ओढणी - हेमा पाटील

ओढणी


सौ.हेमा पाटील.

    तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांतून अश्रू टपटप पडताना पाहून काय करावे हे त्याला सुचेना.त्या अश्रूंच्या पुरात तो ही वाहवत गेला.आपल्याला उशीर होतोय हे ही तो विसरुन गेला.तिच्याजवळ जात तिच्या हनुवटीला धरुन तिचा चेहरा वर उचलत त्याने तिच्याकडे पाहिले.त्याच्या या कृतीमुळे ती अधिकच भावनावश झाली.त्याने हळुवारपणे तिचे डोळे पुसले आणि तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला आपल्या बाहुपाशात घेतले व हळूवारपणे तिला थोपटू लागला.ती ही अगदी विश्वासाने त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या छातीवर डोके घुसळून आपल्या हातांची मिठी त्याच्याभोवती घालून त्याला अशी घट्ट बिलगली , जणू तिला त्याच्यापासून क्षणभरही दूर व्हायचे नव्हते...

   अजितलाही तिच्यापासून दूर होण्याचा त्रास होत होता.पण जाणे आवश्यक असल्याने त्याने नाईलाजाने अगदी जड अंतःकरणाने तिचा निरोप घेतला.मागे वळून बघत तो कारमध्ये बसला.तिला डोळ्यांतील पाण्यामुळे आधीच तो धुसर दिसत होता,जसजशी गाडी पुढे गेली तसतसा मागे वळून हात हलवणारा अजित दिसेनासा झाला तेव्हा कविता भानावर आली आणि घराकडे वळली.आता एक वर्षभर अजित परत येणार नव्हता...

   आपल्या संसारासाठी हा निर्णय दोघांनी मिळून घेतला होता.कंपनीतर्फे एका वर्षासाठी अमेरिकेला जाण्याची संधी चालून आली होती.एक वर्ष यु.एस.ला रहाणे म्हणजे फ्लॅटचे कर्ज एका वर्षात जवळपास पूर्ण फिटणे ....नाहीतर वीस वर्षे दर महिन्याला हप्ता कापून जातो.

   भविष्याच्या दृष्टीने हप्त्यांचे ओझे जेवढे लवकर कमी होईल तितके बरे असा विचार करून त्यांनी एक वर्षाचा दुरावा सहन करण्याची मनाची तयारी केली होती.पण प्रत्यक्ष ती वेळ आल्यावर त्याक्षणी मात्र दोघेही भावूक झाले...जड अंतःकरणाने घरात शिरताना तिला खूप एकटे एकटे वाटले.आता वर्षभर अजितचे अस्तित्व या घरात वावरणार नव्हते.त्याचे खळखळून हसणे, तिच्या हातच्या जेवणाची तारीफ करणे,गाणे गुणगुणणे आणि घरात असताना सारखे तिच्या अवतीभवती करणे हे सगळे आता ती मिस करणार होती.एक वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आहे.आज अजितला जाऊन एक तास पण झाला नव्हता तर तिला अजिबात चैन पडत नव्हता.आपण अजित शिवाय एक वर्ष कसे काढायचे या विचाराने ती कावरीबावरी झाली आणि तिने अजितला फोन केला.अजित एअरपोर्टवर आपले सामान जमा करण्याच्या रांगेत उभा होता.तेवढ्यात कविताचा फोन आला म्हणून त्याने उचलला.आपण काही महत्त्वाचे विसरुन आलो की काय असे त्याला वाटले.अजितने कविताला विचारले,"काय झाले गं? काही महत्त्वाचे विसरलेय का"?

  हा प्रश्न ऐकून कविताचे डोळे भरुन आले.रुद्ध स्वरांत ती म्हणाली," अरे, अख्खी मीच राहिलेय इथे"...

