"देव सहज भेटतो मला...!! "© Velvet Kavishaतसं सणासुदीला उपवास वगैरे जरा लांबचीच गोष्ट तिच्यासाठी... लंघन काय,,, ती एकाला तीन दिवसही करते... फक्त ताक किंवा मुगडाळीचं पाणी पिऊन. डॉक्टरांच्या सल्ल्याने...तर्रर्रर्र--- कोरोनामुळे त्यांना पहाटे लवकर उठायची सवय झालीयं... रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे साडेआठला सगळे उठणार म्हणजे उठणारचं....आज एकादशी. पण तिच्या लक्षात ही नाही. नेहमीप्रमाणे उठली. त्याच्यासोबत खिडकीत बसून चहा बिस्कीटं खावून झालं. दिवसाची सुरुवात छान झाली.दोन दिवसापूर्वी खिचडीसाठी भिजवलेला साबुदाणा उरला होता फ्रीजमध्ये. नाश्त्याला साबुदाणा वडे आणि चटणी करायचे ठरले... बनलेही छान...भरपेट नाश्ता झाला तसं तो म्हणाला- "आज उपवास करायला हवा होता गं. इतके भारी बनलेत वडे ना... एकादशी सार्थ झाली असती""आज एकादशी आहे का?? आधी का नाही सांगितलंस तू..?? " ती"अग मलाही आताच सगळ्यांच्या स्टेटस् वरून कळलंय... या लॉकडाऊनमुळे तारीख, वार काही लक्षात राहत नाही... whatsapp status पाहून तरी कळतं... हा हा हा..." तो." बरं. बरं. हे बघ, सकाळी आपण चहासोबत खाल्लेली दोन बिस्कीटं विसरायला तयार असशील तर उपवास करु शकतो..." ती म्हणाली." चालेल. चालेल. तसंही वातावरण दमट आहे. पोटाला आराम द्यायची गरजच आहे... करु उपवास" त्यालाही पटलं.उपवास म्हटलं की, फळं, रताळी, उपवासाचा चिवडा, वेफर्स, दही, ताक असं सगळं लागतच ना...!! शोधून शोधून काहीच न मिळाल्याने भगर, बाकीच्या वस्तू आणि फळं घेऊन ती घरी आली."रताळी काही कुठेच मिळाली नाहीत. भगर आणि फळं आणलीत." तिने सांगितले..." का गं... उपवास करतेस का..??" सासुबाई." हो आई. दोघांचाही आहे. सकाळी बिस्कीट खाल्ली ते विसरून." तिने म्हटलं."अगं हा पण काही बोलला नाही. तु खाली गेलीस तर मी कुकर लावून घेतला. हा उपवास उद्या दुपारी सुटेल. अन्न वाया जाईल. त्यामुळे आज नका करु उपवास. आज घ्या जेवून..." सासुबाई म्हणाल्या.आता झालं काय की... उपवास करायचा ठरल्यानंतर ती खाली उतरली तेव्हा सासुबाई आंघोळीला गेलेली. त्यामुळे सांगितलंच नाही. आणि सगळ्या वस्तू शोधाशोध करून, एक मीटरचं अंतर मेंटेन करत, लाईनमध्ये उभं राहून तिने खरेदी आटोपली. एक तासाने घरी आली, तोपर्यंत कुकर झालेला..."अरे देवा..!! आई यांनी सांगितले नाही ना तुम्हांला.. बसले असतील लॅपटॉपमध्ये डोकं घालून... सांगून गेलेले त्यांना." तिने सांगितले.त्याला कळलं.. 'कुछ तो गडबड हो गयीं दया.!! आता सावरायला हवं, नाहीतर घरची स्त्री संघटना तुटून पडेल आपल्यावर.'तो समजुतीच्या सुरात म्हणाला-- "हरकत नाही आई. आज जेवतो. उपवास काय उद्याही करु शकतो. हो की नाही गं "मग काय कुकर तर झालेलाच होता. बाकीचं जेवणही यथासांग बनलं. त्यांच्या आवडीचे पदार्थ ते नेहमीच खातात.... तसेच खाल्ले. उद्या उपवास करायचा आहे असं स्वतःला समजावून...मैत्रिणी तिला नेहमी म्हणतात की साधा आषाढी एकादशीला उपवास करु शकत नाहीस काय..?? .. काय सांगणार त्यांना ती -- तिला किती उत्साहात उपवास करायचा असतो. पण घडूनच येत नाही म्हणून.....