एकटी आई आहे पण भित्री नाही

 एकटी आई आहे पण भित्री नाही


©️जया पाटील 



" अनुराधा , तू जो विचार करते आहेस ना , तो विसरून जा.

माझ्या जवळ बोललीस पण कोणाजवळ पुन्हा बोलू नकोस.

तूला साथ तर कोणीच देणार नाही.

पण अनेक जणांची दुश्मनी तू अंगावर ओढवून घेशील.

अग, एकट्या स्त्रीच जगणं आधीच या समाजात कठीण आहे.

त्यात तु अश्या विचित्र कारणासाठी लढणार.

याचा त्रास तुझ्या लेकीलाच होणार.

त्यामुळे तु माघार घे.

एकट्या स्त्रीला अशी लढाई लढणे सोपं नाही.

तुझ्या या वाटेत अनेक संकटं असणार आहेत.

ती पार करणं तुझ्यासाठी सोपी नाही.

त्यामुळे मनातून हा विचार काढून टाक.

आरोहीच्या भविष्याचा विचार कर.

इतक्या लहान वयात तिची बदनामी झाली तर जगणं कठीण होईल तिचं." 

अनुराधाची मैत्रीण वैशाली तिला समजावणीच्या सुरात सांगत होती.

अनुराधा सात वर्षीय आरोहीची एकटी पालक होती. 

अनुराधा आणि राहुल दोघेही एकमेकांचे कॉलेजचे मित्रमैत्रिण.

प्रोजेक्ट्स ,नोट्सच्या बहाण्याने त्यांची मैत्री झाली.

ती कधी प्रेमात बदलली दोघांनाही पत्ता लागला नाही. 

कॉलेजचे शिक्षण संपल्यावर कॅम्पस सिलेक्शन मध्ये दोघांनाही एकाच शहरात नोकरी मिळाली.

दोघांचेही एकमेकांना भेटणं सुरूच होतं.

अनुराधा आणि राहुल दोघांनाही एकमेकांची सोबत आयुष्यभर हवी होती.

दोघांच्याही घरी लग्नाची घाईगडबड सुरु झाली.

अनुराधा आणि राहुल दोघांनीही आपल्या नात्याबद्दल आपापल्या घरी सांगितले.

राहुलचे बाबा लहानपणीच देवाघरी गेले होते.

राहुलच्या आई लताताईंचा राहुल हाच एक आधार होता.

आपल्या मुलाचा आनंद तोच आपला आनंद असे म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला.

अनुराधाच्या घरचे पण अगदी समजूतदार होते.

अनुराधाचे कुटुंबीय राहुलच्या आईला येऊन भेटले. 

आपल्या मुलीचा आनंद तोच आपला आनंद.

शेवटी संसार तर अनुराधा आणि राहुलला करायचा आहे,

म्हणून अनुराधाच्या आईबाबांनी देखील त्यांच्या विवाहास संमती दिली. 

दोघीही कुटुंबियांच्या सामंजस्याने अनुराधा आणि राहुल दोघांचाही विवाह झाला. 

विवाहसोहळा साधेपणाने पार पडला. 

लग्नसोहळ्यामधे तर अनुराधा आणि राहुल  अगदी लक्ष्मीनारायणाप्रमाणे भासत होते.

माप ओलांडून अनुराधा राहुलच्या घरची लक्ष्मी झाली. 

करियर करतानांच तिच्या संसारात देखील तितकीच रुळली. 

आईबाबांच्या चांगल्या शिकवणुकीमुळे अनुराधा एक चांगली सून , 

चांगली बायको आणि उत्तम गृहिणी होण्याचा प्रयत्न करत होती.

तिच्या वागण्याचे लताताईंना देखील खूप कौतुक होते.

अनुराधा ,राहुल आणि लताताई तिघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होते.

लग्नानंतर काही काळ राहुल आणि अनुराधा दोघांचेही ऑफिस अगदी सुरळीत चालू होते. 

त्याच वेळेस अनुराधाने गोड बातमी दिली. 

अनुराधा आई होणार होती. 

त्यामुळे ती खूप खुश होती. 

एक वेगळेच तेज होते तिच्या चेहऱ्यावर. 

ऑफिस आणि घरची कामे सगळे अगदीच व्यवस्थित मॅनेज केले होते अनुराधाने.... !

लताताई देखील अनुराधाला खूप जपत होत्या.

तिला हवं नको ते सगळंच आईच्या मायेने पाहत होत्या.

अनुराधाला नऊवा महिना सुरु झाला. 

तिचे डोहाळेजेवण देखील खूप थाटामाटात पार पडले. 

पूर्ण दिवस भरले.