  यावर अजित म्हणाला," अगं, आपण दोघांनी मिळून घेतलाय ना हा निर्णय? तोही अगदी विचारपूर्वक भविष्याचा विचार करून..मग का गं अशी भावूक होतेस? तुझी अशी अवस्था पाहून मग माझेही मन हेलावते.नको जाऊ का मी? येतो परत..भरु हप्ते.. किमान एकमेकांपासून दूर तरी रहावे लागणार नाही.अजून थोडा वेळ आहे आपल्या हातात..सांग, येऊ परत"?

  या अजितच्या प्रश्नावर ती गंभीर झाली.आपण इतके हळवे होता कामा नये.आपण असे वागलो तर अजितचे तिकडे एवढ्या दूर कामात लक्ष लागणार नाही.असा विचार मनात येताच ती म्हणाली," नाही नाही..पण तुझ्यापासून दूर रहाण्याच्या विचाराने खरंच गांगरुन गेले आहे मी.पण it's ok. I can handle this situation.Dont worry.Take care my sweetheart.मी तुझ्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे ".

  हे ऐकून अजित हसला व म्हणाला,"अगं, अजून जाऊदेत तरी मला..मी आत्ताशी एअरपोर्टवर पोहोचलोय".
त्याचे हे मिश्कीलपणे हसत बोलणे ऐकून ती ही हसली."चल बाय.. Happy journey "असे म्हणून तिने फोन कट केला.

  पण किचनमध्ये गेल्यावर एकटीपुरता चहा करायची तिची इच्छाच होईना.ती बेडरुममध्ये आली.विमनस्क अवस्थेत ती बेडवर पडली.तिच्या डोळ्यांसमोर तिचे आणि अजितचे एकत्रितरित्या अनुभवलेले क्षण तरळू लागले.

  ती इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच तिला अजितचे स्थळ  सांगून आले होते.तिच्या मामाच्या मित्राचाच मुलगा असल्याने स्थळ ओळखीतील होते. सधन, सुशिक्षित कुटुंब होते. मुलगाही दिसण्यास सुंदर व हुशार असून मल्टी नॅशनल कंपनीत उच्चपदावर कार्यरत होता. घरच्या सर्वांना हे स्थळ पसंत पडले.तिला ही मुलगा आवडला होता..पण काय यार..जरा तरी पसंतीला वाव हवा होता असे तिला वाटले.पहिलेच चालून आलेले स्थळ..लगेच काय होकार द्यायचा?येतील की अजून स्थळे..काय गडबड आहे ? 
 अर्थातच कविता दिसायला सुंदर होती, हुशार होती.पण तिच्या मावशीने तिची समजूत घातली."अगं,चालून आलेले उत्तम स्थळ का हातचे घालवायचे? अन् परत असे स्थळ आलेच नाही तर? येईलच अशी खात्री आहे का? मग कशासाठी उगाचच हातचे सोडून पळत्याच्या पाठी फिरायचे"?
   हे ऐकल्यावर तिला ही वाटले,खरंच आहे.सगळे चांगले असताना, माहितीतील स्थळ असताना उगाचच नकार देणे योग्य नाही.त्यामुळे तिने चार दिवस विचार केला व आपला होकार दर्शवला.घरातील सर्वांनाच खूप आनंद झाला.आईच्या तर मनातच भरला होता अजित! त्याचे अगत्यशील वागणे, सौम्य बोलणे,शांत स्वभाव तिला फार आवडला होता, त्यामुळे कविताने होकार दिल्यावर तिला स्वर्ग दोन बोटे उरला.आपल्या एकुलत्या एका मुलीसाठी चांगला जावई आपल्याला मिळाला या खुशीतच तिने अगदी धुमधडाक्यात लग्नाची तयारी सुरू केली आणि तिची परीक्षा झाली की महिन्याभरात लग्न उरकले देखील...

