एक "सखा" असा ही!

एक "सखा" असा ही!

©SunitaChoudhari.



कसंय बघ!

आपण स्वतःच आपल्यासाठीची

सगळी दारं बंद केली ना की;

आपला आक्रोश कोणापर्यंत 

पोहोचतच नाही...

मग समोर असलेलं कोणतंही दार

ठोठावण्याचा आटापीटा आपोआपच

थांबवला जातो ....!

बस् इतकंच् ....

"काय म्हणालीस परत बोल"? 

"कुलटा, कुलक्षणी"...!

अविनाशच्या जोरदार आवाजासरशी गार्गीची तंद्री भंग झाली. समोर अविनाशचा लालबुंद चेहरा होता.  

नेहमीपेक्षा दारू आज त्याला जरा जास्तच चढत; सवयीसरशी तो तिच्या शरीराशी लगट करू लागला.

"आज नको प्लीज"! 

हा असं करतो म्हणूनच लग्नाआधी एकांतात भेटू वाटत नाही….

गार्गी स्वतःवरच चिडली.

"तुझं हे नेहमी असं जवळ येणं नको वाटतं".....मला तुझं प्रेम हवंय रे!.... शरीराची लगट मला किळसवाणी वाटते".

"प्लीज मला समजून घे"!.....

गार्गी त्याला विनवत होती.

अच्छा! .... 

"आता माझं प्रेम तुला शरीराची लगट वाटते काय"? ... 

"अन् हे कोण बोलतंय"?...

अविनाश छद्मी हसत तिच्या दंडाला दाबत शक्य तितक्या तिच्या तोंडाजवळ जात कानाजवळ म्हणाला ;

"एका धंदेवाल्या बाईच्या पोरीच्या तोंडून ही असली वाक्य शोभत नाही ग् डार्लिंग" !...

"नवीन बकरा सापडला ना तुला?

ओsss हो sss ….

अच्छा !म्हणजे तुझं ते प्रमोशन वगैरे होणं हे सगळं ठरवून झालंय तर !....

आता कशाला बरं तुला माझी गरज लागणारे"?... म्हणत तिला जोरदार हिसका देत अविनाश जोरात दरवाजा उघडून निघून गेला.

स्वतः चा तोल सावरून गार्गीने उठत; अविनाशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात दरवाजा लाऊन घेतला.

खरंच हे प्रेम आहे का? असा प्रश्न स्वतः शीच विचारत गार्गी खिडकीपाशी आली. एव्हाना रात्र झाली होती. अन् तिच्या कानात अविनाशचे शब्द शिसासारखे रुतत होते.

"धंदेवालीची पोरगी"! ....

गार्गीच्या डोळ्यांत अश्रूंनी गर्दी केली अन् दुरून कुठूनतरी तिला आवाज येत ती भुतकाळात गेली.

-----------------×××××-----------------

"लैssssलाsssss 

पळ बाळ! लवकर!...

मागे बघू नकोस"....

असं म्हंटलं तरी मागून कोयता घेऊन येणारा तो राठ माणूस तीच्या ह्रदयाची धडधड वाढवत होता.

जीव मुठीत घेऊन पळणारी ती दहा वर्षाची चिमुरडी घाबरली होती पण तरीही "आपल्याला हे असलं जगणं नकोय बाळ"! ……

हे तिच्या आईचे शेवटचे बोल मात्र तिच्या पायांना बळ देत होते अन् ती "त्या" माणसाचा हात पकडून जिवानिशी पळत होती.

"बरंच अंतर पळून आल्यावर त्या माणसाने पुढची सोय केली होती. पहिल्यांदाच चारचाकी गाडीत बसूनही लैला भांबावली होती. गाडीच्या सिटवरपण पाय वरती दुमडून हाताचा विळखा घालून ती अंग चोरून बसली होती अन् तितक्यात त्याने त्याचा हात तीच्या पाठीवर फिरवला…

पाठीवर हात पडताच, त्या मायेसरशी तीला रडू फुटले"!...

