तु अशी जवळी रहा..भाग १ (प्रेमकथा)
© Velvet Kavisha
स्वातीला पाच वाजता जाग आली. दरवाज्याच्या फटीतून लाईट दिसतेयं म्हणजे माई उठल्या आहेत. पटकन आवरून जायला हवं. नाहीतर सगळं काम उरकून मोकळ्या होतील. "उठवायचं ना मला" असं म्हटलं तर "अग रोजच उठतेस की. एक दिवस उशीर झालेला चालतो हो" असं म्हणतील. सत्तावीस दिवस झालेत आज लग्नाला. माईंनी अगदी जीव लावलाय. आता उठावंच. आपलं आवरेपर्यंत माईही आवरून येतील किचनमध्ये. असा मनात विचार येताच ती उठून बसली.
बाजूला झोपलेल्या शिरीषकडे लक्ष गेलं आणि ती सावरून बसली.. केसांना क्लिप लावत असतानाच पुन्हा तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. काळा सावळा, ओठांवर मस्त मिशी, डोक्यावर दाट केस , समोरच्याचा भेद घेणारे डोळे तरीही निरागस. "किती रुबाबदार आहेत हे... " स्वाती गालात हसली...
केसांत हात फिरवावासा वाटतोय. पण नको. उगाच झोपमोड होईल. त्यापेक्षा शांतपणे पाहून घ्यावं असं राजबिंड रुप. मन भरेपर्यंत. आपली हिम्मत फक्त ते झोपलेले असताना पाहायची. एरव्ही समोर आले की बोबडी वळते. आता तर अगदी त्यांच्यासाठी जीव वेडापिसा आणि आतुरलेला ही आहे. पण त्यांना कळतं असेल का हे..??
मी सौ. स्वाती शिरीष शेवडे. शिरीष माझा नवरा. लग्न पाहून सवरुन आणि ठरवून झालंय आमचं. शिरीष रत्नागिरीतील एक सुखवस्तू सधन आसामी. माई , तो, लग्न होऊन सासरी सुखाने नांदणारी त्याची बहिण, तिची दोन मुलं आणि भावाच्या मायेचा भावोजी असं छोटसं विश्व त्याचं.
मी, आईबाबा, बहिण आणि भाऊ असं पंचकोनी कुटुंब आमचं. बाबा पत्रिका पाहणं, पुजा सांगणं अशी भिक्षुकीची कामं करायचे. बऱ्यापैकी नाव आणि कमाई होती. त्यावरच तर चालायचं घर, शिक्षण आणि सगळं. पनवेलमध्ये चाळीत राहायचो. माझं B.Com झालं. वेलिंगकरमध्ये post graduation करत मी नोकरी करु लागले.
बहिण आणि भाऊ दोघेही लहान माझ्यापेक्षा. जुळे. माझ्यानंतर बारा वर्षांनी झाले. वय चोवीसावर आलं आणि वर संशोधन सुरु झालं.. पत्रिकेत दोष होता.. सुरुवातीला सहज जमेल म्हणता म्हणता पाच वर्षे झाली जमलंच नाही. माझ्या तिशीच्या तोंडावर आईबाबा ही काळजीत.
शेवटी रत्नागिरीची आत्या शिरीषचं स्थळ घेऊन आली. पत्रिकेसहित. आम्ही मुळचे राजापूरचे. सुट्टीत कधीतरी जायचो गावी. पनवेलमध्ये तीस वर्षे काढलीत. कायमचं कसं जमेलं राहायला रत्नागिरीत. रत्नागिरी आता खुप छान झालंय म्हणतात. बाबा पत्रिका बघतील. जमली तर हे सगळे प्रश्न. नाही जमली तर टेन्शनच नाही.
संध्याकाळी येऊन बाबांनी पत्रिका पाहिली आणि ओरडलेचं..
" ताई... स्वाती त्यांना पसंत पडली तर पोरीने नशीब काढलं समज.." बाबा म्हणाले.
" अरे, स्वाती त्यांना पसंत आहे. फोटोवरून. आता स्वातीला शिरीष आवडला की झालं." आत्या म्हणाली.
काय करावं ?? आधीच नाही सांगितले तर आत्याला ही वाईट वाटेल. त्यापेक्षा मुलगा पाहून घेऊ. त्यांनी नाही सांगायला हवं. पण त्यांनी हो सांगितले तर आपण नकार द्यायचा. एकदम पक्कं. रत्नागिरीत नाहीच जमायचं. आत्या पण ना माझा फोटो दिला त्यांना. तसंच तो शिरीष का कोण त्यांचाही फोटो आणायचा ना...
" अरे, पत्रिका जमतेयं ते माईंना कळवते. बघू काय म्हणतात ते."
आत्याने असं म्हणतंच नंबर डायल करून फोन लावला सुध्दा... एकंदरीत संभाषणावरून ती मंडळी आत्या असेपर्यंत येणार म्हणत होती. आत्या तर परवा संध्याकाळी ट्रेनने जाणार होती.
अरे देवा...!! म्हणजे हे लोकं परवाच येणार तर !! की उद्या येणार आहेत. परमेश्वरा.. इतकी मंडळी येऊन गेली पाच वर्षांत पण असा आणि इतका गोंधळ माझा कधीच नव्हता झाला याआधी. काय होणार आहे काय माहिती. बघू आता.
आत्या आणि बाबांच्या बोलण्यातून कळलं ती मंडळी उद्याच येणार. बरं झालं पार्लर वगैरे काही केलं नाही ते. अशीच साधी जाईन त्यांच्यासमोर.. मग बरोबर नकार देतील....