  तिची परीक्षा जवळ आल्याने अजित सोबत डेटवर जाणे जमलेच नाही.अजितनेच मनाई केली होती.अभ्यासाला अग्रक्रम दिला पाहिजे कारण तो ही आयुष्याचा महत्वाचा प्रश्न आहे असे त्याने सांगितले.खरं तर लग्न ठरल्यावर मुलांना आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत फोनवर तासनतास बोलणे,भेटणे याची खूप उत्कंठा असते.पण मनावर संयम ठेवणारा अजित कविताला फार भावला.खरे तर तिलाही वाटत होते की, रविवारी भेटायला काय हरकत आहे? तिला अजितला भेटायची खूप हूरहूर लागली होती.त्याच्या सहवासात वेळ घालवायला ती आतुर झाली होती.ते एकमेकांच्या डोळ्यांत डोळे घालून बघणे..मग काळजात होणारी ती अनामिक धडधड, त्याच्या स्पर्शाने मोहरुन जाणे..यासगळ्याचा अनुभव तिला हवा होता.पण अजितने सांगितले तेव्हा अजितचा संयमित स्वभाव व आपल्या होणाऱ्या पत्नीच्या भविष्याची तो घेत असलेली काळजी पाहून तिने आपल्या भावनांना आवर घातला व अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.परीक्षा झाली त्याच दिवशी अजित तिच्या काॅलेजवर तिला घेण्यासाठी आला.त्याला असे अचानक आलेले पाहून ती गोंधळली.त्याने आपली स्पोर्ट्स बाईक तिच्यासमोर आणून उभी केली व तिला म्हणाला,"चला मॅडम! प्रतिक्षा संपली आता आपली..चला लाॅंग ड्राईव्ह वर"...

  ती म्हणाली," आधी घरी जाऊयात"...
यावर अजित म्हणाला,"मी घरी जाऊन तुझ्या आईची रितसर परवानगी घेऊन आलोय तरीही जायचे असेल तर चल"..

  ती म्हणाली,"अरे सकाळी आलेय काॅलेजला..जरा घरी जाऊन फ्रेश होते.मग जाऊ, चालेल"?

  "जशी आपली आज्ञा राणी सरकार"..असे अजित म्हणाला.यावर ती लाजली.तिच्याकडे पहात अजित म्हणाला,"चल लवकर.. खूप वाट पाहिली,आता मी अधीर झालोय".

  घरी गेल्यावर आईने चहा ठेवला.तिने पटकन हातपाय धुवून ड्रेस बदलण्यासाठी कपाट उघडले.कुठला ड्रेस घालावा या विचारात असतानाच आईने आवाज दिला."आले आले" म्हणतच तिने गुलाबी रंगाचा तिचा आवडता ड्रेस काढला व पटकन चढवला. ड्रेसिंग टेबल जवळ जात केस विंचरले व मोकळेच सोडले.कपाळावर टिकली चिटकवत असतानाच तिने स्वतः कडे पाहिले.आरशाने पसंतीचा कौल दिला तशी ती किचनमध्ये गेली.उभ्या उभ्याच चहाचा कप तोंडाला लावला. ते पाहून आई म्हणाली,"अगं बस तरी खाली..एवढी कसली गडबड झाली आहे तुला"?
यावर कविता गडबडली.तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत आई तिची आणखी चेष्टा करत म्हणाली, "बरं बरं समजले मला, अजितराव वाट पहातायत बाहेर"...
"काय गं आई".. तिच्या गालांवर फुललेले लज्जेचे गुलाब पाहून आई हसली.ते पाहून कविता पटकन बाहेर आली.अजित तिची वाट पहात होताच..दोघेजण बाहेर पडले‌.गाडीवर बसलेल्या जोडप्याकडे आई अनिमिष नेत्रांनी पहातेय हे कविताच्या लक्षात आले त्यामुळे तिला अधिकच अवघडल्यासारखे झाले.बाईक वळून हमरस्त्याला लागली तेव्हा अजितने आरशातून मागे कविता कडे पाहिले.कविता आरशातून अजितकडेच पहात होती.आपली चोरी पकडली गेली म्हणून तिने नजर वळवली पण नजर मात्र तिथेच अडकून पडली होती.ती पुन्हा तिकडेच वळली.अजित म्हणाला,"अगं एवढी अवघडून का बसली आहेस? रिलॅक्स मध्ये बस ना ! मी गेली अनेक वर्षे बाईक चालवतोय.पाडणार नाही तुला"..  
यावर कविता म्हणाली," मी दादाच्या बाईकवर बसते नेहमी.मलाही चालवायला येते बाईक..चालवते मी ही"..
"अच्छा...मग मला घाबरली आहेस वाटतं..पण मी एक सभ्य तरुण आहे.तुला पळवून वैगेरे नेणार नाहीये"..
हे ऐकून कविता खळखळून हसली.तिला असे मनापासून हसताना पाहून अजितच्या चेहऱ्यावर ही हास्याची लकेर उमटली.नाही म्हंटले तरी त्याच्यावरही थोडासा ताण आलाच होता.त्याचीही पहिलीच वेळ होती.त्याला मैत्रिणी होत्या,पण ते नाते केवळ मैत्रीचेच होते.