पुढे त्यांनी रेल्वे पकडली आणि शिळ घालत आगीनगाडी पुढे सरकू लागली आणि त्या माणसाच्या मिठीत लैला आपल्या अश्रूंचा बांध रीता करू लागली.

तीला कसं समजवावं म्हणत "तो" तीला मायेने थोपटत होता. 

"एका हातात त्याच्या प्रेमाने ह्या जगाचा निरोप घेतला होता तर एका हातात जगण्याची नवीन उमेद त्याला मिळाली होती".

पण हा माणूस कोण?

कोण होता तो? .....

"खरं सांगायचं झालं तर त्याची अशी स्वतंत्र ओळख नव्हतीच. जेमतेम कुटुंबात वाढलेला पण सावत्र आईच्या अन् सतत कामात असलेल्या बापाच्या प्रेमाने वंचित राहिलेला माधव"!   

त्याला चार लोकांसारखं मुळी जगायचंच नव्हतं. समाजातल्या चौकटी त्याला मान्य नव्हत्या अन् म्हणूनच सतत तो भटकतच रहायचा. मनापासून काळजी करणारंही कोणी नव्हतं!...तो ख-या प्रेमासाठी नेहमी आसूसलेलाच असायचा.

नेहमीसारखीच त्या दिवशीही त्याची घरातून भांडणं झाली अन् रागाने तो घरातून निघाला.

कितीतरी वेळ तो चालतच होता.

कुठे जात होता?... काय करत होता? …. याचं भान त्याला नव्हतं अन् अचानक त्याला वेगवेगळ्या गाण्यांचे आवाज ऎकू आले.

"इन आँखों की मस्ती के 

मस्ताने हज़ारों हैं

इन आँखों से वाबस्ता

अफ़साने हज़ारों हैं

इन आँखों की मस्ती के"

"अय् चिकने"! इधर तो आँ ....

दुसरीकडे ....

"यहाँ पे आँ !...कम दाम मे भी है"...

"साहब"!  गजरा दूँ क्या?... 

वो एकदम खुष हो जायेगी !

"चना- मटर ले लो" .....

"पी पी पी करत गाड्यांचे आवाज" ....!

"कर्कश्य गाणी "...!

माधव ने इकडेतिकडे नजर फिरवली.

अर्धवट साडीचा पदर खोचलेल्या, चेहऱ्यावर रंगरंगोटी करून अश्लील इशारे करणाऱ्या त्या बायकांना पाहताच माधवला तो कुठे आलाय हे कळून चुकलं... तो लगेच परत फिरला... झपाझप चालताच त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला.

"क्या हुआँ साहब ! ऎसेही जा रहे हो?

माल नही चाहीये क्या"? ....

माधव कसाबसा ; "नही"! ….म्हणत, चालू लागला पण, त्या माणसाने ....

"ऎसा कैसे चलेगा साहब! ऎसे नही होता यहाँ पे" ...

"चलो आज मै आपको जन्नत की सैर करवाऊंगा म्हणत त्याने माधवला जवळजवळ ओढतच एका जिन्याजवळ आणलं".  

"शब्बॊ ! देख तो "....

त्याच्या या आवाजासरशी

तोंडात पान धरलेली मध्यमवयीन बाई बाहेर आली.

"आज नये साहब को लायाँ हूँ! 

कुछ नयाँ निकाल और इनको खुश करदे" म्हणत, त्याने तिला डोळा मारला अन् तिथून निघून गेला.

जे काही घडत होतं ते अगदी अचानक होत होतं. माधवला काय करावं सुचेपर्यंत तो तिथे आला होता. अन् नंतर

"साहब चलो उपर"!....

या तिच्या आवाजासरशी तो तिच्यामागे यंत्रवत चालू लागला.

बकाल वस्ती!

