खबरदार माझ्या सूनेला वांझ म्हणाल तर..!!
©️ जया पाटील
" अनुजा , अगं लग्नाला दहा वर्ष झाली.
पण अजूनही पोटी मुलबाळ नाही.
किती परीक्षा घेतोय ग बाई देव तुझी... !
मुलांशिवाय स्त्रीला पूर्णत्व येतच नाही.
कुणालला पण किती वाईट वाटत असेल.
सुमतीताई आणि शरदराव पण नातू किंवा नातीचे तोंड पाहण्यासाठी तरसले असतील.
पण इतकी वर्ष झाली अजून पण तुझ्या पदरात हे सुख आले नाही.
किती वाईट वाटत असेल ग अनुजा ..
त्यातल्या त्यात अश्या प्रसंगी तर तूला खूपच त्रास होत असेल.
जेव्हा तुझ्यासमोर तुझ्या पेक्षा लहान वयाच्या मुलींचे ओटीभरण समारंभ होतात.
खडतर परीक्षा आहे तुझी अनुजा ...
इतकाचांगला नवरा , कुटुंब, पैसाअडका , स्वताःचे घर...
कशाची म्हणून कमतरता नाही.
पण पोटी मुलबाळ तेवढं नाही. "
शैलजा काकू रुचिकाच्या ओटीभरणाच्या कार्यक्रमात अनुजाला सांगत होत्या.
अनुजाच्या दुखऱ्या नसीचा धागा सापडवून त्या तिला आणखीनच दुःखावत होत्या.
सुमतीताई म्हणजे अनुजाच्या सासूबाईंना शैलजाताईंचा खूप राग येत होता.
पण उगाचच आनंदाच्या समारंभात तमाशे नको म्हणूनच सुमती ताई गप्प बसल्या होत्या.
शैलजाताई म्हणजे अनुजाच्या चुलत सासूबाई.
नेहमीच अनुजाला दुखवण्याची एक संधी देखील त्या सोडत नसत.
अनुजा मात्र नेहमीच त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे.
रुचिका म्हणजे अनुजाची चुलतनणंद.
अनुजापेक्षा आठ वर्षांनी लहान.
तिचे लग्न होऊन एकच वर्ष झालं होते.
तेवढ्यात तिने गोड बातमी दिली.
अनुजा रुचिकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंदी होती.
पण आपल्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू मात्र ती इतरांपासून लपवत होती.
अनुजाचे अश्रू मात्र सुमतीताईंपासून लपले नाही.
रुचिकाचा हा सगळा आनंद सोहळा पाहता पाहता अनुजा तिच्या भूतकाळात हरवली.
तिच्यासमोर तिचा भूतकाळ तरळत होता.
ती जुन्या आठवणीत हरवली होती.
भूतकाळात घडलेले सगळे प्रसंग अनुजाला जसेच्या तसे आठवत होते.
कुणाल आणि अनुजा दोघेही कॉलेज पासूनचे मित्र मैत्रिण होते.
परंतु ही मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांनाही समजलं नाही.
दोघांना एकमेकांचा सहवास आवडत होता.
दोघांनाही आयुष्यभराचे साथी होण्याची इच्छा होती.
दोघांच्या घरचेही अनुजा आणि कुणालला जवळून ओळखत होते,
बाकी कोणतीच अडचण नव्हती पण ग्रेजुएशन होऊन सहा महिने झाले तरी ,
कुणालला मात्र नोकरी मिळालेली नव्हती.
कुणाल अजूनही कमावत नाही मग तो अनुजाचा सांभाळ कसा करणार...?
रोजचा उदरनिर्वाह कसा करणार...?
हीच एक अनुजाच्या बाबांची चिंता होती.
त्याचमुळे अनुजाच्या बाबांचा या लग्नाला नकार होता.
कुणालने महिन्याभरात काही तरी पैसे कमवून दाखवावे ,
तर मला विश्वास पटेल की कुणाल अनुजाचा सांभाळ नीट करू शकेल.
अशी अट अनुजाच्या बाबांनी कुणालला घातली.
कुणाल मात्र त्यांचा नकार ऐकून घेऊ शकला नाही.
कुणालने देखील ती अट मान्य केली.
प्रयत्नांची पराकाष्टा करून त्याने छोटी का असेना पण नोकरी मिळवली.
कारण अनुजावर त्याचे जीवापाड प्रेम होते.
शेवटी अनुजा आणि कुणालच्या हट्टापुढे दोघांच्याही घरचे नमले.
अनुजा आणि कुणालचा मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला.
दोघांचाही संसार सुरु झाला.
कुणालचा पगार कमी होता,
पण तरी देखील अनुजा समाधानी होती.
