साहित्य चोर आणि वैताग
© Velvet Kavisha
"ज्याअर्थी एखाद्या लेकराला बेंबी दिसतेय याचा अर्थ त्याच्यासाठी 'माय व्यायलेली आहे...नाळ जोडल्याची खुण असते ती..." शब्दांचं ही तसंच काहीसं. ज्याअर्थी शब्द दिसतात त्याअर्थी त्याचा निर्माता असेलच ना...
साहित्यचोरांचं असं झालयं ना की, लेकरू कोणाचं माहिती नाही आणि छान दिसलं म्हणून घरी घेऊन आलो.... स्वतःचं नाव दिलं. सगळीकडे मिरवून घेतलं. मग लेकराची आई शोधत आली आणि लेकराचा आणि तिचा डीएन match झाला. कायदेशीर कारवाई वगैरे झाली. लेकराची आई लेकराला घेऊन गेली. आता हे चोर "नाम तो हुआ पर बदनाम हो के" असे. अशावेळी चोर काय सांगणार की "पोरगं बरं दिसलं, संगोपन झालेलंच होतं, आवडलं म्हणून आणलं घरी.." ज्याअर्थी लेकराला बेंबी आहे याचा अर्थ त्याची नाळ जोडलेली जन्मदात्री आहे. हे कसं विसरतात लोकं.?? किती तो प्रसिध्दीचा हव्यास...🤦🤦
माझा एक लेख खुप व्हायरल झालेला. काही ठिकाणी नावासहित, काही ठिकाणी निनावी तर काही ठिकाणी एका स्त्रीने स्वतःच्या नावे खपवलेला. एका ग्रुपमध्ये एका मैत्रिणीला दिसला. तिने कळवलं. मी ग्रुप जॉईन करून तिथे गेले. बाईंना समज दिली..
"पोस्ट एडिट करून लेखिका म्हणून माझं नाव लिहा खाली. हा लेख माझा आहे.." मी
"काय फरक पडतो..??? तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचतात ना...?? मग झालं तर...!!" ती
"अहो पण माझ्या लेखाखाली लेखिका म्हणून तुम्ही तुमचं नाव लिहिलंय...त्याचं काय.?? " मी
"त्यात काय झालं... तुमचे आणि माझे विचार जुळलेत.. सेम टू सेम... कथा पण सेम माझीच आहे. म्हणून माझं नाव लिहिलं मी त्याखाली.." ती.
च्यायला हे म्हणजे अतीच झालं ना राव. मला राग येतो. आणि राग आला की मी उच्चप्रतीच्या शिव्या आणि meaningless काहीही बोलू शकते. I can't control myself...
" अग बाई हे तुझं म्हणणं असं झालं ना की, माझा नवरा सेम तुझ्या नवऱ्यासारखा दिसतो म्हणून मी ××××× ×××× ×××××" मी तावातावात...
पण बाई निगरगट्ट. माझीच उलटतपासणी..
"हा लेख तुमचाच आहे कशावरून...?? काय पुरावा आहे तुमच्याकडे..?? " ती.
या चोरांचा असा ××फाडू confidence पाहिला ना की, एक तीव्र सणक मस्तकात जाते माझ्या.
"बयो हा लेख तुझा आहे त्याचा पुरावा दे. अन्यथा साहित्यचोरीच्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करेन. ग्रुपच्या admins सहित तुझ्यावर..." मी.
कमेंटला report to admin करून दिलं. झालं. Admins ने त्वरीत पोस्ट डिलीट करून समज दिली. त्यानंतर जिथे जिथे तिच्या नावाची पोस्ट दिसली तिथे तिथे admin ला सांगून डिलीट करवून घेतली. लिखाण राहिलं बाजूला आणि हे नसते उद्योग माझ्या मागे..
त्यानंतर बऱ्याच ठिकाणी साहित्यचोरीचे प्रकार सापडले. काहींनी तर कधी लेखकाचे नाव घेऊन तर कधी नाव न घेता फक्त त्यांचे लेख घेऊन विडिओ वगैरे बनवून स्वतःचं युट्युब चॅनेल चालवलेत. त्यांना समजवताना अगदीच मेटाकुटीस यायला होतं...
"अहो, तुम्ही माझ्या कथेवर माझी परवानगी न घेता विडिओ बनवून तुमच्या कमर्शियल चॅनेलवर अपलोड केलाय.." एक लेखिका मैत्रिण..
"मग त्यात वाईट काय आहे..?? तुम्हाला आम्ही प्रसिद्धी देतो. तुमचंचं नाव होईल ना त्याने." युट्युबर.
"अहो पण तुम्ही माझी परवानगी घेतली नाही. माझं नाव ही नाही घेतलं विडिओत."..लेखिका.
"तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा खुप प्रयत्न केला पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही..." युट्युबर.
हे लोकं फार बेरकी असतात. "तुम्हांला तुमचं लिखाण इतकं प्रिय आहे तर मग सोशल मीडियावर का टाकता...??" असे ही प्रश्न निर्लज्जपणे विचारण्याची त्यांची बौध्दिक कुवत असते.
हे म्हणजे असं झालं ना की, चोर तो चोर आणि वर शिरजोर... मानधन तर तुम्ही देतच नाहीत पण निदान लेखिकेला श्रेय तरी द्या...
काही खतरनाक चोर..
प्रकार १ - एखाद्या लेखिकेचा लेख उचलायचा. तिने स्त्री लीड दाखवली असेल तर तिथे पुरुष लीड दाखवायचा. क्रियापदे बदलायची की झालं.
