स्पर्शाचा खेळ
मनिषा विसपुते
झुळझुळ
वाहणारी नदी, तिच्या दोन्हीं बाजूने हिरव्यागार झाडांची दाटी...आंबा-काजूच्या
झाडांना लगडललेली फळे, ताडामाडाबरोबर डोलणारी पोफळी,अंगणात पसरलेल्या प्राजक्ताचा
मंद सुवास आणि रात्रीच्या गर्भात निशीगंधाची दरवळ, मन मंत्रमुग्ध होऊन जाईल असे
वातावरण. मध्येच वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणी. पहाटे पक्षांची किलबिल,
पेटविलेल्या लाकडांच्या धूराचा वास, वासराचे हंबरणे जिवंत असल्याची जाणीव करुन
देत. अश्या कोकणातल्या निसर्गाची जादू अल्लड वयात रमावर झाली होती. कोवळ्या
मनाला भुरळ घातली होती. शहरात गाड्यांचे आवाज आणि गाडीनेच फिरणे होत असल्याने ती
कंटाळली होती. हिरवाईची चादर, पाटाचं पाणी, रानमेवा ह्यात हरवून गेली होती. दिवसभर
आंबा,करवंद शोधत फिरायचे. नदीत पाय टाकून गप्पा मारत बसायचे. झाडाला बांधलेल्या
झोपाळ्यावर झुलत रहायचे. आजी आणि मामीच्या हाताच्या विविध पदार्थांची
मनसोक्त चव चाखायची... लवकर उठणे नाही की नळाचे पाणी जायचा ताण नाही. हळूहळू तिला
मामाचा गाव आवडू लागला. तिची आई बहुतेक उन्हाळ्यात आजोळी मुलांना घेऊन येत असत.
पडवीत मामाची दोन मुले नयन मोठा आणि पवन लहान तसेच कधी मावशीची मुले, रमा आणि तिचा
भाऊ समीर सगळे मिळून बैठे खेळ खेळायचे. आठवडा बाजारात फिरायचे. पापड,
कुरडया करायला आई, मामीला मदत करणे, मामाबरोबर शेतात जायला रमाला खूप आवडत असे.
एकंदर ती त्या १५-२० दिवसांत गावचीच होऊन जात होती.
दरवर्षीच्या
आजोळच्या वारीने निसर्गाप्रती ओढ वाढवली होतीच. पण तेथील माणसंही आवडू लागली.
अक्षरशः ती प्रेमात पडली. वय फुलत गेलं तसं प्रेम उमलत गेलं. पौगंडावस्थेतील अवखळ
वयाला काही कळत नव्हते. मन वढाय वढाय...तनमन कोकणात ओढले जात होते. निसर्गाकडे की
आणखी कशाकडे ते काही त्या निरागस मनाला कळत नव्हते. ते प्रेमात पडले होते. सहवासाचा
लोभ दिवसेंदिवस वाढत होता. रमाची आठवीची परीक्षा संपली आणि आजोळला, आईच्या गावाला
जाऊन राहून आली. पण मुंबईला आल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागले. काहीतरी गावी
रहीले असा भास होई. कशाची तरी उणीव भासत होती. हूरहूर वाढली. चक्क पुढच्या उन्हाळी
सुट्ट्यांची वाट पाहू लागली. दिवस मोजण्याचा जणू छंदच जडला. असं नेमके काय घडले
असावे? तुम्हाला पण पडला ना प्रश्न? तसा राहीन ह्या प्रश्नाचे उत्तर शोधत होती...स्पर्शाचा
अर्थ. नदीमध्ये नेहमीसारखी ती, नयन, पवन पाय टाकून बसले होते. पाण्यात खडे
टाकण्याचा खेळ रंगात आला होता आणि अचानक पायाचा पायाला स्पर्श झाला.
एकदा नाही दोनदा नाही सारखा होत होता. मुद्दाम दिला जात होता हे कळत होते.
करवंदीचा काटा बोटाला टोचला आणि त्याने तिचा बोट लगेच तोडांत धरला. अंग अंग
शहारले. हृदयाची धडधड वाढली. उष्ण श्वासाच्या स्पर्शात मनी तरंग उठले.
स्पंदनाने ताल धरला. प्रेमाची शीळ वाजू लागली. नटखट वाऱ्याने डाव साधला. केसांच्या
बट्या गालावर रुळू लागल्या. त्या बाजूला करत त्याने नजरेला नजर भिडवली. प्रीत
भावना नयनात तराळली. खेळताना होणारा स्पर्श लाजत होता. उत्पन्न
होणाऱ्या भावना स्पर्शात चिंब चिंब झाल्या आणि सुरु झाला स्पर्शाचा खेळ!
"प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचे
लेणे"... हवाहवासा वाटणारा स्पर्श संधी साधू बनला. नजरेतले भाव
काहीतरी सांगत होते...मागत होते...पण मुंबईला परत माघारी फिरायची वेळ आली. सगळे
अर्थ अर्धवट राहिले. नीट न कळणाऱ्या वयाला त्याचे वेड लागले. आता गावाकडे बघण्याची
दृष्टी वेगळी झाली. जिथे-तिथे प्रेमाचे खुमारे! अनामिका भितीही मनात डोकावून
जात होती. वयच धोक्याचे; ती तरी काय करणार...
नववीच्या उन्हाळ्यात गावी जाता नाही आले कारण दहावीचे वर्ग सुरु झाले होते.
परंतु अभ्यासात लक्ष कसे लागणार? तिचं मन कुठे होतं थाऱ्यावर...ते
त्या स्पर्शात घुटमळत होते. स्पर्शाच्या खेळात अडकले होते. जाता
येता तिचा पिच्छा पुरवत होते. समीरचा निकाल लागला आणि तिने गावी जायचा तगादा
लावला. एकदाचा तो दिवस उजाडला आणि तिचा हट्ट बाबांनी पूर्ण केला. बाबांनी
आम्हांला आजोळी सोडले. नयनची पंधरावीची परीक्षा संपली होती. समीर-पवनचा निकालही
लागला होता. मलाही पेपर छान गेले होते. सगळे आनंदात होते आणि रमा थोडी जास्तच! एका
वर्षात नयनही बदलला होता. उंच झाला होता. शुद्ध हवा, घरातले पौष्टिक जेवण, शेतातले
शारीरिक कष्ट ह्या सर्वांचा त्याच्या व्यक्तीमत्वाला फायदा झाला होता. आता तिला तो
जास्तच. आकर्षक वाटत होता. आपोआप ती त्याच्याजवळ खेचली जात होती....खींचे तेरी
ओर,कोई डोर...कोई डोर! तनामनात उंचबळणाऱ्या लाटांना किनारा हवा होता. अलवार स्पर्शात
धुंद व्हायचे होते. स्पर्शाला अर्थ द्यायचा होता. नयनच्या बाहूपाशात स्वतःला
विसरुन जायचे होते. स्वप्नांचे एकावर एक मनोरे रचण्यात गुंग होती आणि अचानक
गर्भरेशमी स्पर्श स्पर्शून गेला. ती शहारली. मनीची प्रीतकळी थरथरली.
अंगणातला मोगरा जणू तिला बघून हसत होता. रस्त्यावरचा बहावा हळदीने मोहरला होता.
आरक्त शाल्मली गाली लाजत होती...जणू "बहरला हा मधुमास नवा..." कोवळी
लालसर पिंपळ पालवी सुकलेल्या फांद्यांवर उमलावी तशी रमाची अवस्था झाली होती. ना
बालपण की तरुणपण नीटसं न कळणारे ते वय. झोपाळ्यावर झुलताना परत झालेल्या
मयुरपंखी स्पर्शाने ती भानावर आली. बाजूला नयन बसला होता. हळूहळू पाय एकमेकांत
अडकत होते; तसं मनही गुंफले जात होते. प्रथमच अनुभवत असलेला स्पर्शाने झंकार
उठला. सरगमचे सूर उमटले. तारुण्यातले वय प्रेमात कि आकर्षणात अडकत
होते...नाही...फसत होते...हो शेवटी फसलेच! परत सुरु झाला मखमली स्पर्शाचा खेळ! खेळता खेळता
हात, गाल, मांडीवर हात जात होता. रमा स्वतःला हरवून बसली. नात्याचा विसर पडला.
हातातला हात आता नको तिथे फिरायला लागला. रमाने मूक संमती दिली होतीच. तिलाही आवडत
होते. नजरेने शरीराचा कधीच ताबा घेतला होता. ओठ अधीर झाले. पत्ते खेळताना
मुद्दाम मांडीवर हात ठेवणे, झाडावरची फळे-फुले काढताना उचलणे, लगट करणे,
झोपाळ्यावर खांद्यावर हात टाकून बसणे असे कितीतरी सफल-असफल लंपडावाचा खेळ सुरु
होता. यौवनाच्या उंबरठ्यावर दोघे होते. तरुण वयाला कसली भिती...ते जे हवंय
त्याच्यामागे धावत होते. पण उंबरठा ओलांडण्या आधीच बाडबिस्तरा गुंडाळावा लागला.
बाबांना महत्वाचे काम आहे; आपल्याला घरी जावेच लागणार असे सांगून आई, रमा आणि
तिच्या भावाला घेऊन निघाली. नयन व रमाने थोडा हट्ट केला पण आईने शिताफीने समजावले.
मामी-आजीनेही दुजोरा दिला... पटापट सामान्यांची बांधाबांध झाली. मामा बसचे तिकिटही
काढून आला. आजीने लगबगीने माहेरचा खाऊ आईला दिला. दोघींची अश्रू भरल्या डोळ्यांनी
गळाभेट झाली. बहुतेक परत लवकर न भेट होण्याचा तो संकेत होता आणि रमाच्या मनात
संशयाची पाल चुकचुकली...
पुढच्या
शिक्षणासाठी नयन दिल्लीला गेला. युपीएससीचा अभ्यास, नंतर मर्चंट नेव्हीचे
प्रशिक्षण तो खूप व्यस्त झाला. त्याच्याकडे फोन होता पण तो क्वचितच आईच्या फोनवर
बोले. आई बाजूला असल्याने काही बोलणे शक्यच नव्हते. तळमळ मात्र वाढत होती.
बारावीनंतर रमाला मोबाईल मिळाला...तोपर्यंत उशीर झाला. नयन इंटरनॅशनल शीपवर रुजू
झाला आणि त्यांचा संपर्क कायमचा बंद झाला. रमाही आयुर्वेदिक वैद्य झाली. तिनेही
स्वतःला समजावले. कधीतरी एकांतात त्या स्पर्शाची आठवण होई. नदीचा रम्य परिसर,
कोकिळची कुहू कुहू, लवबर्डची शीळ आणि तो मलमलचा स्पर्श तिच्याभोवती फेर
धरत असतं. वेळ सर्व गोष्टींवर औषध असते. तसेच झाले. कामाच्या, माणसांच्या गर्दीत
कोकण मागे पडले. आता आजोळची ओढ पण कमी झाली होती. कामात स्वतःला हरवून,
दुःखद स्वप्न समजून विसरण्याचा प्रयत्न करत असताना एक दिवस बातमी आली...नयनचे लग्न
ठरले. प्रेमविवाह होणार होता. पायाखालची जमीन सरकली. मनाने परत उचल खाल्ली. नयनची
ती मादक नजर तिच्या मनाचा ठाव घेऊ लागली. खरं-खोटं तिला काही समजेना. आठवणींनी
थैमान घातले. भावनांचा कल्लोळ माजला. पापण्यांच्या कडा भरुन आल्या. अश्रू अनावर
झाले. गालावर ओघळू लागले. विचार करुन करुन ती थकली. आता वयात आली होती.
चांगलं-वाईट समजण्याची जाण होती आणि तिला उमगले...ते फक्त आकर्षण होते. अल्लड,
अवखळ मनाला झालेला तो फक्त होता स्पर्शाचा खेळ!
बघता बघता
नयनच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागली; तशी रमा अस्वस्थ राहू लागली. सगळ्यावरुन मन
उडाले. चलबिचल सुरु झाली. लग्नाला जाण्याचे ती टाळू लागली. आईने तिच्यावर जबरदस्ती
केली नाही. पण नियतीचे कुणाला कळले आहे. आयुर्वेदात पीएचडी करत होती.
त्यासाठी नेमके काही आख्खे मसाल्यांच्या माहितीसाठी, उत्पादन होणाऱ्या ठिकाणी तिला
भेट द्यायची होती. नेमकी तिची निवड आजोळच्या गावासाठी झाली. आईला सांगण्याशिवाय
गत्यंतर नव्हते. तिच्या सरांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. द्विधा मनस्थितीत
ती गेली खरी कोकणात पण लग्नाला कसे जायचे ह्या विचाराने अन्नपाणी तिला गोड लागेना.
