उपवास बिपवास
उपवास बिपवास
© Velvet Kavisha
तसां सणासुदीला उपवास वगैरे जरा लांबचीच गोष्ट तिच्यासाठी... लंघन काय,,, ती एकाला तीन दिवसही करते... फक्त ताक किंवा मुगडाळीचं पाणी पिऊन. डॉक्टरांच्या सल्ल्याने...
तर्रर्रर्र--- कोरोनामुळे त्यांना पहाटे लवकर उठायची सवय झालीयं... रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे साडेआठला सगळे उठणार म्हणजे उठणारचं....
आज एकादशी. पण तिच्या लक्षात ही नाही. नेहमीप्रमाणे उठली. त्याच्यासोबत खिडकीत बसून चहा बिस्कीटं खावून झालं. दिवसाची सुरुवात छान झाली.
दोन दिवसापूर्वी खिचडीसाठी भिजवलेला साबुदाणा उरला होता फ्रीजमध्ये. नाश्त्याला साबुदाणा वडे आणि चटणी करायचे ठरले... बनलेही छान...
भरपेट नाश्ता झाला तसं तो म्हणाला- "आज उपवास करायला हवा होता गं. इतके भारी बनलेत वडे ना... एकादशी सार्थ झाली असती"
"आज एकादशी आहे का?? आधी का नाही सांगितलंस तू..?? " ती
"अग मलाही आताच सगळ्यांच्या स्टेटस् वरून कळलंय... या लॉकडाऊनमुळे तारीख, वार काही लक्षात राहत नाही... whatsapp status पाहून तरी कळतं... हा हा हा..." तो.
" बरं. बरं. हे बघ, सकाळी आपण चहासोबत खाल्लेली दोन बिस्कीटं विसरायला तयार असशील तर उपवास करु शकतो..." ती म्हणाली.
" चालेल. चालेल. तसंही वातावरण दमट आहे. पोटाला आराम द्यायची गरजच आहे... करु उपवास" त्यालाही पटलं.
उपवास म्हटलं की, फळं, रताळी, उपवासाचा चिवडा, वेफर्स, दही, ताक असं सगळं लागतच ना...!! शोधून शोधून काहीच न मिळाल्याने भगर, बाकीच्या वस्तू आणि फळं घेऊन ती घरी आली.
"रताळी काही कुठेच मिळाली नाहीत. भगर आणि फळं आणलीत." तिने सांगितले...
" का गं... उपवास करतेस का..??" सासुबाई.
" हो आई. दोघांचाही आहे. सकाळी बिस्कीट खाल्ली ते विसरून." तिने म्हटलं.
"अगं हा पण काही बोलला नाही. तु खाली गेलीस तर मी कुकर लावून घेतला. हा उपवास उद्या दुपारी सुटेल. अन्न वाया जाईल. त्यामुळे आज नका करु उपवास. आज घ्या जेवून..." सासुबाई म्हणाल्या.
आता झालं काय की... उपवास करायचा ठरल्यानंतर ती खाली उतरली तेव्हा सासुबाई आंघोळीला गेलेली. त्यामुळे सांगितलंच नाही. आणि सगळ्या वस्तू शोधाशोध करून, एक मीटरचं अंतर मेंटेन करत, लाईनमध्ये उभं राहून तिने खरेदी आटोपली. एक तासाने घरी आली, तोपर्यंत कुकर झालेला...
"अरे देवा..!! आई यांनी सांगितले नाही ना तुम्हांला.. बसले असतील लॅपटॉपमध्ये डोकं घालून... सांगून गेलेले त्यांना." तिने सांगितले.
त्याला कळलं.. 'कुछ तो गडबड हो गयीं दया.!! आता सावरायला हवं, नाहीतर घरची स्त्री संघटना तुटून पडेल आपल्यावर.'
तो समजुतीच्या सुरात म्हणाला-- "हरकत नाही आई. आज जेवतो. उपवास काय उद्याही करु शकतो. हो की नाही गं "
मग काय कुकर तर झालेलाच होता. बाकीचं जेवणही यथासांग बनलं. त्यांच्या आवडीचे पदार्थ ते नेहमीच खातात.... तसेच खाल्ले. उद्या उपवास करायचा आहे असं स्वतःला समजावून...
खरंतर देवाला काही लागत नाही. शरीरातच तो ह्रुदयस्थं असतो. त्यानेच एक फुटाचं आपलं शरीर पाच-सहा फुटांत आणलंय ना..?? तो इतरांबद्दलचा स्नेह पाहतो. आपल्या मनातले विचार पाहतो. उपवास करायलाच हवा. कारण शरीराला त्याची गरज असते. आपण एरव्ही उलटसुलट काही खातो. एक घास कमी न खाता दोन घास जास्तच खातो. पोटाला ताण येतो. या ताणातून शरीर वाचवायचं तर एक हलकाफुलका उपवास जरुरीचा आहे. सोबत देवाचं नाव असेल तर सात्विकता ही येते. असो....
मैत्रिणी तिला नेहमी म्हणतात की साधा आषाढी एकादशीला उपवास करु शकत नाहीस काय..?? .. काय सांगणार त्यांना ती -- तिला किती उत्साहात उपवास करायचा असतो. पण घडूनच येत नाही म्हणून.....देवाची इच्छा दुसरं काय..😜😜
मला तर तिच्या सासुबाईच आवडल्या ब्वॉ. साठच्या दशकातल्या असूनही कर्मठ नाहीत.
आपको बताती हुँ... हमें तो इस कड्डक्क उपवास से और मंदिर में लोगों की भक्ती देख के ही डर लगता है ना बाब्बो....
फिर क्या..!! हम इन्सान में ही भगवान ढुँढ लेते है..। 🙆🙆🙆
टीप:- सदर लेखाचा आणि पात्रांचा माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबियांशी काहीही संबंध नाही...
सदर लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.... नावासहित शेअर करा. नाहीतर देवबाप्पा "कान कापेल."
© Velvet Kavisha

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box