थुंकून रंगीबेरंगी केलेला जीना ....!

सगळीकडे घाणीचं साम्राज्य! 

अन्  एका दरवाजाजवळ थांबलेली शब्बो!....

"साहब दो मिनिट!... मै आती" म्हणत ती आत गेली अन् त्याला बाहेर आवाज येऊ लागले.

"हराम की औलाद! सारा धंदा खराब कर रैलीये.... सारा दिन इस पिल्ली के पीछे....  रुक! ... इसको भी धंदे पर उतारती!.... सारा वसूली करती मै!... म्हणत, मारल्याचा आवाज आला त्यासारशी एक नऊ-दहा वर्षाची पोर गालाला चोळत बाहेर आली अन् माधवकडे क्रूरपणे पाहत निघून गेली. तिचे डोळे खुप काही सांगत होते".  

शब्बो बाहेर येत ....

"जाओ साहब ! मजा लो" म्हणत, माधवला आत ढकलत तिने दरवाजा लाऊन घेतला.  

"दहा बाय दहा ची कोंदट रूम!...

 भिंतीवरच्या अश्लील तसबिरी!..

अत्तराच्या भपक्या वासाने माधवला पोटात कालवाकालव होऊन मळमळलं. समोर पाहिलं तर छोट्याश्या त्या काॅटवर पाठ उघडी करून ती बसली होती.  

मोठ्या धिटाईने तो तिच्यासमोर गेला अन् क्षणभर तो तिला पाहतच बसला".

"नाकीडोळी सुबक!... गव्हाळ रंग !...., मोठाले डोळे ! अन् त्यावर केलेला काजळाचा मारा…. नाकात छोटीशी चमकी अन् सोडलेले केस…

खुप सुंदर अशी नाही पण आकर्षक नक्कीच होती".

माधवने तीला नीट निरखून पाहिलं तर तिच्या डोळ्यांत आसवं होती. हातात काहीतरी लपवत होती. त्याने तिचा हात हातात घेत पाहिलं तर,तिच्या हातात मळकट बर्फी होती. बहुतेक मघाच्या मुलीला ती ते भरवत असावी.

"आईची माया इतकी असते"?

स्वतःला प्रश्न करत माधवला गलबलून आलं.

"साहेब जरा थांबता का? एवढी बर्फी लपवते मग तुम्हाला काय करायचंय ते करा….म्हणत, तीने बाजूला पडलेल्या पेपरात बर्फी ठेवत कोपऱ्यात तो पेपर कोंबला".

उठून साडी बाजूला करत ती माधवजवळ बसली. 

पण तिचा पदर निट करत माधवने तिचा हात हातात घेतला. काहीतरी बोलावं म्हणून तो बोलता झाला.

"कुठली आहेस, नाव काय तुझं ?...

आणि इथे कशी आलीस"?

माधवच्या प्रश्नासरशी ती रडू लागली. 

"लहान होते साहेब ! एकाने पळवून आणलं".  

"खुप वरीस झाले पण आता कोन मला भाव देईना. पदरात पोरगी आली अन् आता तिच्यावर डोळा ठेऊन हायेत समदे"! ती हुंदका देत होती. 

काय करावं माधवला समजेना!.. तीला मिठीत घेत हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकत त्याने तीला शांत केलं. 

त्यांचं बोलणं चालूच होतं अन् दरवाजावर थाप पडली. 

"ओ साहब ?"! टाईम खल्लास होयलाय"....

माधवने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला अन् मागे न बघता दरवाजा उघडून शब्बोला पैसे देत तो निघून गेला.

परत इथे पाऊल ठेवायचं नाही म्हणत, बकाल वस्तीतून माधवची पावलं झपाझप जात होती. जितक्या वेगाने तो दूर जात होता तितक्याच वेगाने "तीचे" काजळाने भरलेले टपोरे डोळे त्याचा पिछा करत होते.

