दृष्टिकोन मात्र वेगळा का?

 #दृष्टिकोन_मात्र_वेगळा_का? 

  

©️ जया पाटील 



" आस्था आणि आकांक्षा तुम्हाला दोघांनाही एकमेकांशिवाय थोडं पण करमत नाही.

आता माहेरी आहात तोवर ठिक आहे.

लग्न झाल्यावर मात्र सासरचे खपवून घेणार नाहीत हा..

सारखं मैत्रीण मैत्रीण आम्हाला चालणार नाही म्हणूनच खरडपट्टी काढतील तुमची...!

आता आम्ही तुमच्यासाठी वरसंशोधन करायचं ठरवलं आहे.

लग्न करून तर दोघीही वेगवेगळ्या घरी जाणार ..

मग कसे होईल गं तुमचे ..?

त्यामुळे आताच एकमेकांना सोडून घरच्यांनापण वेळ द्या.

तुम्हाला दोघींनाही एकमेकांशिवाय दुसरे काही सुचतच नाही. " 

शोभाताई म्हणजे आस्थाची आई आकांक्षा आणि आस्थाला चिडवत होत्या.

आस्था आणि आकांक्षाचे ऊत्तर लगेचच तयार होते.

" सख्खे भाऊ असतील ना त्यांच्यासोबतच आम्ही लग्न करू ,

म्हणजे एकाच घरात आम्ही दोन्ही मैत्रिणी जावा- जावा .. 

मग काय नुसती धम्माल असेल आमची ..."

आमची मैत्री तोडणे कुणालाही शक्य नाही काकू ...

आमची मैत्री जपण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. " 

आकांक्षा शोभाताईंना म्हणाली.

" बरं बाई ..

तुमची इतकी घट्ट मैत्री आहे. 

दोघीही एकमेकांना बहिणींसारखा जीव लावता.

हेच पाहून आनंद होतो आम्हाला.

असेच जपा एकमेकींना ..

खूप खूप सुखी रहा. " 

असे बोलत शोभाताईंनी आस्था आणि आकांक्षावरून आपले दोन्हीही हात ओवाळले.

कपाळाजवळ दोन्ही डोळयांच्या बाजूला मुठी वाळून दोन्हीही हातांची बोटं कडकडून मोडली.

" माझ्या लेकींच्या मैत्रीला कुणाचीच दृष्ट लागू देऊ  नको. " 

आस्था आणि आकांक्षा दोघीही बालपणाच्या मैत्रिणी. 

लहानपणापासूनच दोघी शेजारी शेजारी राहत होत्या. 

त्याचमुळे दोघींच्या कुटुंबांचे देखील एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. 

आकांक्षा आणि अखिल अशी दोघी भावंड होती.

आस्था आणि अक्षया ह्या दोघी बहिणी होत्या.

लहानपणापासूनच या सगळ्यांची एकमेकांसोबत अगदी मनापासूनची गट्टी होती. 

आकांक्षाच्या आईला देखील 'आस्था' आणि 'अक्षया' दोघीही आकांक्षा इतक्याच प्रिय होत्या.

आस्थाच्या आईची देखील 'आकांक्षा' , आस्था  आणि अक्षया पेक्षा जास्त लाडकी होती.

प्रत्येक गोष्ट घेताना एकमेकांच्या आवडीची घेणे.

छोट्यामोठ्या अडचणीत एकमेकांना साथ देणे.

पासून सगळ्या गोष्टींत त्यांना एकमेकांची सोबत गरजेची वाटत असे. 

वेगवेगळ्या आयांच्या पोटी जन्म घेतलेल्या त्या मनाने मात्र अगदी सख्ख्या बहिणी होत्या.

वेळ पुढे जात होता तशी त्यांची मैत्री आणखीन घट्ट होत होती. 

एकमेकांच्या सोबतीने आता कॉलेजचे शिक्षण पण पूर्ण झाले होते. 

दोघांनीही इंजिनीरिंगची पदवी मिळवली होती.

त्यांच्या शाखेची संलग्न असलेल्या टेक्नॉलॉजीचे क्लास दोघांनीही जॉइन केले होते. 

या एक्सट्रा ऍक्टिव्हिटी मुळे त्यांना जॉब मिळविणे सोपे जाणार होते.

दोघांच्याही घरच्यांनी आता त्यांच्यासाठी वरसंशोधनाला सुरूवात केली होती.

त्यादरम्यान आकांक्षासाठी निखिलचे स्थळ सांगून आले. 

निखिल मुंबईला राहणारा ,

चांगल्या पदावर नोकरीला, 

समजदार आणि गुणी मुलगा , 

त्यामुळे घरातील सगळ्यांनाच त्याचे स्थळ आवडले होते. 

कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. 

निखिलने आकांक्षासाठी आपला होकार कळवला. 

आकांक्षाचे लग्न ठरले. 

आकांक्षा आपल्याला सोडून जाणार म्हणुन आस्था नाराज झाली. 

आकांक्षाला देखील आस्थाला सोडून जायचे दुःख होते, 

पण आपण एकच शहरात तरी यायला हवे अशी प्रार्थना कर , 

म्हणुन आकांक्षाने आस्थाची समजूत घातली.

आकांक्षा आणि निखिलचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. 

निखिलचे अनेक मित्र लग्नासाठी उपस्थित होते.

त्यातच एक होता विशाल. 

विशालला आस्था पाहताक्षणीच खूप मनापासून आवडली.

लग्न करेल तर आस्थासोबतच असे त्याने ठरवून टाकले.

लग्नानंतर आकांक्षा आणि निखिल मुंबईला सेटल झाले. 

नवीन लग्नानंतर आकांक्षा आणि निखिल दोघेही एकमेकांना वेळ देत होते ,

एकमेकांना समजून घेत होते. 

सगळे काही खूपच छान चालू होते.

त्याचदरम्यान विशाल निखिलला भेटायला आला. 

त्याने त्याला आकांक्षाची मैत्रीण आस्था आवडल्याचे सांगितले.

निखिल आणि आकांक्षाला तर हे ऐकून खूप आनंद झाला.

आस्था मुंबईला येणार.

निखिलच्या मित्राचीच बायको होणार म्हणूनच आकांक्षा खूप जास्त आनंदी होती.

निखिल-आकांक्षाच्या मदतीने विशालने आस्थाला मागणी घातली. 

आस्थाच्या घरच्यांनी होकार कळवला. 

एकच शहरात अगदी जवळ आकांक्षा आणि आपण राहू या विचारानेच आस्था खूप खुश झाली.  

आस्थाचे लग्न विशाल सोबत पार पडले.

चहूकडे आनंदी आनंद होता . 

आस्था आणि आकांक्षा देखील खूप खुश होत्या.

सगळे काही आलबेल असलं तरीही निखिल आणि विशाल दोघांच्याही घरच्यांच्या विचारात खूप जास्त तफावत होती.

आकांक्षाच्या सासरची मंडळी खूप जास्त मोकळ्या आणि प्रगल्भ विचारांची होती.

त्याउलट आस्थाच्या सासरच्या कुटुंबावर शहरांत राहून देखील जुनाट विचारांचा पगडा होता.

परिवर्तन हे आवश्यक असते ही गोष्ट त्यांना मान्यच नव्हती.

या सगळ्या गोष्टीमुळे आस्थाला त्रास होणार हे मात्र नक्की होतं. 

नवीन लग्न झालं त्यावेळेस आकांक्षाला पाळी आली.

सासूबाईंना घाबरून ती वेगळी बसली.

आकांक्षाला घाबरलेले पाहून तिच्या सासूबाई म्हणाल्या..

" बाळ आकांक्षा , घाबरून जाऊ नकोस.

वेगळे बसण्याची गरज नाही.

आराम कर.

तुझ्याकडून शक्य असेल तितकेच काम कर.

अगं यात घाबरण्यासारखे किंवा वाईट वाटण्यासारखे काहीच नाही.

आई होण्याची शक्ती देते ही पाळी आपल्याला..

तिचा विटाळ मानू नये. " 

सासूबाईंच्या या प्रेमळ समजुतीमुळे आकांक्षाच्या मनावरचे दडपण कमी झाले.

आस्थाच्या सासरी मात्र याउलट होतं.

आस्था सासरी गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तिला पाळी आली.

त्यावेळी तिला तिच्या घरातील नियमांची कल्पना नव्हती.

ती तिच्या रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये गेली.

तेव्हा तिच्या सासूबाईंनी अख्खे घर डोक्यावर घेतले.

" आस्था , अगं मासिकपाळी सुरु आहे ना तुझी ..

मग घरभर काय फिरतेस..?

सगळं घर अपवित्र केलंस तु...

गोमूत्र टाकून स्वच्छ करावं लागेल.

एका जागी बसायचं या दिवसात.

इतकी साधी गोष्ट माहित नाही तूला ..? " 

सासूबाईंचे बोलणं ऐकून आस्थाला खूप वाईट वाटले.

मासिकपाळी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

त्यामुळे तिला अपवित्र मानू नये. 

असं आस्थाच्या आईने तिला लहानपणापासूनच शिकवलं होतं.

पण सासरी मात्र त्या उलट सगळ्या गोष्टी होत्या.

मासिकपाळीत वेगळं बसणं. 

