तुला जपणार आहे ..... !

#तुला_जपणार_आहे... !

✍©️जया पाटील.



अनु आणि रश्मी दोघीही बालपणाच्या मैत्रिणी. प्रत्येक गोष्ट घेताना एकमेकांच्या आवडीची घेणे , छोट्यामोठ्या अडचणीत एकमेकांना साथ देणे पासून सगळ्या गोष्टींत त्यांना एकमेकांची सोबत गरजेची वाटत असे. वेगवेगळ्या आयांच्या पोटी जन्म घेतलेल्या त्या मनाने मात्र अगदी सख्ख्या बहिणी होत्या. वेळ पुढे जात होता  परंतु त्यांची मैत्री आणखीन घट्ट होत होती. एकमेकांच्या सोबतीने आता कॉलेजचे शिक्षण पण पूर्ण झाले होते.  


दोघींसाठी आता वरसंशोधन सुरु झाले होते. 

घरातले त्यांना चिडवत असत .. 


अगं मुलींनो , एकमेकांना सोडून तुमचे पान हालत नाही. लग्न करून तर दोघीही वेगवेगळ्या घरी जाणार ..मग कसे होईल गं तुमचे ..?


अनु आणि रश्मीचे उत्तर लगेच तयार असे .. दोन सख्खे भाऊ असतील ना त्यांच्या सोबतच आम्ही लग्न करू म्हणजे एकाच घरात आम्ही दोन्ही मैत्रिणी जावा- जावा .. मग काय नुसती धम्माल असेल आमची ...परंतु  ह्या सगळ्या झाल्या बोलायच्या गोष्टी.....


त्यादरम्यान अनुसाठी अतुलचे स्थळ सांगून आले. अतुल मुंबईला राहणारा ,चांगल्या पदावर नोकरीला, समजदार आणि गुणी मुलगा त्यामुळे घरातील सगळ्यांनाच त्याचे स्थळ आवडले होते. कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला आणि अतुलने अनुसाठी आपला होकार कळवला. 


अनुचे लग्न ठरले आणि अनु आपल्याला सोडून जाणार म्हणुन रश्मी नाराज झाली. अनुला देखील  रश्मीला सोडून जायचे दुःख होते पण आपण एकच शहरात तरी यायला हवे अशी प्रार्थना कर म्हणुन अनुने रश्मीची समजूत घातली.


अनु आणि अतुलचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. अतुलचे अनेक मित्र लग्नासाठी उपस्थित होते. त्यातच एक होता कुणाल ..कुणालला रश्मी पाहताक्षणीच खूप मनापासून आवडली आणि लग्न करेल तर रश्मीसोबतच असे त्याने ठरवून टाकले.


लग्नानंतर अनु आणि अतुल मुंबईला सेटल झाले. नवीन लग्नानंतर अनु आणि अतुल दोघेही एकमेकांना वेळ देत होते ,एकमेकांना समजून घेत होते. सगळे काही खूपच छान चालू होते. त्यातच अनुने गोड बातमी दिली आणि अतुलला तर आभाळ ठेंगणे झाले. मातृत्वाच्या चाहुलीने अनु देखील खूप खुश होती.


त्यादरम्यान कुणालने रश्मीला लग्नासाठी मागणी घातली. रश्मीच्या घरच्यांनी होकार कळवला. एकच शहरात रश्मी आणि आपण राहू या विचारानेच अनु खूप खुश झाली.  रश्मीचे लग्न कुणाल सोबत पार पडले. चहूकडे आनंदी आनंद होता त्यामुळे अनु देखील खूप खुश होती. परंतु सुखाला देखील नजर लागते तसेच काहीसे अनु सोबत देखील घडले. 


अनुचे दिवस भरते होते. एक दिवस अतुलला ऑफिसला उशीर झाल्यामुळे त्याच्या पाठी धावत अनु डबा द्यायला गेली आणि अनवधनाने पाय घसरून ती पडली. अतुलने तिला ताबडतोब हॉस्पिटलला हलवले. रश्मी आणि कुणाल दोघेही लगेच हॉस्पिटलला पोहचले. अनुचा जीव वाचला पण तिच्या पोटातल्या बाळाला मात्र डॉक्टर वाचवू शकले नाही. अनुच्या गर्भाशयाला जबरदस्त मार लागल्याने अनु पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.


मातृत्वाचे सुख असे हिरवल्या गेल्यामुळे अनु मनाने खूप खचली. अतुल ,रश्मी ,कुणाल सगळे तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते परंतु अनुची अवस्था मात्र खराब होत होती. 