एक दिवस तिला बाळंतकळा सुरु झाल्या. 

तिने एका गोंडस परीला जन्म दिला. 

छोट्या परीला हातात घेताच आयुष्यभराचे समाधान प्राप्त झाल्याचा आनंद अनुराधाच्या  चेहऱ्यावर होता.

तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. 

बाळाच्या माथ्यावर एक गोड पापा घेऊन ती भरून पावली. 

अनुराधा आणि राहुल आपल्या बाळाला पाहून मनोमन सुखावले.

पाच दिवसांनी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर अनुराधा तिच्या माहेरी आली.

छोट्याश्या परीचा छोटासा नामकरण सोहळा पार पडला.

बाळाचे नाव ठेवले आरोही ...

आरोहीच्या येण्यामुळे राहुल आणि अनुराधाचा संसार पूर्ण झाला होता.

राहुलची मुलगी त्याला भाग्याची ठरली.

त्याला ऑफिस मध्ये प्रमोशन मिळाले.

त्यांची आर्थिक परिस्थिती देखील आता स्थिर झाली होती.

अनुराधाला आरोहीचे बालपण जगायचं होतं.

त्यामुळे काही काळ तिने नोकरीतून ब्रेक घेण्याचं  ठरवलं.

छोट्या आरोहीच्या बाललीलांमुळे अनुराधाचा वेळ कसा जाऊ लागला. 

हे तिलाच कळेनासे झाले. 

तिचं गोड हसणं, 

घरभर पळणं, 

सगळ्या घरात खेळण्यांचा पसारा करणे, 

कारणाशिवाय तिचे रुसुन बसणे ,

या सगळ्यात अनुराधाचा वेळ कुठे जात असे ते तिलादेखील समजत नसे. 

राहुल देखील आपल्या लेकीच्या सगळ्या बाललीला पाहून भरून पावत होता.

दृष्ट लागण्यासारखा दोघांचा सुखी संसार सुरू होता.

पण नियतीला काही तरी वेगळंच मान्य होतं.

सुखालाही कधीतरी दृष्ट लागते , 

तसेच काही अनुराधा आणि राहुलच्या आयुष्यात घडले.

एक दिवस राहुल कामा निमित्त बाहेर गावी गेला असतानाच अचानक त्याचा ऐक्सीडेंट झाला.

त्यातच त्याचा अपघाती मृत्यु झाला. 

अनुराधावर तर दुखाःचं आभाळ कोसळलं. 

तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला एकटीला सोडून कायमचाच निघुन गेला.

राहुलच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे अनुराधा खचली.  

परंतु आरोहीच्या संगोपनासाठी तिला खंबीर होणं गरजेचं होतं.

आरोहीकडे पाहून अनुराधाने स्वतःला सावरले.

पदरात दीड वर्षाची आरोही आणि लताताईंमच्या सोबतीने ती पुन्हा जिद्दीने उभी राहिली.

तिने पुन्हा एकदा जॉब शोधायला सुरुवात केली.

आधीच्या कामातील अनुभवामुळे तिला पुन्हा नोकरी मिळाली.

लताताई , घर आणि आरोही सगळ्यांचा सांभाळ ती उत्तम रित्या करत होती.

लताताई आणि आरोहीच्या आईबाबांनी तिला दुसरे लग्न करण्याविषयी सुचवले.

पण राहुलची जागा दुसऱ्या कुणाला देण्याचा विचार देखील ती करू शकत नव्हती.

आरोही मोठी झाली.

अनुराधा देखील नोकरीत स्थिर झाली.

मोठ्या पदावर तिचे प्रमोशन झालं.

फायनान्शियली स्टेबल झाल्यामुळे तिने आरोहीला दुसऱ्या शाळेत टाकायचे ठरवले.

ज्युनिअर केजी , सिनियर केजी जवळच्या शाळेत पूर्ण केल्यावर अनुराधाने तिला पहिलीला मोठ्या दूरच्या शाळेत टाकले.

शाळा थोडी दूर होती.

पण येण्याजाण्यासाठी बसची व्यवस्था असल्यामुळे अनुराधा निश्चिन्त होती.

आरोहीची ऍडमिशन नवीन शाळेत झाली.

नवीन शाळा आरोहीला खूप आवडू लागली.

ती रोज शाळेतून घरी आली की अनुराधाला शाळेच्या गमतीजमती सांगत असे.

नवीन शाळेत आरोही रुळली.

हे पाहून अनुराधाला देखील आनंद झाला.

त्यातच दोन तीन महिने निघून गेले.

त्यानंतर मात्र आरोहीचे वागणे बदलले.

ती अचानक शांत शांत राहू लागली.

