वाटणी .. एक हृदयस्पर्शी कहाणी

 वाटणी .. एक हृदयस्पर्शी कहाणी

✍©️जया पाटील 



विनायकराव एका सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत होते. विजय आणि नितेश अशी दोन संस्कारी मुले आणि सुलक्षणी पत्नी रमा असा त्यांचा चौकोनी सुखी परिवार होता. 


मोठा भाऊ विजयचा लहान भावात म्हणजेच नितेशमध्ये खूप जीव होता. विनायकराव अथवा रमाताई प्रत्येक वेळेस मुलांना खाऊ आणत असत. त्यावेळेस आपल्यातला देखील अर्धा हिस्सा विजय नितेशला देत असे.  


विजयला त्याचे आईबाबा नेहमी सांगत ..


अरे विजू , आम्ही दोघेही तुला आणि नितुला सारखाच खाऊ आणतो तरी देखील तु तुझ्यातला अर्धा खाऊ त्याला का देतोस...? तुझ्या वाट्याचा खाऊ तूच खात जा बेटा ....


विजय सांगायचा .. , आईबाबा नितु माझा धाकटा  भाऊ आहे , माझ्यापेक्षा लहान आहे .. माझा अर्धा खाऊ त्याने खाल्ला त्याने काय असा मोठा फरक पडतो ... मला आनंदच होतो याचा .. त्याचे लाड मोठा भाऊ म्हणुन मी नाही पुरवणार तर आणखीन कोण पुरवेल ?


विनायकराव आणि रमाताईंना विजयच्या या समजदारीचे अप्रूप वाटायचे .. तशीच चिंता देखील वाटायची .. पोराच्या अश्या  साध्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणजे झालं .


हळूहळू वेळ पुढे जात होता. विजय आणि नितेश दोघेही मोठी झाली. विजय ग्रॅजुएशन करून एका छोट्याश्या नोकरीला लागला होता. नितु इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. 


विनायकरावांनी विजयसाठी वधूसंशोधनाला सुरुवात केली. जवळच्या नात्यातील अगदीच साधारण कुटुंबातील पितृप्रेमाला पारखी असलेल्या अनुराधाला त्यांनी विजय साठी पत्नी म्हणुन निवडले. विजय आणि अनुराधाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडला.  


अनुराधा अतिशय सद्गुणी आणि मधाळ स्वभावाची होती. लहानपणीच पितृछत्र हरविल्यामुळे विनायकरावांच्या रूपात तिला तिचे वडील पुन्हा गवसले होते. अनुराधा खूप मनापासून विनायकराव आणि रमाताईंची सेवा करत असे. नितेश देखील वहिनीचा खूप लाडका होता. अनुराधाच्या मनमिळाऊ स्वभावावर घरातील सगळेच खूप खुश होते.  


लग्नानंतर काही दिवसांनी ह्रिदयविकाराच्या झटक्यामुळे अनुराधाच्या आईचे निधन झाले. ती पूर्णतः पोरकी झाली परंतु विनायकराव आणि रमाताईंनी तिला तिच्या आईबाबांची कमी कधीच  भासू दिली नाही. घरातील लोकांच्या प्रेमामुळे ती लवकरच तिच्या दुःखातून सावरली.  


विजय आणि अनुराधाच्या संसारवेलीवर नवीन फुल उमलले. उभयतांना एक गोड मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव ' यश 'असे ठेवले. 


नितेशचे देखील इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण झाले. एका मोठ्या कंपनीत त्याला चांगली नोकरी मिळाली. त्याचाही सुशिक्षित आणि चांगल्या नोकरीला असलेल्या साक्षी सोबत विवाह झाला.


साक्षी मात्र अनुराधा इतकी समजदार नव्हती. अनुराधाने आईबाबांचे केलेले काम तिला पुढेपुढे वाटायची. सगळ्यांना घालूनपाडून बोलणे , मनमानी करणे हा तिचा स्वभावच होता. नवीन नवीन नितेश तिला खूप समजवायचा परंतु नंतर मात्र गोड बोलून साक्षीने नितेशला पण स्वतःच्या बाजूने वळवून घेतले.


घरात पैसे खर्च करताना देखील साक्षी कायमच आवरता हात घ्यायची. विजय आणि विनायकराव दोघांच्याही ही गोष्ट लक्षात यायची परंतु घरात वाद नको म्हणुन ते गप्प बसायचे.

 

एक दिवस रमाताईंनी साक्षीकडे घरखर्चाला थोडे पैसे मागितले.तिनेच लगेच रमाताईंसोबत वाद घालायला सुरुवात केली.


साक्षी बोलू लागली ..


