या वळणावर जरा जपून .. !

✍©️जया पाटील 



आयुष्य म्हणजे जगणे आणि मरणे या दोन घटनांमधला संपूर्ण प्रवास. आयुष्याच्या या प्रवासात खूप वेगवेगळी वळणे येतात. काही सुखाने ओथंबलेली आणि काही नकळत संकट आणि दुःख घेऊन येणारी .... !

काही वळणांवर चालणे खूप सोपे असते पण काही बेसावध वळणे अशी असतात की ज्या वळणावर आपल्याला खूप मोठा ब्रेक लागतो. आपल्याला या वळणांवर आपलीच स्पीड थोडीशी कमी करावी लागते आणि खबरदारी जरा जास्त घ्यावी लागते. त्यावेळी आपण खूप निराश होतो पण या वळणावर न डगमगता जरा जपून वागलो तर संपुर्ण आयुष्य सुखकर होऊ शकते.

 खरेतर जगण्याच्या या प्रवासात असे वळण येणे देखील तितकेच गरजेचे असते त्याशिवाय जगणे म्हणजे नेमके काय आपण कधीच समजुन घेऊ शकत नाही. आजची आपली कथा पण अश्याच एका वळणाची कहाणी आहे.

निनाद एका सामान्य कुटुंबातील मुलगा. पैश्याची जुळवाजुळव आणि काटकसरीच्या संसारात निनादच्या आईबाबांचे आयुष्य व्यतीत होत होते.

दोन भावंडात लहान भाऊ त्यामुळे आईबाबांचे आणि आजीआजोबांचे लाडके शेंडेफळ म्हणजे निनाद.

पैश्याची कमी असली तरी देखील जगातील प्रत्येक आईबाबांप्रमाणे निनादचे आईबाबा देखील आपल्या मुलांची प्रत्येक हाऊस पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असत. आपल्याला जे काही मिळाले नाही ते आपल्या मुलांना नक्कीच मिळावे असा विचार तुमच्या माझ्यासारखे सगळेच आईवडील करतात.

निनाद आणि त्याचा भाऊ मोहित दोघेही खूप समजदार होते. लहानपणापासून संस्कारी वातावरणात वाढले असल्यामुळे पैश्यांचा काटकसरीने वापर करणे , मोठ्यांचा आदर करणे , छोट्या मोठ्या गोष्टीत आईबाबांचे मत विचारात घेणे अश्याच अनेक चांगल्या सवयी त्यांना बालपणीपासून होत्या.

हळूहळू निनाद मोठा होत होता. तो माध्यमिक शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर अर्थातच दहावीत येऊन पोहोचला होता. निनादच्या गोड स्वभावामुळे त्याचे मित्रमंडळ देखील खूप मोठे होते. अर्थातच मैत्रीत श्रीमंत आणि गरीब असा काही फरक नसतोच खरा. निनादच्या मित्रांमध्ये खूप सारी मुले होती ती अतिशय श्रीमंताघरची.

भारी भारी कपडे , मोठ्या गाड्या , एकदम भारीतल्या बाईक आणि मोबाईल्स असा निनादच्या मित्रांचा लुक पाहून निनाद हरकून जायचा पण आपल्याला हे सगळे शक्य नाही म्हणूनच मन मारून गप्प बसायचा. शेवटी दिखावा सगळ्यांना भुलवतो तसेच काहीसे निनादचेही झाले होते.

गाडी वगैरे  घेऊन देणे तर आपल्या बाबांना शक्य नाही पण एक मोबाईल तर ते नक्कीच घेऊन देऊ शकतील ना मला .. असा निनाद मनोमन विचार करत होता. एकदा आईबाबांकडे मागुन बघायला काय हरकत आहे असे ठरवून निनाद शाळेतून घरी गेला.

गेल्यापासूनच निनादने आपणहून सगळ्या कामात आईबाबांना मदत केली. एरवी देखील तो घरकामात त्याच्या आईला मदत करतच असे पण आज जरा जास्तच मदत करणे चालू होते.

निनादच्या आईने हा बदल अचूक टिपला आणि निनादला म्हणाली ....

काय रे निनाद ... आज काही तरी काम आहे बहुतेक तुझे आमच्याकडे ..फारच मस्का मारणे सुरु आहे तुझे आम्हाला ... बोला ..काय काम आहे ते ..?

अग काही नाही ग आई , तु आणि बाबा किती करतात मोहित आणि माझ्यासाठी .. म्हणूनच थोडीशी मदत केली ग ...निनाद बोलु लागला.

पुरे पुरे ....मस्का लावणे ..सांग पाहू ..काय हवे आहे तुला ? की काही दुसरे काम आहे माझ्याकडे ? .. तुझी आई आहे मी ... ओळखते माझ्या लेकाला पुरेपूर ....निनादची आई बोलली.

आई ... खरे सांगू का ..माझ्या शाळेतील सगळ्या मित्रांकडे खूप छान कपडे , मोठ्या बाइक्स , मोबाईल, खूप महागडी घड्याळे आहेत ग ..

मी किती पण समजवायचा ठरवले नाही स्वतःला ..की आपल्याला हे सगळे घेणे शक्य नाही तरी पण मन मानत नाही ग आई ...

प्लीज , बाकी काही नको पण प्लीज मला एक स्मार्टफोन तरी घेऊन दे ना आई ....

निनादला कसे समजवावे हे निनादच्या आईबाबांना समजतच नव्हते पण त्यांनी त्याला  सांगितले ..

काही हरकत नाही निनाद ..पण बाळा आम्ही काम करतो , त्यावेळेला आमच्या कष्टाचा मोबदला म्हणून आम्हाला हे पैसे मिळतात. तुला देखील कष्टाची किंमत कळायला हवी ना...

तुला ओव्हरटाईम करून आणि अजूनही काही व्यवस्था करून मी मोबाईल घेऊन देईल पण त्याआधी तु मला दहावीच्या परीक्षेत यशस्वी होऊन दाखव. तुझ्या यशाचे कौतुक म्हणून मी तुला मोबाईल नक्की घेऊन देईल.

बाबांचे म्हणणे निनादला पटले आणि तो अभ्यासाला लागला. परीक्षेत उत्तम यश मिळवून  मी बाबांकडून बक्षीस मिळवेलच असा त्याने मनाशी निश्चयच केला.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी निनादने खूप मेहनत केली , त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. तो सर्वोत्तम गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम आला. वर्तमानपत्रातून सगळीकडे त्याच्या यशाची बातमी झळकली. शाळेत निनादचा मोठा सत्कार करण्यात आला. आपल्या लाडक्या लेकाचा हा कौतुक सोहळा डोळ्यात साठवताना निनादचे आईबाबा भरून पावत होते. त्या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता वेळ होती वचनपूर्तीची ..!

निनादच्या बाबांना आपल्या मुलावर आधीपासूनच पूर्ण विश्वास होता त्यामुळे आधी पासूनच ओव्हरटाईम करून त्यांनी बऱ्यापैकी रक्कम जमा केली होती. उरलेल्या रक्कमेची व्यवस्था त्यांनी अडीअडचणी कामात येतील म्हणून साठवलेल्या पैशातून केली. निनादला भेट देण्यासाठी त्यांनी एक छान स्मार्टफोन घेतला.

स्मार्टफोन पाहून निनादला खूप जास्त आनंद झाला. निनादचे गिफ्ट निनादला देताना त्याचे बाबा म्हणाले ...

निनाद तुझ्या यशाबद्दल माझ्याकडून तुला ही भेट. बाळा , ही भेट तु तुझ्या कष्टाच्याबळावर मिळवली आहे. मी देखील तुला ही भेटवस्तू घेण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. आपल्या दोघांच्याही कष्टाची किंमत विसरू नकोस. दिलेल्या भेटवस्तूचा योग्य वापर कर. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेतच.

जिल्ह्यातून प्रथम आल्यामुळे शहरातील सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये निनादला ऍडमिशन मिळाली. नवीन मोबाईल मिळाल्यामुळे निनाद देखील खुश होता. कॉलेजमध्ये नवीन मित्रांसोबत त्याची गट्टी झाली. जिल्ह्यातून प्रथम असल्यामुळे निनाद खूप स्कॉलर विद्यार्थी आहे असे संपूर्ण कॉलेजला माहिती होते.

नवीन मित्रांसोबत मैत्री करत , नवीन वातावरणात जुळवून घेत निनादच्या रंगीबेरंगी अश्या कॉलेज लाईफची सुरुवात झाली.

निनाद आधीपासूनच हुशार त्यामुळे अकरावीच्या वर्षातपण पहिले सहा महिने तो वर्गात प्रथम स्थानावरच होता.

पण कॉलेज लाईफ मुळात असतेच भुरळ पडणारे ..निनाद बाबतीत देखील तसेच काहीसे झाले. हळूहळू मात्र त्याचे लक्ष मोबाईल , मित्रांसोबत मूवी ,तासनतास गप्पा करणे अश्या गोष्टींमध्ये भरकटू लागले. त्याचे मित्र देखील अश्याच गोष्टी करण्यासाठी त्याला प्रोत्साहित करू लागले. अर्थातच कोणी कितीही सांगितले तरी प्रत्येक निर्णय आपण योग्य विचार करूनच घ्यायला हवा पण निनादची निर्णयक्षमता मात्र याचवेळी कमकुवत ठरली होती. योग्य अयोग्य हे ऐव्हाना त्याला कळेनासे झाले होते.