  "आज पहिल्यांदाच कुणी मुलगी माझ्या बाईकच्या बॅकसीटवर बसलीय". हे अजितचे बोलणे ऐकून कविता म्हणाली, "मी पण पहिल्यांदाच दादा सोडून कुठल्यातरी मुलाच्या बॅकसीटवर बसलेय.पण आता कायमच बसणार आहे". हे ऐकून अजितने आरशातून तिच्याकडे पाहिले.तिच्या डोळ्यांतील भाव पाहून तो वेडावून गेला.बाईकला रेस करत त्याने वेग वाढवला.तिचे वाऱ्यावर उडणारे केस त्याच्या मानेला स्पर्श करत होते.तिलाही तो वेग आणखी धुंद करत होता.वेगाने मागे पळणारी झाडे पाहून तिला मजा वाटत होती.अजितचा चुकून अधूनमधून होणारा स्पर्श देहावरुन मोरपीस फिरल्या सारखा सुखावत होता.
"धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना..धुंद आज वेली धुंद फुल पाने".. अशी दोघांचीही अवस्था झाली होती. एवढ्यात स्पीड ब्रेकर कडे लक्ष न गेल्याने बाईकला धक्का बसला, त्यामुळे दचकून कविताने त्याला पाठीमागून मिठी मारली. अचानक तिच्या हातांच्या पडलेल्या विळख्याने तो ही दचकला,पण तिचा स्पर्श त्याला सुखद व हवाहवासा वाटला..ही आठवण आज फ्लॅशबॅक पहात असल्यासारखी तिला आठवली व पुन्हा एकदा तिने ती अनुभवली.अजित सोबत नसल्याची उणीव अधिकच अधोरेखित झाली तशी ती उठली व मन रमावे म्हणून किचनमध्ये आली.तिने रोजच्यासारखे दोघांसाठी चहाला आधण ठेवले आणि तिच्या लक्षात आले, आपण आज एकटेच आहोत..अजित आपल्या भावविश्वात किती व्यापून राहिला आहे हे तिने पुन्हा एकदा अनुभवले.चहाचा मग हातात घेऊन ती बाल्कनीत आली.खुर्चीवर बसून चहाचे घोट घेत घेत ती फुलझाडांचे निरीक्षण करत होती.अजितलाही फुलांचे,झाडांचे खूप वेड होते... तिच्यापेक्षा ही जास्त!