आई , तुम्ही नेहमीच घर खर्चाला नितेश आणि माझ्या कडून पैसे मागतात ..? विजय भाऊजींकडून तर तुम्ही कधीच पैसे मागत नाही ...? असा फरक का करतात तुम्ही ...?


रमाताई म्हणाल्या , असे काहीच नाही गं ... साक्षी


तुझा काहीतरी गैरसमज होतोय .. अगं विजय देखील घरासाठी खर्च करतोच गं ..पण तुम्ही दोघेही कमावते आहात , नितेशचा पगार पण चांगला आहे , आणि विजयला पैश्यांची अडचण होती या महिन्यात म्हणून फक्त याच महिन्यात  तुझ्याकडून थोडेसे जास्त पैसे मागितले मी ...


साक्षी पुन्हा बोलु लागली ...


अच्छा , म्हणजे आम्ही दोघेही कमवतो .. म्हणुन मग आम्ही फक्त हा घरखर्च करत बसू...? आम्हाला आमचेही काही आयुष्य आहे की नाही ? आम्हालाही आमचे आयुष्य एन्जॉय करण्याचा अधिकार आहे पण तुम्ही लोक आम्हाला काही करू देणार तर ना ...


रमाताईंनी साक्षीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तुझा गैरसमज होतोय असे तिला पुन्हा पुन्हा समजावले परंतु साक्षी मात्र काहीही ऐकायला तयार नव्हती.


तिने खूप वाद करत वेगळे राहायचे ठरवले. नितेशने देखील या बाबतीत तिला साथ दिली. सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी करावी अशी मागणी तिने केली. 


विनायकराव , विजय ,अनुराधा , रमाताई सगळेच या गोष्टीमुळे खूप दुःखी झाले परंतु आता नात्यांमध्ये आणखीन दुरावा नको म्हणुन सगळ्यांनी साक्षीची मागणी मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रॉपर्टीची वाटणी करायचे ठरवले. नात्यांमध्ये अजूनच कटुता नको म्हणुन विनायकरावांनी साक्षी आणि नितेशची मागणी मान्य केली.  


दुसऱ्या दिवशी सकाळी वाटणीची बैठक आपण करूया आणि कायदेशीर रित्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से करूया असे विनायकरावांनी सांगितले.


त्या रात्री साक्षी नितेशला म्हणाली ....,


नितेश, तु म्हणतोस ना .. माझा भाऊ खूप चांगला आहे .. मला त्याच्या हिस्सातले अर्धे तो कायम देतो .. उद्या त्याच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हिस्सा मागुन पहा ..म्हणजे तुझ्या दादाचे खरे रूप तुझ्या समोर येईल ... 


दुसऱ्या दिवशी वाटणीची बैठक सुरु झाली. विनायकरावांनी घर , शेती आणि इतर गोष्टींची दोघीही मुलांना सारखी वाटणी करून दिली.  


मग नितेश बोलु लागला ... 


विजू दादा .., तु नेहमी म्हणतोस ना .. 


नितु .., माझे जे काही आहे सगळेच अर्धे तुझेच आहे.. माझा तुझ्यात खूप जीव आहे ..मग दे तुझ्या वाट्याला आलेल्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा मला ....


मला देखील पहायचे आहे ..तुझा माझ्यात खरेच जीव आहे की हे सगळे नाटक होते ...


नितेशच्या बोलण्याचा सगळ्यांना खूप धक्का बसला.


विनायकराव त्याच्यावर ओरडले ...


प्रॉपर्टीची वाटणी मी केलीय ..तु असे कसे बोलु शकतोस ... नितेश.. ?


विजय मात्र खूप शांत उभा होता. त्याने विनायकरावांना शांत केले आणि तो नितेशला म्हणाला ... 


नितु , एका प्रॉपर्टीच्या तुकड्यासाठी तु माझ्या प्रेमाची परीक्षा घेतोय .. माझ्या प्रॉपर्टीचा पण अर्धा हिस्सा मी तुझ्या नावे करतोय ..


विनायकराव विजयला मधेच थांबवत म्हणाले ..


अरे विजू , अनुराधा आणि यशचा तर विचार कर , अनुराधाचे मत विचार . 


अनुने केव्हाच खुणेने होकार कळवला आहे मला बाबा , विजय म्हणाला.


नितेश पुढे बोलु लागला ...  


प्रॉपर्टीचे तर झाले आता आईबाबांचा प्रश्न आहे ..

सहा महिने तु आणि सहा महिने मी ..असे त्यांना  सांभाळू वाटणीच्या नियमाप्रमाणे  ..आणि त्या काळातला खर्च ज्याच्याकडे आईबाबा असतील तो करेल.


