पाठवणी

 


पाठवणी

© Velvet Kavisha


माझी मैत्रीण आहे मनिषा. तिची  मुलगी प्रिती उपवर झाली आणि वर संशोधन सुरु. मंडळात नाव टाकलं. बायोडाटात सुस्पष्ट लिहिलेलं. सावळेपणा काळेपणाकडे झुकणारा. उंची ४ फुट ११ इंच...


लोकं माहिती पाहून फोन करायचे...

"तुम्ही सावळी लिहिलीय पण साधारण किती सावळी??.. " 


आता हे कसं सांगायचं?? सावळेपणाचा थर थोडीच असतो. साधारण एक इंचभर सावळी आहे असं सांगायला. बरं फोटो copy दिलेली.  पण स्टुडिओ वाल्याला ओरिजिनल फोटो द्यायची allergy जणू. त्यामुळे फोटो आणि वर्णन mismatch....  


प्रिती म्हणाली "जे आधी कलर विचारतात त्यांचे रंग ओळखून आपण नाही सांगूया...." 

चाळीत राहायचे. त्यामुळे घरी मांजर आलं तरी सगळ्यांना कळायचं. सगळे मदतीला तत्पर. प्रिती वर सगळ्यांचीच प्रिती. तिला पाहायला पाहूणे आले की डोकवाडोकवी चालू. म्हणून जे म्हणायचे आधी मुलगी पाहायची आहे त्यांना hotel मध्ये मुलगी पाहण्याचा कार्यक्रम  ड्रेसवर. साडी वगैरे पहिली पसंती आल्यानंतर... 


आता कोणी फोनवर विचारलंच की "किती काळी आहे मुलगी" तर "व्यंकटेश  माहिती आहे का तुम्हांला.??  साऊथचा हिरो. तेवढी सावळी आहे हो प्रिती आमची" असे सांगायला शिकले प्रितीच्या घरचे.


उंची आणि रंगामुळे. शोधमोहीम लांबली. मनिषा धास्तावलेली. "काय ग करायचं?? असंच सुरू राहिलं तर पोरीचं वय वाढतं जाईल! कधी जमेलं हिच लग्न ??.. लोकं विचारत राहतात.."  मनिषाने एकदा फोनवर विचारलं.

आता मला विचाराल तर मला लग्नाची बोलणी करण्याचा काहीच्या काहीच अनुभव... साधारण पाच लग्न जमवली. दोन तर साखरपुड्याआधी मोडून पुन्हा जमवली. त्यामुळे मैत्रिणी लग्नाच्या सल्ल्यासाठी एखादा फोन बिन करतातच. अशावेळी माझी जबाबदारी वाढते. 

माझा देवावर आणि त्याने गाठी स्वर्गात बांधल्या यावर प्रचंड विश्वास. त्याच विश्वासाच्या जोरावर मनिषाला  समजावलं.

 "हे बघ मने, लोकांच काय..!!  बिचारेच असतात ते.  पळून गेली असती तरी विचारलं असतंच की त्यांनी आवर्जून... तेव्हा लोकांचं काही मनावर घेऊ नकोस.  आणि स्थळाबद्दल म्हणशील तर ज्याअर्थी एक पार्ट आपल्याकडे आहे त्याअर्थी दुसरा पार्ट definitely बनलेला आहे. फक्त आपला शोध कमी पडतोय... तेव्हा शोधमोहीम वाढवली पाहिजे." एवढं बोलणं  ऐकून ती खुश झाली आणि मी हुश्श..!!


इतके efforts घेऊन मनिषाला समजावलेलं कामी आलं. झालं मग. अजून पाच सहा ठिकाणी नाव नोंदणी.


प्रितीला ही सांगितल की,. "आम्ही शोधतोच आहोत.  तोपर्यंत तुला कोणी प्रपोज वगैरे केलं तर भेटव आम्हाला एकदा. त्याला फाट्यावर मारायच्या आधी.." 

-----------

ठरवू त्या व्यक्तीवर प्रेम करू हा स्त्रीमधला खंबीर आत्मविश्वास प्रितीकडे वारेमाप... त्यामुळे नो प्रेम, नो प्रकरण. ओन्ली अरेंज मॅरेज.. 