  गुलाबाच्या फुलांकडे पहाताना तिच्या मनात आले," ही सुंदर, सुवासिक फुले फुलतात पण दुसऱ्याला आनंद देण्यासाठीच! यात यांचा काय स्वार्थ असतो? आपल्याला अजितच्या नसण्याचे इतके दुःख झाले आहे,आपण का बरं असा फुलांसारखा विचार करत नाही! आपल्याजवळ जे आहे त्याची सर्वार्थाने उधळण करायची, मात्र त्याबदल्यात कुणाकडूनही कसलीच अपेक्षा करायची नाही . अजित आपला आयुष्याचा जोडीदार आहे,पण तरीही त्याला ही त्याचे आयुष्य आहे आणि ते त्याला एकट्यालाच जगावे लागणार आहे. भले ही आपण त्याच्या सोबत असलो तरीही... आपल्याला त्याची खूप आठवण येतेय, आपण अगदी अस्वस्थ झालोय,पण हा फक्त आपल्या स्वतःपुरता विचार करतोय आपण! अजितला ही एकट्याने परदेशात रहाणे कठीणच वाटेल ना! पण तरीही तो गेलाच आहे ना? असा विचार मनात आला तेव्हा तिचे अस्थिर मन जरासे शांत झाले.आपल्याला त्याच्या सहवासाची ओढ आहे तशीच त्यालाही असणारच ना ! पण तो कायमच जवळ असावा हा स्वार्थी विचार झाला.त्याच्या पुढील आयुष्यात या एक वर्षाच्या कामाचा त्याला उपयोग होईल.मग स्वतःला करमत नाही म्हणून त्याला इथेच थांबवून ठेवायचं हे योग्य नाही असा विचार तिच्या मनात आला.
तिने देवापुढे दिवा लावला व भाताच्या खिचडीचा कुकर लावून ती उद्याच्या भाजीची तयारी करण्यात गुंगून गेली.

  अजितचा पोहोचलो म्हणून विडिओ काॅल आला.त्यानंतर रोजच, कधीकधी दिवसाआड येऊ लागला.हळूहळू तिलाही अजितच्या सोबत नसण्याची सवय झाली. तीही तिच्या रोजच्या जीवनात गुंतून गेली.दिवस कसाही जायचा पण रात्र तिला खायला उठायची.शेजारी अजित नाही या कल्पनेने तिला झोपच यायची नाही. अर्थात फक्त शरीराच्या भूकेसाठीच जोडीदार हवा असतो असे नसून आपल्या जोडीदाराची भक्कम साथ असणे गरजेचे असते. आपल्या मनात चाललेली खळबळ आपण न सांगता जोडीदाराला समजली पाहिजे.कधी गरज असेल तेव्हा मायेचा डोक्यावरुन फिरणारा हात हवा असतो.जोडीदाराशी एकनिष्ठता हवी असते,त्यासोबतच त्याला त्याची स्पेस देणे आणि आपण ती जपणे आवश्यक! पूर्वीच्या काळी पत्नी पतीला पती परमेश्वर मानत आणि त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करत. अशी समर्पित वृत्ती आपल्यातही हवी असे तिला प्रकर्षाने वाटले.आपण अजितची पूजा करतोय,दूर राहूनही तो सदोदित आपल्या जवळच आहे असे वाटते कारण तो आपल्या विचारांमध्ये सामावलेला आहे.त्याला आपण तिथून कधीच काढू शकत नाही असे विचार तिच्या मनात वारंवार घोळत असत. त्यामुळे प्रत्यक्षात अजित सोबत नसला तरी मनात त्याच्या असलेल्या अस्तित्वाची सोबत तिला पुरेशी होती.ती रोज रात्री झोपण्यापूर्वी अजितच्या उशीवर बोटे फिरवत त्याला गुडनाईट म्हणायची.त्यानंतर तिची शांत झोप लागायची.अजितचा विडिओ काॅल एक किंवा दोन दिवसाआड यायचाच! पण कधी कधी शरीर बंड करुन उठायचे. त्याला विडिओ काॅल वर पाहिले की कधीकधी तिच्या भावना अनावर व्हायच्या.पण मनाला बांध घालत ती अजितशी हसून बोलायची.अजितचीही अवस्था वेगळी नव्हती.कविता आपल्या माणसांत तरी होती,पण तो तर एकटाच तिथे रहात होता.पण त्याने स्वतःला कामात इतके बुडवून टाकले होते की,इतर गोष्टींचा विचार करायला त्याच्याकडे वेळच नव्हता.

  असेच दोन महिने गेले. दोघांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता.दोघे दोन दिशेला असूनही घरच्यांच्या इच्छेनुसार वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.घरगुती पद्धतीनेच वाढदिवस साजरा करायचा असे ठरल्याने त्याची तिकडची वेळ व इथली भारतातली वेळ लक्षात घेऊन वाढदिवसाचा केक कापायचा असे ठरले. टिव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर त्याचा विडिओ काॅल जोडल्यामुळे तो अगदी हुबेहूब सोबत असल्यासारखे भासत होते.त्याच्या अनुपस्थितीने तिचे डोळे सारखे भरुन येत होते. त्याच्या लक्षात येऊ नये यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती.घरच्यांसोबत अन् त्याच्या विडिओ काॅल वरील उपस्थितीत दोघांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाला,पण रात्री जेव्हा फक्त त्या दोघांचा पुन्हा काॅल झाला तेव्हा तिने त्याला एक वचन मागितले."यापुढे जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरीही यादिवशी तू माझ्याजवळच असशील".त्याच्याही डोळ्यात पाणी तरळले.त्याने तिला तसे वचन दिले.तिने जाणवू दिले नाही तरीही तिचा उतरलेला चेहरा त्याच्या मगाशीच लक्षात आला होता,आणि त्याचे कारण आपली अनुपस्थिती आहे हे ही त्याला समजले होते....

  काळ आपल्या गतीने चालतच असतो.त्याला कुणाशीही कसलेच देणेघेणे नसते."कुणी हसा कुणी रडा आपापले प्राक्तन भोगा" असाच संदेश देत जणू काळाचे चक्र फिरत असते.असेच बघता बघता सहा महिने गेले. दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते.असे असताना भारतातून अजितच्या कंपनीतून सौम्या सहा महिन्यासाठी अमेरिकेत येणार असल्याचा मेल आल्यामुळे व सहकारी असल्याने आधीचा परिचय असल्याने त्याने तिला स्थिरस्थावर होईपर्यंत मदत केली. परक्या देशात आपले कुणीच नसताना ओळखीचा सहकारी भेटल्याने सौम्या लवकरच स्थिरावली. एकमेकांची ओळख वाढल्याने शनिवारी रविवारी दोघे एकत्र भेटू लागले. केवळ आपली एक सहकारी याच दृष्टीने अजित तिच्याकडे पहात होता.सौम्याची परदेशात येण्याची पहिलीच वेळ होती त्यामुळे खरं तर ती बावरली होती,पण अजितच्या मदतीमुळे तिला सहजपणे स्वतःला सावरता आले.शनिवारी रविवारी दोघे मिळून फिरण्यासाठी जवळपासचे ठिकाण सर्च करुन फिरायला जात.सहवासाचा परिणाम झाला आणि होऊ नये तेच झाले.सौम्या अजितच्या प्रेमात पडली.काहीतरी कारण काढून ती सारखी अजितच्या अवतीभोवती घुटमळू लागली.सुरवातीला अजितच्या लक्षात आले नाही,पण तिचे आपल्याशी वागणे बदलले आहे, तिच्या नजरेत बदल झाला आहे हे त्याला जाणवले.हा आपला भ्रम आहे की खरंच सौम्यात बदल झालाय हे त्याला समजेना.पण उगाच कशाला विषाची परीक्षा घ्यायची म्हणून "या शनिवारी कुठे जाऊयात"? या सौम्याच्या प्रश्नावर या आठवड्यात मला यायला जमणार नाही असे त्याने सांगितले.

  "का बरं"?असे सौम्याने विचारले असता अजित म्हणाला," माझी जरा तब्येत ठीक नाहीये.मला दोन दिवस विश्रांती घ्यायचीय".
यावर "बरं", एवढेच सौम्या म्हणाली.

  शनिवारी सौम्या अगदी छान तयार होऊन अजितच्या रुमवर पोहोचली.अजित नुकताच उठला होता.सौम्याला अचानक आलेले पाहून तो गोंधळला.आत येत सौम्या म्हणाली,"तुझी तब्येत बरी नाही ना म्हणून तुला कंपनी देण्यासाठी मी इथे आलेय.चालेल ना"? आता यावर काय बोलायचे म्हणून त्याने मान डोलावली व तो बेडवरचे बेडशीट सरळ करु लागला.यावर सौम्या म्हणाली," असु देत.मी करते.तू बस.तुझी तब्येत बरी नाही ना"?
तो निमूटपणे खुर्चीवर बसला.ती वाकून बेडशीट सरळ करु लागली. वाकल्यामुळे तिने घातलेल्या लो-कट टाॅपमधून तिचे उरोज अर्धवट दिसत होते.अभावितपणे अजितचे तिकडे लक्ष गेले.त्याने तिकडे दुर्लक्ष केले व तो आत बाथरुममध्ये गेला.तो फ्रेश होऊन येईपर्यंत सौम्याने काॅफी बनवली होती.दोघांनी काॅफी घेतली.सौम्या वारंवार आपल्याकडे पहातेय हे अजितच्या लक्षात आले, त्यामुळे तो अस्वस्थ झाला.सौम्या कधी एकदा जातेय असे त्याला झाले पण सौम्या जायचे नाव घेईना.तिच्या सूचक नजरेतील भावना त्याच्या लक्षात आल्या पण त्याने तिला अजिबात प्रतिसाद दिला नाही.सौम्यानेच पिझ्झा मागवला.दोघांचे खाणे झाल्यावर अजित म्हणाला,"मी आता झोपणार आहे".याचा अर्थ तू आता जा असा होता.पण सौम्याने त्याचा अर्थ वेगळाच घेतला.तिच्या डोळ्यात वासना उतरल्याचे स्पष्ट दिसत होते.ती सरळसरळ अजितला म्हणाली," आपण दोघे ही घरापासून दूर आलो आहोत.तू नसतास तर मी होमसिक झाले असते.आजही मला तुझी फार गरज आहे. I love you. मी तुझ्या प्रेमात पडले आहे." असे म्हणत ती अजितच्या जवळ आली व तिने अजितला घट्ट मिठी मारली.तिच्या त्या आवेशाने तो गोंधळून गेला.त्याने आपल्या भोवतीची तिची पकड हलकेच सोडवली व तो म्हणाला,"मला शक्य नाही हे"..

   त्याच्या स्पर्शाने तिच्या भावना अधिकच उद्दिपित झाल्या होत्या,पण त्याचा नकार तिला अपमानास्पद वाटला.आपल्या सौंदर्याच्या जीवावर आपण अजितला नक्कीच वळवू शकू असा तिला विश्वास होता.पण अजित अजिबातच बधला नाही हे पाहून ती दुखावली गेली.पण पुन्हा एकदा प्रयत्न करत तिने अजितचा हात आपल्या हातात घेतला व त्याच्याकडे मदभऱ्या नजरेचे कटाक्ष टाकत ती म्हणाली "प्लीज, नाही म्हणू नकोस.माझ्या सौंदर्याचा अपमान करु नकोस ना"! यावर अजित म्हणाला,"तू अतिशय सुंदर आहेस,अगदी माझ्या बायकोपेक्षा ही कांकणभर अधिकच सुंदर आहेस हे मला मान्य आहे".
   हे ऐकून सौम्याच्या डोळ्यात चमक आली,"हो ना? मग आजचा दिवस आपण एकत्र घालवू या ना! माझ्या सौंदर्याचा पूरेपूर उपभोग तू घे अन् तुझ्यातील पुरुषत्वाचा अनुभव मला घेऊ देत".
  यावर अजित म्हणाला,"ही माझ्या बायकोची फसवणूक होईल.आणि शारिरीक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे.मी माझ्या बायकोशी प्रतारणा करणार नाही".