अरे ..पण दादा .... यातला पण अर्धा भाग म्हणजे माझ्यातले पण तीन महिने आईबाबांना तु सांभाळायचे ..


विनायकराव आणि रमाताईच्या डोळ्यात अश्रुंच्या  धारा होत्या. आईवडिलांची देखील वाटणी झाली होती. त्यांना स्वत:चे घर सोडून जाण्याची वेळ आली होती. आता त्यांचे लक्ष विजयच्या बोलण्याकडे लागून होते.


विजय बोलु लागला ... 


नितु माझे तुझ्यावर खूप जास्तच प्रेम आहे ... त्यामुळे आईबाबांची वर्षातील बाराही महिने सांभाळण्याची जबाबदारी मी घेतो .. त्यांचा सगळा खर्च देखील मीच उचलतो... 


माझ्या इतकेच हे घर आजही तुझे देखील आहे ..त्यामुळे ज्यावेळेस तुला आईबाबांना भेटावे वाटेल त्यावेळेस तु इथे येऊन त्यांना भेटू शकतो , इथे हवे तितके दिवस राहू शकतो. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमच उघडे असतील.


झालेल्या वाटणीतील सगळे साहित्य घेऊन नितेश आणि साक्षी दुसरीकडे राहायला निघुन गेले. त्यांनी एक मोठे घर विकत घेतले. घरातील सगळ्याच वस्तु आलिशान होत्या. त्यांना एक गोड मुलगा झाला.  त्यांनी त्याचे नाव ' अखिल ' असे ठेवले. नितेश अतिशय अलिशान जीवन जगत होता. पैशात मोजता येणारी सगळी सुखं होती त्याच्याकडे .


इकडे विजयवर इतक्या जबाबदाऱ्या असल्यामुळे तो साधारण आयुष्य जगत होता परंतु तरीदेखील अनुराधा, विजय दोघेही खूपच खुश आणि समाधानी होते. 


समाधानी असणारच ....!


घरातील मोठयांचे प्रेम , आशीर्वाद सगळेच त्यांच्या पाठीशी होते. यश नंतर अनुने एका गोड मुलीला जन्म दिला. तिचे नाव त्यांनी ' ईशा ' असे ठेवले. मुले मोठी होत होती. सगळे काही छान चालू होते.


विजयचा पगार कमी असला तरी तो खूप समाधानी होता. त्याची मुले यश आणि ईशा दोघीही अगदी हुशार आणि गुणी होती.

मोठ्यांचा आदर करणे , पैश्यांची काटकसर करणे. (काटकसर म्हणण्यापेक्षा पैश्यांचा योग्य वापर करणे असे म्हणणे मला जास्त योग्य वाटते ) असे एक ना अनेक चांगले गुण यश आणि ईशा मध्ये होते. 


इकडे नितेशचा मुलगा अखिल मात्र पूर्णपणे विरुद्ध होता. नितेश आणि साक्षी दोघेही त्यांच्या जॉब मुले त्याला वेळ देऊ शकत नसत परंतु त्याला हवी ती वस्तु मात्र त्याला लगेच मिळत असे. अखिल मोठा होत होता तश्या त्याला अनेक वाईट सवयी लागल्या. तो सतत निलेश आणि साक्षीकडे पैश्यांची मागणी करत असे. पैसे मिळाले तर ठीक नाही तर खूप वादावादी करत असे.  


एक दिवस अखिलने नितेश कडे पैसे मागितले परंतु नितेशने दिले नाहीत तर अखिल तावातावात घरातून निघुन गेला. त्याचे मित्र पण चांगले नव्हते. त्यांच्या सोबत त्याने खूप दारू पिली आणि घराकडे जाण्यासाठी निघाला. अर्धवट शुद्धीत असल्यामुळे अखिलला स्वतःचा तोल देखील सांभाळता येत नव्हता. नेमका त्याच वेळेस यश त्याच्या मित्राकडून घरी जात होता. यशने अखिलची अवस्था पहिली आणि अखिलला घरी सोडण्यासाठी तो त्याच्यासोबत घरी निघाला.


नितेश आणि साक्षी दोघेही खूप काळजीत होते. सायंकाळपासून अखिलचा काहीच तपास नसल्यामुळे ते दोघेही खूप काळजीत होते. यश अखिलला घेऊन नितेशच्या घरी आला.  


अखिलची अवस्था पाहून नितेश खूप चिडला आणि त्याला या गोष्टीचा जाब विचारू लागला. अखिल मात्र नितेश सोबतच वाद घालू लागला, आपल्या मुलाची अशी वागणूक पाहून नितेशने त्याच्यावर हात उगारला परंतु त्याआधीच अखिलने नितेशचा हात अडवला आणि नितेशचा खूप अपमान केला. अखिल साक्षीचे देखील काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता.