करता करता एक स्थळ आलं. मुलगा बरा होता. दिसायलाही छान. सगळं छान. दुबईला कामाला. दुबईला नको बाई. तिकडे त्या अरब  लोकांपेक्षा भारतीय नोकरदारांचे जास्त नखरे. दोघांच्या पत्रिकेतील नाडी सेम मग नकार कळवला गेला...


त्यानंतर पंधरा वीस स्थळ पाहून झाली. एक स्थळ फायनल झालं. बोलणीच्या बैठका झाल्या. पण खर्चावरून काही फिसकटलं.  मुलीची बाजू म्हणून कोणी गृहित धरणं कधीच मान्य नाही प्रितीला.  त्यामुळे ठाम नकार दिला. 

मी फोनवर प्रितीला विचारलं,"काय गं बाई वाईट वाटत का?? इतकं जुळत आलेलं लग्न मोडले म्हणून..??"

"नाही गं मावशी. वाईट वाटायला मी काही प्रेमात वगैरे नव्हते त्याच्या. मी ठरवलंय, जोवर लग्न लागून पाठवणी होत नाही तोवर कोणत्याच मुलांबद्दल भावनिक विचार करायचा नाही.... आणि तसंही चप्पल कितीही देखणं असलं तरी आपल्या मापाचं हवं ना... "

आई ग्गं.. आजकालच्या पोरींचे कन्सेप्ट फार क्लिअर असतात बा..‌..

------------------------

सहा महिन्यांनी दुबईवाल्याचं स्थळ पुन्हा एकदा दुसऱ्या मध्यस्थांमार्फत आलं.  एक दिवशी मेसेज. "बहिणीचं लग्न जमलं का. नसेल जमलं तर पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला पत्रिका दाखवून बघता का ???" 

पुन्हा चर्चा. 

रक्तगट वेगळे त्यामुळे पत्रिकेचा प्रश्न मिटला. पण मग फॉरेन रिटर्न आहे..  काय करायचं...?? हा  प्रश्न उरलेलाच. गावी चौकशी केली तर मुलगा चांगला आहे कळलं. गावाला जातांना काय हो सगळेच चांगले बनून जातात. त्यात काय एवढं नवीन..? 😀😀


लग्नासाठी तर खर्च होतोच की..  पण ज्याला मुलगी द्यायची त्याची नको का चौकशी करायला. भावोजींनी म्हणजे प्रितीच्या वडिलांनी ऑफिसच्या माणसाला पाठवून मुलाची इत्यंभूत चौकशी केली.  मुलगा चांगला आहे कळल्यावर होकार दिला.


जास्त माणसं, त्यांच्या आवाजाने आजारी आजी घाबरते.  त्यामुळे अंधेरीला हॉटेलमध्ये त्यांचे आणि प्रितीकडचे पाहुणे भेटलो. बोलणी वगैरे सगळं हॉटेलच्या चहासोबत केली. समजूतीने ठरलं सगळं.

हुश्श...!! झालं फायनल एकदाच. 


घरी पोहोचेपर्यंत प्रितीचा चेहरा उतरलेला.

"आता ग बया, आता आणि काय झालं !! " आमच्या  मनीमाऊला  धसका.  भावोजींनी मनिषाला प्रितीशी बोलायला सांगितले.  "काय झालयं ते विचार. तुला नाही पटलं, तिचं चुकीचे वाटलं तर समजावून सांग. पटलं तर पाहुण्यांना नाही सांगुया" भावोजींची स्वच्छ भुमिका. 


थोड्यावेळाने मला  फोन "तु ये.. पटकन इकडे."


" काय ग, काय झालं...? आणि रडतेस कशाला.." मी गेल्या गेल्या विचारलं.


"मुलाला भोवऱ्याजवळ टक्कल आहे थोडं.." प्रिती.

" आम्हाला नाही दिसलं. तुला कधी दिसलं..??" मनिषा.