सकाळी अंघोळ केल्याशिवाय कुठल्याच वस्तूला हात न लावणे.

असे अनेक नियम त्यांच्या घरात होते.

ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना आस्थाची खूप ओढाताण होत होती.

यातच आकांक्षा आणि आस्था दोघांचेही जॉब सर्चिंग सुरु होते.

खूप प्रयत्नांती दोघांनाही जॉब मिळाला.

आकांक्षाच्या सासरी सगळेच सपोर्टिव्ह असल्यामुळे तिला जॉब आणि घर सांभाळणं सोपं जात होतं.

आस्थासाठी मात्र सगळे मॅनेज करणं खूप कठीण होतं.

अंघोळ केल्याशिवाय कुठल्याच वस्तूला हात लावण्याची सुद्धा परवानगी आस्थाला नव्हती.

हे सगळं मॅनेज करताना आस्था आणि विशालचेही वाद होत असत.

आस्था मनाने खूप दुखावली गेली होती.

एक दिवस आस्था ऑफिस सुटल्यावर आकांक्षाला भेटायला गेली.

तिने आतापर्यंत घडलेला सगळा घटनाक्रम आणि आईंच्या बंधनाबाबतीत आकांक्षाला सांगितले.

तिची सगळी व्यथा सांगून आस्था रडू लागली.

आकांक्षाला देखील तिची अवस्था पाहून वाईट वाटले.

" तु टेन्शन घेऊ नकोस आस्था ..

आपण यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढू..

फक्त थोडे दिवस तु जरा धीराने घे.

वाद वाढले की घरातली शांती भंग होते.

तसे होता कामा नये. " 

आकांक्षा आस्थाला धीर देत म्हणाली.

काही दिवसांनी आस्थाच्या सासूबाईंनी घरी पुजा ठेवायची असं ठरवलं.

त्यांनी त्याबद्दल आस्थाला सांगितले.

" आई , पूजेच्या दिवशी माझी एक महत्वाची मिटिंग आहे. 

क्लायंट येणार आहे. 

त्यामुळे आपण पुजा दोन दिवस उशिरा ठेवली तर नाही जमणार का ..? " 

आस्था घाबरतच तिच्या सासूबाईंना म्हणाली.

" देवाच्या कामापेक्षा तुझे क्लायंट महत्वाचे नाही.

मला तु त्या दिवशी घरी असायला हवी.

बाकी मला काहीच माहिती नाही. " 

इतके बोलून सासूबाई रागात निघून गेल्या.

पूजेच्या दिवशी सुट्टी मिळावी म्हणूनच आस्था रात्रंदिवस मेहनत करून काम करू लागली.

तिने दोन दिवस आधीच सगळा डेटा पूर्ण करून त्याची फाईल तिच्या एका कलीगला दिली.

आस्थाच्या जागी ती मीटिंग अटेंड करणार होती.

या सगळ्यात आस्थाची खूप धावपळ झाली. 

तिला खूप जास्त थकवा आला.

त्यामुळे नेमकी पूजेच्या दिवशी सकाळीच आस्थाची पाळी आली.

झालं ...

तिच्या सासूबाईंना महाभारत घडविण्यासाठी कारण मिळालं.

आस्था आणि विशालच्या जागेवर विशालचे बहीण आणि जिजाजी पूजेला बसले.

पुजा शांतपणे पूर्ण झाली.

उत्तरपुजा करून गुरुजी निघून गेले.

आस्थाला मदत करण्यासाठी आकांक्षा देखील तिथे आली.

तेव्हा मात्र आस्था एका रूम मध्ये दूर बसलेली होती.

तिच्या सासूबाईंवर एकटीवर जबाबदारी येऊन पडल्यामुळे त्यांची मात्र खूप चिडचिड सुरु होती.

" आस्था , तूला ही पुजा निर्विघ्न पार पडूच द्यायची नव्हती. 

म्हणूनच त्यादिवशी दोन दिवसांनी पुजा ठेवा असं सांगत होती.

तु असं बोलली आणि त्याचीच शिक्षा मिळाली तूला.

तुझीच नाट लागली आणि पूजेत विघ्न आले.

तूला काम करायचा कंटाळा होता तर आधी सांगायचं.

मी सगळी व्यवस्था आधीच केली असती.

आता माझे हाल पाहताना मजा येतेय ना तूला ...? " 

आस्थाच्या सासूबाईंचा तोंडाचा पट्टा सतत सुरूच होता.

आस्थाला अश्रू अनावर झाले होते.

झालेला सगळा प्रकार विशाल , त्याचे बाबा , त्याचे ताई आणि जिजाजी पाहत होते.

पण आस्थाच्या बाजूने कोणीच काही बोलायला तयार नव्हते.

घडलेला सगळा प्रकार पाहून आकांक्षाचा संताप अनावर झाला.

ती चिडून बोलू लागली.

" पूजेत विघ्न आस्था मुळे नाही तर तुमच्यामुळे आलेय काकू ...

तुम्हीच तिचे ऐकून दोन दिवस पुजा उशिरा ठेवली असती..

तर दिवस रात्र जागून आस्थाला काम करावे लागले नसते.

अती शारीरिक श्रम आणि मानसिक दबाव म्हणूनच तिची पाळी ठरलेल्या दिवसाच्या आधी आली.

आणि तुम्ही तिलाच दोषी ठरवता आहात.

जिचे स्वतःचे नावच आस्था आहे. 

तिच्याच श्रद्धेवर शंका घेत आहात तुम्ही " 

" हे काय बोलतेस आकांक्षा तु...? 

तुम्ही आजकालच्या मुली मॉडर्न झाल्या म्हणून काय झालं ..?

सोवळे ओवळे पाळणे आपले काम आहे.

तुमचं काय म्हणणं आहे? 

देवाचे पूजन देखील करू नये. 

की देवाचे अस्तित्व मानणे सोडून द्यावे.

त्या प्रथा पूर्वीपासून चालत आल्या आहेत त्या मानायलाच पाहिजे ना.. " 

आस्थाच्या सासूबाई चिडून म्हणाल्या.

" देवाचे अस्तित्व जरूर मानावे काकू ..

कारण तिच एक शक्ती आहे. 

जी आपल्याला सगळ्या संकटातून सोडवू शकते.

पण विटाळ , मासिक पाळीत चार दिवस दूर बसणे. 

हे सगळेच नियम देवाने बनवलेच नाही.

हे नियम आपणच बनवले आहेत आपल्या सोयी प्रमाणे. 

पूर्वीच्या काळी स्त्रियांना खूप जास्त शारीरिक श्रम करावे लागत.

सॅनिटरी नॅपकिन , मेन्स्ट्रुअल कप सारख्या गोष्टी पूर्वीच्या काळी उपलब्ध नव्हत्या.

मासिकपाळीत होणाऱ्या रक्तस्रावामुळे स्त्रीला खूप थकवा असतो.

तो निघून जावा म्हणूनच तिला चार दिवस वेगळं बसवत असतं. " 

"आपण सगळ्यांनी मात्र त्याच्या वेगळाच गैरअर्थ करून घेतलाय.

स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक आरामासाठी वेगळे बसणं हा नियम आहे. 

हे तुम्हालाही माहिती आहे काकु...

मग या दिवसात आस्थाला मानसिक आणि शारीरिक आधाराची गरज आहे हे का समजुन घेत नाहीये तुम्ही काकू ...? 

मानसिक आधार देण्यापेक्षा तुमच्या अश्या वागण्याने तिचा मानसिक छळ होतोय. " 

" महाभारतात जेव्हा द्युताच्या खेळात दुःशासनाने द्रौपदीला भरसभेत खेचून आणले.

तेव्हा ती देखील रजस्वला अवस्थेत होती.

त्याअवस्थेत जेव्हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या धावा केल्या.

त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीस धावून आले.

मासिकपाळी आलेली व्यक्ती अपवित्र असते असं आपण मानतो. 

तश्या व्यक्तीने देवदर्शन करू नये असं आपण मानतो.

तर मग रजस्वला अवस्थेत भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीसाठी कसे धावून आले काकू ...? 

सांगा ना....? 

प्रत्यक्ष देवानेही हा फरक केला नाही तर हा फरक करणारे आपण कोण आहोत ..? 

आपण तर खूप सामान्य माणसं आहोत." 

" काकू आपल्याला चुकून कधी काही लागते. 

त्या जखमेतूनही रक्त येते.

मग जखमेतून येणारे रक्त आणि पाळीचे रक्त दोघांचाही रंग एकच असतो. 

मग आपला दृष्टिकोन मात्र वेगळा का ..? " 

आकांक्षाच्या या प्रश्नावर घरातील सगळे निरुत्तर होते.

आस्थाच्या सासूबाईंना देखील त्यांची चूक उमगली होती.

काहीही न बोलता त्या फक्त मान खाली घालून उभ्या होत्या.

त्यांच्या डोळ्यातून वाहणारे पश्चातापाचे अश्रू वाहत होते.

हेच अश्रू आस्थाच्या कुटुंबीयांनी बदल स्वीकारला आहे हेच दाखवून देत होते.

हेच अश्रू म्हणजे आकांक्षाने आस्थाच्या सुखासाठी घडवून आणलेल्या परिवर्तनाची नांदी होती. 

समाप्त!

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google & Instagram 

✍©️ जया पाटील

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box