ठरल्याप्रमाणे मंडळी आली. शिरीष, माई, अनुताई, तिचे यजमान आणि तिची मुलं. चाळीच्या गेटपाशी दोन गाड्या थांबल्या. मी खिडकीतून पाहिलं. समोरून माई चालत येत होत्या. किती भारी आहेत या. खुपच छान. बाजूला पाहिलं तर हेच राजबिंड रुपं. तेव्हा पहिल्यांदा काळजाचा ठोका चुकला आणि आतापर्यंत चुकतंच राहिलाय.
चहापाणी झाल्यावर मला बाहेर बोलावंल आणि मी त्या मंडळींच्या समोर येऊन बसले. ओळख करुन देत भावोजी म्हणाले, " हा आमचा शिरीष." मी त्यांच्याकडे पाहिलं. नजरानजर झाली आणि अंगातून एक लहर निघून गेली. भावोजींनी व्यवसाय, घरदार या बाबतीत सगळी माहिती दिली.
माईं म्हणाल्या, " तुझ्या आत्याने फोटो दिलेला तो पाहूनच आम्ही तुला पसंत केली होती. पण पत्रिका जुळतात का पाहायचं होतं. ते ही झालं. तु आम्हांला आवडलीस. शिरीषला तु पत्नी म्हणून पसंत आहेस. तुला शिरीष आवडला का..?? तुला तो नवरा म्हणून पसंत आहे का..?? स्पष्ट बोल. होकार किंवा नकार. तुझं आयुष्य आहे. तुझा निर्णय नीट घे."
आता थोडा वेळ मागून घेते आणि मग नकार सांगते असं डोक्यात ठरवत असताना. तोंडाने मात्र "मला पसंत आहे" असं सांगून झालं. स्वर्गात गाठी मारणारा देव तर बोलवून घेत नसेल ना माझ्याकडून. कर्म माझं. रत्नागिरीत कसा निभाव लागायचा माझा. मी विचारात आणि बाकीचे गप्पांत. कोणीतरी म्हणालं. " दोघांना बोलायचं असेल तर बोलून घ्या एकदा एकमेकांशी. तुमच्याकडून एकदा फायनल शिक्कामोर्तब झालं की आम्ही पेढे वाटतो."
"नाही. नाही. काही बोलायचं नाही." मी सहज बोलून गेले. अरे देवा खरंतर मला बोलायचं आहे. आज सगळ्याचा ताळतंत्र सूटलाय. मन, बुद्धी, अंतकरण आणि हृदय बंड का बरं करतंय. काहीच ताळमेळ नाही. विचारात असतानाच शिरीष आणि स्वातीला एकमेकांच्या बाजूला उभं करून फोटोही काढण्यात आला. भावाने काढलेला फोटो मलाही पाठवला मग...
आईबाबांना ही इतकं सुंदर स्थळ जाऊ द्यायचं नव्हतं. माझा होकार समजून त्यांनी पुढील बोलणी केली. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली. घरात एकच धावपळ. मी नोटीस दिली ऑफिसमध्ये. PF ला अर्ज केला. पैसे आले. तेवढेच लग्नखर्चाला मिळतील.
साखरपुडा, लग्न एकाच दिवशी पनवेलमध्ये झालं आणि मी सौ. स्वाती शिरीष शेवडे झाले. आमचं वऱ्हाड पनवेलहून रत्नागिरीत पोचलं. गाड्या "स्वामिनी " बंगल्यापाशी थांबली. मी खाली उतरले, समोर पाहिलं आणि पाहतच राहिले. एवढा मोठा बंगला. सभोवताली नारळी-फोफळी, फुलझाडं आणि बरीच छोटी मोठी झाडं. मी पटकन यांच्याकडे पाहिलं तर ते माझ्याकडेच पाहत होते. मी हलकेच हसले आणि स्नेहाने चिमटा काढला.
आमच्यासोबत एका टवेरा गाडीतून पनवेलमधील मंडळी मला सासरी सोडायला आलेली. त्यात ही माझी जीवलग मैत्रीण स्नेहा. वऱ्हाडासोबत आलेली पाठराखीण म्हणून. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पुजा झाली. तिसऱ्या दिवशी मांडव परतणी. पण पनवेलला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांची जबाबदारी आत्याने घेतली. पनवेलकर मंडळी तिसऱ्या दिवशी निघून गेली. शिरीषचे ताई भावोजी ही घरी येऊन लगेच निघाले. आता त्या अनोळखी घरात फक्त इन मीन तीन माणसं आणि नोकर मंडळी. स्वातीला माईंचाच आधार वाटत होता.
शिरीष सगळ्यांशीच जेवढ्यास तेवढंच बोलत. भाचे कंपनीशी मात्र फुल्लं धमाल. काजू , लोणचं, मँगो पल्प, लाडू इत्यादी उत्पादन व्हायचं त्यांच्या कंपनीत. कामगार पण बरेच होते. माईंनी सक्त ताकीद दिली त्यामुळे शिरीष गेले नव्हते ऑफिसला. साहजिकच घरी माणसांची ये जा वाढलेली. घरी येणारा प्रत्येक जण शिरीषशी अदबीने तरीही सहज बोलायचा. निरीक्षणं बोलणं मात्र खणखणीत, करारी आणि ठाम. कंपनीतून येणारी प्रत्येक व्यक्ती शिरीषकडे प्रचंड आदराने पाहायची. "मालक म्हणून किती चांगला आहे हा.." असं वाटून गेलं. कंपनीतून सावंत काका आले आणि शिरीषनी नमस्कार करण्यासाठी बाहेर बोलावलं. सावंत काका शिरीषचे फार जवळचे.
