#कथा स्त्रीमनाच्या ( महिलादिन सप्ताह विशेष)
#दागिन्यांचा_मान ..
©️ जया पाटील
" अगं सुलू .., आटोप पटकन.... किती वेळ घेणार अजून तयार होण्यासाठी .... अगं आपण मुलगी पाहायला जातोय आपल्या अभिसाठी .... !
नवऱ्या मुलीपेक्षा होणाऱ्या सासूबाईंच जास्त उजव्या दिसायच्या आणि उगाचच तुम्हा दोघांची तुलना व्हायची आणि बिचारी मुलगी underestimate व्हायची 😒 .....आणि घाबरून नकारच द्यायची ती आपल्या अभिला " सुधीरराव सुलभाताईंना चिडवत होते.
" पुरे झाले हा ....चावटपणा , हे काय वय आहे का असा चावटपणा करायचे .... ? सून यायची आहे घरात आणि तुमचे काय चालूय ... !
आपल्या वयाला नाही शोभत असे वागणे आणि माझ्या अभित काय कमी आहे की ती नकार देईल ...? शुभकार्य आहे आणि तुम्ही काय नकारघंटा लावली आहे हो ...? आता एकशब्द सुद्धा बोलु नका😡😡 " रूम मधून बाहेर येताच सुलभाताई चिडून सुधीररावांना म्हणाल्या.
रूममधून बाहेर आलेल्या सुलभाताईंकडे सुधीरराव काही क्षण फक्त पाहतच राहिले. सुधीरराव विलक्षण भारावले होते त्यांना पाहून.... आणि पुन्हा एकदा काळाच्या मागे जाऊन ते जुन्या आठवणींमध्ये हरवले. पूर्वीच्या आणि आजच्या सुलभाताई ...अगदी तश्याच होत्या. काळाची गतीच जणू थांबली होती सुलभाताईंसाठी... आजही त्या पूर्वी इतक्याच मनमोहक आणि रेखीव दिसत होत्या .... पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ....!
सुलभा ताईंच्या गोर्या कांतीवर सुंदर पिवळ्या रंगाची साडी , त्यावर सुंदर मखमली लाल रंगाचे ब्लॉउज , गळ्यात सुंदर ठसठशीत मंगळसूत्र , एक नाजूकसा राणीहार , हातात मोत्यांचे तोडे , गुलाबीसर हातात हिऱ्याची अंगठी , कपाळावरची नाजूक चंद्रकोरी टिकली , लांबसडक केसांची दोन पुडी घातलेली सैलसर वेणी सगळेच अगदी शोभून दिसत होते. मुळातच तो गोरा रंग आणि त्यावर चढलेला दागिन्यांचा साज.... !
विलक्षण सौंदर्य ते ...नक्षत्रासारखे अनुपम ... कोणालाही भुरळ पाडेल असे...!
सुधीररावांच्या बोलण्याप्रमाणे अगदी तरुण मुलीसोबत तुलना व्हावी अश्याच होत्या सुलभाताई ..... अगदी लावण्यवतीच जणू ... !
सुधीरराव अतिशय शांत आणि लोभस व्यक्तिमत्व ... त्यांची पत्नी सुलभा म्हणजे साक्षात लक्ष्मीच जणू .... ! दोघांचाही जोडा अगदी लक्ष्मी-नारायणासारखाच ....! अभिजीत आणि अंकिता अशी दोघीही लाघवी आणि संस्कारी मुले ... अगदी दृष्ट लागावा असाच सुधीररावांचा सुखी चौकोनी परिवार .... !
मुले शिकली , व्यवस्थित स्थिर-स्थावर झाली की आईवडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता सतावू लागते. " मुलांचे एकदा दोनाचे चार हात झाले की आपण जबाबदारीतून मुक्त ...." असा विचार प्रत्येक आईवडील करत असतात. त्याला सुधीरराव आणि सुलभाताई तरी कसा अपवाद असतील .... ?
अभि इंजिनीरिंग पूर्ण करून एका चांगल्या कंपनीत कामाला होता. अंकिताचे शिक्षण सुरु होते , पण अभि मात्र जॉब मध्ये सेटल झाला होता , त्यामुळे अंकिताचे शिक्षण पूर्ण होते तोपर्यंत सुधीररावांनी आणि सुलभाताईंनी अभिजीत साठी वधूसंशोधन सुरु केले होते. त्यामुळे आज सुधीररावांचा पूर्ण परिवार वधुपरीक्षण करण्यासाठी मानेंच्या घरी जाण्यास निघाले होते.
