सून नव्हे मुलगी

सून_नव्हे_मुलगी

©️जया पाटील 



" मानसी , बाळा उठ पटकन. उशिरापर्यंत झोपून राहण्याची सवय बरी नाही तुझी. आता लग्न ठरले आहे तुझे. आणि त्यातला त्यात कौतिकराव पाटलांची सून होणार आहेस तू ...! असा  बेशिस्तपणा आवडायचा नाही ग बाळा त्यांना ..." 

मानसीची आई शोभाताई आपल्या लाडक्या लेकीला मानसीला समजावणीच्या सुरात सांगत होत्या.

शोभाताई आणि दिलीपरावांची लाडाची लेक म्हणजेच मानसी. दिलीपराव छोट्याश्या कारखान्यात कामाला होते. खूप श्रीमंती नसली तरीही खाऊन पिऊन सुखी असलेले हे दिलीपरावांचे कुटुंब. मुलगी मानसी आणि मुलगा चिरायू अशी दोन संस्कारी मुले , छोटेसे घर आणि आनंदी कुटुंब हीच त्यांच्या आयुष्याची कमाई. 

दिलीपरावांच्या 'आंखो का तारा' , लाडोबा म्हणजे मानसी. शोभाताई आणि दिलीपराव दोघांनीही  कधीच मुलगी म्हणुन मानसीवर फार बंधने लादली नाही. अगदीच मुलाप्रमाणे तिला वाढवले. 

त्यामुळे गावाकडे वाढली असली तरी तिला फार मोकळ्या वातावरणाची , स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याची सवय होती. बॅडमिंटन , कराटे , मैदानी खेळ खेळणे. स्कुटी पासून चारचाकी चालविण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांनी तिला योग्य रीतीने शिकवली होती.

आईबाबांनी दिलेल्या मोकळ्या वातावरणाचा मात्र मानसीने कधीही गैरफायदा घेतला. ती अतिशय गुणी आणि समजूतदार होती.

मानसी आता बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे नेहमीच कॉलेज मध्ये मानसी अव्वल येत असे. कॉलेजच्या तिच्या शिक्षकांना तिचे खूप कौतुक होते. 

कॉलेजच्या प्रिंसिपल सरांना तर तिचे खूप कौतुक होते. बीएस्सीची परीक्षा झाली आणि एक दिवस मानसीच्या कॉलेजचे प्रिंसिपल सर तिच्या घरी आले. दिलीपरावांना भेटून त्यांनी मानसीचे खूपच कौतुक केले. ते मानसी साठी विवाह योग्य स्थळ घेऊन आले होते. मुलगा होता अभय ...

अभय कौतिकराव पाटील. कौतिकराव पाटील त्या गावातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते. प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा संपूर्ण तालुक्यात वचक होता. शेतीसोबत पोल्ट्रीफार्म , आणि इतर अनेक लघुउदयॊगात देखील ते अग्रेसर होते. कित्येक होतकरू तरुणांना त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु करून देण्यास मदत केली होती.

केळीपासून स्वादिष्ट पदार्थ , केळीच्या खोडापासून खत निर्मिती , केळीच्या खोडापासून धागे निर्मिती , दुग्धव्यवसाय , क्रीम सेपरेटर आणि पाश्चरायझेशन , कोंबडखत निर्मिती असे अनेक शेती पूरक लघुउद्योग उभारून त्यांनी गावातील कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्यांचा हा लघुउद्योगांचा सगळा व्याप अभय पाहत होता. वरून कणखर असणारे कौतिकराव पाटील मनाने मात्र दिलदार असं व्यक्तिमत्व होतं.

मानसीची हुशारी हेरून तिच्या प्रिंसिपल सरांनी  अभय साठी कौतिकराव पाटलांना मानसी कशी योग्य आहे हे पटवून दिले होते. प्रिंसिपल सरांच्या शब्दाला मान देत कौतिकरावांनी मानसीला तिच्या घरी जाऊन पाहण्याचे ठरवले. गावातील इतक्या मोठ्या व्यक्तीच्या मुलाचे स्थळ सांगून आल्याने दिलीपराव देखील मनापासून खूप आनंदी होते. 

रीतीप्रमाणे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. दिसायला देखणी , रूपवान , हुशार , चपखल अशी मानसी अभयला पाहताक्षणीच आवडली. कौतिकरावांनी तिला अनेक प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाचे मानसीने अगदीच शांतपणे आणि चतुराईने उत्तर दिले. तिच्या हुशारीबाबतीत कौतिकरावांची खात्री पटली. त्यांनी अभय आणि मानसीच्या विवाहाला हिरवा कंदील दर्शवला.

कौतिकराव मनाने दिलदार असल्यामुळे त्यांना दिलीपरावांकडून देण्याघेण्याची कुठलीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे हे लग्न जमण्यात कुठलीच अडचण आली नाही. 

ठरलेल्या मुहूर्तावर अभय आणि मानसीचा विवाह थाटामाटात पार पडला. माप ओलांडून मानसी पाटील घराण्याची गृहलक्ष्मी झाली. पूर्वाश्रमीची मानसी आता सौभाग्यवती मानसी अभय पाटील झाली होती. या नावातील पाटील या पदाप्रमाणेच अनेक जबाबदाऱ्या तिच्यावर येऊन पडल्या होत्या.

मानसी जरी साधारण कुटुंबातील मुलगी होती तरीही ती लहानपणापासून खूप मोकळ्या वातावरणात वाढली होती. कौतिकराव पाटील मात्र थोड्या जुन्या विचारांचे होते. 

घरात मोठी माणसं असताना मानसीचे घरभर फिरणं , डोक्यावरचा पदर खाली पडणं , सकाळी बरेच वेळा सासूबाईंच्या नंतर उठणं या सगळ्या गोष्टी कौतिकरावांना खटकत असत. परंतु जानकीबाई अर्थातच कौतिकरावांची धर्मपत्नी सगळे सांभाळून घेत असे. 

" पोर लहान आहे हो.. लहानपणापासून मोकळ्या वातावरणात वाढली आहे. तिला वेळ लागेल आपल्या घरात रुळायला. आपणच सांभाळून घ्यायला हवं. " 

असे बोलून जानकीबाई वेळ सांभाळून घेत असत.

मानसी देखील स्वभावाला चांगली होती. पण बराच वेळेस अनवधानाने तिच्या कडून चुका होत असत. नवीन लग्न असल्यामुळे अभय सोबत वेळ घालवताना रात्री बराच उशीर होत असे. त्यामुळे तिला सकाळी उठायला उशीर होत असे.

नेहमी ड्रेस घालायची सवय असल्यामुळे साडी आणि डोक्यावरचा पदर सांभाळणे तिला जड जात असे. तरीही ती स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती.

दिवसामागून दिवस पुढे जात होते. एकदिवस अभय आणि मानसी दोघेही बाहेर फिरायला गेले होते. मानसीला बाईक चालविण्याची खूप आवड होती त्यामुळे कौतिकरावांना चोरून अभय आणि मानसी दोघेही शेतात गेले की मानसी बाईक चालवत असे. 

त्या दिवशी देखील तसेच झाले. मानसी आणि अभय दोघेही त्यांच्या शेतातील फार्महाउस वर गेले. मानसीने मस्त पैकी पंजाबी ड्रेस घातला आणि ती आणि अभय बाईक रायडींगचा आनंद घेऊ लागले. अचानक त्यादिवशी कौतिकराव तिथे येऊन पोहोचले. मानसीला बाईक चालवताना पाहून त्यांचा संताप अनावर झाला. ते आल्यापावली शेतातून घरी परत गेले. 

घरी गेल्यावर महाभारत घडणार हे निश्चितच होते.

घाबरत घाबरतच अभय आणि मानसी घरी गेले. कौतिकरावांचा पारा चढलेला होता. चिडून ते बोलू लागले...

" अख्या पंचक्रोशीतील लोक आमचा मान ठेवतात आणि आमच्याच घरात आमच्या सुनबाई आमचा असा अपमान करतात ..आहो बाईच्या जातीने नेहमी मर्यादेने राहावे पण तुम्हाला काय त्याचे ...? "

" आता झाले ते झाले पण सुनबाई या पुढे अशी चूक खपवली जाणार नाही. धाकट्या पाटलीन बाई आहात तुम्ही .... तुमच्या मर्यादा तुम्हाला माहित असायला हव्या... ! " 

" अभयराव , तुम्हाला हे सगळे नव्याने सांगायला नको. आता याच्या पुढे चुकीला माफी नाही.." 

इतके बोलून कौतिकराव तिथून निघून गेले. त्या दिवसापासून मात्र मानसी अगदी शांत झाली. मनमोकळ्या गोष्टी करायची सवय असलेल्या मानसीला मात्र असे वागणे जड जात होते तरीही ती जमेल तितके व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करत होती.