"सुनबाई, सुखाने संसार करा हो. पोराने लहान वयात मोठ्ठं धनुष्य पेललंय. कधी चिडतो, रागावतो पण तुम्ही मायेने सांभाळून घ्या. मोठं गुणाचं पोर आहे. " असं म्हणत, चहा पाणी घेऊन, शिरीषचे गुणगान गात सावंत काका निघून गेले.
तिसरा दिवस असाच गेला. थकलेली स्वाती माईंच्या रुममध्ये झोपली. चौथ्या दिवशी सकाळीच सगळे उठून देवदर्शनाला गेले. संध्याकाळी घरी आले आणि रात्री बेडरूम सजली. स्वातीची रवानगी माईंच्या बेडरूममधून शिरीषच्या रुममध्ये होणार होती. माईंनी चांदीच्या ग्लासात दूध ओतून तो ग्लास स्वातीकडे दिला. स्वाती छातीत होणारी धडधड सांभाळत, वाढलेल्या ठोक्यांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत हळूहळू एक एक पाऊल टाकत शिरीष वाट पाहत असलेल्या बेडरुमकडे निघाली. मैत्रिणींनी चेष्टेत बरंच काही सांगितलंय. घाबरवलं ही आहे बऱ्यापैकी. पण स्वाती बाई घाबरताय कशाला, आता तुम्ही सोळा वर्षांच्या नाहीत तर तिशीत आहात. वेळेत लग्न झालं असतं तर पोटचं लेकरुं पहिलीत गेलं असतं. या विचारांनी तिला स्वतःचंच हसू आलं. शिरीष तसें बरे आहेत. आजवर दहाबारा वेळा बोलणं झालयं त्यांच्याशी. लग्न आणि नंतरच्या विधींमध्ये चुकून होणारे स्पर्श छान मोहरवून टााक होतेच की!! माझ्या हातांच्या स्पर्शाने त्यांनी चमकून पाहिलं की लाजल्यासारखं व्हायचं. आपण या सव्वा महिन्यात किती तरी वेळ शिरीषसोबतची स्वप्नं पाहण्यात घालवलाय.... वेड्यासारखा.
विचाराच्या तंद्रीत ती बेडरूममध्ये गेली. दरवाजापर्यंत सोडायला आलेल्या माईंनी दरवाजा लावून घेतला तशी स्वाती थरारली. जागीच उभी राहिली. हाताला हलकासा कंप सुटला. पाऊल जागीच खिळून राहीलं होतं जणू काही. कितीतरी वेळ ती मान खाली घालून दरवाजापाशीच उभी होती. तिचं अवघडलेपण पाहून शिरीष उठून जवळ आला. तिच्या हातातील ग्लास स्वतःच्या हातात घेतला. दुसऱ्या हाताने तिचा हात पकडला. सावकाश चालत बेडपाशी आला. दुधाचा ग्लास साईड टेबलवर ठेवला आणि दोन्ही हाताने दंड पकडून तिला बेडवर बसवलं.
स्वातीने रुमभर नजर फिरवली. बेडरूम मस्तच आहे एकदम. सजावटही किती भारी. आईबरोबर मालिका पाहताना मालिकेत असा सजलेला बेडरूम दाखवायचे. कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की हे सगळं आपल्याला ही मिळेल. किती गोंधळ उडायचा आपला पटकन चॅनल बदलताना. स्वाती स्वतःशीच हसली. "काय गंमत चाललीय मनात ती मला कळली तरी चालेल" म्हणत शिरीष येऊन बाजूला बसला. स्वातीने लाजून नकारार्थी मान हलवत गालात हसली.
"बरं बाई, नको सांगूस." म्हणत शिरीषने लांब हात करून दुधाचा ग्लास हातात घेतला. तिच्या ओठांसमोर ग्लास धरला. "बाईसाहेब, या मैफीलीची सुरुवात तुमच्यापासून." म्हणत डोळा मारला. तिने ग्लास ओठाला लावून दूधाचा एक घोट घेतला. ती आवंढा गिळत असताना तिच्या कंठाची होणारी हालचाल पाहून त्याला गंमत वाटली. जवळ जात त्याने तर्जनी हलकेच कंठावरून फिरवली. त्याच्या स्पर्शाने धडधड वाढली पुन्हा. तिने स्वतःच्या हातातला ग्लास त्याच्या हातात दिला. त्याने तिच्या नजरेला नजर देत ग्लास रिकामा करुन बाजुला ठेवला. कुठून आणि कशी सुरुवात करावी हे त्याला कळत नव्हतं. "गप्पा मारायच्या का?" शिरीषने बेडवर आडवा होत विचारलं. "हं" म्हणत स्वाती बेडला पाठ टेकून बसली. हळूच पाय बेडवर घेतले. "तु कंम्फर्टेबल आहेस ना इथे?" त्याने स्वातीकडे पाहत विचारलं. "हो. हो." स्वातीने म्हटलं. "रत्नागिरीला अजूनही लोकं गाव समजतात. पण तुमच्या पनवेलसारखंच आहे रत्नागिरी. हां फक्त थोडं लांब आहे इतकंच. रस्ते, लाईट आणि सोईसुविधा थोड्या कमी आहेत. नाहीतर रत्नागिरीसारखं समृद्ध काहीच नाही." शिरीष म्हणाला. "तुमचा बंगला, आजुबाजुची झाडं, बाग, विहीर सगळं किती छान वाटतं. मला खुप आवडलं." स्वाती म्हणाली. "खरंच??" तिच्या तोंडून कौतुक ऐकून