#गृहप्रवेश
©️जया पाटील
" अग सुषमा , किती धावपळ करते आहेस?
होईल सगळं आवरून.
इतकी दगदग करून घेऊ नकोस स्वतःची.
आरोही , अत्युष , मी आणि बाबा सगळ्यांच्या कामाचा किती लोड असतो तुझ्यावर.
घरातील सगळी कामं ,
बाबांची औषधं ,
पथ्यपाणी ,
मुलांचा अभ्यास ,
त्यांना शाळेत , ट्युशनला नेऊन सोडणं आणणं ,
घरातील दूध ,
किराणा ,
भाजीपाला हे सगळं आणणं ,
खरंच किती काम असतात तूला?
मागे एक आठवडा तू आजारी पडलीस.
आणि घराचे घरपणचं नाहीसं झाल्यासारखं वाटलं मला .
तुझ्याविना हे घर खरंच खूप सुनं-सुनं वाटतं ग!
आधीच तुझ्यावर आभाळा इतक्या जबाबदाऱ्या.
तरीही कोणताच त्रागा न करता नेहमीच उत्साही असतेस तू.
त्यातल्या त्यात आपलं नवीन घर पुढच्या महिन्यात ताब्यात मिळणार,
हे ऐकल्यावर तर खूपच उत्साही झाली आहेस तू ..!
कुठून आणते ग इतकी एनर्जी ..?
जरा मला पण सांग.
काय गुपित आहेस ते मला पण सांग.
मला तर थोड्याच वेळात थकायला होतं.
थकलो की मग कितीही चिडायचं नाही ठरवलं तरीही माझी चिडचिड होतेच."
अविनाश आपल्या बायकोच्या अर्थातच सुषमाच्या उत्साहाचे गुपित खूप उत्साहाने विचारत होता.
"यात कसलं आलं गुपित ..?
अहो , प्रत्येक स्त्रीचं आपली मुलं ,
नवरा, घर यांच्यातच विश्व सामावलेलं असतं.
माझ्यासाठी ही हेच माझं सर्वकाही आहे.
सासूबाई गेल्या.
आणि सात वर्षापूर्वी आपण इथे मुंबई मध्ये स्थायिक झालो.
खूप सारी स्वप्न घेऊन आपण या शहरात आलो होतो.
इतरांप्रमाणे या मुंबईने आपल्या देखील इथं सामील करून घेतलं.
तुमची नोकरी ,
चांगलं आयुष्य ,
मुलांच्या दृष्टीने उत्तम भविष्य ,
सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत आपली.
पण आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे स्वप्न म्हणजे आपले स्वतःचे घर.
ते घर छोटसं असलं तरीही चालेल.
पण आपल्या मालकी हक्काचं.
आपल्या नावाची पाटी दरवाज्यावर रुबाबात मिरवणारं..
आपलं ते सुंदर स्वप्न सुद्धा पूर्ण होतंय.
पुढच्या महिन्यात आपण आपल्या नवीन हक्काच्या घरी असू.
माझा तर विश्वासच बसत नाही.
माझ्या या स्वप्नातल्या घराला मला खूप सुंदर सजवायचं आहे हो..!
नवीन घराचे तोरण ,
तिथल्या सजावटीच्या वस्तू ,
सगळं काही मला अगदी साजेस घ्यायचं आहे.
आपल्या या छोट्याश्या घरातला गृहप्रवेश माझ्यासाठी मूल्यवान आहे.
त्यातला एकेक क्षण मला भरभरून जगायचा आहे. "
सुषमा तिची स्वप्नं अविनाशला सांगत होती.
नवीन घरात प्रवेश करण्याच्या उत्सुकतेने सुषमा खूप हरकून गेली होती.
आठ वर्षांपूर्वी एका नातेवाईकांच्या लग्नात सुषमाला लीलाताईंनी पाहिले.
पहिल्याच नजरेत त्यांनी तिला सून म्हणून पसंत केली.
नातेवाईकांकडून सुषमाची सगळी माहिती घेऊन,
लीलाताई आणि त्यांचे पती प्रकाशराव दोघांनीही सुषमाला त्यांच्या मुलासाठी ,
अर्थातच अविनाशसाठी मागणी घातली.
रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला.
अविनाश आणि सुषमाची नजरानजर झाली.
