#स्वप्न_चालून_आले_भाग_एक
©️ जया पाटील
" अरे वा , तुमच्या रोहिणीला स्कॉलरशिप मिळाली ...खूप खूप अभिनंदन ...! खरंच तुमच्या लेकीचे कौतुक करावे तितके थोडे आहे ..!"
"इतक्या खडतर परिस्थितीवर मात करून तिने राज्यभरात होण्याऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत मध्ये एवढं मोठे यश मिळवले.. ते देखील फक्त स्व:अभ्यासावर ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे ....आम्हाला सगळ्यांनाच रोहिणीचे खूप कौतुक आणि अभिमान आहे. "
"रोहिणीच्या आई... , तिने तुमची आणि तिच्या बाबांचीच नव्हे तर आपल्या संपूर्ण कॉलनीची मान उंचावली आहे. "
शेजारच्या काकू ..रोहिणीच्या आईला कौतुकाने सांगत होत्या.
रोहिणी ...सुभाषराव आणि स्मिता ताईंची जेष्ठ कन्या... सुरज आणि धीरज अश्यादोन लहान भावांची लाडकी ताई .... ! तसे पाहता रोहिणी नावाचे एक नक्षत्र ...पण सुभाषरावांची रोहिणी देखील तिच्या नावाप्रमाणेच होती .... नक्षत्रासारखी सुंदर , सुशील , सद्गुणी , देखणी , मनमिळाऊ ..कोणालाही पहिल्यांदा पाहिल्यावर आवडेल अशीच ...! अगदी मनापासून मनात भरणारी ..... !
सुभाषराव एका कंपनीत काम करणारे साधारण कर्मचारी ...खूप काही श्रीमंत नसले तरीही खाऊन - पिऊन सुखी असलेले कुटुंब .काटकसरी बायको आणि तिघीही गुणी , संस्कारी मुले त्यामुळे त्यांचा संसार अगदी सुखात चालू होता .....थोडक्यात सांगायचे तर आर्थिक श्रीमंती नसली तरीदेखील खूप मोठी मनाची श्रीमंती असलेले हे सुभाषरावांचे एक समाधानी कुटुंब होते.
दिवसामागून दिवस सरत होते. रोहिणी मोठी होत होती. रोहिणी दिसायला जितकी देखणी होती तितकीच ती अभ्यासात देखील हुशार होती.
त्यामुळे प्रत्येक वर्षी उत्तम गुण मिळवून ती पास होत होती. इतर वर्षांप्रमाणेच रोहिणीने बारावीच्या परीक्षेत देखील खूप छान यश मिळवले. उत्तम गुण मिळवून तिने तिच्या महाविद्यालयातून सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला. लेकीच्या या यशामुळे सुभाषरावांच्या आनंदाला पार उरला नाही. सुभाषराव आणि स्मिताताई दोघांचाही उर अभिमानाने भरून आला. ते आनंदाने भरून पावले.
रोहिणी देखील परीक्षेत मिळालेल्या यशामुळे खुपच खुश होती. पुढील शिक्षणासाठी तिला फार्मसी क्षेत्रातील उच्चपदवी घेऊन तिला त्याच क्षेत्रात पुढे संशोधन देखील करायचे होते. तिची ही महत्वाकांक्षा तिने सुभाषरावांना सांगायची ठरवली. तिने तिच्या पुढील स्वप्नाबाबतीत तिच्या बाबांना अर्थातच सुभाषरावांना सांगितले.
सुभाषरावांना तिच्या मतांचा खूप आदर वाटला आणि तितकेच कौतुक देखील वाटले परंतु फार्मसी कॉलेजला लागणारी फी भरण्याची आपली ऐपत नाही हे सुभाषराव ओळखून होते. छोट्याश्या पगारात रोहिणी , सुरज आणि धीरज तिघांच्याही शिक्षणाचा भार त्यांना पेलवणारा नव्हता. आपल्या लाडक्या लेकीला मात्र हे सगळे कसे सांगावे ह्या द्विधा मनःस्थितीत ते होते. त्यांना त्यांच्या अडचणींची लाज वाटत होती परंतु सगळा दिखावा करता येतो पण पैशांचा दिखावा करता येत नाही हे सुभाषराव जाणून होते त्यामुळे त्यांनी रोहिणीला आपल्या अडचणी समजून सांगायचे ठरवले.
" मला माफ कर ... रोहिणी बेटा , तुझ्या या गरीब बापाच्या मजबुरीला समजून घे. तू मला तुझ्या पुढील शिक्षणाची कल्पना सांगितली आणि माझा उर अभिमानाने भरून आला. "
"इतक्या कमीवयात गगनभरारी घेणाऱ्या तुझ्या स्वप्नांच्या मला खूप अभिमान वाटला पण तुझ्या फार्मसी कॉलेजची ट्युशन फी भरण्याइतकी देखील तुझ्या या गरीब बापाची ऐपत नाही. "
" धीरज आणि सुरज दोघांच्याही शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे तुझ्या भविष्यासाठी , तुझ्या स्वप्नांसाठी मी इतकी छोटीशी गोष्ट करू शकत नाही याचीच मला खंत वाटते आहे. "
" मी तुझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप ठिकाणी मदतीची याचना देखील केली परंतु कुठूनही मदत उपलब्ध होऊ शकली नाही. "
" आज एक बाप म्हणून मला स्वतःच्याच नाकर्तेपणाची लाज वाटते आहे ...... ! मला माफ कर , बाळा ....मला खरंच माफ कर .....! "
असे सांगून सुभाषराव दोन्ही हात जोडून रोहिणीची माफी मागू लागले. आपल्या वडिलांना असे रडताना पाहून रोहिणीला देखील अश्रू आवरता आले नाही. त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन ती बोलू लागली ....
" असे नका बोलू ,बाबा ..प्लीज ...तुम्ही जे आजवर आमच्यासाठी केले त्याची कशासोबतही कधीच तुलना होऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याही बाबतीत आम्हाला कसल्याही गोष्टीची कधीच कमी भासू दिली नाही. "
" नेहमीच स्वतः अडचणीत राहिले पण आमच्या गरजा तुम्ही नेहमीच पूर्ण केल्या. फक्त माझ्या एकटीच्या स्वप्नांसाठी तुम्ही सुरज आणि धीरज दोघांच्याही भविष्याचे नुकसान नाही करू शकत हे मी समजु शकते .. बाबा "
" आपल्याकडे पैसा कमी असेलही पण तुम्ही दिलेले संस्कार , प्रेम हाच माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान ठेवा आहे आणि तो ठेवा कुठल्याही मापात मोजला जाऊ शकत नाही. माझ्या आयुष्यातील सगळ्यात अनमोल शिदोरी आहे ती ...! "
" फार्मसी कॉलेजला नाही जाता आले म्हणून काय झाले .. ? मी दुसऱ्या क्षेत्रात देखील माझे करियर घडवू शकते ..ते देखील तुम्ही दिलेल्या शिकवणुकीमुळेच ...! "
" तुम्हीच म्हणतात ना ..बाबा , " इच्छा तिथे मार्ग "
मग मलाही मार्गांची कमी नाही फक्त माझ्या बाबांना असे रडताना पाहून मात्र मला कुठलाच मार्ग सापडत नाही. त्यामुळे सर्वात पहिले स्वतःला अपराधी समजणे तुम्ही बंद करा.. बाबा .. "
" तुम्ही माझी कमजोरी नाही तर ताकद आहात ... बाबा ...सगळ्यात मोठी ताकद ....! "
वडिलांच्या आर्थिक परिस्थितीवर नाराज न होता रोहिणीने आर्टस् कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे ठरवले. जवळच्याच एका चांगल्या कॉलेजला तिला ऍडमिशन मिळाली. कॉलेजची दोन वर्षे संपत आली आणि त्यातच रोहिणीसाठी एक उत्तम स्थळ सांगून आले.
सुभाषरावांचे प्रिय मित्र असलेल्या शरद निकम काकांनीच रोहिणीसाठी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या शशिकांत जाधवांच्या मुलाचे अर्थातच निलेशचे स्थळ आणले. निलेश एका सुखवस्तू कुटुंबातील एकुलता एक मुलगा ..त्याला एक लहान बहीण आणि आईवडील ..छोट्याश्या पण सुखी परिवारातील ..लाडात वाढलेला ..पण अतिशय समजदार मुलगा .. एका कंपनीत चांगल्या पदावर निलेश कामाला देखील होता. थोडक्यात सांगायचे तर निलेशचे स्थळ म्हणजे रोहिणीसाठी उत्तम सोयरीक होती.
शरदरावांना सुभाषरावांच्या आर्थिक परिस्थितीची चांगली कल्पना होती त्यामुळे निलेश सोबत रोहिणी खूप सुखात राहिल असे शरदरावांनी सुभाषरावांना समजावले. शरदरावांच्या या विचारामागे बरीच कारणे देखील होती. कारण निलेशचे आईबाबा अतिशय चांगल्या विचारांची माणसं होती , त्या दोघांचाही हुंडा आणि मानपान अशा समाजातील काही वाईट रूढी-परंपरांना विरोध होता. सुभाषरावांकडून त्यांची कसलीही अपेक्षा नव्हती. विशेष म्हणजे रोहिणीला तिचे उरलेले शिक्षण पूर्ण करण्यास देखील निलेश आणि त्याचे आईबाबा दोघांचीही संपूर्ण संमती होती.
