शाळेच्या आठवणी
© Velvet Kavisha
मी शाळेत जाऊ लागले.
आजी म्हणायची "खपरीत" जाते.
"खपरी" म्हणजे अंगणवाडीच्या आधीचं वर्ष.
नंतर अंगणवाडी.
नंतर बालवाडी.
बालवाडीनंतर पहिली ते चौथी.
अशी सहा सात वर्षे जिल्हा परिषदेच्या शाळेत गेली. लहानपणीच्या सगळ्या गमतीजमती इथे अनुभवल्या.
चार इयत्तेला दोन शिक्षक नेमलेले.
पहिली आणि तिसरी एका वर्ग खोलीत
तर दुसरी आणि चौथी दुसऱ्या वर्गखोलीत.
एखादे गुरुजी गैरहजर असताना,
वर्गात कोणी शिक्षक नसताना
हळूच शाळेच्या पाठीमागे जायचो.
काठीला रिबन गुंडाळून बाहुला बाहुली सजायची.
आवळ्याचा झाडाची पानं काढून अंबाडा बनवायचो.
शेवटी लग्न लावूनच वर्गात जायचो.
शाळा घरापासून जवळच.
दुपारच्या सुट्टीत जेवायला घरी.
पुन्हा अडीच ते पाच शाळा.
चौथीनंतर शाळा बदलली.
वडिलांनी हट्टाने जिल्हापरिषदेच्या शाळेत न घालता पाचवीपासून हायस्कूलमध्ये नाव घातलं.
फार कमी वेळा एस टी मिळायची.
चालतच जावं लागायचं.
मोठ्या दोन बहिणींच्या मागे डुलत डुलत चालायचं.
पुर्ण पाच किलोमीटर.
कोकणातले चढण उतरणीचे रस्ते.
रोजची पायपीट.
तरीही शाळा आवडायची.
सकाळी १०.४० ते ४.४० अशी दिवसभर शाळा.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून शाळा सकाळची असायची.
भर दुपारी १२.१० ला सुटायची.
बाराची एस टी सुटून जायची.
मग तास सव्वा तास उन्हात चालत जायचं.
गावातले सगळेच चालत जायचे.
सहावीचं वर्ष होतं.
आईकडून मी हट्टाने मंगळवारच्या बाजारातून माझ्यासाठी १५/- रुपयांची काळी सॅंडल घेतली.
तेव्हा ती महागच.
१०/- रुपयांना स्लीपर यायची.
एकदा पीटीच्या तासाला सगळ्यांना चपला वर्गात काढून ठेवायला सांगितले.
सगळे मैदानावर गेलो.
शेवटचा तास होता.
बेल झाली.
आणि मी सरांना सू सू ला जाते सांगून पळाले.
वर्गात येईपर्यंत रस्त्यातच वंदे मातरम् होऊन गेलं.
मी पळत पळत वर्गात गेले.
सगळी मुलं गेलेली होती.
मी दप्तर पाठीला लावलं आणि बेंचखाली वाकले तर फक्त चार दिवस जुनी सॅंडल गायब.
बहिणी गेटवर थांबायच्या.
मी त्यांच्याकडे जाऊन सॅंडल हरवल्याचं सांगितले.
त्या मला घेऊन वर्गात आल्या.
तिघींनी शोध शोध शोधलं.
शिपाई काकांना सांगितले.
ते म्हणाले मिळालं तर सांगतो.
मी देवाला साकडं घातलं "सॅंडल मिळू देत रे बाबा." आणि निघालो.
वर रणरणतं ऊन
रस्त्यावरचं तापून विरघळलेलं डांबर.
तासभर चालायचं.
दोन्ही बहिणींनी आपल्या पायातली एक एक स्लीपर दिली.
दोघींचे पाय वेगवेगळ्या मापाचे
आणि माझे वेगळ्या मापाचे.
लडखडत चालताना वेळ लागायचा.
बहिणी जोरात चालत जाऊन झाडाच्या सावलीत थांबायच्या
आणि मी त्यांना गाठायचे.
मग थोडा वेळ दोघींना त्यांच्या स्लीपर्स देऊन पळत जाऊन सावलीत थांबायचे.
२ मे ला रिझल्ट लागला तरी सॅंडल मिळाली नाही.
तोवर रोजचा प्रवास सुरू होता.
तेव्हापासून "चप्पलेने" वेगळंच घर केलं मनात. चटक्यांनी इतकी जिद्द आणि चिकाटी निर्माण केली की, अनवाणी ते "फक्त लेदरच वापरेन" इतका माज येण्याइतपत प्रगती झाली.
वर्गात बाजूला एक मैत्रीण बसायची
मनिषा नावाची.
तिचे आई-बाबा भावंडं मुंबईला.
ती आजीकडे राहायची.
दोन वर्षे गावी शिक्षण घेऊन ती पुन्हा मुंबईला निघून गेली.
आम्ही कायम गावीच राहिलेलो.
एकदाच कधीतरी मुंबईत येऊन गेले होते मी.
आमच्या डब्यात भाकरी
आणि मालवणी मसाल्यात तेल मीठ घालून त्याची बनलेली चटणी असायची.
असे खाणारे वर्गात निम्म्याहून जास्त होते.
तिच्या डब्यात बटाट्याची भाजी किंवा कधीतरी इतर एखादी भाजी असायची.
तिचे आई-बाबा कधी कधी मुंबईहून भेट पाठवून द्यायचे.
ती बऱ्याचदा तो खाऊ घेऊन यायची शाळेत.
अशीच एकदा खजूर घेऊन आली.
जेवणाच्या सुट्टीत स्वतः खाता खाता मला म्हणाली, "हा घे तुला खजूर."
मी खजूर कधी पाहिलाच नव्हता
त्यामुळे तिला विचारलं "कसा खातात गं हा..??"
तर म्हणाली,
"चावत चावत रहायचा दातांनी.."
झालं.
मी तोंडांत टाकला आणि चावत राहिले.
संध्याकाळी सहा वाजता शाळेतून घरी आले. हलणारं तोंड बघून ताई म्हणाली, "काय खातेस गं ते..??"
मी उत्साहात सांगितलं,
" मैत्रिणीने खजूर दिलाय दुपारी.
बघ ना अजून पुरलाय.
संपतच नाही." म्हणत तोंडातून काढून दाखवला.
"अगं ही खजुराची बी आहे. ती का खातेस..?? खजुरचा वरचा नरम भाग खाऊन झाल्यावर बी फेकून द्यायची. ती चावत बसायची नसते. येडी कुठली.." ताई ओरडली.
"ही खजुराची बी आहे का..??
मनिषाने मला हीच खजूर म्हणून दिली.
आणि मी तिलाच खजूर समजून दुपारपासून खातेयं." मी सांगितलं.
"अगं पण तुला घ्यायला सांगितलीच होती कोणी..??" ताई रागात बोलली.
बरोबर होतं ताईचं.
तेव्हा बालसुलभ बुध्दी काही सुचू देत नाही.
मोह होतो खाऊचा.
ती बी आजही जशीच्या तशी आठवते.
दाताने चावून चावून कुरतडून कुरतडून बारीक केलेली.
तेव्हापासून ठरवलं
कोणाकडून काहीच खायला घ्यायचं नाही.
पण पुढच्याच वर्षी आईचं ट्युमरचं खूप मोठं आॅपरेशन झालं. आणि वर्गातल्या मेघना जाधव आणि अजिता तळेकर नावाच्या मैत्रिणींनी तीन महिने स्वतःच्या डब्यातली पोळी भाजी खाऊ घातली.
खजूराने मात्र चांगली शिकवण दिली.
ऑपेरा हाऊसच्या पंचरत्नमध्ये नोकरी मिळाली. मैत्रिणीसोबत क्रॉफर्ड मार्केटला जाणं झालं.
एवढ्या प्रकारचे खजूर बघून जीव वेडावून गेला.
मी थोडे थोडे करत सगळ्या प्रकारचे खजूर घेऊन घरी आले.
इतके खाल्ले की त्या दिवशी जेवण गेलं नाही.
दुसऱ्या दिवशी पित्त झालं.
पंधरा दिवसांतच पाळी आली.
पण मनसोक्त खजूर खाण्याचं समाधान वेगळंच.
त्याला तोड नाही.
आता दोन खजुरांच्या वर खजूर खाल्ले जात नाहीत.
नववीत असताना एकदा इंग्रजीच्या सरांनी शब्दार्थ पाठ करायला सांगितले.
जेवणाच्या सुट्टीआधीचा तास होता.
ज्यांचे पाठ झाले नव्हते त्यांना घरी पाठवून "पालकांना घेऊन या" सांगितलं.
जेवणाच्या सुट्टीनंतरचा तास ही इंग्रजीचा होता.
एक पोरंग तास सुरू झाल्यावर आलं.
" पालकांना आणलंस का..??"
सरांनी विचारलं.
त्या बरोबर त्याने हातात लपवलेली गुप्ती (सुऱ्यासारखं हत्यार) सरांवर उगारली.
मी सरांच्या टेबलाला चिकटून असलेल्या पहिल्याच बेंचवर.
जोरात आरडाओरडा केला.
बाजूच्या वर्गातले सर धावत आले.
सुदैवाने इंग्रजीच्या सरांनी पोराचे दोन्ही हात धरून त्याला उलटा फिरवला होता.
पोलिस कंम्प्लेंट झाली.
मी आॅंखो देखी सांगितले.
पहिल्या बेंचवर बसलेली मी आणि माझी मैत्रीण साक्षीदार.
तहसीलच्या कोर्टात तारखा.
सरांसोबत जायचो.
त्या मुलाची शाळा थांबलीच.
बरेच लोकं म्हणाले, "काय गरज होती सगळं वर्णन पोलिसांना सांगायची.?? तुझ्यावर डुख ठेवला म्हणजे..?"
पण तेव्हा सरांवर झालेला हल्ला महत्वाचा वाटला.
आपल्याला कोणी त्रास देईल हा विचार डोक्यात आला नाही.
काही वर्षांपूर्वी तो मुलगा एकदा ठाण्यात भेटला.
रिक्षा आहे त्याची.
चांगला बोलला.
आई बाबांची चौकशी केली.
बाकी हुशार मुलांचा टारगटपणा त्यांच्या हुशारीआड झाकला जातो.
आमचे रसायनशास्त्राचे सर.
एकदम तरूण होते.
मुलींना कधीच हाताने मारायचे नाहीत.
अडीच तीन फुट लांब लाकडी पट्टी होती.
दीड फुटावरून बोटांच्या पेरांवर खटखट मारायचे. कळ मस्तकात जायची.
असं ताईने सांगितलेलं.
त्यामुळे आपण त्यांचा अभ्यास सगळ्यात आधी पूर्ण करायचा असं ठरवून टाकलं.
दहावीत गेलो आणि सरांचं लग्न झालं.
त्यांनी मुलींना मारणंच बंद केलं.
बऱ्याच मुलींनी त्यांच्या बायकोला धन्यवाद दिले.
मी आगाऊपणे सरांना प्रश्न विचारला, " सर तुम्ही थोडं लवकर लग्न का नाही केलंत??"
"का??" या त्यांच्या प्रतिप्रश्नाला "मुलींनी मार खाणं तेवढंच लवकर बंद झालं असतं" असं सांगितलं.
सर एक टपली देऊन हसत निघून गेले.
आमच्या शाळेत पटवर्धन मॅडम होत्या.
त्यांची शिक्षा करण्याची पध्दत अजब होती.
त्या वर्गासमोरच्या मैदानात लाल मातीवर पाणी ओतून चिखल करायला लावायच्या
आणि ज्याला शिक्षा करायची असेल त्याला त्यात बसवायच्या.
ही शिक्षा स्पेशली मुलांसाठी होती. मुलींना नाही.
नवीनच जॉईन झालेल्या एक मॅडम.
उंचीला कमी त्यात प्रेग्नंट.
पोटावर मनगट आडवं ठेवून धडा समजवून सांगायच्या.
त्यांची टिंगल करण्यात आम्ही आघाडीवर.
त्याच मॅडम एकदा टीव्हीचा अॅंटिना हलवताना शॉक लागून पडल्या तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो.
खुप वाईट वाटलेलं.
त्यांच्या डोक्याला बांधलेल्या पट्ट्या बघून.
हायस्कूल १०+२ होतं.
ज्युनिअर कॉलेज तिथेच.
अकरावीचा वर्ग.
१ आॅगस्टचा दिवस.
लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी.
मी भाषण करून वर्गात आले.
काही मोजके विद्यार्थी आणि आमचे दाते सर वर्गात.
शाळा कधीच सुटली होती पण सर विद्यार्थ्यांशी बोलत होते.
मस्त गप्पा सुरू होत्या.
मी आगाऊपणा केला.
म्हटलं, " सर, टिळकांना चहा गाळून प्यायची गरजच नसेल पडली ना..??"
"का बरं..??" सरांनी विचारलं.
" त्यांच्या मिशाच इतक्या झुबकेदार होत्या की, चहा आपोआपच गाळून निघत होता असेल. तुम्हांला काय कळणार सर..?? तुम्हांला तर मिशाच नाहीत." उपस्थित सगळे हसले.
पण सर मात्र गंभीर झाले.
"कोणाच्याही राहणीमानावर, पेहरावावर, अपंगत्वावर कधीच टिपण्णी करत जाऊ नये. ते अजिबात योग्य नाही. ज्याला त्याला हवं तसं राहण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. हे नेहमी लक्षात ठेवा." एवढं बोलून सर निघून गेले.
मला खुप अपराधी वाटलं.
काहीच सूचेना.
मी तडक सरांच्या घरी जाऊन पाय धरुन त्यांची माफी मागितली.
सरांनी ही मोठ्या मनाने माफ केलं.
पण तो धडा कायम लक्षात ठेवला.
याच सरांनी B.K. या विषयातले माझे Highest मार्क्स बघून सीए होण्याचा सल्ला दिला होता.
पण परिस्थिती अभावी राहून गेलं.
गेल्या वर्षी आमच्या ज्यु. कॉलेजच्या प्रो. केवटे सरांनी माझ्या वर्गमित्राकडून माझा नंबर घेऊन फोन केला.
सर रिटायर्ड होऊन दहा एक वर्षे झाली असतील.
खुप भरभरून बोलले.
मनापासून विचारपूस करत आशिर्वाद दिला.
तेवीस वर्षापुर्वींच्या विद्यार्थीनीला फोन करून तिच्याशी बोलण्याइतपत मी काही तरी कमावलंय असं ही वाटलं.
उगाचच.
अजून खूप साऱ्या आठवणी आहेत.
दोन महिन्यांपूर्वी आमच्या खोत मॅडम देवाघरी गेल्या आणि एक शांत निवांत वादळ निमालं असं वाटून गेलं.
उगाचच पोकळी जाणवली.
पाचवीत इंग्रजी शिकवणाऱ्या घोसाळकर सरांची बातमी ही दु:ख देऊन गेली.
मधली अठरा वर्षे मी आणि माझा संघर्ष यातच गेली.
गावाशी संबंध नव्हता.
गेली चार पाच वर्षे मात्र सासरच्या गावी जाणं होतं.
आई-बाबा बारा तेरा वर्षे मुंबईत आहेत.
त्यामुळे माहेरच्या गावी जायचा प्रश्न नाही यायचा.
व्हॉट्सॲप गृपमूळे जुने मित्र मैत्रिणी भेटल्या.
बरीचशी नावं माझ्या विस्मृतीत गेलेली.
आता थोडी थोडी आठवू लागलीत.
पण काही जणांना मी जशीच्या तशी आठवते हे कौतुकास्पद.
सायकलवरून चार सीट जाणारी पहिली मुलगी तू म्हणून काहींनी माझी ओळख मला करून दिली. काही वर्गमित्र फोनवर बोलताना, "अजूनही तीच जरब आहे बोलण्यात." असं हसत हसत सांगतात.
तीन महिन्यांपूर्वी आई-बाबा गावी शिफ्ट झाल्यामुळे मागच्या आठवड्यात गावी जाणं झालं.
शाळेला लांबूनच पाहिलं.
खुप बदल झालाय शाळेच्या परीसरात.
जिथे कुल्फी, आईस्क्रीम, पेप्सी कोला घेऊन सायकलवाले उभे असायचे
तिथे आता मारवाड्यांची दुकाने झालीत.
तरीही चारपदरी गोवा हायवेवरून शाळेचं कौलारू छप्पर दिसतंच.
आणि आठवण करून देत राहतं.
तुम्ही या शाळेचे विद्यार्थी आहात.
लेकींना लांबूनच शाळा दाखवली.
त्यांनीही कुतुहलाने बरेच प्रश्न विचारले.
आणि आठवणी जाग्या झाल्या.
त्यातल्या काही निवडक आठवणी म्हणजे आजचा लेख.
बाब्बो...!! लै बोअर केलं का आज....?? 🙆🏻♀️🙆🏻♀️ नाही ना..?? मग आठवा की तुमच्या शाळेतल्या आठवणी. खुप भारी वाटत बघा...😍😍💞💞
© Velvet Kavisha

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box