सई
©वर्षा पतके थोटे (लेखिका,
कवयित्री)
आज अचानक पावसाचे आगमन झाले. तसं तर पावसाळी दिवसात पाऊस येतोच. पण श्रावणात ऊनपावसाचा खेळ सुरु असतो म्हणून आज सईला वाटलं आभाळ काही भरून आलेलं नाही थोडं अंगणातल्या झाडांची उखरी करूयात म्हणून ती झाडांच्या मुळाशी असलेली माती एका छोटया विळ्याने उखरत होती मध्येच झाडाच्या पानांना हात लावून प्रेमाचा एक कटाक्ष झाडांकडे टाकत होती. तेव्हा तिचे डोळे आपोआप भरून येत होते. तिला चांगल्या प्रकारे कळून चुकलं होतं की प्रेम हे माणसांपेक्षा, झाडांवर, पशू-पक्षांवर, निसर्गावर करावं. माणसं दगाबाज निघतात. पण निसर्ग कसलीही अपेक्षा न करता भरभरून देतो. झाडांना उखरीकरता करता ती कधी भूतकाळात हरवली तिचं तिलाही कळलं नाही.
साधारण तीन-चार वर्षापूर्वी समीर तिच्या आयुष्यात
आला. त्याच्या फोनवरच्या बोलण्याने, व्हाट्स ऍप वरच्या चॅटींग ने सई हळूहळू
त्याच्या प्रेमात पडत गेली. आयुष्यात एखाद्या गोष्टीची कमी असेल आणि ती गोष्ट
स्वतःहून जर चालत आली असेल तर आपण पटकन त्या वस्तुच्या, व्यक्तिच्या प्रेमात
पडतो. सई चे पण असेच झाले होते. सई आणि समीर दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते
तरीही दोघांमध्ये अलग अलग शहरात राहत असूनही एक बंध निर्माण होत होता. दोघेही
एकमेकांशी बोलण्यासाठी उत्सुक असायचे. सकाळी व्हाट्स ऍप ला गुड मॉर्निंग
केल्याशिवाय त्या दोंघाचा दिवस सुरु होत नसे. हळूहळू तो तिला कविता, गझल पाठवू
लागला ते ही त्याने रचलेल्या. आता तिचा विश्वास पक्का होत होता की समीरला मी
आवडते. तसं कधी त्याने सांगितलं नव्हतं. आणि तिनेही कधी विचारलं नव्हतं. सईने तिचे
लग्न झाल्यानंतरच्या दोन वर्षातच ह्रद्याचे सर्व दरवाजे स्त्री-पुरूष संबंधातील
प्रेम या एका विषयासाठी बंद केले होते. लग्नानंतर अगदी काही दिवसातच तिच्या लक्षात
आलं होतं की ज्याच्याशी आपलं लग्न झालं तो फक्त एक व्यवहार ठरलाय. तुझी मुलगी आणि
आमचा मुलगा दोघंही लग्नाची म्हणून उरकून टाकूया लग्न. त्याप्रमाणे सईचं लग्न
झालं होतं. दोघांची मने कुठे जुळली होती ? आणि सईच्या दोनच वर्षात लक्षात आलं होतं
ज्याच्याशी आपलं लग्न झालं तो जीव लावावा असं व्यक्तिमत्वही नव्हतं. पण लग्न तर
झालं होतं . तिचं शरीर जरी नव-याचं झालं होतं तरी सईचे मन मात्र आयुष्याच्या
चाळीसीतही कोरं करकरीत होतं अजूनपर्यंत तरी तिला तिच्या मनावर अधिराज्य गाजवणारा
व्यक्ती मिळाला नव्हता आणि आता शक्यताही नव्हती. तिची काही त्या विषयी कुरबुर नसली
तरी तिने ती मनातली सल मनातच दाबून टाकली होती.