कुठेही जायचा प्लॅन असला की निनादने नाही म्हटले तरी त्याचे मित्र म्हणायचे ..

अरे just chill ..scholar ..अरे अकरावी म्हणजे relax year .... ऐवढे वर्ष कर मस्त पैकी enjoy ...पुढच्या वर्षी अभ्यासच करायचा आहे.

या सगळ्या गोष्टीमुळे निनादचे अभ्यासातले संपुर्ण लक्ष भरकटले आणि दहावीत जिल्ह्यातून प्रथम येणारा, अकरावीच्या पहिल्या सहामाहीच्या परीक्षेत कॉलेजमध्ये प्रथम येणार निनाद अकरावीच्या वार्षिक परीक्षेत अगदी काठावर पास झाला. सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचे हसू झाले. कॉलेजमधील सरांनी निनादला केबिन मध्ये बोलवून सांगितले.

अकरावीचे वर्षे इतके हलक्यात कसे घेतले तु निनाद ... तुझा आधीचा परफॉर्मन्स चांगला होता म्हणुन आम्ही तुला ओरल एक्साम मध्ये जास्त मार्क्स देऊन पास केले आहे ...तुझ्यासारख्या स्कॉलर मुलाकडून मला ही अपेक्षा मुळीच नव्हती.

या अपयशामुळे निनाद पुरता खचला होता. त्यावेळेस निनादच्या बाबांनी त्याला समजावले ..

बाळ निनाद , कष्ट हे आयुष्यभर करावे लागतात , एकदा यशस्वी झालो म्हणूनच यश आपला पाठलाग करेल असे होत नाही. आपल्यालाच सतत यशाचा पाठलाग करावा लागतो तरच यश आपली सोबत करते. असो , हे अपयश म्हणजे तुझ्या आयुष्यातील एक खडतर वळण आहे असे समज.. आणि या वळणावर तु स्वतःला कसा सावरतोस हे तुझे तूच ठरव ... निराश होऊ नकोस. पुन्हा जिद्दीने उभा राहा आणि यशस्वी हो.

झालेल्या गोष्टीवर लक्ष देणे सोडून निनाद पुन्हा जिद्दीने उभा राहिला. पुन्हा एकदा त्याने मेहनत करायलाच सुरुवात केली. पूर्वीपेक्षा जास्ती जोमाने तो अभ्यासाला लागला. मोबाईल , टीव्ही अश्याच सगळ्या गोष्टींचा निनाद फक्त कामापुरता वापर करू लागला. 

निनादच्या या जिद्दीला यश आले आणि पुन्हा एकदा बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला. मेडिकल एंट्रन्सच्या परीक्षेत तो सगळ्यात जास्त गुण मिळवून संपूर्ण राज्यभरात प्रथम आला. पुन्हा एकदा त्याचा कौतुकसोहळा आपल्या डोळ्यात साठवण्याचे सौभाग्य त्याच्या आईबाबांना लाभले.

निनादच्या कॉलेजतर्फे त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. निनादच्या यशाचे गमक नेमके काय आहे ? हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा होती म्हणूनच त्याचे मनोगत मांडण्यासाठी त्याला स्टेजवर आमंत्रित करण्यात आले.

निनाद बोलु लागला ...

आजच्या माझ्या या यशाचे संपुर्ण श्रेय आहे ते माझ्या आई आणि बाबांचे ...

दहावीत चांगले मार्क्स मिळाले म्हणूनच जरा हवाच गेली होती माझ्या डोक्यात .. सुखाचे वळण होते ते ..त्याला तिकडे सोडून मी माझ्या लक्षापासून पूर्णतः दुर झालो आणि अकरावीच्या परीक्षेत नापास होण्याची वेळ आली. हे वळण मात्र खडतर वळण होते. या वळणावर मात्र माझ्या आईबाबांच्या मदतीने मी पुन्हा जिद्दीने उभा राहिलो आणि हे यश प्राप्त करू शकलो.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख अशी दोघेही वळणे येतात. मात्र सुखाच्या वळणावर मोहून जाऊ नये आणि दुःखाच्या वळणावर आपले धैर्य कधीही गमावू नये त्यामुळे दोघीही वळणे सुखकर होतात. आयुष्यात कुठलेही वळण आले तरी त्या वळणावरून चालताना मात्र जपूनच चाला ...तरच आयुष्याची वाट सुखकर होइल.... !

वरील कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा  👇

Velvet kavisha - वेलवेट कविशा 

फोटो साभार - pixels

✍©️ जया पाटील