" तो रुमाल उचलायला वाकला तेव्हा..." प्रिती


आयला असं आहे होय. पहिल्यांदा मुलगा पाहायला गेलेले तेव्हा प्रितीकडची मंडळी जरा उशिरा पोचलेली.  तोपर्यंत मुलाकडचे सगळे येऊन बसलेले होते. त्यांना चार प्रश्न विचारून प्रितीच्या घरच्यांनी त्यांच्या परीने सगळं चेक केलं. मुलाशी थोडं हळू बोलून त्याला नीट ऐकू येतयं ना. मध्येच वेगळा प्रश्न विचारून काय उत्तर देतोय त्यावरून थोडी हुशारी चेक केली. हॉटेल मधून निघताना त्यांना पुढे जाऊ दिलं. एकजण आधीच पुढे जाऊन उभा राहिला... फेंगडा, लंगडा तर नाही ना ते पाहिलं. पाठीत पोक काढून खांदे वर उचलत नाही म्हणजे टीबी सारखा आजार नक्कीच झालेला नाही. असे आणि इतके पापड बेलल्यावर अजून काही राहीलं असेल असं कोणालाच नाही वाटलं. आता अचानक कळलं की सगळ्या निरीक्षणात टक्कल सुटलं. 🤦‍♀️🤦‍♀️


तुम्हीच सांगा. मुलाला साधारणपणे मागूनपुढून पाहतात. आता टक्कल आहे की नाही हे पाहायला वरून कसं पाहणार ??? बरं आता मुलगा चांगला होता घरच्यांच्या दृष्टीने. पण लग्न प्रितीला करायचं त्यामुळे तिला सगळं पटण गरजेचं होतं. मनात किंतू ठेवून कोणतंच नातं जगलं जात नाही.  तरीही एकदा समजावून पाहावं म्हणून मनिषाने विचारलं..


"खुप मोठ्ठं आहे का टक्कल ??"..... मनिषा.


"नाही...लहानसंच आहे.... पण तुम्ही बघायला हवं होतं ना मुलाला केस कमी आहेत ते..." प्रिती.


"अग हो. तु म्हणालीस, मिशीवाला नवरा पाहिजे मग आम्ही मिशीवाला शोधला न. त्या गडबडीत इकडचे केस थोडे तिकडे झाले असतील तर काय हरकत आहे." मी प्रितीला समजवायचं मनावर घेतलेलं. 


"पण आत्तापासूनच टक्कल. पुढे जाऊन अजूनच वाढेल की." प्रितीची प्रश्न.


" बरं आता शांत रहा. उद्या तो येणार आहे ना तेव्हा बघू." मनिषाने सांगितलं.

-----------------

दुसऱ्या दिवशी पाहिलं. इतकही काही नाही टक्कल. पुन्हा समजावून सांगायची पाळी आली...


"हे बघ बाई, पाहिलं मुलाला. टक्कल इतकंही काही वाटतं नाही. मुलगा चांगला आहे. दिसायला, नाकीडोळी नीटसं आहे. तुझ्यापेक्षा बराच उजवा वाटतोय. तरीही तुला वाटतं असेल तर तबल्याची शाई आणून तु नंतर घासू शकतेस टकलावर." मी चेष्टेच्या सुरात समजावतं म्हटलं.


"माझा नवरा बघ. तेरे नामची स्टाईल मारत फिरायचा. पण आता मेरे बाल म्हणत फिरतोय. आणि सगळे म्हणतात लग्नानंतर गेले केस पोराचे.. अप्रत्यक्षपणे मीच जबाबदार असल्यासारखं. या मुलाला आधीपासूनच टक्कल आहे त्यामुळे तुझी एक बाजू सेफ आहे." बाजुच्या वहिनींनी समजावलं.. 

"मला तर साखरपुड्याच्या दिवशी चिवड्यातला लाडू दिसला होता.. आता पुर्ण चंद्र झालाय. पण माणूस झ्याक हाय एकदम.." मी पुन्हा अभिमानाने सांगितलं.


"फक्त ते जरा केसांनी भोवऱ्यावर साथ सोडली म्हणून नकार सांगायचा असेल तर हा फोन घे आणि नकार कळवून टाक. तुझ्या जबाबदारीवर." आता भावोजींनी थोडा स्ट्राँग स्टँड घेतला.


यावेळी मात्र प्रितीला समजलंच.