कुणालचे तिच्या सोबत असणेच तिला खुप सुखावत असे.
कुणालचे मात्र या उलट होते .
छोट्या गोष्टीत समाधान मानणे त्याला माहीतच नव्हते.
त्याने आणखीन जास्त पगाराची नोकरी शोधायला सुरु केली .
त्यासाठी त्याने भरपूर मेहनत देखील केली.
कुणालच्या मेहनतीला यश आले.
त्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली.
त्या दरम्यान अनुजा देखील घरातून काही ऑनलाईन कामे करतच होती.
कुणालने एक मोठे घर विकत घेतले.
छानशी कार घेतली.
कुणालची मेहनत फळाला आली होती.
त्यांचा संसार अगदी आनंदाने बहरून गेला.
सगळी भौतिक सुखं कुणाल आणि अनुजाच्या पायाशी लोळण घेत होती.
अनुजा आणि कुणालचा अगदी राजाराणीचा संसार सुरु होता.
एकमेकांसोबत वेळ घालवणे ,
रुसणे आणि एकमेकांना मनवणे ,
अश्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे दोघांचाही संसार बहरत चालला होता.
एक छानसा जोडीदार जो फक्त आपल्यावर प्रेम करेल.
आपल्याला समजून घेईल यापेक्षा जास्त काय हवं असतं एका मुलीला... ?
कुणालच्या याच प्रेमळ वागणुकीमुळे अनुजा खूप खुश होती.
सगळ्या घरात फक्त आनंदी आनंद होता.
कुणाल आणि अनुजाचा संसार पाहून सुमतीताई आणि शरदराव देखील खूप खुश होते.
कुणाल- अनुजाच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होण्यात आली होती.
त्यामुळे शरदराव आणि सुमतीताईंना नातवंडांचे तोंड पाहण्याची घाई लागली होती.
लग्नानंतर काहीकाळ गेल्यानंतर सगळ्याच जोडप्यांना वाटते तसे,
आता आपल्याही जीवनात एका छोट्याश्या पाहुण्याचे आगमन व्हावे असे कुणाल आणि अनुजा दोघांनाही वाटत होते.
परंतु पूर्वसंचित म्हणा किवा त्यांचे दुर्दैव म्हणा.
अनुजाची आई होण्याची इच्छा मात्र काही केल्या पुर्ण होत नव्हती.
याबाबतीत मात्र कुणाल आणि अनुजाच्या पदरी फक्त निराशाच पडत होती.
अनुजा आणि कुणालच्या सगळ्या तपासण्या देखील करण्यात आल्या.
दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल होते.
दोघांपैकी कुणातच दोष नव्हता.
उपवास , डॉक्टर , दवाखाना , नवस काहीच फळाला येत नव्हतं.
अनुजा निराश होत होती.
आई होणं सगळ्याच स्रियांच्या आयुष्यात महत्त्वाचं असतं.
त्याचप्रमाणे ते अनुजाच्या आयुष्यात देखील महत्त्वाचं होतं.
कारण मुल एका स्रीच्या आयुष्याला जगण्याचा खरा अर्थ देते.
अनुजाची ही अवस्था मात्र कुणालला पहावत नव्हती.
तो तिला या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत होता.
सुमतीताई आणि शरदराव देखील अनुजाला धीर देण्याचा प्रयत्न करत असतं.
मुलबाळ होत नाही म्हणून त्यांनी कधीच अनुजाला दुखावलं नाही.
त्यांच्या प्रेमळ आधारामुळेच ती सावरली होती.
दिवसामागून दिवस पुढे सरकत होते.
अनुजा आणि कुणालच्या लग्नाला सात वर्ष झाले.
डॉक्टरांनी त्यांना आय व्ही एफ ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांच्या सल्लानुसार सगळी प्रोसिजर पूर्ण केली.
पण अनुजाच्या बाबतीत मात्र त्या ट्रीटमेंटला यश आले नाही.
अनुजा पूर्णपणे खचली.
तिने आता पुढे कुठलेच उपचार घ्यायला नकार दिला.
हे सगळे होऊन सहा महिने होत नाही तोवर शरदरावांना अर्धांगवायूचा झटका आला.
आपली सगळी दुःख विसरून अनुजा शरदरावांची सेवा करण्यात मग्न झाली.
आपल्या दुःखाचा लवलेश ही तिच्या चेहऱ्यावर दिसू देत नसे.
शरदराव आणि सुमतीताईंची अनुजा अगदी पोटच्या लेकीप्रमाणे काळजी घेत होती.
अनुजाच्या पोटी मुल असावे ही शरदराव आणि सुमतीताईंची पण इच्छा होती.