एव्हाना खुप रात्र झाली होती. झोपण्यासाठी तो बेडवर आडवा झाला. पण त्याच्या बंद डोळ्याआडही "ती" होतीच.

दुस-या दिवशी सकाळीच तयार होत माधव बाहेर पडला. काही कामं करून खिशात त्याने पैसे खेळते ठेवले. 

का?.... कशासाठीचं … उत्तर त्याच्याकडेही नव्हतंच ....

संध्याकाळ झाली आणि त्याची पावलं नकळत त्या बकाल वस्तीत फिरली. 

"अरे साहब!... आज फिर से?....

चलो आज कुछ दुसरा देती आपको"!...

शब्बो खुष होती.

"नही … नही! कलवालीही चाहीये" म्हणत, माधव जिन्यातून वरती जाऊ लागला. 

"क्या बात है साहब!  बहोत खुष कर रैली लगती वो !....म्हणत, डोळा मारून ती हसू लागली".

आजही तीची छकूली होतीच; जाताना परत तिने माधवकडे तुच्छतेनं पाहिलं. माधव तिच्या बघण्याने खजील झाला.

तो आत जात कडी लाऊन घेत तिच्याजवळ आला.

"साहेब आज परत आलात ?

काल काही दिलंच नाही ना मी तुम्हाला?

इथे आल्यापासून काल पहिल्यांदा कोणीतरी मला, माणूस म्हणून वागवलं"! म्हणत "ती" भावनीक झाली. 

"अग्!  काल तू मला तुझं नावच सांगितलं नाहीस म्हणून मी परत आलो". वातावरण हलकं करण्यासाठी माधव बोल्ला.

'इथलं नाव "नूर" आहे साहेब'!

"नाही ग्!  तुझं खरं नाव सांग "...

"मीरा"!

"अहाहा!  कीती सुंदर नाव आहे ग् तुझं!....

अगदी तुझ्यासारखंच"! म्हणत, त्याने तीला मिठीत घेतलं.  

त्यासरशी ती ओरडली ....

"आह् !  सकाळच्या साहेबांने खुप छळलं"! म्हणत, ती रडू लागली.

माधव! सुन्नपणे पहात होता. 

"तिच्या शरीराच्या जखमा त्याला खोलवर रुतायच्या म्हणूनच की काय तो त्रास त्याने तीला कधीच दिला नाही". 

"इतरांची शाररीक भुक इथे शमायची पण त्याची मात्र मानसिक भुक इथे तृप्त व्हायची".

हळूहळू मीरा बोलती झाली. माधव आता नेहमीच येऊ लागला होता. दोघं खुप गप्पा मारायचे. 

गप्पा रंगात यायच्या अन् दरवाजावर थाप पडायची.

हातातला हात सोडवेना व्हायचा अन् माधव तडक मागे न बघता निघून जायचा. 

जाताना त्या चिमुरडीचे डोळे त्याला घायाळ करायचे. 

चिमुरडी आता मोठी होणार होती पण तिचं भविष्य काय असणार होतं?.....

अन् एक दिवस मात्र!

"आज नही साहब! ...नूर आज धंदा नही करेगी आप दुसरीको देखो"! 

माधवचं नेहमी येणं आणि मीरा कडेच जाणं शब्बोला आता खटकत होतं. 

अरे लेकीन ?....

"नही साहब!  दुसरी देखो नही तो आज जाओ आप" !.... शब्बॊने माधवला बाहेरचा रस्ता दाखवला.

माधव आणि मीरा चं नातं आता बहरत गेलं होतं.  

"शरीरापलीकडेही एक निरपेक्ष प्रेम असतं हे दोघांनाही समजलं होतं". 

माधवला कोणीतरी मायेचं माणूस भेटलं होतं अन् मीरा ला शरीराव्यतीरीक्त प्रेम करणारी व्यक्ती! ....

दोघांच्या मनात चलबिचल झाली होती. भावनांचा हळूहळू उद्रेक होत होता.

पण आता करायचं काय हा प्रश्न दोघांच्या समोर आsss वासून उभा होता.

मधे थोडे दिवस जाऊन माधव परत तिकडे गेला पण यावेळेस तो पूर्ण तयारीनिशी होता.

शब्बोने परत नकार दिला पण जास्तीचे पैसे देत, विनवणी करत माधवने तिचा होकार मिळवला.

दरवाजा लोटताच तिची चिमुरडी म्हणजेच लैला तिला बिलगून होती. 

"काय झालं मीरा"!  

शरीरावर असंख्य जखमांनी ती विव्हळत होती.

"साहेब! आता मी ह्यांच्या कामाची नाही म्हणून अशी मारहाण होतेय.आता तुम्ही इथे नका येत जाऊ. मी तुम्हाला हवं असलं तरी कोणतही शाररीक सुख देऊ शकत नाही. म्हणत, मीरा रडत होती."

"मीरा!  हेच ओळखलंस मला?

अग् प्रेम करतो मी तुझ्यावर !

तुझ्या शरीरावर नव्हे...

चल, तुला दवाखान्यात नेतो".

नको साहेब! …. 

आता हे लोक मला जगू देणार नाहीतच आणि मी मेल्याशिवाय इथून माझी सुटकाही होणार नाही. मीराला एव्हाना दम लागला होता. शरीर आता साथ देत नव्हतं. श्वासांना धाप लागत त्यांना मंदगती आली होती पण तरीही मीरा "लैला" कडे बघत रडतच होती. ....

आज लैलाला कोणी बाहेर काढलं नव्हतं कदाचित मीराच्या अशा परिस्थितीत ती काही करणार नाही याची सगळ्यांना खात्री होती.

तू काळजी करू नकोस मी बघतो सगळं!....

आज माधवने रग्गड पैसे दिले होते अन् राहिलेला माल विकला जातोय म्हणत शब्बॊनेही त्याला ते दिलं होतं. 

आज रात्री तो तीथे जास्त वेळ राहणार होता.

अंधार पडू लागला अन् माधवने खिडकीत येऊन कोणालातरी कसलासा इशारा केला.

"मीराला त्याने घट्ट मिठीत घेतलं! तिचे श्वास मंदावतच होते. रात्रीच्या शांततेत अचानक त्या जिन्यातून काही लोक आले. 

आरडाओरड झाली.

धावाssss  पळाssss

कौन कमीना आया रे ass

अय कम्म्या, सलीमsss

मारो इन ×××चोद को…

सगळीकडे एकच गलका उडाला होता.

अन् माधवला आता मीराची ती मिठी सोडवणंही भाग होतं. 

मीराने लैला कडे पाहिलं आणि म्हणाली …

"ह्यांच्यासोबत जा ....

आपल्याला हे असं जगणं नकोय!

खुप मोठी हो" म्हणत, तिने तिचा हात माधवच्या हाती दिला आणि तीच्या डोळ्यांसमोर अंधारी येत ती झोपली…. कायमची! ....

माधवने लैलाचा हात घट्ट पकडला.

त्या वस्तीतून निसटणं सोपं नव्हतं पण माधवने तशाच काही लोकांना पैसे देत काम करवून घेतलं होतं.

दोघं पळू लागले अन् एकजण कोयता घेत मागे धावून आला होता. दोघं निसटले होते पण, सगळाच थरार होता.        

         *** ----------------***

चाय लेलो चायsssss!....

रेल्वेतल्या त्या आवाजाने माधव भानावर आला.

लैला अजूनही त्याच्या मिठीत झोपली होती. आधीचे तिचे त्रास देणारे डोळे आता त्याला त्रास देत नव्हते.

काय करायचं आता हे त्याने पक्कं ठरवलं होतं.  

पुढे जात काही वर्षांनी लैलाचं नाव बदलून माधवने "गार्गी" ठेवलं आणि तिचा बाप अन् आई बनून तिचं सगळं पालनपोषण त्याने केलं.

कधीकाळी केलेल्या एका ख-या प्रेमासाठी तो अक्षरशः जगला होता.

मीराच्या आठवणीत माधवने लवकरच ह्या जगाचा निरोप घेतला पण गार्गीला योग्य मार्ग दाखवत तिला तीची दिशा दाखवून स्वत:ची कर्तव्यं पार पाडून गेला.

----------------×××××-----------------

पीपीप sssss

मोबाईलच्या रिंगने गार्गीची तंद्री भंग होत लहानपणीच्या भूतकाळातून ती बाहेर आली.

तिने पाहिलं तर अविनाशचा मेसेज होता.

"Sorry darling"….!

"तुला माहिते ना, पिल्यानंतर मला काही सुचत नाही, मी वेडेपणा करतो. 

रागवू नकोस आपण सकाळी आॅफीसच्या कँटीनला भेटू"!....

"Love you"!....

गार्गी त्याच्या मेसेजवर छद्मीपणे हसली.

एव्हाना पहाट झाली होती अन् तिला तिचा मार्ग सापडला होता.

सकाळी तयार होत ती अविनाशला भेटायला गेली.

"My darling"! म्हणत अविनाशने तिला मिठी मारली. त्याची मिठी सोडवत त्या दिवशी त्याने दिलेली अंगठी त्याच्या हातावर ठेवत म्हणाली;

"It's over Avinash"....

"काय झालं डार्लिंग"?  म्हणत अविनाश तीला मनवण्याचा प्रयत्न करत होता.

'मी धंदेवालीचीच पोरगी आहे पण तिच्यावरही मनापासून प्रेम करणारा "सखा" तीला मिळाला होता. माझा भुतकाळ बदलता येणार नाही पण माझ्या आईच्या त्या "सख्याने" माझ्या "बाबाने"!.... माझं भविष्य बदललं!...

धंदेवाल्या बाईच्या प्रेमापोटी त्याने सर्वस्व पणाला लावत तो तिच्यासाठी झुरला !!.

"जोडीदार ! फक्त आपल्या शरीरावर नव्हे तर आपल्या मनावर प्रेम करणारा हवा. जो आपल्या शांततेतला आवाज ऐकतो, समजू शकतो अन् आदर करतो असा "सखा" हवा'!...

"प्रेम म्हणजे संपूर्ण समर्पण!.... 

न सांगता एखाद्याला समजून घेणं!....

त्याला तो आहे तसं स्वीकारणं!....

म्हणूनच तर माझा बाबा मीराचा कृष्ण बनून तिला तिथून मोक्ष द्यायला आला होता".

ह्या सगळ्या गोष्टी तुला कधीच समजणार नाही. मला माझ्या बाबासारखा एक सखा हवाय आणि तो तु नक्कीच होऊ शकत नाहीस म्हणत इतका वेळ बोलणारी गार्गी अविनाशचं काही न ऎकता त्याच्याकडे हसरा कटाक्ष देत मागे न पाहता निघून गेली तिच्या "सखा" च्या शोधात!...

समाप्त!

©SunitaChoudhari.

आम्हाला मनापासून भावलेल्या एका सुंदर कथेची मेजवानी ..खास वेलवेट कविशाच्या वाचकांसाठी.....!

कथा सत्यघटनेशी प्रेरित असून गरजेनुसार काल्पनिकतेची जोड दिली आहे. तरीही कथेमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास त्याबद्दल क्षमस्व …!

कथेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत सर्वस्वी लेखकांचे आहेत.

सदर कथा लेखिका सुनीता चौधरी यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही. आम्ही साहित्यचोरीचा निषेध करतो.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Velvet Kavisha

फोटो गुगलवरुन साभार.

Post a Comment

1 Comments

Please do not enter any spam link in the comment box