अनुराधाला आरोही मधला बदल लक्षात आला. 

त्यामुळे तिने आरोहीला याबद्दल विचारले देखील..

पण तिने काहीच उत्तर दिले नाही.

दोन दिवसांनी आरोही शाळेत जायचं नाही म्हणून अनुराधाला सांगू लागली.

आरोहीला शाळेत जायला इतकं आवडते तरीही ती नकार का देतेय याचे अनुराधाला आश्चर्य वाटलं.

त्या रात्री आरोहीला फणफणुन ताप आला.

अनुराधा तिच्या उशाशीच बसून होती.

मध्यरात्री आरोही झोपेत बडबडत होती.

" काका , असं नका करू ...प्लीज 

मला खूप त्रास होतोय.

असं कुठे पण का हात लावताय मला..

मला पोटात दुखतय खूप ..

प्लीज ..असं नका ना करू ...

मला माझ्या मम्मा कडे जायचंय.." 

आरोहीचं झोपेतलं बोलणं ऐकून अनुराधाला खूप मोठा धक्का बसला.

आपल्या नाजूक लेकीवर कोणीतरी अत्याचार केला आहे हे तिच्या लक्षात आले.

सकाळी आरोही उठल्यावर अनुराधाने तिला जवळ घेतलं आणि तिला विचारलं ..

" आरोही , बाळा कुठल्या काकांनी तुला त्रास दिला मला सांगशील ...? "

काकांचे नाव ऐकून आरोही खूप घाबरली.

तिला घाम फुटू लागला.

आरोहीची अवस्था पाहून अनुराधाच खचली.

पण तिने स्वतःला सावरले.

आणि ती आरोहीला समजावत म्हणाली ..

" घाबरू नको बाळा , तूला इथे कोणीच काही करणार नाही.

मला सगळं काही नीट सांग. " 

" पण मम्मा , मी जर तूला सगळं काही सांगितले तर ते माझी टीचर कडे कंप्लेंट करतील.

मग टीचर मला पनिशमेंट देईल

आणि मग मला स्कूल मधून काढून टाकतील. " आरोही 

" असं काहीच होणार नाही आरोही बाळा ..

हवं तर आपण पोलीस काकांना बोलावू.

चुकीचं काम करणाऱ्या लोकांना ते शिक्षा देतात.

आपण त्या वाईट काकांना शिक्षा मिळवून देऊ.

मी आहे ना तुझ्यासोबत...

घाबरू नकोस.

सांग मला सगळं ..." 

अनुराधाने आरोहीला समजावलं.

आईच्या सांगण्यावरुन आरोही सगळं सांगु लागली.

" मम्मा , आम्ही रोज स्कूलला जात होते तेव्हा आधीचे जे ड्रॉयव्हर काका होते ते खूप छान होते.

खूप मज्जा यायची मला.

पण आता ते छान ड्रायव्हर काका गेले.

आणि दुसरे काका आले.

त्यादिवशी माझे सगळे फ्रेंड्स उतरून त्यांच्या घरी गेले.

आपलं घर लास्ट येतं.

पण आपले घर यायच्या आधी गाडी थांबवून ते काका माझ्या जवळ आले.

त्यांनी माझा फ्रॉक वरती केला.

आणि ते मला कुठेपण हात लावत होते.

मला खूप त्रास होत होता.

तिथल्या मावशी पण त्यांना रागवल्या.

पण त्यांनी ऐकलं नाही.

हे जर मी कोणाला सांगितलं तर ते मला स्कूल मधून काढून टाकतील. 

असे त्यांनी मला सांगितलं.

मम्मा , मला नाही जायचं स्कूलला बसने ..

मला खूप भीती वाटते आहे त्या काकांची..." 

इतके बोलून आरोही अनुराधाला बिलगून रडू लागली.

इतक्या लहान वयात आपल्या लेकीनं काय सहन केले आहे. 

ह्याची जाणीव होऊन अनुराधाला खूप धक्का बसला.

त्या नराधमाला शिक्षा मिळवून देणारचं असा मनाशी तिने निश्चय केला.

दुसऱ्याच दिवशी अनुराधा स्कूल प्रशासनाला जाऊन भेटली.

पण त्यांनी अनुराधाचं बोलणं झिडकारून लावलं.

अनुराधा ही सिंगल पॅरेण्ट आहे हे स्कूल प्रशासन जाणून होतं.

त्यामुळे ती फार मजल गाठणार नाही.

आणि पोलीस कंप्लेंट झाल्या तर शाळेची बदनामी होईल.

त्यामुळे त्यांनी अनुराधाला साहाय्य करण्यास नकार दिला.

ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

तुम्ही कंप्लेंट करत आहात ती व्यक्ती अगदी सज्जन असून गेली पंचवीस वर्ष तो इथे काम करतो आहे.

त्याच्याविरुद्ध कधीच कोणती तक्रार आली नाही. 

त्यामुळे तुमच्या आरोपात कुठलेच तथ्य नाही.

असे सांगून शालेय प्रशासनाने अनुराधाला परत  पाठवलं.

अनुराधा नाराज झाली.

पणा तरीही तिने हा लढा चालूच ठेवायचा ठरवला.

तिने ज्यांच्याकडून मदत मागितली.

त्या सगळ्यांनी तिला वेड्यात काढले.

अनुराधाची प्रिय मैत्रीण वैशाली तिने देखील या बाबतीत तिची साथ सोडली.

सगळ्यांच्या अश्या वागण्यामुळे अनुराधा खूप खचली.

पण ती हरली मात्र नाही.

तिने जिद्दीने हा लढा सुरूच ठेवायचा ठरवला.

कारण तिला आरोहीला न्याय मिळवून द्यायचा  होता.

शेवटी तिने आयसीआरडब्ल्यू ,  निर्भया केंद्र ,  लॉयर्स कलेक्टिव्ह अश्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळविली.

त्यातच तिची ओळख ऍडव्होकेट स्नेहा राऊत यांच्या सोबत झाली.

कोणाचीही सोबत नसतांना आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या अनुराधाच्या जिद्दीचे त्यांना खूप कौतुक वाटले.

त्यांनी आरोहीची केस लढण्याचे ठरवलं.

या सगळ्यात अनुराधाचा विश्वास खचला.

परंतु ऍडव्होकेट स्नेहा यांनी अनुराधाला सगळ्या कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या.

पोक्सो कायद्याच्या मदतीने त्यांनी आरोहीला न्याय मिळवून देण्याचे ठरवले.

पोक्सो कायदा (POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२,

हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी ,

आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. 

पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.

या कायद्यात पीडित बालकाच्या सुरक्षेची आणि गुप्ततेची हमी घेतली जाते.

यातील सगळ्या गोष्टी ऍडव्होकेट स्नेहा यांनी अनुराधाला समजावल्या.

ऍडव्होकेट स्नेहा आणि अनुराधा दोघींनी आरोपी विरुद्ध पुरावे गोळा केले.

घटनेच्या साक्षीदार असलेल्या मदतनीस मावशींना साक्ष देण्यास अनुराधाने तयार केले.

अनुराधाची जिद्द आणि ऍडव्होकेट स्नेहा यांनी केलेल्या प्रतिनिधित्वामुळे आरोपीवरचे आरोप सिद्ध झाले.

त्यात त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात आली.

अनुराधाने तिच्या लेकीला न्याय मिळवून दिला.

एक आई आपल्या मुलांसाठी कितीही संकटे झेलू शकते हे अनुराधाने दाखवून दिले.

तिला वेड्यात काढणाऱ्या समाजापुढे तिने आदर्श घालून दिला. 

स्त्री ही मायाळू असू शकते,

तशीच ती या महिषासुररुपी राक्षसांचे मर्दन करणारी महिषासुरमर्दिनी असू शकते...!  

हे अनुराधाने सिद्ध केले.

पालकांच्या तक्रारीला दुर्लक्षित केल्यामुळे शालेय प्रशासनावर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

आरोहीच्या मनावर कोवळ्या वयात झालेले मानसिक आघातांची तीव्रता कमी करण्यासाठी अनुराधाने कौन्सिलरची मदत घेण्याचे ठरवलं.

तिने स्वतःच्या प्रेमाने , शिकवणुकीने आणि कॉउंसिलिंगच्या साहाय्याने आरोहीला या आघातातून सावरले.

आरोही पुन्हा आनंदाने शाळेत जाऊ लागली.

पण हे सगळेच शक्य झाले ते फक्त आणि फक्त अनुरोधाने लढलेल्या लढाईमुळे ....तिच्या जिद्दीमुळे...!

अनुराधाची ही लढाई खरंच एक प्रेरणा आहे.

आपल्या बाजूला देखील अश्या अनेक आरोही असतील. 

पण या अत्याचाराला रोखण्यासाठी गरज आहे ती अनुराधाच्या जिद्दीची , तिच्या आत्मविश्वासाची ...! 

तिचं जिद्द आपण आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण करायला हवी तरच आपण आपल्या मुलांचे आयुष्य आनंदी करू शकू.

समाप्त!

टीप - पोक्सो कायदाची माहिती गूगलवरून साभार.

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 


✍©️ जया पाटील








Post a Comment

0 Comments