स्वार्थीपणा असावा पण मर्यादेतच..

#स्वार्थीपणा_असावा_पण_मर्यादेतच..

✍©️जया पाटील 





आपली मुलं प्रत्येक आईवडिलांसाठी स्वतःचं भावविश्व असतात. 

त्यांच्या चालण्या - बोलण्यापासून त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला सुखावत असते. 

त्यांचे बोबडे बोल , 

त्यांनी दिलेला त्रास सुद्धा आपण आनंदाने सहन करत असतो. 

काळजाचा तुकडा असल्याने आपल्या बाळाला झालेला त्रास ,

त्यांच्या पेक्षा आपल्यालाच जास्त वेदनादायी असतो.

आपल्या मुलासोबत केलेला प्रवास देखील अविस्मरणीय असतो. 

माझ्या मुलासोबत तो लहान असताना म्हणजे बाळ असतांना मी त्याच्या सोबत अनेक प्रवास केले ,

पण त्यावेळेस आईच्या कुशीत झोपायचे आणि आपण सांगू ती पूर्व दिशा ... 

असं वागायचं मग काय तो प्रवास अतिशय सुखावणारा असायचा.

परंतु माझा मुलगा दोन वर्षाचा झाला म्हणजेच आता कळता झाला असे म्हणालायला हरकत नाही.  

त्यावेळेस आमचा ट्रेनचा प्रवास करायचा किस्सा मात्र आजही लक्षात आहे माझ्या . 

त्यामुळेच आज वाटले तो किस्सा माझ्या वाचक मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेयर करूया.

माझा मुलगा दोन वर्षाचा झाला .

आम्ही महाराष्ट्रातून तेलंगणाला शिफ्ट झालो. 

मग दिवाळीला घरी जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय योग्य असे आम्ही ठरवूनच टाकलं.

दिवाळीच्या वेळेस तिकीट मिळत नाही , 

म्हणुन दोन महिने आधीपासूनच तिकीट आरक्षित करून ठेवले. 

त्यामुळे काळजी मिटली असं वाटलं.

आता खरी प्रवासाची वेळ आली.  

घरापासून मेन स्टेशन पर्यन्त जाण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्याय निवडला. 

माझं घर ते रेल्वेस्टेशन पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनने साधारण चाळीस मिनिटे लागतात.

माझ्या मुलाने ती चाळीस मिनिटे खूपच एन्जॉय केली. 

झुक झुक गाडी🚉🚉 .....अशी सारखी बडबड चालू होती.

चला खूपच आनंद झाला.  

मुलाला ट्रेन आवडलेली दिसतेय असाच चुकीचा समाज आम्ही स्वतःशीच करून घेतला.

कधी कधी स्वतःहून केलेले समज खूपचं त्रासदायी ठरतात.

आमच्या बाबतीत देखील तसचं घडलं.

मजल दरमजल करत आम्ही स्टेशन वर पोहोचलो.

त्यावेळी ट्रेन एक तास उशिराने सुटणार असं कळलं .

आधीच एक तास आगाऊ गेलो असल्यामुळे पुढचे दोन तास कसे घालवायचे हा आमचा पुढचा यक्ष प्रश्नच होता.

तरी कसा तरी वेळ घालवला आणि ट्रेन मध्ये जाऊन बसलो.

आम्ही आधीच दोन बर्थ आरक्षित केलेले होते.

माझ्या मुलाचेही सगळे मजेत चालू होते.

तितक्यात आमच्या समोर एक आजी येऊन बसल्या. 

जरा गप्पा झाल्यावर त्यांनी हळूच विचारले ..

"तुमचे खालचे सीट मला द्याल का ?

वय झालं आहे ,चढायला उतरायला त्रास होतो ,

त्यामुळे मदत केली तर बरं होईल. "

काकूंचे बोलणं ऐकलं ,

आणि माझ्यातला दानशुर कर्ण जागे झाला.

"आमच्या दोघांपैकी कोणीही एकजण तुमच्या बर्थ वर जाऊन झोपु.

तुमची झोपा आमच्या खालच्या सीट वर... "

असे सांगून मी मोकळी झाली.

आजीबाई जेवण करून लगेचच झोपी गेल्या. 

मी माझ्या खालच्या सीट वर माझ्या मुलाला घेऊन झोपले.

त्याचे पप्पा आजीबाईंच्या वरच्या सीट वर झोपी गेले.

त्यानंतर मात्र माझ्या मुलाचं रडणं चालू झालं ते सकाळपर्यंत थांबलं नाही.

आईपप्पा दोघेही माझ्या जवळच हवे असा त्याचा हट्ट होता. 

पण एकाच सीट वर आम्हा तिघांना झोपता अथवा बसता येणे देखील शक्य नव्हते.  

तो थोडा झोपला की आम्ही आमच्या सीट वर जाऊन झोपायचो , 

आणि तो लगेच जागा व्हायचा. 

त्यादिवशी आमच्यासाठी तो सी.आय.डी इन्स्पेक्टर पेक्षा कमी नव्हता.

पूर्ण रात्र गेली , 

पण तो झोपला नाही आणि आम्हाला पण झोपू दिले नाही.  

रडून रडून तो स्वतःदेखील खुप थकला. 

मात्र या गडबडीत आमच्या समोरच्या सीट वरच्या आजीबाईंनी मात्र आम्हाला ढुंकूनही पहिले नाही.

आमच्या स्टॉपच्या आधीच्या स्टॉप वर त्या उतरणार होत्या म्हणुन त्या उठल्या.

जाताना मला सांगून गेल्या ...

"बाई गं , माझ्यामुळे तुझा मुलगा झोपला नाही ना .....!

मला वाटत होते की ...

तुमचे सीट परत द्यावे आणि दोन सीट सोडून माझा मुलगा खालच्या सीटवर  झोपला आहे.

त्याच्या सीट वर मी ट्रान्सफर व्हावे .

पण नंतर विचार केला माझा मुलगा झोपला असेल मग त्याला त्रास का द्यायचा .....? "

मी ऐकुन थक्कच झाली...

"काकु , केवढा आहे तुमचा मुलगा?"

मी काकूंना विचारलं.

"अगं फार मोठा नाही... 

बावीस वर्षाचा आहे."

आजी अगदी शांतपणे म्हणाल्या.

हे ऐकल्यावर मात्र मी मनात म्हणाले.. 

भोगा आपल्याच कर्माची फळे.... 😒😒😒!

आता मात्र माझा खूपच संताप झाला होता.

तुमच्या बावीस वर्षाच्या मुलाची झोपमोड होऊ नये, 

म्हणुन माझ्या दोन वर्षाच्या मुलाला 

आणि त्याचबरोबर आम्हाला देखील तुम्ही जागे ठेवले.  

वेळेवर आम्ही केलेल्या मदतीचा त्यांनी थोडा तरी विचार करायला हवा होता.

त्या काकूंचा मला मनोमन खूप राग आला.

आपली सोय करणं , आपल्या मुलांची काळजी करणं. 

यात चुकीचं काहीच नाही. स्वार्थीपणा असावा पण त्याला देखील मर्यादा असायला हवीच. 

मनोमन त्यादिवशी निश्चय केला की पूर्ण चौकशी केल्याशिवाय उदारपणा दाखवायचा नाही.

असो , सगळेच लोक जगात आजीबाईंसारखे नसतात.

कारण एक वाईट अनुभव आला म्हणून सकारात्मकता नाहीशी होत नाही , 

परंतु कोणालाही मदत करावी पण समोरच्याने देखील केलेल्या मदतीची जाणीव ठेवावी.

इतकचं मला या अनुभवातून सांगावंसं वाटतं.

कोणीही आपल्याला मदत केली ,

त्या गोष्टीबद्दल त्याचा आदर करणे तर सोडाच ,

पण त्यानंतर त्याच्या काही अडचणी समजुन घ्यायला सुद्धा काहीच वेळा लोक तयार होत नाही.

प्रत्येक वेळेस फक्त आपली मुलं ,आपली सोय हा विचार न करता..,

जेव्हा सगळ्यांना आपले मानून जेव्हा आपण कोणाला मदत करतो.  

त्यावेळेस मदत स्विकारणारा देखील कृतकृत्य होतो.

स्वतःचा स्वार्थ ,स्वतःचा विचार ,आपलाच फायदा ही मानसिकता आपण बदलायला हवी हे मात्र नक्की.

हा बदल अंगीकारल्यावर आपल्याला अपरिमित समाधान लाभेल हेही तितकचं खरं....! 

तुम्हाला देखील असा काही अनुभव आला असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. 

तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. 

म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. 

साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा. 

अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 

फोटो साभार - Google 

✍©️ जया पाटील 









Post a Comment

1 Comments

  1. असे एकच नाही तर अनेक अनुभव आले आहेत. खोटे आजाराचे किंवा जीवनावश्यक कारण सांगून चैनीसाठी पैसे उसने घ्यायचे आणि परत करायचे नाहीत. उलट समोर यायला सुद्धा टाळाटाळ करायची.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box