सगळ्यांचे फोन आले...जवळ आहेस तर येऊन जा. जाणं आवश्यक होते. लग्न रविवारी
सुट्टीच्या दिवशी असल्याने कारण देणं कठीण होऊन बसले. आता लग्नात भाग घेणे
क्रमप्राप्त होते. शेवटी हिंमत करुन ती आदल्या दिवशी शनिवारी पोहचली. तिला बघून
आजी, मामा-मामी खूप खुश झाली. सहा वर्षात खूप फरक पडला होता. घराची पुनर्बांधणी
केली होती. बाग छान सजवली होती. झोपाळा तो मात्र तिथेच होता. आपसूकच पावलं
वळली. एक ऊसासा टाकून; डोळे झाकून झोका घेतला...मनाचा कप्पा उघडला गेला. धूळ
बाजूला सारली अन् परत अनुभवला पायाचा स्पर्श! चुकून की मुद्दाम कळायला मार्ग
नव्हता. खाड्कन भानावर आली आणि बघतच राहिली... तरणाताठा, हट्टाबांड, रुबाबदार तरुण
तिच्या जवळ बसला होता. पहिल्या नजरेत प्रेमात पडावं असं रुप जणू मदनबाण! तशी तीही
तारुण्याने मुसमुसलेली; सुडौल बांधा, ओठ जणू गुलाबाची पाकळी, चाफेकळी नाक, लांब
केशसंभार, गोरेपान फुललेलं यौवन सौंदर्य! अंग चोरुन बसलेल्या नयनला बघून तिच्या
डोळ्यात पाणी आले. नयनने हातावर हात ठेवला...आता त्या स्पर्शात ती भावना
नव्हती. तो अर्थ नव्हता. तरी मनात घालमेल सुरु होती. चोरुन चोरुन त्याला बघताना ती
गतकाळात रमू लगली. नयन पुढे निघून गेला पण रमा परत मागे गेली. स्पर्शातले
लाजणे आठवून शहारत होती. नजर नयनला शोधत होती. त्याला भेटण्यासाठी...त्या स्पर्शात
न्हाऊन जाण्यासाठी धडपडत होती. अधीर मन झाले...काय बरोबर काय चूक ह्यात तिला
पडायचे नव्हते. पहिलं, कोवळ्या वयातील प्रेम...विसरणं शक्यच नव्हते. जीवाची तळमळ,
नजरेतला शोध स्वस्थ बसू देत नव्हता. नातलग, पाहुण्यांच्या गराड्यात नयनची सावलीपण
दिसत नव्हती. दिसला तरी पटकन गायब होत होता. नजरेला नजर भिडवत नव्हता. त्याला
रमाचा विसर पडला की तो तसं भासवत होता हे रमालाही कळत नव्हते. शेवटी लग्नाचा दिवस
उजाडला. जांभळी धोती आणि क्रिम रंगाचा कुर्ता शोभून दिसत होता. अगदी राजबिंडा!
नयनचे लग्न, मन आणि बुद्धी मानायला तयार होत नव्हती. तिच्या पचनी पडेना. वादळ
उठलेल्या सागरात लाटा भरकटत होत्या. त्यांना किनारा दिसत नव्हता. अडकलेल्या स्पर्शातून
बाहेर पडण्यासाठी तिची धडपड जरी चालू असली तरी नयन दिसताच ती गळून जात होती. पहिल्यांदाच
अनुभवलेला स्पर्श नसानसात भिनला होता...
"फिर मोहब्बत करने चला है तू...दिल संभल जा
जरा..." पण नाही. तिला नयनला विसरणे अशक्य झाले. पूर्वी घालवलेल्या प्रत्येक
क्षणाचे साक्षीदार तिथे होते. ती दरवळ, सोनसळी, आंब्याचे झाड आजही त्यांच्या
उमलत्या प्रेमाची साक्ष देत होते. पण सगळे व्यर्थ. पडलेला चेहरा, दुःखाचे भाव खूप
काही सांगत होते. "सावधान...आता वर आणि वधूने एकमेकांना माला घाला". असे
गुरुजी म्हणाले आणि गरम हाताचा हाताला स्पर्श झाला. कुणीतरी आपला हात
घट्ट पकडला असल्याचे तिला जाणवले. बाजूला आई होती. तो मायेचा स्पर्श धीर
देत होता. त्याच्यात ताकद होती. तो जणू सांगत होता की, सावर स्वतःला. मनाला आवर
घाल. बस्, तिथेच थांबला...स्पर्शाचा खेळ!!!
मनिषा विसपुते, मुंबई.
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box