----------------

लग्नाच्या आधी दहा दिवस भावोजींची आई खुप आजारी झाली.  खरेदी, हॉल, लग्न आणि हॉस्पिटलची धावपळ. सगळ्यात होऊ घातलेल्या नवरदेवाची ही बाकीच्या मंडळींसोबत मदत झाली. माणूस कळला. दिसणं किंवा टक्कल हा criteria असू शकत नाही. हे प्रितीला समजून चुकलं. टक्कल बाजूला जाऊन त्याची जागा कौतुकाने घेतली. 


लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करायचा ठरलेला. त्यानेही सांगितलं काही अडचण आली तरी घाबरु नका... पैशांच टेन्शन घेऊ नका. तुम्हांला जमतील तेवढे द्या बाकीचं मी बघतो.  पण तशी काही गरज पडली नाही.  लग्न यथावकाश पार पडलं...

----------------------------

आता पाठवणी करतांना प्रिती धाय मोकलून रडणार. हे सगळ्यांना माहिती. कारण प्रितीचा स्वभाव हळवा. 

मी प्रितीला समजावत म्हटलं... " बघ पिल्लू, इतका खर्च करून तो तुला त्यांच्या घरची लक्ष्मी म्हणून घरी न्यायच्या विचारात आहे... तु उगाच रडून रडून "रडत लक्ष्मी" म्हणून जाऊ नकोस बाई."  

प्रितीचा भाऊ तिथेच होता बाजूला. " प्रिते तु खरंच रडू नकोस गं लग्नात. आणि रडलीसच तर जरा छान रड. आतापर्यंत पाहिलंय लैच घाण रडतेस. लग्नात नथ असते नाकात. रडून रडून शेंबडाने सगळी नथ भरून टाकशील आणि लग्न झाल्या झाल्या तुला पाहुणे इथंच सोडून जातील. " म्हणाला.

त्याचं तसं बरोबर होतं. प्रिती कधीही रडायला लागली की तिच्या डोळ्यांसोबत नाकही साथ देतं. फाररररर फुररररर करत नाक रुमालात घालून ती रडते. मलाही पटलं रडू कसं देखणं हवं. 🤪🤪🤪

---------------

पाठवणीचा क्षण जवळ आला. समोरची पाहूणे मंडळी. प्रितीकडचे सगळे जमा झाले. मनिषा आणि भावोजींनी प्रितीच्या सासुला साडी, सासऱ्यांना शर्ट पँट पीस देऊन त्यांचा मानपान केला. शेवटी मनिषाने विहिणीला आणि भावोजींनी व्याहींना "आमची लेक आजपासून तुमची झाली. सांभाळा तिला. आम्ही जपलीय, तुम्ही ही जपा.." असं गळाभेट घेत सांगितले. 

मनिषा आणि भावोजींना अश्रू सावरेनात. आजुबाजुच्या आम्ही सगळ्याच रडलो. प्रितीला बजावलेलं होतं म्हणून किंवा आपण रडलो तर सगळे रडतील म्हणून माहिती नाही पण प्रिती रडली नाही.....

भाऊ माझ्याबाजूला येत म्हणाला," मावशी ही खरंच नाही रडली.. मला वाटलं नोबितासारखी धो धो रडतेय की काय..!!" 

"हळवी माणसं जेव्हा खंबीर व्हायचं ठरवतात तेव्हा शंभर टक्के होतात." मी बोलायचं म्हणून बोलले. 

पाठराखीण देऊन, घरभरणी करायची म्हणून सोबत अजून एका गाडीतून दहा बारा माणसे मुलाच्या घरी गेले. तिकडच्या रितीभाती झाल्या तशा सगळे नाश्ता पाणी करून जायला निघाले. पाठराखीण फक्त तिथे राहणार होती. बाकी माहेरची सगळी माणसं जाणार होती. आतापर्यंत सोबतच होते सगळे म्हणून जाणवलं नाही. उंबरठ्याच्या आत राहून निरोप देताना मात्र प्रितीचा बांध फुटला..... 

----------------------

"आता ही खुप रडेल आणि तिच्या खोड्या काढून हसवायला मी तिथे नाही... आई, खुपच एकटं वाटत असेल ना तिला त्या घरी...?? भावोजी सावरतील का तिला माझ्यासारखं..??"  गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसलेला भाऊ बोलत होता.

समाप्त....

© Velvet Kavisha

सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. लिंक शेअर करण्यास आमची हरकत नाही. 


फोटो गुगल साभार

© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments