तो आणि त्याची ती



तो आणि त्याची ती

© Velvet Kavisha ✍️

प्रणालीचा फोन खुप वेळ झाला तरी वाजतच होता. प्रवीणचा फोन होता. "आताच निघाले. पोचते पंधरा वीस मिनिटात." म्हणत तिने फोन कट केला.  त्याला ठरलेल्या वेळी हजर लागते ती समोर. आज जरा घरून निघायला पाच मिनिटे उशीरच झालाय. तेवढा चालवून घेऊ. फोन पर्समध्ये टाकून पर्स गाडीच्या डिकीत ठेवून तिने गाडीला किक मारली. 


खरंतर हे थंडीचे दिवस. घरातून निघताना चांगलं ऊन पडलं होतं. आणि कुठं कमी दाबाचा पट्टा तयार झालाय काय माहिती. पंधरा मिनिटांच्या प्रवासात काळे ढग भरून आले आणि पाऊस सुरू झाला देखील. पाच मिनिटांत पटकन पोहोचू म्हणून स्कुटी कुठेच न थांबवता रिमझिम पावसात निघाली होती. चौकात ट्रॅफिक लागलं आणि पावसाचा जोर ही वाढला होता. भिजलीच तशी ती पुर्ण. पावसाने अंगाला चिपकलेले कपडे शरीराचे सगळे उभार नजरेत येतील असे दाखवून देत होते. "सनकोट, रेनकोट काही तरी घ्यायला हवा होता सोबत.. पण विसरले. काय करु..??" म्हणत तिने सिग्नल लागला तशी ओढणी अंगभर लपेटून घेतली.

" हेल्मेट घालायची सवय करून घ्यायला हवी म्हणजे अशा मनमानी पावसात डोकं तरी वाचेल. लांबसडक केसांची हौस महागात पडतेय वाटतं आता. डोकं भिजून गेलंय पार. " ती मनाशीच विचार करत ट्रॅफिकमधून वाट काढत होती. 


वायब्रेटवर टाकलेला फोन पुन्हा गुरगुरला. "याला काय झालंय आज. नेहमी मी कुठेही वेळेवर पोचते. आज उशीर झाला तर समजून नको का घ्यायला.!! या पुरुषांना तसंही बाईचं मरण काय असतं कुठे कळणार आहे म्हणा..!! 

एकतर पत्ता असा दिलाय.  या एरियात कधी गेले ही नाहीय. शोधत जावं लागणार आहे. पाच मिनिटे उशिराने निघाले पण आता अर्धा तास उशीर झालाय."  प्रणाली मनाशीच पुटपुटत होती.


"आनंद" बिल्डिंगच्या गेटमधून आत येत गाडी लावली. पाच मजल्यांची बिल्डिंग. लिफ्टसमोर उभी राहिली. लिफ्ट आली तशी आत जात तिने पाच अंक दाबला. लिफ्ट पाचव्या मजल्यावर थांबली. बाहेर येत तिने इकडे तिकडे पाहिलं. कोनातला फ्लॅट नंबर ५०६. बेल वाजवली. 

"दरवाजा उघडाच आहे ये आत..!!"  आवाज ओळखीचा वाटला.   भिजलेली ओढणी झटकून पुन्हा एका खांद्यावर घेतली. दरवाजा ढकलून ती हळूच डोकावत आत आली. 

तेवढ्यात तिच्या दंडाला पकडत कोणीतरी तिला जोरात ओढलं होतं. मागे दरवाजाची कडी लावल्याचा आवाज आला. केस बाजूला करत तिच्या ओल्या मानेवर गरम ओठांचा स्पर्श झाला. भन्नाट धडधडलं छातीत. गात्रं आकुंचन पावत सरकन शरीरावर काटेरी शहारा आला. 

"प्रवीण, काय हे. एवढ्या लांबून आलेय. भिजलेय बघ किती. मला आत येऊ तर दे की.." तिने कसंबसं म्हटलं. 


"किती वेळ झाला गं वाट पाहतोय. जरा लवकर यायचं ना.." त्याने तिची ओढणी आणि पर्स बाजूला ठेवत तिला गच्च मिठीत घेत म्हटलं. 

"हं.." तिने मान त्याच्या खांद्यावर मागे टाकत गालावर ओठ टेकवून प्रतिसाद दिला. ओल्या थंडीने कुडकुडणाऱ्या शरीराला त्याच्या शरीराची ऊब सुखावत होती. तो पण वेड्यासारखा तिच्या उघड्या अंगावर ओठ टेकवत होता.  

"किती दिवसाने भेटतेस, ती ही अशी मस्त ओली.. " त्याने केसांचा क्लिप काढत तिचे केस मोकळे केले. 


"काय वेडेपणा आहे हा?? आणि हे घर कोणाचं आहे??" तिने मागे वळून त्याच्याकडे पाहत विचारलं. 

"तू आता प्रश्न नको विचारुस ना... सगळा मूड घालवशील..!!" तो थोडासा वैतागून बोलला.

ती काहीच न बोलता गप्प राहिली. 

"राणी तू अशी मिठीत ये ना.. बघ कशी छान तयारी केलीय तुझ्या स्वागताची. " म्हणत त्याने बेडकडे बोट दाखवलं. तिने पडदा सरकवून बेडकडे पाहिलं. गुलाबाच्या पाकळ्या पसरलेला बेड. मधोमध तिला आवडणाऱ्या डेअरी मिल्क कॅडबरीज लावून बनवलेलं निळं फुलं आणि त्या प्रत्येक कॅडबरीवर ठेवलेलं सोनचाफ्याचं फुलं. 

भारी वाटलं तिला. 

"My god.. अगदी माझी बारीकसारीक आवड मांडलीस आठवणीने.  काय हे मध्येच बरा आहेस ना तू..?? आता चाळीशीपार आलोय दोघंही. " तिने गालात हसत म्हटलं.

" रोमॅंटिक लोकांना वय मॅटर नाही करत राणी... अभी तो महेफिल शुरू हुई है..और महफिले अक्सर शाम को ही रंग लाती है जानेमन..." त्याने पुन्हा स्वतःजवळ ओढून घेतलं तिला. तो सॉल्लिड मूडमध्ये.


आता त्याला अडवण्यात काहीच पॉईंट नव्हता. खुप सारे प्रश्न होते. पण त्याची उत्तरं एवढ्यात मिळणार नव्हती. तो सगळं सांगेल पण जेव्हा शांत होईल तेव्हा. तोवर जे समोर येईल ते एंजॉय करु... 


ती फक्त हसली. त्याला घट्ट बिलगली. त्याच्या मिठीत विरघळली. एका एका कपड्याचा भार हलका होत शरीरावरचा भार वाढत होता. ओठांची खडाजंगी अन् सुस्काऱ्यांची आवर्तने. वेडावलेले दोघे मिठीत बंदीस्त. तिच्या अंगभर चिकटलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. भर उजेडात चाळीशीतही वेड लावणारं तिचं अनावृत्त शरीर डोळ्यांना सुखावत होतं.    

त्याचे ओठ शरीरभर फिरून बेंबीवर विसावले. तसं तिचं मोहरून जाणं त्याला कळलं.  बाहेर पडणारा पाऊस आणि त्याच्या गारव्यात तापलेली शरीरं. कितीतरी दिवसांची आस पराकोटीला जाणारी.  तिचा होकार आणि मिलनाची सांगता. 


शांत झालेल्या त्याला बिलगून ती तशीच पडून राहिली. अंगावरची रजई उब देत होती. "थॅंक्यु" म्हणत त्याने तिच्या केसांत बोटं फिरवली. 

"अगं केस किती ओलेचिंब आहेत तुझे. पुसायचे तरी ना??" त्याने काळजीने म्हटलं.

"कधी ते?? वेळ तरी दिलास का??" ती त्याच्या बाजूला सरकत कुशीत शिरत म्हणाली.

"हं... "

त्याने रजईच्या टोक हातात पकडून हळूवारपणे तिचे केस पुसले. रजईतून बाहेर येत अंगावर कपडे चढवले. चहाचं पातेलं घेऊन चहा बनवला. दोन कपांत ओतून घेत बेडजवळ आला.  

"चहा घे थोडा. काळाच आहे. पण तुला आवडतो तसा गोड आणि फक्त एक उकळी काढून बनवलाय बघ. पिऊन बघ छान वाटेल. 