अखिलने धक्काबुक्की करून आपल्याच आईबाबांना घराबाहेर काढले. त्यावेळेस यशने मात्र त्यांना सावरले. त्यांची खूप काळजी घेतली. यशची समजदारी आणि वागणूक पाहून नितेश आणि साक्षीला स्वतःच्या मुलाच्या वागणुकीची लाज वाटू लागली.


यश नितेश आणि साक्षीला घेऊन आपल्या घरी आला. विजयला पाहताच नितेश त्याला धरून रडू लागला. विजयने नितेशला आधार दिला. अनुराधाने रडणाऱ्या साक्षीला समजावले , तिला मायेने कुरवाळले. नितेश आणि साक्षी दोघांनाही आपल्या वागणुकीचा पश्चताप झाला होता. ती दोघेही घरातील सगळ्यांची , विजय आणि अनुराधाची माफी मागत होते.  


विजय, अनुराधा आणि आईबाबांनी नितेश आणि साक्षीला मोठ्या मनाने माफ केले. यशने अखिलचे वागणे सगळ्यांना सांगितले. त्यावेळेस एकुलत्या एका मुलाच्या अश्या वागणुकीमुळे नितेश पुन्हा एकदा हताश झाला. 


त्यावेळेस विजयने त्याला विश्वास पटवून दिला की आपण सगळेजण मिळून आपल्याला प्रेमाच्या आणि समजुतीच्या आधारे त्याला नक्कीच सुधारू. आपले प्रेम आणि आपली एकता आपल्या अखिलला परत आणण्यास आणि सुधरवण्यात नक्कीच यश देईल याची मला खात्री आहे.  


वाचकहो, वाटणी ही फक्त पैश्याची होत नसते. पाप-पुण्य आणि नीतिमूल्यांची देखील होते असते. आपल्या चांगल्या वागण्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते आणि आपली नसलेली , दुसऱ्या कुणाच्या वाट्याची घेतलेली कुठलीही वस्तु आपल्याला कधीच सुखी करू शकत नाही.


भागवत कथेत याबद्दल एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे.


गुरुवर्यांच्या आश्रमात श्रीकृष्ण आणि सुदामा ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस एकदा गुरुमातेने त्यांना लाकडे तोडण्यासाठी वनात पाठवले. येण्यास उशिर होणार त्यामुळे वाटेत खाण्यासाठी गुरुमातेने श्रीकृष्ण आणि सुदामा दोघांना चणे सोबत दिले.


दोघांनीही खूप मेहनत करून लाकडे गोळा केली. आराम करण्यासाठी दोघेही झाडाखाली विश्राम करण्यासाठी थांबले. श्रीकृष्णाला झोप लागली. सुदामा मात्र जागे होता. त्याला खूप भूक लागली होती. सुदामाने चणे खायला सुरुवात केली. त्याच्या वाट्याचे चणे खाऊन झाल्यावर सुदामाने विचार केला अजून थोडेसे खातो. कान्हाला थोडेसे उरतील असे म्हणुन त्याने पुन्हा थोडेसे चणे खाल्ले , असे करता करता संपूर्ण चणे सुदामाने फस्त केले. 


श्रीकृष्ण झोपेतून उठल्यावर सुदामाकडे चणे मागू लागले त्यावेळेस चणे संपले असे सांगून सुदामाने श्रीकृष्णाची माफी मागितली. श्रीकृष्णाने सुदामाला मोठ्या मनाने माफ केले आणि घडलेली गोष्ट गुरुवर्य आणि गुरुमातेला सांगू नकोस असे सुदामाला बजावले.  


गुरुवर्यानी मात्र घडलेल्या गोष्टीला अंतर्ज्ञानाने जाणले आणि गुरुवर्य गुरुमातेला म्हणाले...


सुदामाने आज श्रीकृष्णाच्या वाट्याचे चणे खाऊन आपल्या स्वतःच्या नशिबी दारिद्र्य लिहिले आहे. 


सांगायचे तात्पर्य एकच .. की कुणाच्याही वाट्याचे धन असू दे , अन्न किंवा इतर मौल्यवान वस्तु आपण ज्यावेळेस अन्याय करून त्या आपल्या वाट्याला घेतो त्या गोष्टीचे पूर्णतः सुख आपण कधीही उपभोगू शकत नाही.


समाप्त .. !


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ....!


अशीच नवीन रोमँटिक कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

घायाळ मी हरिणी .. सख्या रे ..


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 
















Post a Comment

0 Comments