लागी रे मुझे तुमसे मन की लगन - सुप्रिया रामचंद्र जाधव



लागी रे मुझे तुमसे मन की लगन'

©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव

 तळ्याकाठचे विहंगम दृश्य बघत सान्वी चहाचे घोट घेत होती. हा तिचा नित्यनेम होता. हिरवागार निसर्ग, थंड, आल्हाददायक हवा, रिमझिमणारा पाऊस बघत तिची प्रसन्न सकाळ सुरू होत असायची.

    रोज सकाळी पक्षांचा किलबिलाट नेहमीच कानावर पडायचा, पण आज 'सारस पक्षाची' जोडी तळ्याकाठच्या झुडपात घरटे तयार करत होती, दोघेही घरटे बनवण्यात मग्न झाले होते. त्या जोडीला बघून निसर्ग आणि पक्षांची आवड असलेली सान्वी खूप आनंदी झाली, आता तिला या जोडीचे रोज निरीक्षण करता येणार होते, प्रेमाचे आणि एकनिष्ठेचे प्रतिक असलेली ही जोडी. हे परदेशी पक्षी विणीच्या हंगामात भारतात येतात, यावेळी चार महिन्यांच्या अधिवासासाठी त्यांनी सान्वी च्या घराशेजारील तळ्याचा काठ निवडला होता. 

 सान्वी विचार करत होती, या परदेशी पाहुण्यांना यायला मात्र व्हिजा, पासपोर्टची गरज लागत नाही, किती स्वच्छंदी जिवन आहे नाही यांच? नाहीतर रेगेन

 त्याला भारतात यायला व्हिसा, पासपोर्ट ची गरज लागणार आहे. आता तिला रेगेनची प्रकर्षाने आठवण येऊ लागली, ती गुणगुणू लागली 

"पंछी होते तो उड आते रे पपिहा तू बालमा, तुझे दिल का राग दिखलाती रे.....

 सान्वी चे डोळे भरून आले होते. 

 रेगेन सान्वीचा परदेशी मित्र, चार वर्षांपूर्वी इटलीला कंपनीच्या प्रोजेक्ट वर काम करायला गेली असताना तिला तिथे रेगेन भेटला होता. तो ही त्याच  ऑफिस मध्ये कामासाठी आला होता. तिथे त्यांची पहिली भेट झाली होती. बघता क्षणीच रेगेनच्या चांगल्या व्यक्तिमत्वाची छाप तिच्यावर पडली होती. दोघांनी एकत्र काम ही केले होते. 

शेवटचे दोन दिवस सान्वीने  इटलीत भटकंती करण्यासाठी राखून ठेवले होते. 

"इटलीत आहेस तर लेक कोमोला भेट दे" 

असे तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले होते, त्यानुसार ती लेक कोमोला  एकटीच भेट द्यायला गेली होती. ट्रेनमधीलतीन तासांच्या प्रवासात, ट्रेनमधून दिसणारे सृष्टी सौंदर्य, छोटी छोटी गावे, आजुबाजूची शेती, डाव्या बाजूला असलेला विस्तीर्ण लेक कोमो आणि दुसऱ्या बाजूला पांढऱ्या आल्प्स पर्वत रांगा , त्या पर्वतावरील छोटी, मोठी, सुंदर घरे. नेत्रदिपक ,सुंदर नजारा पाहून ती हरवून गेली. 

तीन तासाचा प्रवास कसा सरला तिला कळलेच नाही. तीने प्रथम बोलऍंगोला भेट दिली . विशालकाय लेक कोमो आणि तिथल्या निसर्गात ती हरवून गेली. 

तिथेच समोर चित्र रेखाटणारी एक व्यक्ती तिला पाठमोरी दिसली, ती उत्सुकतेने पुढे गेली असता नकळत तिच्या तोंडून निघाले, 

अरेच्चा हा तर रेगेन!....

तिला पाहून रेगेन बोलला

 "हे बेबी  मला माहीत असते तू इकडे येणार आहेस तर सोबतच आलो असतो."

रेगेनने कॅनव्हासवर  समोरील लेक कोमो आणि निसर्गाचे हुबेहूब चित्र रेखाटले होते. तिथेच दुसरे चित्र होते, आल्फ्रेड पर्वत रांगा वरील छोट्या छोट्या सुंदर घरांचे, तिच्या तोंडून सहज उद्गार गेला, 

 "किती सुंदर चित्र काढतोस, मोठा चित्रकार आहेस तू!   

"थॅक्स सान्वी, आता  इथे  सोबतच फिरु सान्वी, तूला इथले सुंदर प्वाईंटस दाखवतो," रेगेन बोलला.  ती सफर यादगार ठरली होती. विशेषतः बोटीतून केलेला प्रवास, आजूबाजूचा सुंदर नजारा, पलिकडील शहरात केलेली भटकंती, आणि तिथल्या सुंदर बागा, पुरातन संग्रहालय,  खरेच दोन दिवस मनमुराद भटकंती झाली, सोबत वेगाने सारखा मित्र... 

अतिशय हुशार, धट्टाकट्टा रेगेन एक कुशल इंजिनिअर तर होताच त्यासोबत तो उत्तम चित्रकार आणि निसर्गप्रेमी होता. निसर्ग प्रेम,आणि वाचनाचे वेड हे त्या दोघांचे दोन गुण जुळत होते. दोघांची चांगली गट्टी जमली. सान्वी एका बाकावर बसून टक लावून लेक कोमोला न्याहाळत होती, साधारण अर्ध्या तासात तिचे स्केच काढून रेगेनने सान्वीसमोर धरले, सान्वी आश्चर्य आणि आनंदाने त्याच्याकडे बघतच राहिली.  ती रेगेन वर खूप खूश झाली. त्या दोघांत आता घट्ट मैत्री झाली होती, हो 'मैत्रीचे पवित्र नाते', नंबर ची देवाणघेवाण झाली एक जिवाभावाचा मित्र घेऊनच सान्वी परदेशी टूर वरून परतली होती. 

 पुढे त्यांचे रोज थोडेतरी बोलणे व्हायचे, कधी खंड ही पडायचा, असाच मोठा खंड पडला कोरोना काळात, सान्वीला कोरोना झाला होता त्यामुळे जवळपास एक महिना त्यांच्यात संभाषण झाले नाही. एक दिवस सान्वी ला रेगेनचा फोन आला, सान्वीचा  मेसेज,फोन  न आल्याने तो खूप अस्वस्थ झाला होता,  तिला कोरोना झाला होता  हे त्याला कळाले,त्याला तिची काळजी वाटत होती. त्याच्या मनात आपल्या बद्दल एवढा आपलेपणा आहे हे पाहून सान्वी भारावून गेली होती. कळत नकळत हळूहळू बंध जुळू लागले होते.

  आज काय केलं, कोणतं पुस्तक वाचलं, कुठे भटकंतीला गेली त्याची चित्रकला आणि  देश पातळीवरील राजकीय, सामाजिक घडामोडी  असे सगळे विषय त्यांच्या संभाषणात असायचे.रोज एकमेकांशी तासभर तरी व्हिडिओ कॉलवर ते दोघे बोलत होते. कळत नकळत तारा जुळत होत्या, सान्वी आता गुणगुणू लागली होती, 

लागी रे मुझे तुमसे मन की लगन... 

तिकडे रेगेन  ही तिच अवस्था होती, रोज एकमेकांशी गप्पा मारल्याशिवाय त्यालाही चैन पडत नव्हता. सान्वीच्या आई बाबांनाही दोघांची मैत्री माहित होती. ते ही कधीतरी त्याच्याशी थोडेफार बोलायचे. 

व्हॅलेंटाईन डेला रेगेनने तिला विल्यम्स शेक्सपियरची True love  ही poem  पाठवली होती. 

Let me not to the marriage of true mind

Admit impediments

Love is not love 

Which alters when it alteration finds

Or bends with the remover to remove 

त्याला तिने दिल इमोजी पाठवून प्रतिसाद दिला होता. हळूहळू एकमेकांच्या भावना त्यांना कळू लागल्या होत्या. 

सान्वी अठ्ठाविसीची झाली होती , ती एका नामांकित कंपनीत सिनियर इंजिनिअर होती. आता तिचे आईबाबा तिच्या लग्नाचे बघू लागले होते. मला एवढ्या लवकर  लग्न करायचे नाही, सान्वीने सांगून टाकले .

 त्यावर तिचे बाबा तिला बोलले, 

"माझा  मित्र दिलीप पाटीलचा एकुलता एक मुलगा कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे, शिवाय घरची गडगंज संपत्ती. काही कमी पडणार नाही तुला? त्यांच्या कडून विचारणा झाली आहे, मी सुजय बद्दल बोलतोय, ओळखीचा आहे ना तुझ्या तो?... 

"हो बाबा ओळखीचा आहे पण... 

"आता पण बीण काही नाही बार उडवून टाकू यंदा. " सान्वीचे बाबा

"नाही बाबा एवढी घाई करू नका सान्वी बोलली."

"बेटा एवढे चांगले स्थळ हातचे जाऊ द्यायचे नाही मला."

सान्वीने निक्षून सांगितले,

"पैसा, अडका, धनदौलत रेडिमेड नको आहे मला, त्यात मजा नसते बाबा, 

स्वकमाईतून मिळालेला आनंद काही वेगळाच असतो."

"जरा समजवा आपल्या लेकिला"... 

सान्वी ची आई मधुराताईंना बोलत रागाने सान्वी चे बाब तिथून निघून गेले. पंधरा दिवस घरातील वातावरण बिघडलेले होते. सान्वी हिरमुसलेली होती. 

तुझ्या मनात तरी काय आहे? माधुरीताईंनी तिला विचारले आणि तिने रेगेन बद्दल आईला सांगितले.   माधुरीताई दचकून बोलल्या,

"मैत्री ठीक आहे पण जीवनातील एवढा मोठा निर्णय, सान्वी विचार कर एकदा, रेगेन हुशार आहे, माणूस म्हणून उत्तम आहे पण तो परदेशी त्यात ही तो कृष्णवर्णीय," युरोपात घडलेल्या घटना पेपर मधून वाचनात येत होत्या, त्यामुळे तिची आई कासावीस झाली होती . 

"या लग्नाला बाबा ही तयार होणार नाहीत." 

प्रेम ही पवित्र भावना आहे आई, किती सुंदर असते प्रेम त्याला देश, भाषा धर्म काही माहित नसते, म्हणून तर प्रेम ही एक सुंदर भावना असते, दूर राहून ही प्रेम करतात येत त्याला जवळच असावं असे काही नसतं

मी मनाने एकदा त्याला वरले आहे, मला माझ्या संस्कृतीचा जेवढा अभिमान आहे तेवढेच माझे सर्वधर्मसमभावाचे विचार, केवळ भाषणापुरते मर्यादित नाहीत, काळा, गोरा या गोष्टी गौण आहेत माझ्या दृष्टीने, एक माणूस म्हणून जितका तो उमजला आहे, तितके अन्य कोणी नाही, मी लग्न केले तर रेगेनशीच लग्न करेन, अन्यथा नाही."

 मुलीच्या निर्णयाने आई धास्तावली होती. 

"रेगेन तयार आहे का तुझ्या बरोबर लग्न करायला?" माधुरी ताईंनी विचारले. 

 " हो आई परवाच आमचे बोलणे झाले. तो ही म्हणतो लग्न करेन तर तुझ्याशीच... 

 "पण बाळा त्यांची संस्कृती वेगळी, विवाह संस्था मजबूत नाही त्यांची...  तस होणार नाही आई." सान्वी बोलली. 

आता माधुरीताई कोड्यात पडल्या होत्या. काय करावे, हिच्या बाबांना कसे समजवावे.

योग्य वेळ साधून माधुरीताईंनी सगळे काही सान्वीच्या बाबांच्या कानावर घातले, तेही सुरवातीला थोडे हादरलेच. पण अलिकडेच आपल्या इकडे दोन तीन लग्न तुटलेल्या घटना ऐकल्या होत्या, दिलीपचा मुलगा ही छंदीफंदी होता हे बाबांना समजले होते त्यामुळे बाबा ही सान्वीच्या निर्णयाशी सहमत झाले. 

 खूप विचारांती एक माणूस म्हणून चांगला असणाऱ्या रेगेनशी विवाह करायला बाबांनी परवानगी दिली, त्या अगोदर रेगेन बरोबर सगळ्या गोष्टी व्हिडिओ कॉलवर बोलून क्लिअर केल्या होत्या. त्याच्या उच्च शिक्षित आईबाबांशीही ते दोघे बोलले होते.

 बाबांचा होकार ऐकून सान्वी आनंदाने वेडी झाली होती. तिने आनंदाने आईला मिठी मारली आणि लगेच रेगेनला मेसेज करून आनंदाची बातमी कळवली. 

त्या दिवशीची सायंकाळ अतिशय रमणीय होती. सान्वीच्या हातात चहाचा कप होता, गच्चीत बसून ती मजेत चहाचे घुटके घेत होती. समोर केशरी आभाळ, घरट्याकडे परतणारे पक्षी, थंड हवा, पारिजातकाचा मंद सुवास घेऊन येत होती, आणि तळ्याच्या काठावरील झुडपावर घरटे पुर्ण विणून प्रेमाचा करत असलेली ती सारस पक्षांची जोडी बघून, सान्वी प्रसन्नचित्ताने गाणे गुणगुणत होती. 

"लगन लागे तुमसे मन की लगन, लागी रे मुझे तुमसे मन की लगन." 

 ©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव


disclaiimer


सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  

  

Post a Comment

0 Comments