पण वाचन - लेखणाची सवय असल्यामुळे तिने ऑनलाईन
लिखाणाला सुरूवात केली होती. आणि वयाच्या चाळीशीत अचानक तिची ओळख समीरशी झाली. तो
सुद्धा लिहित होता. म्हणजे दोघेही लेखक होते. त्याच्या शब्दांनी हळूहळू
तिच्या मनाचा ताबा घेणे सुरू केले. इतके की त्याच्या लिहिलेल्या त्याच्या ऑनलाईन
पोस्टमध्ये, कवितेमध्ये, गझलेमध्ये ती स्वतःचाच चेहरा शोधत होती. तिला जशी त्या
शब्दांची धुंदी चढली होती. तिचा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी उगवायला लागला होता
आणि त्याच्याचसाठी मावळायला लागला होता. पुढे पुढे दोघांनाही एकमेकांची
स्पदंने जाणवत होती. जरी दोघंही वेगवेगळ्या शहरात राहत होती. कधी फोनवर तर कधी
मॅसेंजर, वाट्स ऍपवर रोजचच बोलणं, मॅसेजेस ठरलेले होते. देवाप्रती इतकी आस्था
बाळगणारी सई इथे मात्र त्याच्यामुळे देवालाही विसरू लागली होती. हो पण
कुटूंबाप्रती असलेली तिची जबाबदारी ती न कुरबुरता पार पाडत होती. पण तिच्या सोबत
तो जरी शरीराने नसला तरी चित्ती मात्र त्याने त्याने ठाण मांडले होते. हे सईकडे
पाहून परक्या व्यक्तीलाही जाणवत होते. सतत शांत आणि चूप चूप राहणारी सई खूप आनंदी
राहायला लागली होती. चारचौघात मिसळायला लागली होती. एकटी असली तरी तिच्या चेह-यावर
आनंद कायम राहू लागला होता. तिचे ओठ सतत छान छान गाणी गुणगुणू लागली होती.’ आज मै
उपर, आसमा नीचे’ अशी अवस्था सई ची झाली होती. सईला वाटायचं तिला तिचा सखा,
परमेश्वर समीरच्या रूपात मिळाला. ज्याच्यावर ती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवू
शकते. तो पण दिवसातला बराच वेळ तिला देई. कधी लगेच कविता करून पाठवी तर कधी तिच्या
प्रश्नांची उत्तरे आनंदाने देत असे. दोघांनाही एकमेकांची ओढ जाणवत होती. पण कधी
शब्दातून दोघंही व्यक्त झाली नाहीत. कसे होणार वयाची चाळीशी दोघांनीही ओलांडली
होती. दोघंही विवाहीत होती. दोघांनाही मुलं होती. नाही म्हटलं तरी सामाजिक बंधन
मध्यमवर्गीय मानसिकतेत आडवी येतातचं. पण दोघांनाही कसली अपेक्षा नव्हती. निदान
तिला तरी तसं वाटतं होतं. एक निखळ आनंद रोज शब्दातून, बोलण्यातून एकमेकांना देत
राहायचा एवढी आणि एवढीच तिची अपेक्षा होती. तसं तर दोघंही वेगवेगळ्या शहरात राहत
होती पण मनाने मात्र एक झाली होती. असंच तिला सारखं वाटत राहायचं. तसाही तिचा
प्रारब्धावर, नियतीवर , माणसांवर भोळा विश्वास होता. तो पण तिच्या मनातल्या
संकल्पनेत पूर्णपणे उतरला होता. या बंधाला पुढे नेण्यासाठी एकदा ती त्याच्या शहरात
संमेलनाच्या निमित्ताने त्याला भेटण्यासाठी गेली. तो ही
थोड्यावेळासाठी का होईना सईला भेटला. त्यानंतर तिचा त्याच्यावरचा विश्वास
आणखी पक्का झाला. हे अद्वैत बंध साधारण तीन वर्ष सुरू होते. तीन वर्षानंतर हळूहळू
त्याचा सईसोबतचा ऑनलाईन वावर कमी होऊ लागला. हे सईलाही जाणवू लागलं होतं. तीने
त्याला बरेचदा आडून आडून विचारायचा प्रयत्न केला. ‘समीर तुम्ही आजकाल माझ्याशी
पहिले सारखे बोलत नाही’? समीर हसत हसत टोलवा-टोलवीचे उत्तरं देऊ लागला. तरिही ती
त्याची वाट पाहू लागली. आपण पाठवलेल्या मॅसेजला आता उत्तर देईल ? मग उत्तर देईल.
या विचारात ती दिवस- दिवस घालवू लागली. तो आता तिला फार टाळायला लागला होता. फार
काही विचारलं की काहीतरी अनपेक्षित उत्तर देऊन मोकळा होत होता. तिला कळत नव्हतं
असं नव्हतं पण तिचा तिच्या चांगुलपणावर फार विश्वास होता आणि त्याने शब्दातून ,
बोलण्यातून का असेना तिच्या ओंजळीत सुखाचे चार क्षण घातले होते. ते तिच्यासाठी फार
अनमोल होते म्हणून तोही तिला फार अनमोल होता. पण आताशा असं व्हायला लागलं होतं की,
ती जेवढी ते क्षण पकडायला जायची तेवढा तो निसटून चालला होता. तीने स्वतःला बरंच
समजावून पाहिलं. त्याला विचारून पाहिलं पण कुठेच, काहीच उत्तर मिळालं नाही. मग काय
आधीच दुःखाला पदराची गाठ मारणारी ती. हे ही दुःख म्हणजे आपलं प्रारब्ध असेल असं
समजून ती दुःखाला जोजवून जगत होती. ती मनातून पार खचली, तुटली पण कोणाला जाणवू
दिलं नाही. समीरला हरप्रकारे विचारून झालं, चूक नसताना माफी मागून झाली पण तो काही
‘ताकास तूर लागू देईना. सईला शांत राहण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. कोणाला
सांगायचं म्हटलं तरी काय सांगू शकली असती? हा विचार करून ती आतल्या आत रोज मरत
राहिली.
तशी सई कायमच शांत स्वभावाची होती. आक्रमकता तिच्या रक्तात नव्हतीच. पदरी पडलं अन् पवित्र झालं हे समजून घेण्यातला तिचा स्वभाव होता.
साधारण एक वर्ष नंतर अचानक तिच्यापुढे त्याच्या फितुरीचे चित्र स्पस्ट झाले होते. तिच्याच सारखी तिची एक मैत्रीण तिच्या स्वतःच्या भावनांचे पदर उलगडत गेली आणि जेवताना जसा एखादा खडा दाताखाली यावा आणि त्या खड्यामुळे आपलं शरीर थोडावेळ का असेना भुंकपासारखे हलावे तसंच काहीसं समीरचे नाव तिच्या तोंडी ऐकून तिला झालं होतं. तिला आता सगळं चित्र स्पस्ट व्हायला लागलं होतं की आपण ज्या शब्दांवर, कवितावर आपला मालकी हक्क मनातूनच का असेना अधोरेखित करत होतो. ती तर परकी झाली आहेत. हे अनाकलनीय कसं घडत गेलं. जेव्हा तिने तिच्या मैत्रीणीला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे तर एक मृगजळ होतं. जे आता आपली मैत्रीण अनुभवते आहे. पण हा थोड्या वेळाचा पावसाचा शिडकावा का आला असेल आयुष्यात ? जीवनाला , नियतीला काही शिकवायचे असेल का ? की हे ही माझ्या प्रारब्धाचाच भाग असेल ?
असं म्हणतात की, जिथे थोड्याशा दुःखाने माणूस कोसळतो, तिथे जास्त दुःख पदरात असलं की, माणूस त्यातून सुखाचा मार्ग शोधत राहतो. याच मार्गाचा सईने उपयोग करायचं ठरवलं. दुःखातून निघायला तिला बराच त्रास झाला. पण तो त्रास तिने फार काळजीपूर्वक न्याहाळला. त्यामध्ये होणारी मनाची अवस्था, मनाची प्रत्येक पातळी तिने फार धैर्याने आणि समजंसपणे सांभाळली आणि आपलं तुटलेलं मन पुन्हा निसर्ग प्रेमात रूजवायचं हे तिने मनाशी पक्कं ठरवलं. तिला आता पूर्णपणे कळून चुकलं होतं की, ज्याला आपण प्रेम समजत होतो. ते फक्त माझ्या बाजूने होतं कारण माझ्या आयुष्यात या गोष्टीची कमी होती. तो तर त्याचा स्वभावच तसा होता. त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्त्रीला मी तुझाच आहे दाखवण्याचा. जेव्हा तिने झालेल्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की , त्याने तर मला आतापर्यंत असं कुठलंच वाक्य, कुठलाच शब्द, किंवा बोलण्यातूनही म्हटलेलं नाही की, तू मला आवडतेस ते ! किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे ते. मी तर स्वतःच स्वतःची समजुत करून घेतली होती की तो सुद्धा माझ्या प्रेमात आहे. पण मग त्याने माझ्याशी असं अचानक बोलणं का कमी केलं असेल ? सईला हा एकच प्रश्न फार सतावत होता. माझं काही चुकलंय का ? नकळतपणे का असेना मी त्याला दुखावलं का ? पण मैत्रीणीशी सविस्तर बोलल्यावर कळलं की तो त्याच्या संपर्कात आलेल्या स्त्रीशी असाच वागतो. मनाजोगं काही झालं नाही की तेथून निघून जातो आणि सांगतो सध्या कामाचा फार व्याप आहे त्यामुळे मी जास्त ऑनलाईन राहू शकत नाही. हे ऐकून सई पार हादरलीच. पण आता हादरून काहीच उपयोग नव्हता. तिने मनाशीच निर्धार केला. काय खरं आणि काय खोटं देवचं जाणो. पण मी मात्र आता कुठल्याही तकलादू प्रेमाच्या भानगडीत न पडता. निसर्गावर भरभरून प्रेम करणार आहे आणि त्याने शब्दातून दिलेले चार क्षण त्या भरोश्यावर मी सकारात्मकतेने जीवनाकडे बघणार आहे.
ही संपूर्ण कथा सईला रिमझिम सुरू असलेल्या पावसात आठवली. सईची मनातली कथा संपली आणि खूप जोरात पाऊस सुरू झाला. सईने मनसोक्त त्या पावसात भिजून आपल्या डोळ्यातील अश्रू वाहून जाऊ दिले. घरातली लोक तिला आवाज देत होती. आजारी पडशील म्हणून सांगत होती. पण त्यांना कुठे माहिती होतं की ती तर तिच्या मनाला झालेला आजार अश्रूंचा अभिषेक घालून ठिक करत होती. पाऊस थांबला तशी सई भानावर आली. तिला आता फार हलकं हलकं वाटायला लागलं होतं. अंतर्बाह्य ती स्वच्छ झाली होती. तिने स्वतःला या एकल वाटेवरून दुर सारून चहा पिताना मनाशीच ठरवलं की , मी साॅयकोलाॅजीचे सत्र सुरू करायला हवेत. कारण तिची साॅयकोलाॅजी मध्ये मास्टरी होती आणि ती आता पर्यंत धुळ खात तशीच पडून होती. या साॅयकोलाॅजी मधून ती स्वतःच पेशंट म्हणून उत्तमरित्या बाहेर पडू पाहत होती तेही पावसाचा आधार घेऊन. तिला जाणवलं माझ्यासारखे अनेक असतील ज्यांना मी ठिक करू शकते. तिच्या मनाचा निर्धार आता पक्का झाला होता. या नंतर पुढे संपूर्ण आयुष्य तिच्या मनातला पाऊस तिच्याच साठी बरसणार होता आणि ती एकटीच चहाचा घोट घेत त्याचा मनसोक्त आनंद घेणार होती.
©वर्षा पतके थोटे (लेखिका, कवयित्री)
disclaiimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
1 Comments
👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box