गुंडाळलेल्या रजईसहीत ती उठून त्याला रेलून बसली. गरमागरम चहा पिऊन खरंच तो म्हणाला तसं छान वाटलं तिला.

पाऊस एव्हाना थांबला होता. तिचा ड्रेस मात्र तसाच ओला चिंब लादीवर पडलेला होता. त्याचं लक्ष गेलं. "इतक्या पावसात भिजत आली. उशीर झाला की चिडचिड होते आपली म्हणून आडोशाला थांबली नसेल. केस ही भिजलेत. हा बिनमोसमी पाऊस. सर्दी ताप आला तर..!!  कशाची पर्वा करत नाही. वेड्यासारखं प्रेम करते पण मी  किती मुर्ख आहे. तिला नेहमीच समजून घ्यायला कमी पडतो..." तो स्वतःचाच विचारात हरवला. 

"अय् हिरो, कुठे हरवलास??" त्याच्याकडे एकटक पाहत असणाऱ्या तिने त्याची तंद्री भंग करत म्हटलं. 

"काही नाही.." म्हणत तो उठला. तिचा ड्रेस दोन मुठीत पकडुन घट्ट पिळून घेतला आणि झटकून गालाला लावून पाहिला. "किती थंडगार आहे..!! कसा घालेल ही..!!" मनात म्हणाला. 

शेजाऱ्यांना रिक्वेस्ट करून इस्त्री घेऊन आला. ओल्या कपड्यावर गरम इस्रीचा चरचर आवाज ऐकू येत होता.

"आता तरी सांगणार आहेस का?? ही जागा कुणाची आहे?? आणि आज हे अचानक सरप्राइज वगैरे?? काय होतं हे सगळं??" तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. 

"काही नाही गं..‌ माझ्यासारख्या अजून दोन मित्रांनी आणि मी मिळून ही रुम भाड्याने घेतलीय. थोडी एका बाजूला आणि वन रुम  किचन. त्यामुळे भांड तीन हजार फक्त. तिघे मिळून हजार हजार रुपये भरतो" त्याने सांगितलं.

"कशासाठी घेतलीय ही रुम??" ती.

"तुला काय वाटतं कशासाठी घेतली असेल??" 

"आता मला कसं माहिती असणार?? कशासाठी घेतलीय ते??"

"वेडाबाई, आजच्यासारख्या एकांतासाठी. बेड एकच आहे.  त्यावरच्या चादरी, उशा, रजई प्रत्येक जोडप्याच्या वेगळ्या...!! ही बघ ही आपली बॅग. यात आपलं सामान जाताना भरून ठेवायचं." त्याने सांगितलं.


"आणि हे डोकं कोणाचं??" तिने विचारलं. 


"अगं आम्ही तिघे मित्र आधी एकाच कंपनीत होतो. नंतर  वेगवेगळ्या कंपन्या जॉईन केल्या. फिल्डवर भेटतो. एकदा असाच विषय निघाला. ते दोघंही आपल्यासारखे एकत्र कुटुंबात राहणारे. एकांताची बोंब. समोर ताट पण जेवण नाही अशी अवस्था. मुलं मोठी आहेत त्यामुळे मोकळेपणा नाही नवराबायकोंत. ती तिच्या आणि तो त्याच्या कामात. जसं तू आणि मी. कधीतरी आम्ही उरकून घेतो. पण मनाच्या समाधानाचं काय..?? चर्चा बरीच रंगली. आणि तिघे शेवटी या निर्णयावर आलो. नितीनच्या ओळखीत आहे ही रुम. त्यामुळे डिपॉझीट वगैरे न देता घेतलीय. काल चावी मिळाली. तीन चाव्या बनवून घेतल्या. आपलं कपल सिनियर म्हणून आपला पहिला नंबर..." त्याने हसतच सांगितलं.

तिला आठवलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अप्पा सापडले. बऱ्यापैकी पैसा खर्च केला. बरे झाले पण कायमस्वरूपी दुखणं घेऊन. आईना सतत त्यांची काळजी. यश आता बारावीला आहे. तर सोना दहावीत. दोघांचे क्लासेस, अभ्यास यातच बिझी. मुलं दोघांसोबत झोपत असल्याने नवरा-बायको असं नातं राहिलंच नाही. 

लॉकडाऊनच्या आधी आई भजनी मंडळात, अप्पा मित्रांसोबत गार्डनमध्ये तर मुले क्लासला. त्यामुळे संध्याकाळी बऱ्याचदा प्रवीण प्रणालीला एकांत मिळायचा. कोरोना काळात सगळेच घरी आणि दोघांवर उपासमारीची वेळ.

पावणेदोन वर्षे त्याच परिस्थितीत काढल्यानंतर प्रवीणने हा तोडगा काढला. चूक की बरोबर तिला काही कळेना. पण सगळ्यांचं करताना स्वतःचा विचार केला तर कुठे बिघडलं..?? आणि चाळीस म्हणजे काही वय नाही झालं आपलं.. म्हणत ती स्वतःशीच खुदकन हसली.

"तुला आवडलं ना हे सगळं??" इस्त्री करून वाळवलेला ड्रेस तिला देत त्याने विचारलं. 

"आधी सांगितलं असतंस तर एक ड्रेस आणला असता ना सोबत?" तिने हसत म्हटलं.

"मग सरप्राइज काय राहिलं असतं. तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि समाधान कसं कळलं असतं मला??" त्याने तिचे गाल पकडत विचारलं. 

"हं... ते ही आहेच." ड्रेस घालून ओढणीला गाठ मारत ती म्हणाली.

"खुश ना??" त्याने तिला जवळ घेत डोळ्यात पाहत विचारलं. 

"खुप खुप खुश आहे.. आणि या कल्पनेसाठी थॅंक्यु.." तिने त्याचे केस विस्कटत म्हटलं. 

"मंगळवार आणि शुक्रवार आपला आहे.. व्हिजीटला याच एरियात असतो ना मी..!!" त्याने हसत म्हटलं.

"बरं..!! मग आता निघायचं का??" 

"हो... तू पुढे हो. मी पोचतोच मागोमाग. पण सावकाश जा. उगाच घाईत गाडी चालवू नकोस. घरी काय सांगशील??" 

"जाताना भाज्या घेऊन जाते. सांगेन भाजी आणायला गेलेले. पाऊस आला म्हणून थांबले.." 

त्याने "बरं.. बरं" म्हणताच दोघेही हसले. 

तिने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली. "थॅंक्यु" म्हणून निघाली. डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 

"ए ऽ ऽ वेडाबाई रडतेस का अशी..??" तो.

"आनंदाश्रु आहेत ते.. तुला नाही कळणार.. बाय. मी निघते. तू लवकर ये घरी. वाट बघतेय.." 


गाडीपाशी येत तिने वर पाहिलं तो खिडकीतून पाहत होता. तिने हात हलवून बाय केलं. गाडी स्टार्ट केली आणि निघाली. खुप अभिमान वाटत होता तिला नवऱ्याचा. आजची संध्याकाळ अगदी स्वप्नवत बनवली होती त्याने. दीड पावणेदोन वर्षे  भावनांचा, शरीराच्या त्या गरजेचा, आनंदाचा अक्षरशः कोंडमारा झाला होता.  त्याला ते सुख बाजारात कुठेही मिळालं असतं. पण त्याने तसं न करता तिच्यासाठी, तिच्यासहीत तो आनंद राखून ठेवला होता. आता शुक्रवारची भेट आपण खास बनवायची त्याच्यासाठी. एक चावी बनवून घेऊ त्याला न कळू देता. त्याला आवडणारी साडी नेसून तयार राहू त्याच्या स्वागताला. तसंही आजच्या भेटीने पोट भरलंच नाही त्याचं  "कसा वेडावून बघत होता.. वेडा बाबा कुठला.."

स्वतःच्या बिल्डिंग खाली गाडी पार्क करता ती स्वतःशीच हसली..‌ समाधानाच्या वेगळ्या अनुभूतीने..!! 

समाप्त...

© Velvet Kavisha ✍️

Post a Comment

3 Comments

  1. superb i like it this story,,,,,, agdi manala sparsh karnari kahani,,,,

    ReplyDelete
  2. नितांत सुंदर संकल्पना आणि मांडणी पण

    ReplyDelete
  3. खूप छान मांडलाय हा विषय . Lockdown madhye खरंच अशी कुचंबणा झाली असणार .ह्या बद्दल फारसं बोलल्या जात नाही . Very good varsha

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box