शरदरावांच्या या समजावण्यामुळे सुभाषराव देखील निलेश आणि रोहिणीच्या लग्नाला तयार झाले. सुभाषरावांना मात्र रोहिणीचे मत विचारात घेणे जास्त योग्य वाटत होते कारण शेवटी संसार रोहिणी आणि निलेश दोघांनाच करायचा होता. रोहिणीला हवे असलेले शिक्षण पूर्ण करू देण्यात आपण असमर्थ ठरलोच आहोत ..पण आता चालू असले शिक्षण पूर्ण करतांनाच रोहिणीच्या लग्नाचा विचार करणे म्हणजे तिच्यावर अन्याय करणे होईल असे मनोमन सुभाषरावांना वाटत होते. अपराधीपणाची भावना त्यांना मनोमन बेजार करत होती.
या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन सुभाषरावांनी रोहिणीला निलेशच्या स्थळाबाबतीतल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या ठरवल्या. आणि तिचा जो निर्णय असेल तोच मला मान्य असेल .....तिने कुठल्याही दबावात हा निर्णय घेऊ नये असे रोहिणीला प्रेमाने समजावून सांगायचे ठरवले.
रोहिणीला जवळ बसवून त्यांनी सांगितले ...
" रोहिणी , बाळ तुला तुझ्या शरद काकांनी तुझ्यासाठी आणलेल्या निलेशच्या स्थळाबाबतीत तुला माहिती आहेच. त्यांच्या परिवाराबाबत , आर्थिक आणि इतर स्थिती बाबतीत देखील काकांनी तुला संपूर्ण माहिती दिली आहे."
" माझ्या मते म्हणशील तर इतक्या चांगल्या विचारांची , सुनेच्या मतांचा , तिच्या भावनांचा विचार करणारी माणसे फार बोटावर मोजण्याइतकीच असतात. कारण आजकालच्या जमान्यात फक्त आणि फक्त दिखावा ..महत्वाचा आहे मग तो श्रीमंतीचा असू दे , पैश्याचा असू दे किंवा विचारांचा असू दे. "
" निलेश आणि त्याचे आईबाबा मात्र आजही माणुसकी जपून आहेत. उत्तम विचारांनी समृद्ध आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते."
" मला माहिती आहेत , बाळा ..माझ्या आर्थिक मजबुरीमुळे मी तुला हवे ते शिक्षण नाही घेऊ देऊ शकलो आणि आज तुझ्या शिक्षणाच्या अर्ध्यात तुझी सोयरीक जुळवायला निघालो आहेत. "
" खरेतर मी देखील या स्थळासाठी तयार नव्हतो कारण मला माहीत आहे कि लग्नानंतर तुझे अर्धवट थांबलेले शिक्षण पूर्ण होऊ शकणार नाही किंवा ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुझे कुटुंबीय तुला परवानगी देखील देणार नाही परंतु शरद काकांनी माझा गैरसमज दुर केला त्याचवेळेस मी या लग्नासाठी तयार झालो. "
" एक बाप म्हणून मला शरदच्या समजावणीच्या गोष्टी पटल्या आणि लेकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी या लग्नाला तयार झालो परंतु यात मात्र तुला माझी कुठलीही जबरदस्ती नाही. अंतिम निर्णय हा फक्त तुझा आणि तुझा असणार आहे आणि तुझा जो निर्णय असेल तोच मला मान्य असणार आहे. "
सुभाषरावांचे बोलणे ऐकून झाल्यावर स्वतःचा निर्णय कळविण्यासाठी रोहिणीने तिच्या बाबांकडून थोडा वेळ मागुन घेतला.
रोहिणीला खरंतर इतक्या लवकर लग्न करायचे नव्हते परंतु निलेश आणि त्याच्या कुटुंबियासारखी इतकी समजदार लोक पुन्हा मिळाली नाहीत तर माझ्यामुळे बाबांना पुन्हा खूप अपमान सहन करावा लागेल कारण आपली आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे ती जाणून होती. माणूस मनाने कितीही सुंदर असला तरी भौतिक बाबींना भुलणारी माणसेच या जगात जास्त आहेत हे तिला समजत होते. तिच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून न राहता एक माणूस म्हणून त्यांना मान देणाऱ्या निलेशच्या आईबाबांचा तिला मनापासून खूप आदर वाटत होता. त्यामुळे सर्व बाजूंचा योग्य विचार करून रोहिणी निलेश सोबत लग्नाला तयार झाली.
क्रमश:
रोहिणी निलेशसोबत लग्नाला तयार झाली तर खरे ...पण तिच्या स्वप्नांचे काय ...? सगळ्यांचा विचार करताना ती तिची स्वप्न पूर्ण करू शकेल का ..? निलेश आणि त्याचा परिवार तिला या सगळ्यात साथ देईल का ..? जाणून घेण्यासाठी पुढचा अंतिम भाग वाचायला मात्र विसरू नका.
भाग अंतिम वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
👉 स्वप्न चालून आले... भाग अंतिम
कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels & Google
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box