सासू तुमची मोलकरीण नाही

 


सासू तुमची मोलकरीण नाही
© Velvet Kavisha

निर्मलाताईंना दोन मुलं. किशोर आणि सारीका. महादेवराव वारले आणि त्यांच्या जाग्यावर नोकरी करत निर्मला बाईंनी संसाराचा गाडा ओढला. मुलांना शिक्षण दिलं.   दुःख झेलूनही मुलांसाठी  खंबीर झाल्या. आई तर त्या होत्याच पण वेळप्रसंगी मुलांचा बाप ही झाल्या होत्या.  किशोर नोकरी करू लागला. चार पाच वर्षांत स्थिरस्थावर झाला आणि निर्मलाबाईंनी व्हीआरएस घेतली. नाही म्हटलं तरी थकल्याच होत्या थोड्या. आरामाची, निवांतपणाची गरज होती त्यांना.
सारीकाचं लग्न झालं. मुलगा झाला तिला. ती तिच्या सासरी छान होती. आता किशोरचं लग्न करून त्याचा संसार मार्गी लागला की झालं.
निर्मला बाईंनी चार ठिकाणी सांगितलं. आलेल्या स्थळांमधून किशोरला नमिता पसंत पडली. लग्नाची सगळी बोलणी करून यथावकाश लग्न झालं. निर्मलाबाईंनी आहेरात, मानपान किंवा भेट म्हणून काहीच घेतलं नाही.
"काय करायचं घेऊन..?? परमेश्वराने पुरेसं दिलंय. तुमच्याकडून घेऊन मला किती दिवस पुरणार..??" निर्मला बाईंचं स्पष्ट मत.
लग्न यथायोग्य पार पडलं. नवीन सूनेचं कोडकौतुक झालं. माहेरपण झालं. निर्मला बाईंनी सुनेला त्यांचं घर तिचं वाटावं यासाठी पुर्ण मोकळीक दिली. नमिता तशी जास्त मोकळेपणाने बोलत नसे. नवीन जागा, नवीन माणसं यांच्यात रुळायला वेळ लागतो म्हणून निर्मलाबाई बोलत नसतं. वर्षभरात नातवंड आलं घरात. निर्मला बाईंनी सगळं हौसेने केलं. लग्नाला तीन वर्षे झाली आणि नमिताने हळूहळू एक एक करत सगळी जबाबदारी घ्यायला सुरूवात केली.
"यापुढे तिलाच सांभाळायचं आहे सगळं. आपण किती दिवस आहोत आता. बरं झालं इंटरेस्ट घेऊन करतेय सगळं. ज्याचा संसार त्यानेच करावा. आपण आपलं लागलं तर मार्गदर्शन करावं, मदत करावी. नाही तर नातवंडामध्ये, देवाच्या नामस्मरणात दिवस घालवावेत. " निर्मला बाईंचा फंडा एकदम सरळ.
बाजारहाट, देणंघेणं, आहेर किचन सगळं नमिता पाहू लागली. निर्मलाबाईंनी कधी काही सुचवलं तर ते न ऐकता स्वतःच्या मनासारखं करू लागली. स्वयंपाकघरात निर्मलाबाईंना जवळजवळ बंदीच होती. सगळ्यांची ताटं वाढून ठेवली जायची. निर्मलाबाई आपलं ताट घेऊन जेवायला बसायच्या. दर रविवारी एकतर नमिताच्या माहेरहून कोणी तरी यायचं नाही तर मग नमिता माहेरी जायची. जेवणावळी उठायच्या. गप्पा टप्पा होतं राहायच्या. निर्मला बाईं त्यांच्या परीने हसून खेळून राहत.
"आई, जरा मशीन लावता का कपड्यांचं..??" नमिताने एक दिवस निर्मला बाईंना विचारलं.
"हो लावते ना. आज कुंदा येणार नाही का..??"
"ती सुट्टीवर आहे. पंधरा दिवस गावी जाणार आहे. " नमिताने सांगितले.
त्या दिवसापासून हे कराल का ते कराल का करत नमिताने कुंदाची सगळी कामं निर्मलाबाईंकडून करून घ्यायला सुरूवात केली. पंधरा दिवसांचाच तर प्रश्न आहे ना म्हणत निर्मलाबाई काम करत होत्या. एक दिवस त्यांना अंगात ताप असल्यासारखं वाटलं. क्रोसीन घेऊन त्या झोपून राहिल्या. त्या करत असलेली कुंदाची सगळी कामं तशीच राहिली. नमिताने कपडे तसेच ठेवून दिले. लागणारी भांडी तेवढी घासून घेतली. बाकीची टबमध्ये भरून ठेवून दिली.
दुसऱ्या दिवशी निर्मला बाईंना बरं वाटलं. ढीगभर भांडी बघून त्यांनी कुंदाला फोन लावला. तिने बदली बाई न देता सुट्टी घेतली म्हणून चांगलं झापलं. तेव्हा त्यांना कळलं की, नमिताने कुंदाला कामावरून काढून टाकलंय.
"सासुबाई बसूनच असतात तर करतील वरची कामं. उगाच कशाला बाईचा खर्च. त्यांना काही दिवसांत डोंबिवलीला फ्लॅट बुक करायचा आहे. त्यासाठी पैसे  वाचवायचे म्हणून कुंदाला कामावरून काढून टाकलं" असं नमिता कुंदाला म्हणाली होती.
खरंतर चाळीतली रुम वन प्लस वन होती.. वरखाली चार रुम होत्या. निर्मलाबाईंच्या मते एवढी जागा पुरेशी होती. त्यामुळे त्यांना फ्लॅटचा विचार कधी मनात आला नाही. त्यांना नमिताचं वागणं कळत नव्हतं.
निर्मलाबाई पेन्शनचे आलेले पैसे घरखर्चाला देत होत्या. कुंदाला काढून टाकून तिची कामं निर्मलाबाईंकडून या वयात करून घेताना नमिताला कसंच काही वाटलं नाही. निर्मलाबाई दुखावल्या गेल्या. त्यांनी कुंदाला "करते थोड्या वेळाने फोन" म्हणत फोन ठेवला.

संध्याकाळी किशोर घरी आला. नेहमीसारखे सगळेच टीव्ही बघत बसले होते. निर्मलाबाईंनी विषय काढला.
"किशोर, तू डोंबिवलीला फ्लॅट बुक करायचा विचार करतोयस का..??" निर्मलाबाईंनी सरळ मुद्दा विचारला.
" अं हं.. म्हणजे पुढचा प्लॅन आले गं. घ्यायचा नक्की झाल्यावर सांगणारच होतो तुला" किशोरने सांगितले.
"बरं. हरकत नाही. चांगला आहे प्लॅन. पण त्यात माझं काय चुकतंय.?? तुमच्या फ्लॅटला पैसे हवेत म्हणून कुंदाला कामावरून काढून टाकलं. दहा दिवस झाले मी घरातलं काम करतेय. मला काम करण्याबद्दल काही वाटत नाही. माझं पुर्ण आयुष्य कष्टात गेलंय. पण आता झेपत नाही. आज मी दिवसभर झोपून आहे. आत जाऊन बघ. भांड्यांचा ढीग तसाच टबमध्ये भरून ठेवलाय. कोण घासणार रे ती भांडी..?? बरं असं नाही की मी घरखर्चाला काही देत नाही. पेन्शन आली की, मी बॅंकेत जाऊन पैसे घेऊन येते. आणून नमिताकडे देते. घरात तर माझा सगळा हक्क नमिताला देऊन मी कधीच मोकळी झालेय. मला माझे उरलेले चार दिवस निवांत घालवायचे होते. माझी तुमच्या संसारात अडचण होतेय हे लक्षात नाही आलं माझ्या. " निर्मलाबाई बोलायच्या थांबल्या.
किशोरने नमिताकडे रागाने पाहिलं. म्हणाला, " तुला सांगितलं होतं ना, कुंदाला काढून टाकू नकोस म्हणून."

निर्मलाबाईंच्या लक्षात आलं की, जे काही होतंय ते मुलगा आणि सूनेच्या संगनमताने होतंय.

"देव दयेने पैशांसाठी मी तुमच्यावर अवलंबून नाही म्हणून बरं नाहीतर माझं तुम्ही काय केलं असतं रे..?? तुम्हांला कुंदाचा पगार परवडत नव्हता तर प्रत्येकाने आपापली कामं करायची होती ना. सगळा राडा माझ्यावर टाकून तुम्ही निवांत झालात. मी माझ्याने होतील तेवढी कामं करतेच की. पण तुम्ही तर मला मोलकरीण बनवायला निघालात." निर्मलाबाई बोलत होत्या.
"नाही गं आई, असं काही नाही. " किशोर सारवासारव करत होता.
निर्मला बाईंनी मनाशी काही ठरवलं.
"किशोर, तुम्ही भविष्यात डोंबिवलीत घर घेणारच आहात ना. तू चांगला कमावता आहेस. त्यामुळे तू या महिनाअखेरपर्यंत तुझ्यासाठी दुसरं घर बघ. मी इथे राहीन. माझ्या नवऱ्याचं आहे हे घर. माझ्यानंतर तुमचंच होणार आहे. पण जोवर मी आहे तोवर ते माझं राहील. तुम्ही तुमचा संसार सुखाने करा. माझी म्हातारीची त्यात लुडबुड नको. तुम्ही पैसे वाचवायला कोणत्याही थराला जाऊ शकता. माझा तुमच्यावर विश्वास नाही."
निर्मला बाईंनी कुंदाला फोन लावला. तिला बोलावून घेतलं. ती आली.
"कुंदा, तुझे दादा वहिनी पुढच्या महिन्यापासून दुसरीकडे राहायला जाताहेत. तेव्हा मी एकटीच असेन भांडी, कपडे, केरलादी या कामांचे किती घेशील ते सांग.  आजपासून हे लोक जाईपर्यंत रोज येत जा. त्याचा पगार मी देईन." निर्मला बाई सगळं ठरवून मोकळ्या झाल्या. किशोरला काही सुचत नव्हतं. कारण एवढ्या शॉर्ट नोटवर दुसरं घर शोधणं शक्य नव्हतं.
"आई, असं काय करतेस..?? एवढ्या कमी वेळात कुठे घर मिळणार आहे..?? आणि भाड्यात किती पैसे जातील."
"बरं मग तुम्हाला इथेच राहायचं आहे का..? मग एक काम करा. जोवर इथे आहात तोवर घराचं अर्धं भाडं पाच हजार रुपये महिना देत जा. कुंदाचे अर्धे पैसे तुम्ही द्या. लाईट बील, पाणीबील सगळा खर्च अर्धा अर्धा. केबलचे पैसे तुम्हीच द्या. कारण मी टीव्ही बघत नाही. माझ्या जेवणाचे चार हजार रुपये भाड्यातून कापून घ्या आणि उरलेले मला देत जा. "
निर्मला बाई इतक्या ठामपणे बोलत होत्या की किशोरला काही सुचलं नाही. नमिता ही वरमली होती. कदाचित हीच सुरुवात होती‌, सासुला गृहित धरण्याची. निर्मलाबाईं वेळीच खंबीर झाल्या होत्या. थोडे पाश तोडून हिशोबाने वागल्या होत्या.
मुलांना शिकवणं, त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांचा खर्च करणं ही आईवडीलांची जबाबदारी असते. पुढे जाऊन ही आईवडीलांची मालमत्ता मुलांचीच होणार असते. तरीही त्याचं आई वडिलांसोबत छक्के पंजे करायला मुलं-सुना, लेक-जावई मागेपुढे पाहत नाहीत.
उतारवयात आईवडीलांना पैसा नाही तर आधाराची गरज असते. आपल्या माणसांचा सहवास त्यांना जगायला बळ देतो.
निर्मला बाईंनी मात्र वेगळा मार्ग निवडला. किशोरवर स्वतःची जबाबदारी पडू नये म्हणून त्यांनी स्वतःहून वेगळं व्हायचं ठरवलं. एका वृद्धाश्रमात जाऊन आल्या. हातपाय चालताहेत तोवर कुंदाच्या मदतीने सगळं करायचं ठरवलं. पण जेव्हा काहीच होणार नाही तेव्हा मात्र डॉ. कीर यांच्या वृद्धाश्रमात जायचं नक्की केलं.
किशोरला हे कळत होतं. पण तो निर्मलाबाईंना थांबवू शकला नाही. त्याने एक दोनदा प्रयत्न केला बोलण्याचा तेव्हा निर्मलाबाईंनी त्याला समजावून सांगितलं. नमिताला वाईट वाटत होतं. कारण निर्मलाबाई कधी सासु सारख्या वागल्या नव्हत्या. जेवढे सारिका त्या घरात मोकळेपणाने वागत होती तेवढीच मोकळीक नमिताला ही होती. किंबहुना जास्तच होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे घर चालत होतं. पण आता निर्मलाबाईंनी घेतलेला निर्णय तिला पटत नव्हता. लोकं काय म्हणतील?? या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. 
निर्मलाबाईंचं मात्र सगळं ठरलं होतं. त्यांना आता मुलांना कोणताच चान्स द्यायचा नव्हता. ठरल्याप्रमाणे किशोरने डोंबिवलीत फ्लॅट घेतला. निर्मला बाई पुजेला जाऊन आल्या.
कुंदा सोबत त्यांचं सगळं नीट चाललं होतं. कधी सारीका तर कधी किशोर ही आठ दिवस माहेरपणाला येऊन जात. निर्मला बाईंनी स्वतःला गुंतवून घेतलं होतं. नातवाची आठवण आली की जाऊन भेटून येत होत्या. नमिता मुलाला सांगून सासूला थांबण्याचा आग्रह करायची पण निर्मलाबाई  थांबत नसतं.

अकरा वर्षे निर्मलाबाई एकट्याच राहिल्या. तब्बेतीच्या कुरबुरी वर्ष दोन वर्षे सुरुच होत्या. चार पाच वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमीट होऊन आल्या होत्या. आता त्यांनी रात्री झोपताना सोबत म्हणून एक बाई ठेवली होती. एका पहाटे निर्मलाबाईंना ॲटॅक आला आणि त्यातच त्या गेल्या. मुलाने सगळं केलं.
निर्मलाबाईंनी मृत्युपत्र केलं होतं. आपल्या नातवंडांच्या नावे सगळं वाटून दिलं होतं. बॅकेतल्या पैशांची सारीका आणि किशोरच्या मुलांना समान वाटणी करून दिली होती. निर्मलाबाईंचं सगळं किशोरच्या मुलाला तो सज्ञान झाल्यावर मिळणार होतं. तोवर त्या राहत असलेली रुम भाड्याने देऊन येणारे पैसे डॉक्टर कीर यांच्या वृद्धाश्रमाला देण्याची अट होती. सरतेशेवटी एक वाक्य त्यांनी किशोरच्या मुलाला उद्देशून लिहिलं होतं. "बाळा तुझ्या आईला कधीच मोलकरणीसारखी वागवायचा प्रयत्न करु नकोस. तिला आई म्हणूनच घरात राहू दे."
मृत्युपत्राचं वाचन झाल्यावर "तुमची आई एकदम खमकी होती" म्हणत पाटील वकीलांनी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.
समाप्त.
© Velvet Kavisha
सदर लेखाचे/कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. निनावी किंवा स्वतःच्या नावावर खपवू नका. कायदेशीर कारवाई केली जाईल.
धन्यवाद..!!




Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box