त्याचदरम्यान रश्मी देखील प्रेग्नेंट राहिली. अनुला रश्मीसाठी खूप आनंद झाला. सारे काही विसरून ती पुन्हा रश्मीची काळजी घेऊ लागली. मनाने अनु अजूनही खचलेली होती. दिवसपुढे सरकत होते. रश्मीला बाळंतकळा सुरु झाल्या. अनु लगेचच हॉस्पिटलला पोहोचली. 


रश्मीने एका गोड मुलीला जन्म दिला. नर्सने बाळाला बाहेर आणून अनुच्या हातात दिले. पहिल्यांदा बाळाला हातात घेताना अनु खूप खुश होती. कुहूचे आगमन होताच ती पुन्हा खुश झाली परंतु ही आपली नाहीतर रश्मीची लेक आहे हे जाणवल्यावर ती पुन्हा हिरमुसली.


कुहू पण मोठी होत होती. ती आता दोन महिन्यांची होत आली होती. कुहूच्या सानिध्यात आली की अनु आनंदी असते हे रश्मीला जाणवत होते.अनुला सगळेच तिच्या दुखातुन सावरायचा प्रयत्न करत होते. अनुची मानसिक स्थिती मात्र दिवसेंदिवस खराब होत होती.


अतुलची चिंता वाढत होती. शेवटी अतुल , रश्मी आणि कुणालने तिला गावी घेऊन जायचे ठरवले. आपल्या माणसांमध्ये राहिल तर थोडेसे मन मोकळे होईल तिचे.. आणि दुसऱ्या दिवशी सगळे  कुणालच्या कारने गावी निघाले. अनुला बरे वाटावे म्हणुन रश्मीने कुहूला अनुच्या मांडीवर झोपवायला दिले.


नियतीला मात्र काही वेगळेच मंजूर होते. गाडीचा ब्रेक फेल झाला आणि अचानक कुणालच्या  ड्रायविंगचा तोल ढासळला आणि समोर येणाऱ्या गाडीवर कुणालची कार आदळली आणि फ्रंटसीट वर बसलेली रश्मी आणि कुणाल जबर जखमी झाले. 


अतुल आणि अनु देखील जखमी झाले परंतु ते शुद्धीत होते. त्यांनी येणाऱ्या गाड्यांकडून मदत मागितली आणि रश्मी आणि कुणालला ताबडतोब हॉस्पिटलला हलवले. छोटी कुहू मात्र अनुच्या मांडीवर असल्यामुळे सुरक्षित होती.

कुणाल मात्र हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच मृत झाला होता. रश्मीची पण हालत खूप गंभीर होती. कुणलाच्या मृत्यूमुळे ती खूप खचली होती.


एक दिवस रश्मीला खूप जास्तच त्रास होत होता. तिला कुहूला भेटायचे होते. तिने अनुला आत बोलावले. रश्मीच्या तब्येतीमुळे कुहूचा सांभाळ अनुच करत होती. अनुच्या हातात कुहूला पाहून रश्मीला रडू आले. तिने कुहूचा पापा घेतला  आणि तिने कुहूचा हात अनुच्या हातात दिला आणि रश्मी बोलु लागली ...


अनु... माझ्या मातृत्वाचे दान मी तुझ्या पदरात टाकतेय ...मी फार काळ जगणार नाही परंतु कुहूच्या आईच्या रूपात तिचा सांभाळ आता तु  कर ...तिला आईची कमी कधीच जाणवू देऊ नकोस ...आता तूच तिची आई हो...आणि रश्मीने प्राण सोडला.


अनुला अश्रु अनावर झाले होते. अनपेक्षितपणे ती  कुहूची आई झाली होती. रश्मीचा हात हातात घेऊन अनु रडतच बोलु लागली ....


खूप मोठे दान माझ्या पदरात टाकून गेलीस गं रश्मी ...... अगदी अनपेक्षितपणे ...


आपल्या मैत्रीचे नाते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जपलेस तु ... 


परंतु तु काळजी करू नकोस ...कुहूला आईची कमी कधीच जाणवणार नाही .... तिचा मी खूप चांगला सांभाळ करेल ...आपल्या लेकीला मी स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त जपेल ...कारण तिच्या रूपात  मी माझ्या रश्मीला जपणार आहे .....माझ्या जिवलग मैत्रिणीला जपणार आहे ...... तुझ्या आठवणींना जपणार आहे .....तुला जपणार आहे ....!😥😥😥



धन्यवाद!🙏


कथा आवडल्यास नावासहितच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल . तुमचे अभिप्राय कळवायला विसरु नका.


✍©️जया पाटील.


Image - pixabay.

Post a Comment

0 Comments