अविनाशला पाहून पहिल्या नजरेतच सुषमा त्याच्या प्रेमात पडली.
अविनाशची अवस्था देखील वेगळी नव्हती.
सुषमा अगदी सुंदर सजून हातात चहाचा ट्रे घेऊन जेव्हा बाहेर आली,
तेव्हा अविनाश तिच्याकडे पाहतच राहिला.
जणू स्वर्गातून अप्सरा पृथ्वीवर उतरून समोर उभी आहे असा भास अविनाशला झाला.
सुषमा तिच्या गोर्या कांतीवर सुंदर पिवळ्या रंगाची साडी ,
त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज ,
गळ्यात एक नाजूकशी चैन ,
हातात मोत्यांचे तोडे ,
गुलाबीसर हातात एक नाजूक नक्षीची अंगठी ,
कपाळावर नाजूक टिकली ,
मेस्सी बन मध्ये बांधलेले केस ,
हा सगळा पेहराव लेवून जेव्हा बाहेर आली ,
तेव्हा अविनाश पाहताक्षणीच तिच्यावर लट्टू झाला.
हा सगळा सौंदर्यसाज सुषमावर खूपच शोभून दिसत होता.
अविनाश आणि सुषमा दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारायचे ठरवले.
दोघांचाही विवाह संपूर्ण परिवार आणि नातेवाईकांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटात पार पडला.
सुषमा आता अविनाशच्या घराची गृहमंत्री झाली होती.
अविनाश एका तालुक्याच्या गावी एका छोट्या फर्मवर काम करत होता.
लीलाताई , प्रकाशराव ,अविनाश आणि सुषमा असा त्यांचा चौकोनी परिवार खूप आनंदात होता.
सुषमाच्या येण्यामुळे लीलाताई आणि प्रकाशरावांच्या आयुष्यातील मुलीची कमतरता भरून निघाली होती.
सुषमाने घरात येताच तिच्या लाघवी स्वभावाने सगळ्यांचे मन जिंकून घेतले होते.
अविनाश आणि सुषमा दोघांचेही लग्नानंतरचे मोरपंखी स्वप्नांनी सजलेले ,
आनंदाने मोहरलेले दिवस अगदी सुखात जात होते.
एका वर्षाच्या आत सुषमाने आनंदाची बातमी दिली.
त्यांच्या संसाराच्या वेलीवर आता नवीन फुल बहरणार होते.
नऊ महिने पूर्ण झाले.
लीलाताईंनी सुषमाचे ओटीभरण करायचे ठरवले.
सुषमाचे डोहाळेजेवण देखील थाटात पार पडले.
सुषमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
बाळाचे नाव ठेवले ' आरोही ' ...!
आरोहीच्या रूपाने घरात लक्ष्मीचे आगमन झाले म्हणून सगळेच खूप खुश झाले.
सगळा परिवार आरोहीच्या बाललीलांमध्ये हरवला.
आपल्या लाडक्या नातीच्या लीला पाहून लीलाताई देखील खूप खुश होत्या.
पण देवाला मात्र हे मंजूर नव्हते.
आरोही एक वर्षाची झाली.
आणि अचानक लीलाताईंना हृदयविकाराचा झटका आला.
त्यातच त्या हेच जग सोडून वैकुंठधामाच्या प्रवासाला निघून गेल्या.
आजीचा सहवास आरोहीला फार काळ लाभलाच नाही.
काही काळानंतर अविनाशला मुंबईमध्ये चांगल्या नोकरीची संधी चालून आली.
अविनाश प्रकाशराव , आरोही आणि सुषमाला घेऊन नोकरीनिमित्त मुंबई मध्ये स्थायिक झाला.
मुंबई मध्ये स्वतःचे बस्तान बसवतांना अविनाशला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
पण आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने सगळ्या संकटांवर मात केली.
काहीच काळानंतर सुषमाला पुन्हा दिवस गेले.
आरोहीच्या जन्मानंतर चार वर्षांनी अत्युषचा जन्म झाला.
आरोही आणि अत्युष दोघांच्याही बाललीलांमुळे सुषमाचा वेळ कसा जाऊ लागला हे तिलाच कळेनासे झाले.
त्यांचं गोड हसणं ,
घरभर पळणं,
सगळ्या घरात खेळण्यांच्या पसारा करणं,
कारणाशिवाय त्याचे रुसुन बसणं ,
या सगळ्यात सुषमाचा वेळ कुठे जात असे ते तिलादेखील समजत नसे.
सुषमा , अविनाश , आरोही, अत्युष आणि प्रकाशराव असा त्यांचा चौकोनीचा पंचकोनी परिवार झाला होता.
दोघीही मुलांच्या जबाबदाऱ्या,
घरखर्च ,
प्रकाशरावांची औषधं
हा सगळा खर्च अविनाशला जड होत होता.
सुषमाला अविनाशची अडचण जाणवत होती.
लग्नामुळे बारावीनंतरच सुषमाचे शिक्षण थांबलं होतं.
त्यामुळे तिला लगेचच नोकरी मिळणे शक्य नव्हते.
पण तिला मनापासून अविनाशला आर्थिक मदत करायची होती.
सुषमाचे शिक्षण जरी अर्धवट राहिले होते तरी ती इतर सगळ्या गोष्टीत खूप हुशार होती.
स्वयंपाकात तर ती अतिशय सुगरण होती.
एक दिवस शेजारच्या घरी तिने थालीपीठ बनवून पाठवले.
त्यावेळी शेजारी आलेल्या पाहुण्यांनी तिला थालीपीठाची भाजणी बनवून देण्याची ऑर्डर दिली.
त्यातूनच तिला आयडिया सुचली.
तिने थालीपीठ भाजणी ,
लोणची , खारवलेल्या मिरच्या हे सगळे पदार्थ बनवून विकायला सुरुवात केली.
या सगळ्यासाठी सुषमा खूप मेहनत घेत होती.
तिच्या मेहनतीला यश मिळत होते.
सुषमाच्या या कमाईमुळे अविनाशला देखील खूप मोठा आधार मिळाला होता.
सुषमा आणि अविनाश दोघांच्याही कमाईमुळे घरखर्च सांभाळून थोडा पैसा शिल्लक राहत होता.
आरोही आणि अत्युष लहान आहेत तोवर घर घेण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला.
खूप कष्टाने पैसा उभा करून त्यांनी त्यांच्या स्वप्नातले घर बुक केले.
आता वेळ होती स्वप्नपूर्तीची...!
घराचे बांधकाम पूर्ण झाले होते.
एकाच महिन्यात पझेशन होणार होते.
सुषमाच्या आनंदाला पार उरला नव्हता.
नवीन घरात जायचे म्हणून नवीन तोरण ,
फ्लॉवरपाॅट ,
रांगोळ्या ,
सोफाकव्हर अशी कितीतरी सजावटीच्या सामानाची खरेदी झाली होती तिची.
घरातील सगळ्या सामानाची साफसफाई सगळं अगदी उत्साहात सुरु होतं.
पाच दिवसांनी गुढीपाढवा होता.
त्यामुळे नवीन घरात कलशपूजन आणि गुढी उभारूया असे सुषमाने मनाशी ठरवलं.
कोरोना व्हायरस ने सगळीकडे थैमान मांडले असल्यामुळे ,
तिने सगळं आवरण्यासाठी कोणाची मदत घ्यायची नाही असं ठरवलं.
हवं तर हळूहळू मी स्वतःच सगळं आवरेन असं मनाशी ठरवलं.
आता घरात पूजा असली म्हणजे साफसफाई ही आपसूकच आली.
गुढीपाडव्याच्या तीन दिवस आधी सुषमा सकाळी लवकर उठली.
घरातील सगळी काम आटोपली.
आरोही ,अत्युष , प्रकाशराव सगळ्यांसाठी नाश्ता ,
दुपारचे जेवण ,
अविनाशचा डबा सगळं आवरून ,
स्वतःसाठी देखील थोडेफार खायला बनवून ती निघाली.
सॅनिटायझर ,मास्क सगळी पुरेपूर काळजी घेऊन ती तिच्या नवीन घरी पोहोचली.
नवीन घर आता आपल्या ताब्यात मिळणार म्हणून ती खूप खुश होती.
दिवसभर नवीन घराला आवरून तिने स्वच्छ केले.
लादीवर पडलेले कलरचे डाग घासून स्वच्छ केले.
जाळी-जळमटी झाडून आवरून घर चकपाक केले.
दिवसभर सगळं आवरून ती खूप थकली.
सगळं काही आवरून सुषमा घरी गेली.
त्या दिवशी मात्र तिला खूप जास्त थकवा जाणवत होता.
आज खूप जास्त धावपळ झाली म्हणून थकवा असेल असं समजुन ती झोपली.
दुसऱ्या दिवशी पहाटे मात्र तिला खूप ताप आला.
खोकला आणि सर्दीचा त्रास सुरु झाला.
घरात बाबा वयस्कर ,
आरोही आणि अत्युष दोघेही लहान आहेत.
त्यामुळे सुषमाने जास्त उशीर न करता डॉक्टरकडे धाव घेतली.
डॉक्टरांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्यास सांगितली.
सुषमाने टेस्ट साठी स्वॅबचे सॅम्पल दिले.
रिपोर्ट येईपर्यंत ती तिथेच थांबली.
सकाळी सॅम्पल देऊन झाल्यावर रात्री उशिरापर्यंत रिपोर्ट आले.
घरी प्रकाशराव आणि मुलं खूप चिंतेत होते.
अविनाश सुषमासोबतच असूनही नसल्यासारखाच होता.
सुषमापासून दुर एका योग्य जागेवर थांबला होता.
सुषमाचे दुर्दैव त्यामुळे तिचा रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आला.
अविनाश आणि सुषमाला खूप टेन्शन आलं.
पण आता कणखर व्हायलाच हवं म्हणून सुषमा हॉस्पिटलला ऍडमिट झाली.
पण मनातून मात्र तिला मुलांची खूप काळजी वाटत होती.
तिच्या चेहऱ्यावरची चिंता अविनाशच्या लक्षात आली.
अविनाश तिला समजावणीच्या सुरात म्हणाला.
" मुलं आणि बाबा दोघांचीही मी व्यवस्थित काळजी घेईल.
तू फक्त स्वतःची काळजी घे.
लवकर बरी हो.
तुझ्याशिवाय आपलं घर खूप सुनं-सुनं वाटतं.
त्यामुळे आमची चिंता सोड.
आणि आमच्यासाठी लवकर बरी हो."
इतकं म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी अविनाश तिथून निघून गेला.
अविनाश समोर सुषमा खूप धीराने वागली.
पण नंतर मात्र तिच्या संयमाचा बांध फुटला.
सुषमाला पुढच्या ट्रीटमेंट सुरु झाल्या.
औषधं ,पथ्य सगळं व्यवस्थित सुरु होते.
आरोही , अत्युष , बाबा आणि अविनाश
सगळ्यांसोबत रोजच्या रोज व्हिडीओ कॉल वर सुषमाचं बोलणं सुरूच होतं.
सुषमाची तब्येत सुधारत होती.
सगळं काही आलबेल होतं.
सुषमा लवकरच घरी येणार म्हणून सगळे खुश होते.
सगळे रिपोर्ट देखील नॉर्मल येत होते.
परंतु दोन दिवसानंतर सुषमाची तब्येत अचानक ढासळू लागली.
तिला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होऊ लागला.
अविनाश ,बाबा आणि मुलं सगळेच खूप घाबरले.
अविनाशला काही सुचेनासं झालं होतं.
आलेल्या परिस्थितीमुळे तो मजबूर होता.
तो सुषमाच्या जवळ जाऊन तिला जवळही घेऊ शकत नव्हता.
माझ्या सुषमाला बरं कर म्हणून प्रकाशराव देवघरातल्या गणपतीला पाण्यात टाकून बसले होते.
डॉक्टर खूप प्रयत्न करत होते.
पण देवाला काही वेगळं मंजूर होतं.
ऍडमिट केल्यावर बारा दिवसांनी सुषमाला प्रचंड त्रास होऊ लागला.
शेवटी सुषमाची कोरोना विरुद्धची लढाई अयशस्वी झाली.
'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला'
ही उक्ती सुषमाच्या बाबतीत खरी ठरली.
सुषमा तिच्या संसाराला ,
तिच्या मुलांना सोडून निजधामाच्या प्रवासाला निघून गेली.
अविनाश , बाबा , आरोही सगळ्यांसाठी हा धक्का पचवणं खूप कठीण होतं.
अत्युष मात्र खूप लहान होता.
त्यामुळे आई बरी होऊन घरी येईल याच आशेवर बसला होता.
घरात सगळ्यांना रडलेले पाहून त्याला काहीच सुचत नव्हतं.
अत्युष सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगत होता ..
" पप्पा , आजोबा, दीदी तुम्ही इतके का रडताय..?
तुम्हांला मम्माची आठवण येते का ..?
ती लवकर बरी होऊन घरी येणार आहे.
तोपर्यंत आपण तिच्या सोबत व्हिडीओ कॉल वर बोलूया. "
अत्युषच्या या निरागस वक्तव्यावर सगळ्यांना काय बोलावं तेच समजत नव्हतं.
त्याला सत्य समजल्यावर त्याची काय अवस्था होईल.
याचा विचार करूनच अविनाश आणि प्रकाशराव खचले होते.
ज्या घराचे स्वप्न पाहत सुषमा स्वर्गाच्या दारी निघून गेली.
त्या घरात मी आता कधीच राहणार नाही.
ते घर माझ्यासाठी पणवती ठरलं.
त्यामुळे मी नवीन घरात कधीच गृहप्रवेश करणार नाही.
ते घर दुसऱ्या कोणाला विकून टाकू.
असं अविनाशने ठरवलं.
त्याने त्यासाठी एजंटला बोलावलं.
घराच्या विक्री बाबतीतले एजंटसोबतचे अविनाशचं बोलणं आरोहीने ऐकलं.
आरोही आठ वर्षाची होती.
थोडी समजदार होती.
तिला तिच्या बाबांचा हा निर्णय आवडला नाही.
म्हणूनच ती आजोबांकडे गेली.
" आजोबा , बाबांना सांगा ना ..
आपले नवीन घर ते विकायला निघाले आहेत.
आईचे स्वप्न ते घर होते.
आईला ते घर विकले तर किती दुःख होईल.
आजोबा , तुम्ही बाबांना समजावून सांगा ना..
प्लीज आजोबा ..सांगा ना .."
हे आजोबांना सांगता सांगता आरोही रडू लागली.
खरं तर तिच्या निरागस भावना आजोबांना योग्य वाटत होत्या.
पण त्या घरामुळेच सुषमा आपल्याला सोडून गेली.
हा विचार अविनाशच्या मनातून जात नव्हता.
एजंट गेल्यावर प्रकाशराव आरोहीला घेऊन अविनाशकडे गेले.
त्याला समजावणीच्या सुरात म्हणाले ..
" अवि , हे मी काय ऐकतोय ..?
तू आपलं नवीन घर विकण्याचा निर्णय घेतला आहे ..?
अरे , पण ते घर आपल्या सुषमाचे स्वप्न होते.
हे मात्र तू विसरतो आहेस.
असं करू नकोस अवि ..
ऐक माझं...
सुषमाच्या स्वप्नाला असं परक्याच्या स्वाधीन करू नकोस."
" माहिती आहे बाबा ...
सुषमा आणि मी दोघीही मिळून आमचे नवीन घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होतो.
पण अर्ध्या वाटेवर मुलांना ,तुम्हाला ,मला ..
आपल्या सगळ्यांना एकटं टाकून ती निघून गेली.
त्या दिवशी जर गृहप्रवेशाच्या तयारी साठी ती त्या घरी गेली नसती,
तर ती आजारी पडलीच नसती.
त्या घरामुळेच आपली सुषमा आपल्याला कायमची दुरावली.
म्हणूनच मला नकोय ते घर बाबा ...
त्या घरामुळेच माझी सुषमा मला सोडून गेली."
इतकं बोलून अविनाश ओक्सबोक्शी रडू लागला.
त्याला सावरत प्रकाशराव म्हणाले ..
" तुझं दुःख समजते आहे रे अवि मला ..
आपली सुषमा गेली.
आणि आपण सगळेच पोरके झालो.
आपला भक्कम आधार गेला.
पण त्या दिवशी ती तिथे गेली नसती ,
तरी तिला आजारी पडायचं तर ती आजारी पडलीच असती.
त्या घरी जाणं फक्त निम्मित मात्र होतं.
पण हे घर उभारण्यासाठी ,
सुषमाने खूप कष्ट केले.
तिने रात्रंदिवस स्वतःच्या घराचे स्वप्न पाहीले.
तिची शेवटची इच्छा होती रे ती..
ह्या घरातला गृहप्रवेश.."
"ती नेहमीच मला म्हणायची ..
बाबा , एकदा माझ्या घरात गेली की बाकी मला काहीच नको परमेश्वराकडून..
सगळं काही भरभरून दिलं आहे मला ..
तिची शेवटची इच्छा पूर्ण कर अवि.."
हे बोलत असतानाच आरोही बोलू लागली ...
" बाबा , आईला खूप मनापासून आवडायचे ते घर.
आपण त्या घरात रहायला गेलो ना ...
तर आई आपल्या जवळचं आहे असं वाटेल मला आणि अत्युषला ..
त्या घराच्या रूपाने आई आमच्या सोबत असेल.
प्लीज बाबा , नका ना विकू आपलं नवीन घर. "
इतकं बोलून आरोही रडू लागली.
प्रकाशराव आणि आरोहीचं बोलणं अविनाशला पटलं.
अविनाश आरोहीला जवळ घेऊन म्हणाला ..
" आरोही ,तूला त्या घरात राहायचे आहे ना ..
मग आपण नक्कीच जाऊया."
"बाबा , तुमच्या भावना समजता आहे मला ..
माझ्या चिमण्या पिल्लांच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो.
पण गृहप्रवेश करणारी घराची लक्ष्मीच निघून गेली तर आपण गृहप्रवेश कसा करणार बाबा..?
सुषमा शिवाय माझ्याकडून तरी गृहप्रवेश होणार नाही. "
" तुझी अडचण समजते आहे मला अवि ..
सुषमा आपल्या घरात नसली ,
तरी तिच्या रूपात तिचे अंश आरोही आणि अत्युष आपल्या सोबत आहे.
मुलगी पण आपल्या घराची लक्ष्मीच असते.
आपण आरोहीच्या शुभ पावलांनी गृहप्रवेश करू.
सुषमाला नक्कीच आवडेल ही गोष्ट.
आपण सगळं काही सुषमाला हवं तसंच करूया.
सजावट , रांगोळ्या , पूजा ..
करशील ना अवि ..
हे सगळं ..?"
प्रकाशराव अविनाशला म्हणाले.
अविनाशने मानेनेच होकार दिला.
प्रकाशरावांनी योग्य मुहूर्त काढून नवीन घराचा गृहप्रवेश करायचा ठरवला.
सुषमाला हवी होती तशीच पूर्वतयारी त्यांनी करून घेतली.
घरात निर्मळ कलश भरून कलशपूजन करण्यात आले.
आरोहीने तो पवित्र कलश हातात घेऊन तिच्या शुभ पावलांनी उंबरठा ओलांडून गृहप्रवेश केला.
सगळी पूजा सारसंगीत पार पडली.
रात्री अविनाश ,प्रकाशराव ,आरोही आणि अत्युष सगळे नवीन घराच्या गॅलरीत उभे होते.
आकाशात एक तारा खूप लख्ख प्रकाश देत होता.
त्या ताऱ्याकडे बोट दाखवून अत्युष म्हणाला ..
" आजोबा , तो तारा पहा ना ...
किती ट्विंकल ट्विंकल करतोय..
जे लोक बाप्पाकडे जाता ते तारा बनतात का ..?
आई पण असेल का तिथे ?"
अविनाश कडे पाहत प्रकाशराव म्हणाले ..
" हो बाळा , तो ट्विंकल ट्विंकल करणारा तारा म्हणजे तुझी आईच आहे.
ती आज खूप खुश आहे म्हणून इतकी प्रकाशमान आहे.
तिच्या स्वप्नांच्या नगरीत आज तुमचा गृहप्रवेश झाला.
त्यामुळेच ती खूप खुश आहे. "
अविनाश , प्रकाशराव , आरोही आणि अत्युष
सगळेच त्या चकाकणाऱ्या ताऱ्याकडे एकटक पाहत होते.
तो ताराही तसाच प्रकाशत त्यांना आनंद देत होता.
त्या ताऱ्याच्या रूपाने त्या सगळयांना सुषमाचाच भास होत होता...!
समाप्त !
सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.
तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात.
त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे.
साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा
अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google & Pinterest
✍©️ जया पाटील
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box