पण नशिबापुढे कोणाचेच चालत नसते.
कोणी कितीही टोमणे मारले तरीही शरदराव आणि सुमतीताईंचा मात्र अनुजाला भक्कम पाठिंबा होता.
तो पाठिंबाच अनुजाचा मोठा आधार होता.
अनुजाच्या विचारांची तंद्री भंगली.
रुचिकाचं ओटीभरण सुरु झालं होतं.
पहिली मानाची ओटी रुचिकाच्या जावेने भरली.
आलेल्या सगळ्या पाहुण्यादेखील साडीचोळी देऊन रुचिकाचे कौतुक करू लागल्या.
रुचिकाने अनुजाला हाक मारली.
" अग वहिनी , तु पण भर की माझी ओटी.
केव्हापासून शोधतेय तूला.
पण तु मात्र गायबच आहेस."
अनुजाने मानेनेच होकार दिला.
ओटीचे सामान घेऊन ती पुढे सरसावली.
तितक्याच शैलजा काकू धावतच पुढे आल्या. आणि ओरडल्या ..
" अनुजा , थांब.
काय अपशकुन करायला निघालीस..?
वांझ असूनही नाक वर करून अश्या कार्यक्रमाला आलीस तर आली.
आणि रुचिकाची ओटी भरायला निघालीय.
तुझ्यात मातृत्वच नाही.
आणि होणाऱ्या आईला आईपणाचे दान देणारी तु कोण ..?
बाजूला हो. "
शैलजा काकूंचे बोलणं ऐकून अनुजा ताडकन बाजूला झाली.
तिला अश्रू अनावर झाले.
ती मागे वळून निघणार तितक्याच सुमतीताई आल्या.
"माझ्या लेकीला वांझ म्हणणारी तु कोण ..?
तिच्यात मातृत्व नाही असं बोलायचा अधिकार कोणी दिला तूला...
देरानी आहेस म्हणून फक्त शाब्दिक मार देतेय.
दुसरे कुणी असते तर त्याच्या जोरदार कानशिलात लगावली असती मी शैलजा..."
सुमतीताई चिडून शैलजाताईंना म्हणाल्या.
अनुजा त्यांना अडवत म्हणाली ..
" जाऊ द्या आई ...
माझ्यासाठी तुम्ही वाईटाचा वाटा नका घेऊ.
शैलजा काकू बरोबर म्हणाल्या..
मी इथे यायलाच नको होतं.
माझ्यासारख्या वांझ स्त्रीची अश्या आनंदाच्या सोहळ्यात येण्याची गरजच नाही. "
" तु गप्प बस अनुजा ...
स्वतःला दोषी ठरवू नको.
तुझ्यात मातृत्व नाही.
असं बोलणारी ही कोण ..?
राहता राहिला प्रश्न आई होण्याचा..
तर आई होणं ही एक सुंदर भावना आहे ,
उर्मी आहे. "
" स्वतः जन्म दिला म्हणजेच आईवडील होता येते असे नाहीये ,
आई होण्यासाठी आपल्याच पोटात मुल वाढवावे असे काही नसते.
सहवासानेही प्रेम , माया निर्माण होतेच कि ...."
अनुजा कुणालच्या बाबांची सेवा ज्या मायेने करते.
तेही मातृत्वच आहे.
मी जेव्हा हतबल , हताश होते ,
तेव्हा मायेने मला समजावते.
तेव्हा मला तिच्यात माझ्या आईची छबी दिसते.
कुणाल जेव्हा थकून भागून ऑफिस मधून घरी येतो.
तेव्हा प्रेमाने त्याची काळजी घेतानाही तिच्यात आईचीच माया असते.
आईपण मागुन आणावे लागत नाही शैलजा ...
ते प्रत्येक स्त्रीमध्ये जन्मताच असते.
त्यामुळे एक स्त्री असूनही एका स्त्रीचे मातृत्व तु नाकारते आहेस ..?
स्वतः दोन मुलांची आई असूनही तु अनुजाचे दुःख समजुन घेऊ शकत नाहीस..?
लाज वाटते मला तुझ्या स्त्रीपणाची ..तुझ्या मातृत्वाची ...! "
सुमतीताईंच्या या बोलण्यावर शैलजाताईं मान खाली घालून उभ्या होत्या.
त्यानंतर सुमतीताई आणि अनुजा घरी निघून गेल्या.
सुमतीताईंनी अनुजाची बाजू समजुन घेऊन तिला धीर दिला.
त्यामुळे अनुजाच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर आणखीनच वाढीस लागला होता.
दोन तीन दिवस गेल्यावर सुमतीताई अनुजाजवळ जाऊन म्हणाल्या..
