रीमा

 


लग्नबाह्य संबंध... 
(Extra marital affair)

© Velvet Kavisha

रीमा एका खाजगी कंपनीत टेलिफोन ऑपरेटर. मोहन त्याच कंपनीत क्लार्क. हळूहळू ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. रीमाने घरच्यांच्या विरोधात जाऊन रजिस्टर लग्न केलं. मोहन घरचा मोठा मुलगा. चांगला शिकला सवरलेला. त्याच्या पगारावर सगळं मस्त चाललेलं. घरचे त्याला विरोध करण्याचा काही प्रश्न नव्हता. रीमाचं सासरी छान स्वागत झालं. 

रीमा ब्राम्हण तर मोहन सीकेपी. मोहनच्या घरी सोमवार सोडून सर्व दिवसांत मांसाहारी जेवण. त्याचं कुटुंब पण मोठं. रीमा तडजोड करत मोहनसोबत खुश होती. दोघेही एकत्रच ऑफिसला जात-येत होते. फुलपाखरांचे दिवस जणू.

लग्नाला दोन वर्षे झाली आणि मंदार झाला. बाळंतपणाची रजा संपली तशी तिने राजीनामा दिला. बाळंतपणानंतर वर्षभर रीमा घरी राहिली.   मंदारचं छान संगोपन केलं. एक वर्षाच्या मंदारला सासुबाईंकडे त्याला सोडून रीमाने दुसरी नोकरी शोधली. 

रीमा जात्याच हुशार आणि बोलबच्चन होती. एखादी गोष्ट पटकन शिकायची. आठदहा वर्षांत asst. Manager पर्यंतचा प्रवास नेटाने आणि स्वकर्तुत्वाने केला. तिच्यातील हुशारी पाहून कंपनीने तिला मार्केटिंग डिपार्टमेंटला पाठवली. पगारही वाढवून मिळाला. 

मार्केटिंग म्हणजे साईट्सवर विजीट असायच्या. ही असिस्टंट मॅनेजर त्यामुळे नेहमी सिनिअरसोबत जावं लागे. "एकटीच एवढ्या लांब का जातेस..?? त्यापेक्षा ही नोकरी सोडून दुसरी बघ एखादी"  असे सल्ले घरातून मिळू लागले. मोठ्या कष्टाने इथवर आल्यानंतर रीमाला मागे फिरणं प्रशस्त वाटेना. घरी येऊन रोजचं शेड्यूल ती सांगू लागली. कुठे गेलेलो, कसं वर्किंग असतं, सोबत सिनिअर असतात. मी एकटीच नाही जात कुठे असं समजावू लागली. 

मोहनला मात्र संशयाने घेरलं. तो तिला खोदून खोदून प्रश्न विचारु लागला. ती कोणत्या रस्त्याने येते-जाते. 'आईकडे जाऊन आले' म्हटल्यावर ती खरंच गेली का तिकडे..?  याचं cross check मोहन करायचा. 

तिला फक्त वाटायचं की मोहन काळजीपोटी सगळं विचारतोय. पण नंतर मात्र तो संशय घेत असावा असं वाटू लागलं. तिने बऱ्याचदा मनाला समजावलं. मोहन असं करणार नाही. किती प्रेम आहे एकमेकांवर दोघांचं. सगळ्यांच्या मर्जीविरुध्द लग्न केलंय. त्यामुळे विश्वास आहेच. आणि असायलाच हवा ना..!!

एकदा तिच्या ऑफिसबाहेर तिने मोहनला पाहिलं. तो स्वतःच्या ऑफिसला न जाता तिच्या मागावर आला होता.  तिला धक्का बसला. मोहन संशय घेतोय याची खात्री पटली. घरी आल्यावर तिने विचारलं नाही आणि त्यानेही सांगितलं नाही. 

मोहनचे प्रश्न काळजीतून नसून संशयातून आहेत हे कळलं तिला. खुप वाईट वाटलं. ज्या माणसासाठी घर सोडलं त्यानेच पाळत ठेवावी..??. त्याचा विश्वास नसावा आपल्या बायकोवर...??  कुठे गेलं ते 'तुझ्यासाठी जीव देईन वालं प्रेम'...?? कुठे गेली ती एकमेकांना दिलेली वचने...???  कुठे गेल्या साथ निभावण्यासाठीच्या घेतलेल्या आणाभाका..??? 

रीमा विचारांच्या आणि प्रश्नांच्या खोल डोहात डुंबत गेली.   तिचा प्रेम, त्याग गोष्टीवरून हळूहळू विश्वास उडत होता. मोहनही मनातून उतरू लागला. मोहन - रीमामधील दरी वाढलीच होती. तिने 'आता मोहन काय करतो' हे पाहायचं ठरवलं.  

ती आऊटडोअर विजीटसाठी जाताना नेहमी सेल्स मॅनेजर अशोक पवार सोबत असायचा. कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर असे. घरातून सकाळी दहा वाजता वेळेत निघायची. यायला मात्र आठ वाजून जायचे. कंपनीची गाडी आणि अशोक आधी तिला घरी सोडायचे. मग गाडी पुढे निघून जायची, अशोकला सोडायला. 

दिवसभर वेगवेगळ्या क्लायंट विजीटस्, मोहनचा बदलत जाणारा स्वभाव. नेहमी सोबत असणाऱ्या अशोकने घेतलेली काळजी हे सारं तिला अशोकच्या जवळ घेऊन जात होतं. एक एक करत गोष्टी शेअर होऊ लागल्या. विजिटनंतर बिल्डिंगखाली सोडून जाणारा तिला सिनिअर असणारा अशोक घरी येऊ लागला.  

मोहनचा संशयी स्वभाव पाहून त्याला रीमाबद्दल अंदाज आला. आणि सुरु झाली एक कहाणी. अशोक आणि रीमाचं अफेअरची.  जी मोहनला ही माहिती होती. मंदारला आईवडिलांची गरज आहे, म्हणून रीमा-मोहन घटस्फोट न घेता एकत्र राहत होते. खरंतर त्या नात्याला काही अर्थ नव्हता. ओळखीचे असूनही अनोळखी होते दोघे. 

अधूनमधून मोहन मंदारला आईविरुध्द काही बाही सांगून भडकवायचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला  राग यायचा त्यालाही. पण आताशा शांत रहायचा. अकाली नोकरी सोडून घरी बसलेला हतबल बाबा मंदारला चुकीचा वाटतं होता. एकटी आई घराचा गाडा ओढतेयं हे त्याला समजत होतं. तिचे आणि अशोक अंकलचे संबंध वेगळे आहेत, हे ही त्याला कळतं होतं. कदाचित आई आपल्यासाठी बाबासोबत राहतेय हे ही तो जाणून होता. मोहनला, मंदारला सर्व माहिती असूनही दोघेही काही करु शकत नव्हते. अशोक रीमाचा मानसिक, शारीरिक आधार बनला होता. 

शेवटी रीमा सेल्स डिपार्टमेंटची Head बनली. अर्थात यावेळी अशोकची मदत झाली. प्रत्येकवेळी प्रमोशन घेताना जशी व्हायची तशी. १९९८ साली अशोक रिटायर्ड झाला आणि रीमा त्याच्या जागी आली. २००० साली आपली सर्विस पुर्ण करून रीमा ही सेवानिवृत्त झाली. मधल्या काळात मंदारचं लग्न होऊन सून नातवंडे ही आलीत कुटुंबात. मोहन नातवंडांमध्ये छान रमलाय. ती ही रमलीय आजी म्हणून. पण अशोकसोबतचे संबंध तसेच आहेत. आजही रीमा अशोकसोबत बाहेर पिकनिकला जाते, खरेदीला जाते, जेवायला, सिनेमा किंवा गाण्याचा एखादा प्रोग्रॅम पाहायला दोघे सोबत असतात. 

संबंध लग्नबाह्य तरी कुटुंब न तोडलेले....🤦‍♀️🤦‍♀️

वाचकहो , मी या कथेचं समर्थन करत नाही. पण बऱ्याचदा आपल्या पार्टनरकडे सतत संशयाच्या नजरेने पाहणं नात्यासाठी घातक ठरतं. रीमासारखी एखादी, नसलेल्या नात्यासाठी संशयाच्या भोवऱ्यात अडकते तेव्हा "काहीच नसताना एवढा संशय घेतला जातोय तर आता तशीच वागून दाखवते यांना.. म्हणजे यांचा संशय खरा ठरल्याचा आनंद मिळेल यांना" अशा निर्णयापर्यंत येते. तिथूनच नात्यांच्या वाताहतीला सुरुवात होते. अर्थात दुखावल्या गेलेल्या मनाने तो रागाच्या भरात घेतलेला निर्णय असतो.  मोहनसारखे नवरे समोर सगळं दिसत असूनही काही करु शकत नाहीत. 

यात किती आयुष्य उध्वस्त झालीत याचाच विचार करुया फक्त. मी रीमाबद्दल लिहिलं तसंच अशोकच ही कुटुंब असेलच ना.. त्याच्या पत्नीने, मुलांनी आपल्या "वाटला" जाणाऱ्या बाबाला आनंदाने तर नक्कीच स्विकारलं नसेल ना.... 


कथा माहिती होती तेवढी तुमच्या समोर मांडली. वाचकहो, या कथेत काय चुक काय बरोबर ते तुम्ही शोधा.

© Velvet Kavisha

कथा शेअर करायची असल्यास लिंकसहित करा. Copy paste नका करु. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. तेव्हा नावासहित शेअर करायला विसरू नका.
फोटो गुगल साभार..

Post a Comment

0 Comments