देवाची इच्छा दुसरं काय..😜😜मला तर तिच्या सासुबाईच आवडल्या ब्वॉ. साठच्या दशकातल्या असूनही कर्मठ नाहीत.खरंतर देवाला काही लागत नाही. शरीरातच तो हृदयस्थं असतो. त्यानेच एक फुटाचं आपलं शरीर पाच-सहा फुटांत आणलंय ना..??तो इतरांबद्दलचा स्नेह पाहतो. आपल्या मनातले विचार पाहतो. उपवास करायलाच हवा. कारण शरीराला त्याची गरज असते. आपण एरव्ही उलटसुलट काही खातो. एक घास कमी न खाता दोन घास जास्तच खातो. पोटाला ताण येतो. या ताणातून शरीर वाचवायचं तर एक हलकाफुलका उपवास जरुरीचा आहे. सोबत देवाचं नाव असेल तर सात्विकता ही येते. असो....मला ही पटलं रावं....या कथेवरून एक किस्सा सांगते..." हॅलो, अरे आज घर पे आना,,, शीर कुर्मा बनाया हैं।" ..."अरे रुबिना, मैं तो भुल गयी यार!.. ईद मुबारक डियर.. लाख लाख शुभकामनाएँ।..... मैं आऊँगी शाम को। चल फोन रखती हुँ। तुझे तो अभी मस्जिद भी जाना होगा ना। "नवीनच मैत्री झालेल्या रुबिनाशी झालेला संवाद.तिने सांगितले की, त्यांच्याकडे स्त्रिया मस्जिदीत जात नाहीत, घरूनच नमाज अदा करतात... देव तर सर्वत्र आहे त्याला घरातून नमस्कार केला तरी पोहोचतोच हे मला कळलयं. समिनाशी झालेल्या संवादानंतर गेली सहा वर्षे मी नवरात्रात, जत्रेच्या ठिकाणी, भंडाऱ्यात, देवळासमोर गर्दी असणाऱ्या दिवशी जाणं टाळतेयं... तरीही मी खूश असते. अगदी देव भेटल्याच्या अविर्भावात फिरते सगळीकडे.मी मंदिरात जाते. तिथलं शांत निवांत वातावरण आणि खोल श्वास घेऊन तो अंतरी दाबून ठेवण्याची उर्मी देणारा निर्वात गाभारा खुप आवडतो मला.महाशिवरात्रीच्या दिवशी हैराण झालेले शिवशंकर आपल्या मुलासोबत आहेत असा भास होतो आणि दोघांचेही दर्शन मला गणपती मंदिरात होते. तर गणेश चतुर्थीला हे दोघे मला शंकराच्या देवळात भेटतात. त्यामुळे मी महाशिवरात्रीला गणपतीच्या देवळात आणि गणेश चतुर्थीला महादेवाच्या मंदिरात जाते.रामनवमीच्या दिवशी हनुमान मंदिरात राम आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या देवाकडे म्हणजे राममंदिरात मला हनुमान भेटतो. म्हणजे मी तरी हेच करते.नवरात्रात नऊ दिवस देवीच्या नावाने घरीच ओट्या भरून त्या आदिवासी, गरीब स्त्रियांना दिल्यावर मला देवी भेटते.डिसेंबर महिन्यात मालवणच्या भराडी देवीच्या मंदिरात देवीला ओटी भरून ...सणसणीत गाऱ्हाणं घालून दिलं जातं.. तेव्हा देवी मला भेटते..सर्वपित्री अमावास्येला टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात दोन भटजी आणि शांतता... चक्क मुर्तीच्या पायाला हात लावून नमस्कार करू दिला जातो तिथेच गणपती बाप्पा भेटतो...माझ्या सासुबाईंना नमस्कार करून मी जेव्हा त्यांना घरची लक्ष्मी म्हणून संबोधते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या कृतार्थ भावात मला माता लक्ष्मी भेटते.वटपौर्णिमेच्या दिवशी मला पित्त होऊ नये म्हणून उपवासाला मनाई करणाऱ्या माझ्या पतीमध्ये मला सत्यवान भेटतो.जत्रेत, जयंतीत, भंडाऱ्यात देवापेक्षा पुजारी भाव खावून जातात. देवाच्या दर्शनासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत किती हकनाक बळी जातात.. म्हणून मी ही नवीन पध्दत अवलंबिली... त्यामुळे मला कोणी नास्तिक म्हणत नाहीत. माझा वेळही वाचतो. गर्दीत जीव गुदमरत नाही. पुजाऱ्यांनाही जास्त अपेक्षा नसते. देवाचं मनसोक्त दर्शन झाल्याने मलाही आत्मिक समाधान मिळतं... आणि त्या परमेश्वराला ह्रदयात साठवता येतो...खरंतर तो चराचरात, अणूरेणूत आहे. मग आपल्याला तो माणसांत का बरं दिसूं नये. कुत्र्याला सुंदर कपडे, त्यावर स्वेटर घालून फिरवताना पाहिलं की वाटतं..."प्राण्यांची माणसांसारखी काळजी घेतात तर हे लोकं घरातल्या माणसांची किती काळजी घेत असतील ना..!!!" असा विचार मनात येऊन जातो आणि मग कळतं परिस्थिती वेगळीच आहे...देवासाठी, देवासमोर काही करावं लागत नाही. फक्त त्याची मनापासून आठवण आणि त्याचं अस्तित्व मान्य केलं की झालं.... त्याला शरण गेलं की सगळं सोपं होऊन जातं आणि मार्ग सुकर होतो... तो सहज भेटतो मला - - म्हणून मी लिहिते....#तो_तूच_आहेसकोण वागतं तुझ्या मर्जीविरुध्द???तेच प्रारब्ध असतं सुकृतावर बेतलेलं...कदाचित तसंच वागणं घडत असेलपापपुण्याच्या संचितावर...निव्वळ निमित्तमात्र सगळंकरविता तू वेगळाच आहेसहो...!! तो तूच आहेस...कोण गातो गोड गाणं वसंतातत्या कोकिळाच्या गळ्यातून...कोण नेत असेल घासपोटात तोंडातून...कोणी दिला रक्तरंगपाण्याला गडद लाल...कोणी वसवलाय मेरूमांदार आणिअथांग सागरही-- इंचभर डोळ्यात...कोणी उतरवला लाळेत गोडवाशरीराच्या मिठागरात...प्रेतालाही असतात नाक कान डोळे हातपायपण त्यांना चालवणारा "तू" त्यात नसतोस....तुझा शोध घेता तू सापडतोस - -खूऽप काही करतांना... आणि कळतं,,मी मी म्हणणारा मी नसतोच मुळीतो "तूच"असतोस - हृदयस्थानी विराजमान...तूच चालवतोस जगाचं सूत्रपिंडी ब्रम्हांडी दोन्हीकडे...आम्ही मायापाशात अडकलेले वेडेनव्हें नव्हें किंबहुना तूच अडकवलेले...स्रीचा जन्म घेतला नाहीस तू कधीअसे अनेक बोल तूला लागले...शरीर कोणतंही असो नरमादी वा किन्नरप्रत्येक देहातून यातना तूच तर भोगल्यासआत मात्र "तो" तूच असतोस - नि:शस्त्री..एक हुंदका - - त्याआड कितीतरी हुंदकेतुझ्यापाशी विरलेले....समुद्राने समुद्राला भेटावे तसेकित्येक अश्रू तूला आतल्या आत भेटलेले...तुझं अधिराज्य आहेअभंग, अद्वैत आणि अद्भूतसायुज्यतेची आस आणि सुषुप्तीची परिसीमाआणि उन्मनी अवस्थेपलिकडला तूपुन्हा "तूच" आहेस...© Velvet Kavishaसगळीकडे झालेल्या बाजारीकरणातून देवाची पवित्र मंदिरे ही सुटलेली नाहीत..माझ्या लेखामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीये. मला ज्यातून आनंद मिळतो तो तुमच्यासोबत शेअर केलंय.. कोणालाही चुकीचं ठरवण्याचा उद्देश नाही..आपला अभिप्राय नक्की कळवा.... लिंकसहितच शेअर करा. साहित्य चोरी हा गुन्हा आहे. सदर लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.... नावासहित शेअर करा. नाहीतर देवबाप्पा "कान कापेल."
2 Comments
माझाही देवावरचा विश्वास पराकोटीचा आणि त्यामुळेच फक्त ठराविक दिवशीच देवदर्शन करण्याचा अट्टाहास मुळीच नाही
ReplyDeleteBarobar aahe g...
DeleteThanks for comment
Please do not enter any spam link in the comment box