" मला माहिती आहे अनुजा ...
तु मनातून खूप नाराज आहेस.
पहिली आय व्ही एफ प्रोसेस फेल झाली.
तेव्हा देखील तु खूप नाराज झाली.
पण मला असं वाटतंय की तु पुन्हा एकदा प्रयत्न करावा.
आम्हाला नात-नातू हवा आहे म्हणून नाही सांगत आहे बाळा ...
पण तुझ्यासाठी ...
तुझ्यातल्या मातृत्वासाठी आतुर असलेल्या आईसाठी ..
मी हे सांगते आहे.
आपण पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू.
हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल.
उद्याच कुणाल आणि तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या. "
सुमतीताईंनी घातलेल्या समजूतीमुळे अनुजा पुन्हा एकदा आय-व्ही-एफ प्रोसिजर करण्यासाठी तयार झाली.
डॉक्टरांनी देखील सहमती दर्शवली.
अनुजाच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या.
सगळ्या टेस्ट नॉर्मल होत्या.
डॉक्टरांनी अनुजाला कुठलाही ताण घेऊ नकोस म्हणून सांगितले.
सुमतीताई , शरदराव आणि कुणालने देखील अनुजाला त्रास होणार नाही या गोष्टीची खबरदारी घेतली.
सुमतीताई प्रत्येक क्षणात तिच्या सोबत होत्या.
आईच्या मायेने त्या तिची काळजी घेत होत्या.
सगळ्या प्रोसेस ह्या खूप त्रासदायक असल्यातरी आपल्या बाळासाठी आई ह्या सगळ्या वेदना सहन करत असते.
अनुजाची या वेळेसची आय व्ही एफ सायकल यशस्वी झाली.
नऊ महिने तिला सगळयांनी खूप जपले.
आणि शेवटी तो दिवस उगवला.
अनुजाला बाळंतकळा सुरु झाल्या.
ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती.
अखेरीस तिच्या आयुष्यात तो क्षण आला होता.
त्यासाठीच असंख्य शारीरिक आणि मानसिक वेदनांचा सामना अनुजाने केला होता.
अनुजाची सी-सेक्शन करून डिलिव्हरी करण्यात आली.
अर्धवट शुद्धीत असलेल्या अनुजाला डॉक्टर सांगत होते.
" अनुजा , अभिनंदन ..
मुलगा झाला तुम्हाला...
छोट्या कृष्णाचा जन्म झाला तुमच्या घरी ...
आभाळाएवढा आनंद झाला होता सगळ्यांनाच.
थोड्या वेळाने अनुजा शुद्धीत आली.
त्यावेळी सुमतीताई बाळाला तिच्या हातात देत म्हणाल्या...
" तुझ्यातील मातृत्वाची जिद्दच तुझ्याबाळाला तुझ्यापर्यंत घेऊन आलीय.
घे बाळा ..
त्याला तुझ्या कुशीत घे. "
सुमतीताईंच्या हातातून अनुजाने बाळाला तिच्या हातात घेतले.
छोट्या बाळाला हातात घेताच आयुष्यभराचे समाधान प्राप्त झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता.
तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
बाळाच्या माथ्यावर एक गोड पापा घेऊन ती भरून पावली.
अनुजा हातातील बाळाला पाहून ती मनोमन बाळासोबत बोलु लागली ...
"बाळा , तुझ्या येण्याने माझे आयुष्य जणू इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी रंगाने रंगून गेले आहे.
तु माझ्या उरात असल्यापासुन मला झालेला त्रास आताही आठवतोय मला.
परंतु तुझ्या येण्याच्या चाहुलीमुळे तो त्रास देखील सुखावणारा होता.
तुझ्या येण्याच्या चाहुलीपासुन ते आज तुझ्या जन्मापर्यंतच्या सगळया आठवणी आज डोळ्यांपुढे तरळत आहे.
तु माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गिफ्ट आहेस ..
आणि यात कुणालने म्हणजे तुझ्या बाबाने , तुझ्या आजीआजोबांनी मला साथ दिली नसती तर आज परिस्थिती काही वेगळी असती ...
माझ्यासोबतच त्यांच्या सगळ्यांच्या तपश्चर्येचं फळ आहेस तु बाळा ...!
खूप खूप आनंदी रहा."
मायलेकाचा हा आनंदसोहळा सुमतीताई , शरदराव आणि कुणाल तिघेही आपल्या डोळ्यात साठवून घेत होते.
समाप्त!
कसा वाटला अनुजाच्या मातृत्वाचा हा प्रवास मला कळवायला विसरू नका.
तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - Google/pixel/Instagram
✍©️ जया पाटील

1 Comments
खूपच सुंदर
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box