शशिकांत मानेची मुलगी अन्वी अतिशय गोड , सुंदर आणि संस्कारी , साधेपणा हाच तिचा खरा दागिना असल्यामुळे कोणालाही भावणारी अशीच होती अन्वी .... ! त्यामुळेच अन्वी अभिजीतला देखील पहिल्या नजरेतच भावली. अभिजीत आणि अन्वीची नजरानजर झाली , ती गोड लाजली आणि अभिजीत तिच्यावर फिदा झाला. अंकिताला देखील होणारी नवीन वहिनी खूप आवडली. आपल्या मुलाची पसंत तिच आपली पसंत म्हणून सुधीररावांनी देखील अभिजीतच्या पसंतीला होकार दिला. सुलभाताईंना मात्र अन्वी फार अशी मनात भावली नाही.
सुलभाताईंना स्वतःला नटण्या-मुरडण्याची भारी हौस ...! कुठेही गेले तरी चार लोकांनी आपल्या सौंदर्याचे कौतुक करायलाच हवे अशी त्यांची इच्छा असे. त्यांची इच्छा नेहमीच पूर्ण देखील होत असे कारण वयाच्या पन्नाशीत देखील त्या वीस वर्षाच्या मुलीला लाजवतील इतक्या सुंदर दिसत असत. त्यामुळेच आपल्या मुलाची होणारी बायको देखील अशीच हौशी असावी आणि तिच्या राहणीमानाचे आणि सौंदर्याचे देखील असेच खूप कौतुक व्हावे असे त्यांना वाटत होते त्यामुळेच या स्थळाबाबतीत त्या थोड्या नाराज होत्या. अन्वीचा साधेपणा त्यांना आवडला नाही ,
त्यामुळेच अन्वीला पाहून आल्यानंतर त्यांनी त्यांची मनातील नाराजीची भावना घरातील सगळ्यांना बोलून देखील दाखवली.
आईच्या बोलण्यामुळे अभि थोडा नाराज झाला पण मग सुधीरराव सुलभाताईंना समजावणीच्या सुरात म्हणाले ...
"अग सुलभा , सगळ्यात पहिले मुलाची पसंती ती आपली पसंती असते ....आणि संसार त्या दोघांनाही करायचा आहे ...आणि राहता राहिला अन्वीच्या साधेपणाचा प्रश्न ...? तर प्रत्येक व्यक्तीचे काही तरी वेगळे वैशिष्ट्य असते."
"प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या बाबतीत स्पेशल असते ...अन्वीचे देखील तसेच आहे ... तिच्यातला साधेपणा अगदी सगळ्यांच्या मनाला भावतो , स्पर्श करतो. तोच साधेपणा तिला खऱ्या अर्थाने स्पेशल बनवतो..... ! "
" जेव्हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळेस देखील आपण फक्त चवीपुरतेच काजू , बदाम , मनुका टाकतो ... का ...? तर मुळ शिऱ्याची चव तशीच राहावी. इतर पदार्थानी मुळ चव जायला नको म्हणून ....तसेच अन्वीबाबतीत देखील आहे ..तिचा साधेपणा हा तिचे मुळ स्वरूप आहे. मेकअप , स्टाईल ह्या सगळ्या गोष्टी फक्त तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. या सगळ्यात तिचा मुळ साधेपणा दाबला जाईल आणि ते मला , अभिला देखील नकोय. अन्वी जशी आहे तशीच उत्तम आहे. "
" शेवटी आपल्या लेकाचा आनंद तोच आपला आनंद .... ! हो की नाही ....? "
"त्यामुळे सुलभा , आता मनातील सगळ्यात शंकांना दुर सारून तु आपल्या अभिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात कर. वरमाय होणार आहेस तु ....तुझा थाट देखील तसाच असायला हवा की नाही... ? "
नाराजीने का असेना सुलभाताई अन्वी आणि अभिजीतच्या लग्नाला तयार झाल्या. अन्वी आणि अभिजीतचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. माप ओलांडून अन्वी घरात आली आणि सुलभाताईंची सून झाली.