एक दिवस कामानिमित्त अभय बाहेरगावी गेला होता. घरातून काम करणारे महादू काका देखील दोन दिवसांची सुट्टी घेऊन बाहेरगावी गेले होते. घरी होत्या फक्त जानकीबाई आणि मानसी. त्याचवेळेस कौतिकराव देखील लवकर घरी निघून आले.

जानकीबाईंनी लवकर घरी येण्याचे कारण विचारल्यावर त्यांनी त्यांना खूप अस्वस्थ होतेय असे कारण सांगितले. असेल कामाचा थकवा म्हणूनच जानकीबाईंनी कौतिकरावांना आराम करायला सांगितले. 

दिवसतर निघून गेला पण मध्यरात्री मात्र कौतिकरावांना खूप त्रास होऊ लागला. जानकीबाई खूप घाबरल्या. त्यांनी लगेच मानसीला आवाज दिल्या. तितक्यात कौतिकराव धाडकन जमिनीवर कोसळले. जानकीबाई हमसून हमसून रडू लागल्या. काय करावे हेच त्यांना सुचेनासे झाले. 

मानसी मात्र सगळे धीराने घेत होती. तिने जानकीबाईंच्या मदतीने कौतिकरावांना कार मध्ये बसवले आणि त्यांना घेऊन ती ताबडतोब हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. 

कौतिकरावांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून तिने हॉस्पिटलच्या इतरही फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या. जानकीबाईंना धीर दिला. कौतिकरावांच्या तब्येतीविषयी अभयला कळवले. 

अभय देखील लगेच तिकडे येण्यास निघाला. लवकरात लवकर हॉस्पिटलला आणल्यामुळे कौतिकरावांवरचा धोका टळला होता. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला होता.

दुसऱ्यादिवशी सकाळी कौतिकराव शुद्धीवर आले त्यावेळेस डॉक्टर त्यांना भेटायला आले. तोपर्यंत अभय देखील हॉस्पिटलला पोहोचला होता. कौतिकरावांसोबत बोलताना डॉक्टर म्हणाले ...

" दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचले पाटीलसाहेब ..सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता तुम्हाला ... तुमची मुलगी तुम्हाला वेळेवर हॉस्पिटलला घेऊन आली नसती तर ..खूप वाईट वेळ होती कालची ...! " 

" धन्यवाद डॉक्टरसाहेब , यांचा जीव वाचविल्याबद्दल ..." जानकीबाई डॉक्टरांना म्हणाल्या.

" मला थँक्यू बोलण्यापेक्षा तुमच्या मुलीला थँक्यू म्हणा कारण हे सगळेच तिच्यामुळेच शक्य झाले आहे..." 

" डॉक्टर साहेब , ती माझी सुनबाई आहे. माझा मुलगा अभयची धर्मपत्नी ..." जानकी डॉक्टरांना सांगू लागल्या. 

त्याचवेळेस कौतिकराव बोलू लागले...

" बरोबर सांगतो आहात तुम्ही डॉक्टरसाहेब. मानसी माझी सुनबाई नाही तर मुलगीच आहे. कारण हे सगळे एक मुलगीच आपल्या बापासाठी करू शकते. "

" सुनबाईंना मी नेहमीच त्यांच्या मोकळ्या वागण्यावरून कोसले. परंतु ज्या गोष्टी करण्यासाठी मी त्यांना मनाई करत होतो. आज त्याच गोष्टीने माझा जीव वाचवायला मदत केली."

" माझ्या जीवासाठी त्यांनी स्वतःला रागवण्याची चिंता न करता , मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मला दवाखान्यात आणले. हे सगळे एक लेकच करू शकते. " 

" आजपासून मानसीला तिला हवे तसेच वागण्याची मुभा मी देतोय. मर्यादांची कात्री लावून मी तुझे पंख छाटन्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मला माफ कर पोरी ...! " 

" मला खात्री आहे , तुझ्या या बापाला तू माफ करशील कारण आजपासून तू खऱ्या अर्थाने माझी सून नव्हे तर मुलगी झाली आहेस .." 

मानसीच्या डोळ्यातून पाणी तरळून आले आणि कौतिकरावांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती पुढे सरसावली. आज सगळे पाटील घराणे लेकीच्या आगमनाने खुश झाले होते.

समाप्त !

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 


फोटो साभार - Google & instagram


✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments