत्र लिही .....
तुझ्या मनातल्या भावना माझ्यापर्यंत पत्राद्वारे नक्कीच पोहोचतील ...आणि
हो वेडाबाई ...कितीही त्रास झाला तरी अन्वी ,अनीश आणि आईबाबांसमोर रडायचे नाही ... मी लवकरच परत येईल ... आणि नाही आलो तरी भारतमातेप्रती माझे असलेले कर्ज मी उतरवले असे समज....
असे बोलत होतास जसे की तुझे भविष्य तुला माहीतच होते जसे ....
मला मात्र हे सगळे बोलणे ऐकून गहिवरून आलेले ..मी काहीच बोलु शकली नाही .... तुला फक्त गहिवरून एक मिठी मारली .... त्या मिठीतली जादू आजही कायम आहे .. आजही जेव्हा मी माझे दोन्ही हात माझ्या कमरेभोवती घट्ट कवटाळून ठेवते ..त्यावेळेस हळूच एक वाऱ्याची झुळूक येते ...जणू ... तु कुठेतरी माझ्या सोबतच आहे याची जाणीव होते ....
माझे प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचावे म्हणुन प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील तुला पत्र लिहितेय ....कारण तुलाच वचन दिलेय ना.... तुझी कितीही आठवण आली तरी अन्वी अनीश , आणि आईबाबांसमोर कधीच रडायचे नाही ...!
तुला दिलेले वचन आजदेखील निभावते आहे रे ...., पण कितीही झाले तरी वीरपत्नी असण्याच्या आधी मी एक साधारण स्त्री आहे. मला देखील रडू येते ...आणि तुझ्या सहवासाची नितांत ओढ वाटते ... का सोडून गेलास मला आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर ..? तुझी आठवणीने जीव व्याकुळ होतो माझा ...तुझ्या सोबतच्या आठवणी फक्त आता माझी सोबत करतात ...
आईबाबा लग्नासाठी स्थळाच्या शोधात होते .. मोठ्या कंपनीत असलेला इंजिनिअर आणि एक देशसेवेत असलेला अधिकारी ..यात मी मात्र तुझी निवड केली .. त्याचवेळेस बाबा म्हणाले होते ....देशसेवका सोबत लग्न करणे म्हणजे निखार्यावर चालणे आहे कारण तो तुला वेळ देऊ शकणार नाही , इतर लोकांसारखे सहजीवन तुला मिळेल की नाही याची शाश्वती देखील नाही ..
त्यावेळेस खंबीरपणे मी बाबांना म्हणाली होती ..काहीही झाले तरी माझा आयुष्यभराचा साथीदार फक्त अनिकेत असेल ...
त्यांनतर आपले लग्न झाले. लग्नाच्या दिवशी अनु , तु खूपच गोड दिसते आहेस हे सांगण्यासाठी तुझी चालू असलेली धडपड ... मला जाणवत होती.
लग्नानंतरचे तुझ्यासोबतचे ते अनमोल क्षण ..आजही मी जपले आहेत. तु सतत गुणगुणत असायचा ते तुझेच आवडते गाणे ...आताही माझ्या कानात ऐकू येतेय ..
दृष्ट लागण्याजोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे!
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन् तृप्तीची शांत सावली इथे मिळे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे!
जुळलेले नाते अतुट घडे जन्मजन्मांची भेट
घेऊनिया प्रीतिची आण एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे!
आपल्या अन्वीच्या जन्माच्या वेळेस तुझेच हॉस्पिटलमध्ये सतत फेऱ्या मारणे ... सतत डॉक्टरांना सांगणे ... अहो डॉक्टर.., प्लीज काही तरी करा ना ... किती त्रास होतोय अनुला .... तुझी माझ्याविषयी असलेली काळजी ... , माझ्यावरचे प्रेम आजही काळजाचा ठोका चुकवते माझा...
किती सांगू आणि किती नाही अनिकेत ....
कदाचित लिहायला सुद्धा शब्द अपूर्ण असतील माझ्यासाठी ...
पण फक्त इतकेच सांगेल की मी आजही सौ.अनघा अनिकेत देशमुख आहे ... कारण एका देशभक्ताची वीरपत्नी आहे मी .... तु तुझ्या शरीराचा त्याग देशसेवेसाठी केला असलास तरी तुझे मन मात्र आजही माझ्यासोबत आहे .. तुझ्या आठवणी अन्वी आणि अनीशच्या रूपाने माझ्यासोबत आहेत. माझ्या रूपाने मीच अन्वी आणि अनीशची आई आणि बाबा आहे आणि त्यामुळेच मी आजन्म तुझीच सौभाग्यवती आहे ...!
जन्मोजन्मी फक्त तूच जीवनसाथी असावा हेच मागणे मागेल आजच्या आपल्या विवाह वर्धापन दिनाच्या दिवशी .....फक्त पुढील जीवनात माझी साथ अशी अर्ध्यावर सोडून जाऊ नकोस ... म्हणुनच आजच्या दिवशी तुला सांगावेसे वाटते आहे ..
नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे
जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे हात तू हाती घेशील ना
मला साथ देशील ना
माझा होशील ना………..?
माझा होशील ना………..?
माझा होशील ना………?
तुझीच
सौ. अनघा अनिकेत देशमुख ( तुझी वेडाबाई )
धन्यवाद !🙏
सदर लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे लेख शेयर करायचा झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अश्याच नवीन साहित्याचे वाचन करण्यासाठी आमच्या " वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️जया पाटील.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box