नवीन घरात येऊन देखील अन्वीने सुधीरराव , अंकिता आणि अभि सगळ्यांचे मन जिंकून घेतले. ऑफिससोबतच घरातील सगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या ती चोख पार पाडत होती. घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी देखील ती लक्षात घेत होती. सुलभाताईंना देखील तिच्या या सगळ्या गुणांचे कौतुक होतेच पण त्यांना हवे होते तसे मेकअप आणि इतर भौतिक बाबींमध्ये मात्र तिला इंटरेस्ट नव्हता.
अन्वीचा लग्नानंतरचा पहिला सण आला मकरसंक्रांती.... सुलभाताईंनी हौशीने अन्वी साठी नवीन दागिने बनवले. हळदीकुंकवाचा मोठा कार्यक्रम ठेवला. अन्वीला खूप छान तयार होण्यासाठी सांगितले. अन्वी तयार झाली पण सुलभाताईंना हवे होते तसे मात्र नाही .... हळदीकुंकवाला येणारी प्रत्येक स्त्री फक्त एकच बोलून जात होती...
"सुलभाताई ..., सून छान आहे पण तुम्हा दोघींच्या आवडीनिवडी मात्र खूपच वेगळ्या आहेत ... अभिची निवड तुमच्या पेक्षा खूपच वेगळी आहे . तुमच्यापेक्षा तुमची सून खूपच साधी आहे ."
सुलभाताईंना खूपच वाईट वाटले. रागारागात त्यांनी अन्वीसाठी केलेले सगळे दागिने परत घेतले. सुधीरराव , अभि सगळ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. त्यांना रात्री सगळ्यांसमोर त्यांनी अन्वीला सांगितले ...
" अन्वी , तुझ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या माझ्या ...पण तु मात्र त्या पूर्ण करण्याकडे कधीच लक्ष दिले नाहीस ..त्यामुळे माझ्या संपूर्ण स्त्रीधना वर अर्थातच माझ्या सगळ्या दागिन्यांवर फक्त आणि फक्त माझ्या अंकिताचा अधिकार असेल. तुझा कधीच नाही. "
सुलभाताईंचे बोलणे ऐकून अन्वीला खूपच वाईट वाटले मात्र तिने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. अन्वी स्वतःचे कर्तव्य कमी करण्यात कुठेही कमी पडली नाही. तिच्या प्रेमळ वागण्यामुळे तिने सुलभाताईंना देखील आपलेसे केले. काळ हा कुठल्याही जखमेला भरण्यासाठी एक उत्तम औषध आहे त्यामुळे वेळ पुढे सरकत गेला तशीच सुलभाताईंच्या मनातील अन्वी विषयीची कटुता देखील कमी होत गेली.
अंकिताचे शिक्षण पूर्ण झाले त्यामुळे आता सुधीररावांनी आणि सुलभाताईंनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरु केले. तिच्यासाठी त्यांनी सुयोग्य अश्या रोहितची निवड केली. रोहित आणि अंकिताचा विवाह देखील अगदी थाटामाटात पार पडला. अन्वीने अंकिताच्या लग्नात देखील सगळ्यांची अगदी भरभरून काळजी घेतली. लग्नाची सगळी कामे आणि इतर जबाबदाऱ्या देखील अगदी व्यवस्थित पार पाडल्या. सगळ्यांचा मानपान देखील अन्वीने अगदी योग्य रीतीने केला. अंकिताच्या सासरच्यांनी सुलभाताईंजवळ अन्वीचे भरभरून कौतुक केले. त्यामुळेच सुलभाताई मनोमन खूप आनंदी झाल्या.
सुलभाताईंना मनोमन वाटू लागले की मी उगाचच अन्वीच्या साधेपणावर रागावत असे. मुळात तिचा साधेपणाच तिचे खरे सौंदर्य आहे. आपल्या मनातील भावना एकदा अन्वीला बोलून दाखवून तिची माफी मागावी असे सुलभाताईंनी ठरवले खरे ...पण किती वेळा अन्वी जवळ जाऊन देखील त्या मनातील भावना बोलून दाखवू शकत नसतं. शेवटी त्यांनी त्यांच्या मनातील भावना त्यांची प्रिय मैत्रिण देशमुखताईंना सांगितल्या. त्यांनी सुलभाताईंना समजावले ...
"अग सुलू , ज्या भावना आपल्याला खूपच त्रास देतात ना ..त्यांना कधीच अश्या दाबून ठेवायच्या नसतात. अन्वी खूपच चांगली मुलगी आहे. तु तिच्यासोबत एकदा बोलून तर पहा ती तुला नक्कीच समजून घेईल. काहीच बोलली नाहीस तर तिला तरी तुझ्या भावना कश्या समजणार? "
सगळे काही आलबेल चालू होते पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच चालू होते. एक दिवस काम करत असतानाच सुलभाताईंना अर्धांगवायूचा झटका आला त्यामुळे त्यांचा एक हात आणि एक पाय निकामी झाला. त्या अंथरुणाला खिळल्या. अन्वी या अवस्थेत देखील त्यांची तितकीच प्रेमाने काळजी घेत होती. त्यांची अंघोळ , त्यांना खाऊपिऊ घालणे सगळेच ती अगदी प्रेमाने करत होती. अन्वीच्या या प्रेमळ वागणुकीमुळे सुलभाताईंना सतत आपण तिच्या सोबत लागलेल्या वागणुकीचा पश्चाताप वाटत होता पण त्या देखील परिस्थितीमुळे हतबल होत्या. कदाचित आज मला अन्वीची गरज आहे म्हणून मी तिची माफी मागतेय असे तिला नको वाटायला म्हणूनच सुलभाताई अन्वीजवळ स्वतःच्या पश्चातापाच्या भावना बोलु शकत नव्हत्या.
सुलभाताईंना अंकिताला देखील भेटण्याची खूपच इच्छा असे पण अंकिता मात्र तिच्या संसारात रमली होती. आईला भेटायला आली तरी वरचेवर दहा मिनिट भेटून ती निघुन जात असे. सुलभाताईं मात्र तिच्या मायेच्या स्पर्शाला आसुसत असत.
संत एकनाथ यांनी म्हटले आहे .." पक्षी अंगणात आले , अपुला चारा चरून गेले. " त्यामुळे आईवडील मुलांकडून प्रेमाची जबरदस्ती देखील नाही करू शकत. तसेच काहीसे अंकिताबाबतीत देखील झाले होते.
एक दिवस अंकिता तिच्या सासरी काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे सुलभाताईंच्या साड्या घेण्यासाठी घरी आली. सुधीरराव देखील त्यावेळी सुलभाताईंच्या रूम मधेच होते.
आईच्या रूम मध्ये येऊन अंकिता आईला सांगू लागली ...
" आई , आता तुला उठता बसता येत नाही , पुर्वीसारखे छान तयार देखील होता येत नाही त्यामुळे आता या साड्यांची तुला गरज नाही ...त्यामुळेच आता त्या मी घेऊन जाते आणि राहता राहिले दागिन्यांचे तर ....ते तु आधीच अन्वीला सांगितले आहे कि तुझे सर्व दागिने फक्त आणि फक्त माझे असणार आहे ...त्यामुळे नंतर घेऊन जाण्यापेक्षा आताच मी हे सगळेच घेऊन जाते."
सुधीरराव आणि सुलभाताई पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत होते. डोळ्यातले अश्रू पुसत सुधीरराव म्हणाले ...
"अंकिता , आईला साड्या आणि दागिने या सगळ्या गोष्टी खूपच आवडतात. आयुष्यभर तिने या सगळ्या गोष्टी जपल्या आहेत. त्यामुळे आईच्या सगळ्या वस्तू आई असेपर्यंत तरी इथेच राहू दे. हवे तर कार्यक्रमासाठी एखाद दुसरी साडी तु घेऊन जाऊ शकते ...पण बाकी सगळ्या वस्तू इथेच असू दे ."
सुधीररावांच्या या बोलण्यामुळे अंकिता नाराज झाली आणि तिथून निघुन गेली. दिवसेंदिवस सुलभाताईंची तब्येत आणखीनच खालावू लागली. अन्वी मात्र तेव्हाही तितक्याच आपुलकीने त्यांची काळजी घेत होती. एक दिवस सुलभाताईंनी अन्वीजवळ त्यांची मैत्रीण ऍडव्होकेट सौ देशमुखताईंना भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. अन्वीने देशमुखताईंना सुलभाताईंना भेटण्यासाठी बोलावले. सुलभाताईंनी देशमुखताईंसोबत एकांतात बोलायचे ठरवले. सौ देशमुख आणि सुलभाताई बऱ्याच वेळ बोलत होत्या.
देशमुख ताईंसोबत बोलणे झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात सुलभाताई देवाघरी गेल्या. सुधीरराव , अंकिता ,अभिजीत आणि अन्वी सगळ्यांना दुःख अनावर झाले पण आलेल्या परिस्थितीला सामोरे तर जावे लागणारच म्हणूनच अन्वीने सगळ्यांना सावरले.
सुलभाताईंचे तेरावे आणि इतर विधी आटोपले. त्यांना जाऊन एक महिना झाला. त्यावेळेस अंकिता तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. सुलभाताईंच्या साड्या , दागिने आणि इतर वस्तू घेऊन ती निघाली तितक्यात तिथे ऍडव्होकेट देशमुख आल्या आणि त्यांनी सुलभाताईंचे मृत्युपत्राचे वाचन करायचे आहे असे सांगितले.
सुधीररावांना देखील या सगळ्या गोष्टींची कल्पना होतीच कारण त्यांच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आला होता. सौ. देशमुखांनी मृत्युपत्र वाचण्यास सुरुवात केली...त्यात नमूद केले होते...
" मी सौ. सुलभा सुधीर साठे .....माझ्या सर्व प्रॉपर्टीचे दोन हिस्से करून माझा मुलगा अभिजीत आणि अंकिता ह्यांच्या नावावर करत आहे मात्र माझ्या संपूर्ण स्त्रीधनावर , माझ्या दागिन्यांवर मात्र फक्त आणि फक्त माझी लाडकी लेक / सून सौ. अन्वी अभिजित साठे हिचाच अधिकार असेल. कोणीही जबरदस्तीने सुद्धा हा अधिकार तिच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही अगदी अंकिता सुद्धा नाही."
आईच्या मृत्यूपत्राच्या वाचण्यानंतर अंकिताला अश्रू अनावर झाले त्यावेळेस सौ.देशमुखांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवायला सुरुवात केली ..त्यात सुलभाताईंचा आवाज होता ...
प्रिय अन्वी ,
" तुझे अभिसोबत लग्न ठरले त्यावेळेस तु माझ्या फारशी पसंतीस उतरली नाही कारण फक्त एकच तुझा साधेपणा ... ! तुला माझ्या सारखे नटायला आवडत नाही फक्त एवढेच कारण पुरेसे ठरलेले मला तुझा दुस्वास करायला .... ! पण तुझे खरे सौंदर्य तर तुझा सालसपणा , तुझ्या अंगी असलेले चांगले गुण आणि तुझे संस्कार आहेत. तुझ्यातला चांगुलपणा ओळखायला उशीरच लागला मला ....पण तो ओळखून सुद्धा तुझी माफी मागायची हिम्मत कधीच झाली नाही. कदाचित इथे देखील माझा अहंकार मला नडला असावा. "
" ज्या अपेक्षा मला अंकिता आणि अभिजित कडून होत्या , त्यांच्या प्रेमाला , त्यांच्या स्पर्शाला मी आसुसलेले असायचे पण .., त्यांची ती कमतरता देखील ओळखून तु ती कमी भरून काढायची. "
" मला माफ कर अन्वी बाळा .. , तुझ्या या आईकडून खूप मोठी चुकी झाली ..पण त्या संक्रातीच्या दिवशी मी तुझ्याकडून घेतलेले सर्व अधिकार आज मी तुला परत देते आहे....मला खात्री आहे कि तु तुझ्या या आईला नक्की समजून घेशील. "
" अन्वी ,अभि आणि अंकिता असेच खूपच सुखात राहा. बाबांची काळजी घ्या ... मी नेहमी तुमच्यासोबतच असणार आहे आठवणींच्या आणि आशीर्वादाच्या रूपाने .....! "
अन्वी , अभिजीत आणि अंकिता तिघेही सुधीररावांना बिलगून रडू लागले. सुधीरराव तिघांनाही प्रेमाने कुरवाळत होते आणि आकाशात ला एक तारा सुलभाताईंच्या रूपाने गोड हसत होता .....!
समाप्त..
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels & Google
✍©️ जया पाटील

3 Comments
👌👌 भावपूर्ण
ReplyDeleteThank you
Deleteखुपच छान
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box