शिरीषने पलटी मारत तिच्याकडे पाहत विचारलं. तिने होकारार्थी मान हलवली तसं शिरीषने तिच्या मांडीवर डोकं ठेवत उताणा झोपला. नजर तिच्या चेहऱ्यावर. स्वातीला काही सुचेना. छातीत धडधड वाढली. हा इतका जवळ. काय बोलणार. नवरा आहे आता तो. हे वागणं साहजिकच आहे त्याचं. तेवढ्यात त्याने तिचा हात हातात घेतला. तिच्या हातावर काढलेल्या मेहंदीच्या नक्षीवर हलकेच बोट फिरवत होता. आणि दुसरीकडे तिच्या घरच्यांबद्दल, त्यांनी केलेल्या आदरतिथ्याबद्दल भरभरून बोलत होता. तिलाही आवडला त्याचा हा स्वभाव. त्याचं होकारार्थी नकारार्थी मान हलवत बोलणं आवडलं तिला. त्याच्या तशा करण्याने साडीवरून त्याच डोकं मांडीवर घासलं जात होतं. उजव्या मांडीला झालेल्या जखमेतून कळ निघून मस्तकात जात होती. बहुतेक शिरीषच्या डोक्याच्या हालचालीने त्यावर लावलेली पेपर टेप निघाली होती. मांडीवर ओलसरपणा जाणवत होता. तो इतक्या खुशीत बोलत होता की आता त्याला काही बोलायची तिची हिंमत झाली नाही. कळ सोसत ती त्याच्या बोलण्याला हुंकार देत होती. तो बोलत बोलत कुशीवर झाला आणि त्याचं लक्ष तिच्या मेहंदी लावलेल्या पायांकडे गेलं. करंट लागल्यासारखा तो उठून बसला. तिला हुश्श झालं.
"किती छान काढली ग मेहंदी" म्हणत मेंदीच्या नक्षीवरून दोन बोटं फिरवत त्याचा हात पैंजणांपाशी गेला. पैंजणावरून बोटं फिरवली तसे पैंजण किणकिणले. त्याने कान पैजणांच्या घुंगरांपाशी नेऊन दोन बोटांत धरून घुंगरू हलवले. पुन्हा पुन्हा हलवले. जणू तो पैंजणरव तो कानात साठवून घेत होता. बोटांमधून घुंगरू सोडून दिले तसे ते पायावर हलकेच आदळले. घुंगरू जिथे स्थिरावले तिथे त्याने आपले ओठ हळुवारपणे टेकवले. त्याच्या ओठांच्या ओल्या स्पर्शाने ती बावरली.तिने आपला पाय थोडा मागे ओढला. त्याने मान वर करून पाहिलं. मेहंदीची नक्षी वरच्या दिशेला जात होती. त्याने साडीचा काठ हळूहळू वर सरकवत आणला. ती त्याचं असं तिच्यात रमणं अनुभवत होती. तो जणू तिच्या शरीराचं अंग न् अंग जाणून घेऊ पाहत होता. साडी अगदी गुडघ्यापर्यंत वर आली तशी ती लाजली. गुडघ्याभोवती गोल गोल बोट फिरवत गुडघ्याच्या मध्यावर त्याने तर्जनीने दोनदा टॅप केलं. धुंद झाला होता तो. त्याच प्रेमभऱ्या नशिल्या डोळ्यांनी मान वर करुन त्याने तिच्याकडे पाहिले तर तिने दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला होता. त्याने हळूच बोट अजून वर नेलं. गुडघ्याच्या वर जिथून मांडीला सुरवात होते तिथल्या मांसल भागावर बोट येताच पटकन वाकून त्याने ओठ टेकवले. स्वाती मोहरली. अंगावर रोमांच आले. शहारलं अंग. अशावेळी काय करायचं असतं. काही समजत नव्हतं. ओठांचे स्पर्श मांडीच्या पटलावर थोडे वर सरकले. साडीचा काठ अजून थोडा वर सरकवला आणि.... आणि शिरीष जोरात ओरडला. "अग काय हे... मूर्ख आहेस का तू..??? सांगता येत नाही का तूला.. ??? माई ~ माई.." म्हणत जोरजोरात हाका मारु लागला. तडकन् उठून उभा राहिला. तिची वर गेलेली साडी काठाला धरून खाली ओढली अन् जोरात दरवाजा उघडला. घाबरलेल्या माई आत आल्या अन् शिरीष रागाने बाहेर निघून गेला. माई येऊन स्वातीपाशी बसल्या. स्वातीला काहीच कळत नव्हतं. शिरीषच्या ओरडण्याने, वागण्याने घाबरली होती. ओक्साबोक्शी रडत होती. माईंना बिलगली.
नेमकं काय झालंय. दोघांची पहिलीच रात्र. शिरीष काही वेडंवाकडं वागणार नाही असं मन सांगत होतं. पण शिरीषही शेवटी पुरुषच ना. त्यात लग्न वयाच्या पस्तीशीला झालेलं. माईंना काही कळेना. काय आणि कसं विचारावं ते. शिरीष इतका भडकलेला होता की त्याला काही विचारणं म्हणजे हंगामाच. त्यापेक्षा स्वातीलाच विचारावं हळूवार.
माईंनी तिला सावरु दिलं. पाठीवरून हात फिरवत हळूच विचारलं. "तु ठीक आहेस ना..?? लग्न हे असं इतक्या उशिरा झालेलं आणि पुरुषी अहंकार, शिरीष तुझ्याशी काही चुकीचं..??
नकारार्थी मान हलवत स्वाती नाही म्हणाली.
"काय बिनसलं? शिरीष थोडा भडकल्यासारखा वाटला मला." माईंनी विचारलं.
काय सांगावं, कसं सांगावं तिला कळेना. तिने साडी वर ओढून गुडघ्यावर आणली. रक्ताने भिजलेला परकर पाहून माईंच्या काळजात चर्र झालं. "अगं, किती ब्लिडींग? कसं? पाळी आलीय का? " माईंनी घाबरून विचारलं. तिने नकारार्थी मान हलवत परकर थोडासा वर करून मांडीला झालेली जखम दाखवली.
"बापरे! काय झालंय हे?" म्हणत माईंनी कपाटातून फर्स्ट एड किट काढलं.
"भाजलेय."
"केवढी जखम झालीय. कशाने भाजलंय?" कापसाचा मोठ्ठे मोठ्ठे बोळे घेऊन जखम पुसून कोरडी करत माईंनी विचारलं.
"लग्नाआधी दोन दिवस पार्लरला गेलेले. बॉडी वॅक्स करताना गरम वॅक्स मांडीवर पडला. चांगलंच भाजलं. मोठ्ठा फोड आला. डॉक्टरकडून टीटीचं इंजेक्शन आणि गोळ्याही घेतल्या. लग्नाच्या धावपळीत फोड फुटला. स्कीन निघून आली अन् जखम झाली. सलग काही ना काही सुरु आहे. मांडीवर असल्याने जखम उघडी ठेवली तर कपडे चिकटतात पट्टी लावली तर जखमेला वारा लागत नाही. आतल्या आत जखम चिघळतेय. तरीही आज पट्टी लावली होती. पण गप्पा मारता मारता शिरीषनी.."
"शिरीषनी काय स्वाती? काय केलं त्याने?"
"डो कं मां डी व र ठे वू न..."
"झोपला??
"हं" होकारार्थी मान हलवत स्वाती म्हणाली.
"शिरीष छान गप्पा मारत होते माझ्याशी. त्यांच्या डोक्याच्या हालचालीने पट्टी निघून जखम सोलवटली गेली आणि रक्त आलं."
"अगं पण तू त्याला जखम झाली हे का नाही सांगितलंस?" माईंनी औषध लावून जखमेवर पट्टी लावत विचारलं.
"कसं सांगणार? नेहा म्हणाली, नवऱ्याला नाराज करु नकोस म्हणून. आणि आज तर पहिली ..." स्वाती बोलता बोलता गप्प झाली.
"अगं वेडाबाई तू नाही सांगितलंस तरी तो नाराज झालाच ना? आणि नुसता नाराज नाही तर प्रचंड चिडलाय तुझ्यावर." माईं
"मग आता मी काय करू माई? किती जोरात ओरडले? त्यांच्या ओरडण्याने खुप घाबरले मी! पण एवढं रागावण्यासारखं काय आहे माई? जखमच तर आहे ना? जखमा काही कोणाला होत नाहीत का? नशीब घरात आपण तिघेच आहोत. मी नाही आता त्यांच्यासोबत एकटी राहणार. मला भिती वाटते त्यांची. माई मी तुमच्या रुममध्ये येऊ?" स्वातीने रडत रडतच विचारलं.
माईंनी तिला जवळ घेतली. डोक्यावरून हात फिरवला. माईंना कळलं नेमकं काय बिनसलंय ते. शिरीषच्या वडीलांचं ॲक्सिडंट झालं होतं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबाला बघून खुप घाबरला तो. स्वतःला लागलेलं असताना ही वडीलांना तसाच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पण तेव्हापासून रक्त पाहिलं की फार घाबरतो तो. अक्षरशः थरथर सुटते त्याच्या अंगाला.
"स्वाती तुला एवढ्यात सांगायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. आता जे सांगते ते नीट ऐक. शिरीष कॉलेज संपवून दादांसोबत पूर्ण दिवस कंपनी सांभाळू लागलेला. दादा म्हणजे शिरीषचे बाबा. एकदा बाईकवरून जात असताना एका ट्रकने समोरून धडक दिली. मागे बसलेला शिरीष लांब फेकला गेला आणि दादासाहेब ट्रकखाली. एकवीस वर्षांचं पोरं ते. रक्ताने माखलेल्या बापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलं. दादांच्या पायात काही तरी घुसलेलं. गँगरीन झालं. नंतर पाय काढावा लागला.
दोनचार महिन्यात दादा गेले पण शिरीषच्या मनात खोलवर धसका देऊन. चारेक वर्षे तरी सावरला नव्हता. अनूताईच्या मिस्टरांनी म्हणजे त्याच्या भावोजींनी मोठ्या कष्टाने त्याला पुन्हा उभं केलयं. मुंबईतल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. सगळं छान आहे. तरीही मनातला धसका कायम आहे त्याच्या. स्वतःला कितीही लागलं तरी चालतं त्याला मात्र त्याच्या प्रेमाच्या माणसांना काही लागलेलं चालत नाही. रक्त पाहिलं की घाबरतो, भितो पण पुरुष आहे ना भिती दाखवता येत नाही. मात्र प्रचंड चिडतो. मी किचनमध्ये खुप काळजीपूर्वक काम करते. चुकून कधी बोटं कापलेलं जरी पाहिलं तरी घर डोक्यावर घेतो. जखम बरी होईपर्यंत चिडचिड करत राहतो. बरी झालेली जखम पाहिली की हळूहळू रुळावर येतं सगळं. आपल्या घरी शोभाताई आहेत ना मदतनीस त्यांचा खुप जीव आहे शिरीष वर. दुसरी माईच आहेत त्या शिरीषसाठी. मागे एकदा नारळ फोडताना त्यांच्या हाताला कोयता लागला होता. पंधरा दिवस बोलत नव्हता त्यांच्याशी. आता त्या ही घाबरतात स्वतःला काही लागलं तर. रक्त दिसलं की चिडतो, रागावतो, काम काळजीपूर्वक करायला काय होतं? असं म्हणणं असतं त्याचं. घाबरतो तो जवळच्या माणसांना गमवायला. त्याच्या रागामागे त्याचं प्रेमच असतं. ती व्यक्ती त्याच्यासाठी खास असते.
दादांच्या मागे कंपनी खुप मोठी केली त्याने. खंबीरपणे उभा राहिलाय पण मनात धसका घेऊनच." माईंनी बोलता बोलता स्वातीचा हात हातात घेतला.
"स्वाती, शिरीष कणखर वाटतो. तापट आहे. पण तसं नाहीय. हळवं आहे ग पोरं माझं. इतका भडकलाय म्हणजे जीव लावून बसलाय तुझ्यावर. तुला काही झालंय म्हटल्यावर बिथरलाय. सांगणार नाही. तुलाच समजून घ्यावं लागेल. सांभाळशील ना त्याला. समजून घेशील ना? तो जसा आहे तसा.??" म्हणत माईंनी डोळे पुसले.
बापरे!! माई तर खुपच भावूक झाल्या. स्वाती सावरून बसली. इथे कणखर दिसणारी माणसं आतून हललेली आहेत. ही नाती जपायला हवीत. कधी शिरीषची तर कधी माईंची आई बनून.
"माई, तुम्ही निश्चिंत रहा. मी सांभाळेन त्यांना. कधी स्वाती, कधी माई तर कधी अनूताई बनून." म्हणत स्वातीने माईंना आश्वस्त केलं.
"तेवढा वाटतो हो विश्वास तुझ्याबद्दल." म्हणत माई उठल्या. जायला निघाल्या. अरे देवा!! या कुठे निघाल्या आता.
"माई ! "
"अं..काय ग.??" माई
" मी तुमच्या खोलीत येऊ का झोपायला? म्हणजे त्यांचा राग कमी होईपर्यंत." स्वाती.
" तो राग आता तुझा पायाची जखम बरी होईपर्यंत राहील तसाच. एकदा का पाहिलं सगळं ठीक आहे, की मग होईल तो पुर्वीसारखा. तोपर्यंत धुसफुसत राहील आतल्याआत. स्वाती, तसंही तू त्याला सांभाळून घेणार आहेसच ना? तर माई बनून आजपासूनच का नाही सांभाळत त्याला?" थोडंसं गालात हसत माई म्हणाल्या आणि बाहेर जायला वळल्या.
" अँ? नको माई. यावेळी तुम्हीच प्लीज बोला ना त्यांच्याशी माई." स्वाती म्हणाली तशा माई स्वातीकडे पाहत हसत हसत निघून गेल्या.
छे!! काय माई पण आहेत यार... किती मुर्ख आहे मी. मला तरी काय गरज होती एवढे मोठे मोठे डायलॉग्ज मारायची. सगळा सिरीयलचा परीणाम हा. आता शिरीषचं हे भडकं डोकं किती दिवस याच टेंम्परेचरमध्ये राहील देव जाणे. ही पार्लरवाली पण बेअक्कल मेली. चांगलच भाजून ठेवलयं. केवढं रामायण झालं. अख्ख्या घरभर बोंबाबोंब. पहिली रात्र चांगली संस्मरणीय ठरलीय. जाऊ दे. यांना शोधायला हवं.
हे गेलेत कुठे नक्की.? माईसुध्दा गेल्या झोपायला त्यांच्या रुममध्ये. पहायला हवं यांना रागाने कुठे नेऊन बसवलंय ते. असे काय हे शिरीष!! एवढ्या मोठ्या आवाजात कोणी ओरडतं का नव्या नवरीवर. माझे बाबा पण कधी एवढ्या जोरात ओरडले नाही कधी. या माणसासाठी मी पनवेल सोडून इथे रत्नागिरीत आले. माझं माहेर ही इतक्या लांब. समजून नको का घ्यायला. आता जखम बरी झाली तरी सांगणारच नाही. कोपर आपटलं माझं मागे बेडला. इतक्या रागात ढकलंल. जेव्हा स्वतःहून येतील माझ्यापाशी तेव्हाच माफ करेन त्यांना. हम भी कुछ कम नहीं, अभी नाम के आगे शिरीष लगा रहें हैं। 😉😉 शिरीषला ही त्यांची चूक कळायला हवी.
विचार करत स्वाती बाहेर आली तर बागेतला झोपाळा कुरकुरत होता. एवढी थंडी आहे आणि हे इथे बसलेत. स्वाती झोपाळ्यापाशी जाऊन थांबली. शिरीष रागात पण भारीच दिसताहेत.
"Sorry..!! चुकलं माझं. मी सांगायला हवं होतं लागलं ते. प्लीज आत चला." स्वाती म्हणाली.
" तु जा आणि झोप निवांत. मला बसू दे इथेच." शिरीष.
" नका ना इतकं रागावू. प्लीज चला. थंडी पण आहे बाहेर. माईंना ही टेन्शन येईल." स्वाती.
"तुला जा म्हटलं ना. जा तू. झोप. माईची काळजी नको करूस. माईला माहिती आहे माझा स्वभाव. माझ्या माणसांनी या स्वभावासहीत स्विकारलंय मला. तुला नाही जमणार. जा तू." शिरीष बोलून गेला आणि स्वाती रडू लागली.
" मी कोणीच नाही तुमची. हे मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, अंगठी आणि ही टिकली उगाचच आहे सगळं. कशाचा काहीच संबध नाही??. स्वभाव कळायला तेवढा वेळ तरी मिळालाय का मला..? मीच वेडी. पनवेल सोडून इथे रत्नागिरीत आलेयं. उद्या आत्याला फोन करून सांगते. ये आणि मला घेऊन जा. इथे मी कोणीच नाही कोणाची." म्हणत स्वाती रागातच घरात आली आणि जाऊन बेडवर झोपली. तिचं बोलणं वर्मी लागलं होतं. दरवाजा लावल्याचा आवाज आला. शिरीष तिच्या मागोमाग घरात आला होता. ती डोळे मिटून पडून राहीली. शिरीष येऊन बाजुला झोपल्याचं जााणवल. विचारांच्या कल्लोळात तिला कधीतरी झोप लागली.
सकाळी शिरीष लवकर उठून स्वाती कधी उठते याची वाट पाहत बसला होता. स्वातीला जाग आली. पांघरून बाजूला करून ती उठून बसली. बाजुच्या टेबलवरचा क्लिप घेऊन केस वर टांगले. ब्लॅंकेटची घडी घालून उशीवर ठेवलं. इतक्यात "आत्याला फोन करून त्रास द्यायची काही गरज नाहीय आणि इथून कोणी कुठेही जाणार नाही." खिडकीजवळ आरामखुर्चीत बसलेला शिरीष बोलला. तिने वळून मागे पाहिलं. तिच्याकडे न पाहताच तो खोलीबाहेर निघून गेला. स्वाती स्वतःचं आवरायला निघून गेली.
स्वाती आंघोळ करून येईपर्यंत शोभाताईंनी खोली आवरून ठेवली. ती चहा घेऊन रुममध्ये आली. खिडकीजवळच्या खुर्चीवर बसली. बाहेरून येणारा पक्षांचा आवाज तिला सुखावत होता. सकाळचा गार वारा सुटला होता. त्याचा स्पर्श मुड बनवत होता. चहा पिऊन झाल्यावर खिडकीच्या कठड्यावर हातांची घडी घालून त्यावर हनुवटी टेकवून बाहेर पाहत होती. शिरीष ऑफिसला जायचं म्हणून तयारी करण्यासाठी आत आला. त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. धुतलेले केस पंच्यात गुंडाळून वर टांगले होते. त्यातल्या काही खट्याळ बटा बंधनाला झुगारून चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला रुळत होत्या. कठड्यावर कोपरापासून हात टेकल्यामुळे शरीराला एक सुंदर वळण आलं होतं. किती सुंदर आहे ही!! त्याला वाटलं आणि चेहऱ्यावर हलकं हसू आलं.
खांद्यावरून नजर खाली आली. काखेतला काटकोन आणि पदराखालून अंगाला घट्ट बिलगलेला ब्लाऊज.... आई ग्गं!! त्याच्या अंगातून एक लहर उसळली. नजर वरपासून खाली सरकत आली आणि अचानक काल तिच्या मांडीवर पाहिलेली रक्ताळलेली जखम आठवली. मुड बदलला. डोकं पुन्हा सणकलं. "मुर्ख कुठली! किती तो निष्काळजीपणा." त्याचा पुन्हा राग राग झाला.
तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि दोघांची तंद्री भंगली. तो कपाटातून काही वस्तू काढून बॅगेत भरत होता. पनवेलहून आई बोलत होती. उद्या पहाटे केरळला जायचं आहे. हनिमूनसाठी साहेबांनी केरळ निवडलाय. आई त्याबद्दलच विचारत होती. तिच्या मागून बाबा बऱ्याच सूचना देत होते. स्वातीचं बोलणं ऐकून त्याला आठवलं. रात्री बागेत झोपाळ्यावर बसून हनिमूनच बुकींग कॅंसल केलंय आपण. स्वातीला माहितीच नाही. त्याने लगेच मोबाईल हातात घेऊन कॅंसलेशनचा मेसेज तिला फॉरवर्ड केला आणि नेहमीप्रमाणे बॅग उचलून ऑफिसला निघून गेला.
फोनवरचं बोलणं संपलं तसं तिने मेसेज वाचला. अच्छा म्हणजे साहेबांनी रागाच्या भरात हनिमून कँन्सल करून टाकलाय तर. हा रागाचा कोणता प्रकार आहे यार. आता आईबाबांना काय सांगू? किती विचित्र माणूस आहे हा. नाही नाही. अगदीच विचित्र नाहीये काही. रात्रीचा त्यांचा हळुवारपणा किती भावला होता. गात्रं गोठलीच होती त्यांच्या स्पर्शाने. तिने आताही लाजून चेहरा तळव्यांत झाकून घेतला. तसा गोड आहे अगदी. 😍 समजून घ्यायला हवा हा माणूस. मगच बदलता येईल ना त्याला. ती स्वतःतच हरवली होती. शोभाताई बोलवायला आल्या तेव्हा भानावर येत ती त्यांच्यामागून किचनमध्ये गेली.
संध्याकाळी आत्याने नवीन जोडप्याला जेवायला बोलावलं होतं. त्यामुळे शिरीष ऑफिसमधून वेळेत आले. गावात जाताना बाईक वापरत शिरीष. स्वातीच्या मांडीला जखम होती त्यामुळे बाईक नको कारने जाऊ असं ठरलं.
शिरीष स्वतः ड्राईव्हिंग सीटवर. दोघंच जाणार होते त्यामुळे स्वाती बाजुच्या सीटवर बसली. गाडी सुरू झाली आणि तिने मान न वळवता डोळ्यांच्या कडांमधून त्याच्याकडे पाहिलं. अगदी स्थितप्रज्ञ. चेहऱ्यावरची रेष ही हलत नव्हती. काय हा माणूस आहे! बायको बाजूला बसलीय तर ढुंकूनही पाहत नाहीये. देवा राणी तर बनवलीस पण या सणकी राजाची.
आत्याकडे पोचल्यावर. आगतस्वागत झालं. गप्पा झाल्या. ओटी भरून, शिरीषना भेटवस्तू देत जेवणखाण करून निघाले दोघं. गाडीत येऊन बसले. सगळ्यांनी अंगणात उभे राहून हात हलवून दोघांना निरोप दिला. गाडी मुख्य रस्त्यावर आली तसं शिरीषनी गाडीचा वेग कमी करत स्वातीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. स्वातीच्या लक्षात आलं.
"ते आत्यांना काही सांगितलं नाही ना..?? " घसा खाकरत शिरीष काहीतरी विचारायचा प्रयत्न करत होते.
"हो. सगळं सांगितलं." स्वाती
"काय सांगितलं.?" शिरीष
"हेच की, लग्नासाठी खुप सुट्टी झाली तर कारखान्यात कामाचा लोड आहे." स्वाती
"त्याचा काय संबंध??" शिरीषने रागात विचारलं.
"कामाचा लोड असल्याने केरळची ट्रीप कॅंसल करावी लागली." स्वातीने शांतपणे सांगितले आणि काचेतून बाहेर पाहू लागली.
अरे आपल्या लक्षात कसं नाही आलं. आपण रागाच्या भरात ट्रीप कॅंसल केली. त्याबद्दल आपल्याला कोणी विचारणार नाही पण स्वातीला विचारतीलच ना? माई नेहमी म्हणते, रागावर थोडा कंट्रोल ठेवा. खरंच आहे तिचं, राग आल्यावर आपण काहीच विचार करत नाही. त्याला पुन्हा स्वतःचा राग आला आणि रागातच गाडीच्या ॲक्सिललेटरवरचा दाब वाढला आणि गाडी झुम करत पळाली.
"रागावताय कशाला? मला आयत्यावेळी जे सुचलं ते सांगितलं. खरं कारण सांगितलं असतं तर आत्याला वाईट वाटलं असतं. तुमचं स्थळ तिनेच सुचवलंय." स्वातीचा आवाज कातर झाला होता. शिरीषला काही सुचेना काय बोलावं ते. तो फक्त "थँक्स" म्हणून गप्प बसला. गाडीत कमालीची शांतता होती.
मागे पळणाऱ्या रस्त्याकडे पाहत स्वाती विचार करत होती. "किती egoistic आहे हा. माई म्हणतात जीव जडलाय यांचा माझ्यावर. हा असा जडतो का जीव एखाद्यावर? आत्याला खरं सांगितलं असतं तर तिलाही वाईट वाटलं असतं ना? कुठे आणून टाकली पोरीला असं वाटलं असतं. तिने आईबाबांना सांगितलं असतं तर त्यांना खुप दुःख झालं असतं.
विचारांच्या तंद्रीत घर कधी आलं ते ही कळलं नाही तिला. गाडी पार्क करून शिरीष खाली उतरले. धाडकन दरवाजा लावल्याचा आवाज आला तशी स्वातीने पाहीलं आणि पटकन दरवाजा खोलून बाहेर आली. साडी नीट करून शिरीषच्या मागे चालत घरात आली. "माई म्हणाल्या तशी ही धुसफूस सुरू आहे. आधी ठीक होतं पण आता तर लग्न झालयं ना. त्याचं काहीच कसं वाटत नाही यांना? जाऊ दे. बघू काय होतं ते. जास्त भाव नको द्यायला उगाच त्यांना. राहू दे त्यांना त्यांच्या रागासोबत." स्वातीने मनात ठरवून टाकलं.
लग्नाला आठ दिवस झाले. मागच्या चार पाच दिवसात माईंनी छान सांभाळून घेतलं स्वातीला. शिरीष ऑफिसला गेला की खुप गप्पा मारायच्या तिघी जणी. माई, स्वाती आणि शोभाताई. या चार पाच दिवसात माईंनी अगदी त्यांचं लग्न झालं तेव्हापासून सगळं थोडं थोडं करत सांगितलं. स्वातीसठी सारं काही नवीन होतं. गप्पांमधून कारखाना, घर आणि शिरीषबद्दल कळत होतं. त्या गप्पांनी शरीराने दूर गेलेले शिरीष हृदयाच्या खुप जवळचे वाटू लागले. मन नकळत त्यांच्यापाशी राहू लागलं. तिचं त्यांच्याप्रती वाढणारं प्रेम शिरीषपर्यंत पोहोचत होतं की नाही ते कळत नव्हतं. पण आधी रागात असणारे शिरीष निवळू लागलेत. काही विचारलं तर नीट उत्तर देतात. तिच्या आजूबाजूला रेंगाळणं थोडं वाढलंय. तरीही पायाची विचारपूस मात्र माईंकडेच. 😁😁
क्रमशः
पुढील अंतिम भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...👇👇👇
लाईक, कमेंट आणि शेअर करा नक्की...
फोटो गुगल साभार
© Velvet Kavisha
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box