प्रकार २ - कथा उचलायची. कथेत चार माणसांच कुटुंब असेल तर सहा माणसांचं कुटुंब दाखवायचं.. खाली स्वतःचं नाव लिहिलं की एक लेखक तयार झाला...
प्रकार ३ - सोशल मीडियावर फार जुन्या रचना कोणीतरी नवोदितांनी केलेल्या उचलायच्या. त्याखाली एखादं दुसरी ओळ add करायची की पुन्हा कवी/कवयित्री तय्यार.....
प्रकार ४ - चारोळीकार चोर... लोकं चंद्रकांत गोखलेंची चारोळी स्वतःची म्हणून पोस्टतात तेव्हा हद्द होते रावं....
प्रकार ५ - अनुवादक चोर... हिंदी/इंग्रजीमधून quotes उचलायचे त्याचा मराठी अनुवाद करायचा आणि फेकून मारायचा वाचकांच्या तोंडावर...
एका बहाद्दराने माननीय लेखक शिवाजी सावंत यांची मृत्यूंजय कादंबरी टायपून एका ऍपवर पोस्ट केलेली पाहून "याची देही याची डोळा" झालं माझं.
कठीण आहे रावं अशा विचारांचं....हद्द झाली.... काय करावं...🤦🤦
इतक्या उठाठेवी कशाला हव्यात पण... साहित्यचोरी हा दखलपात्र गुन्हा आहे हो... हे ही लक्षात घ्यायला हवं ना..
परवा एकच quote नऊ मैत्रिणींच्या स्टेटसला होता. एकीला कोणीतरी फॉरवर्ड केलेला. तिच्या स्टेटसला पाहून माझ्यासहित प्रत्येकीने एकमेकींकडून मागवून घेतले होते. चार पाच मैत्रिणींशी बोलणं झाल स्टेटसवरून.. तेव्हा ठरवलं यापुढे कितीही quote, सुविचार, एखादा लेख आवडला तरी त्याखाली author चं नाव असेल तरच फॉरवर्ड करायचा किंवा स्टेटसला ठेवायचा... आपल्यापासून सुरुवात करायची...
काही नियम घालूनच घेतलेत स्वतःला.
• कोणताही quote, रचना, कथा सगळ्यात आधी आम्ही आमच्या वॉलवर पोस्ट करतो. जर स्वतःचं पेज असेल तर त्यावर... नंतर इतर ठिकाणी. सध्या स्वतःचा ब्लॉग असल्याने सर्वात आधी ब्लॉगवर पोस्ट करून लिंकसहित शेअर करतो.
• चारोळ्या किंवा कविता लिहिताना एखाद्या चित्रावर लिहायची. त्यावर आपल्या नावाचा "वॉटरमार्क" टाकायचा.
• कविता, चारोळी किंवा कथेसाठी चित्र गुगलवरून घेतलं असेल तर "फोटो गुगल साभार" असं आवर्जून लिहायचं...किंवा pixabay/pixel सारख्या साईटवरून फ्री इमेजेस घ्यायच्या...
• लेख/कथा लिहिताना कथेच्या नावाखाली लगेचच (©) कॉपीराईटचं चिन्ह टाकून स्वतःचं नाव लिहायचं..
• कथेच्या शेवटी, "सदर साहित्याचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही. निनावी किंवा स्वतःच्या नावाने शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कॉपीपेस्ट लिहून निनावी शेअर करू नये" अशी प्रेमळ टीप लिहायची.
आता हे सगळं करूनही चोरी होतेच आहे. त्यासाठी आम्ही मैत्रिणींनी ब्लॉग काढून त्यावर लिहायचं ठरवलं आणि पोस्ट करताना लिंकसहित शेअर करतो. त्यामुळे आमच्यापुरता तरी आम्ही हा प्रश्न मार्गी लावलाय असं वाटतं.
तुमचं लिखाण वाचनीय असेल तर वाचक खुप आवडीने वाचतात. काही वाचक तर लक्षात ठेवून चोरांना सांगतात की हा लेख/रचना तुमची नाही. वाचकांचं प्रेम हेच एक समाधान. बाकी चोरांची लंगोटी उलटीच. ते नवीन नवीन क्लुप्त्या काढतातच...
बाब्बो... खुपच लिहिलंय पण अगदी मनापासून. सकारात्मक विचारांचं स्वागतच.. माझं लिखाण किंवा मुद्दे आवडले नाहीत तर वाद नका घालू. तुमची मतं तुमच्याकडे आणि माझी माझ्याकडे... बाकी तुम्ही सूज्ञच...
ता.क. मी अतिशहाण्यांच्या नादी लागत नाही...
सूचना:- वरील लेख तुम्हांला आवडणार. मग तो तुम्ही शेअर करणार. भारी वाटतं रावं. फक्त नावासहित शेअर करण्याची तसदी घ्या. बाकी उपकार नकोत. परोपकारात मग कायदेशीर कारवाई करावी लागते... आणि मी अजून एकदाही कोर्टाची पायरी चढलेली नाहीय.. तुमच्याकडून ते पुण्यकाम नको....
वाचकांचे खुप मनापासुन आभार. तुम्ही वाचून प्रतिक्रिया देता म्हणून लिहिण्यास प्रोत्साहन मिळतंय... धन्यवाद तुम्हां सर्वांचे. असेच प्रेम असू द्या...🙏🙏
© Velvet kavisha
फोटो गुगलवरुन साभार.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box