   "इतका आर्थोडाॅक्स आहेस होय? कुठल्या काळात वावरतोस"?असे सौम्या म्हणाली.
यावर अजित म्हणाला,"कुठलाही काळ का असेना,माझी पत्नी तिकडे भारतात उर्मिलेने जशी लक्ष्मणाची वाट पाहिली तशी माझी वाट पहातेय हे मी विसरु शकत नाही.त्यामुळे तू कितीही प्रयत्न केलास तरीही मी बधणार नाही".

  यावर सौम्या काहीच न बोलता सरळ निघून गेली.त्यानंतर परत कधीच ती त्याच्यासमोर आली नाही.

  पण नाही म्हंटले तरी गेले सहा महिने स्त्रीसुखापासून दूर असलेल्या अजितला कविताची फार आठवण येऊ लागली.कधी एकदा तिला भेटतोय असे त्याला झाले.त्याने पंधरा दिवसांची सुट्टी मागितली व कंपनीतर्फे प्लेनचे तिकीट काढावयास सांगितले.

  यासाठी त्याचा खर्च होणार होता,पण त्याला आता कविताचा दुरावा सहन होत नव्हता. सौम्याच्या त्याच्यावरील हल्ल्यापासून त्याने स्वतःला वाचवले खरे..पण त्यामुळेच त्याला कविताला भेटण्याची उर्मी मनात दाटून आली.त्याच्यापासून गेले सहा महिने दूर रहात असूनही तिने कधीच विडिओ काॅल वर किंवा फोनवर बोलताना या दुराव्याचा किती त्रास होतोय हे चुकूनही दर्शवले नव्हते.ती ही तरुण आहे,तिला ही भावना आहेत असा विचार मनात आला आणि त्याने पंधरा दिवसांसाठी का होईना जाण्याचा निर्णय घेतला.त्याची रजा मंजूर झाली आणि प्लेनचे तिकीट ही हातात आले.पण याबाबत त्याने कविताला काहीच मागमूस लागू दिला नाही.तिला सरप्राईज द्यायचे असे त्याने ठरवले.निघायच्या आदल्या दिवशी त्याने कविताला सांगितले की,"उद्या माझे एक दिवसाचे ट्रेनिंग आहे, त्यामुळे मला फोन करता येणार नाही". कविताला ही त्यात काही विशेष वाटले नाही.कारण अधूनमधून अशी ट्रेनिंग्ज असतात याचा तिलाही अनुभव होताच! 

   दारावरची बेल वाजली.आत्ता यावेळी कोण आले असावे असा विचार करत ती दारापाशी आली तेवढ्यात आपल्या जवळच्या चावीने दार उघडत अजित आत आला.अजितला पाहून तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.अजितने हातातील बॅग खाली टाकली व तिला मिठीत घेण्यासाठी आपले बाहू पसरले.कविता आवेगाने त्याच्या मिठीत शिरली.त्याच्या खांद्यावर डोके टेकवून तिनं आपल्या हातांची घट्ट मिठी अजितभोवती घातली.अजितने तिचे मुखकमल वर उचलले व आवेगाने तिच्या ओठांवर ओठ टेकवणार एवढ्यात त्याला तिच्या डोळ्यांतील अश्रू दिसले.
  "ऐ वेडाबाई..का रडतेस"? असे म्हणत त्याने तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसले व तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.
  त्याला अधिकच बिलगत कविता म्हणाली,"खूपच मिस केले रे मी तुला..रोज रात्री तुझ्या उशीवर हात फिरवून मी तुला गुड नाईट म्हणायचे तेव्हा रोज माझे डोळे भरुन यायचे.तुला वाईट वाटेल म्हणून मी आजवर कधीच बोलण्यातून तुला जाणवू दिले नाही,पण तो विरह आज माझ्या डोळ्यांच्या मार्गे या अश्रूंच्या माध्यमातून बाहेर पडतोय"...

  "मी पण तुला खूप मिस करत होतो गं..मी स्वतःला कामात इतके गुंतवून ठेवले होते की,काम संपले की आपोआप डोळे मिटायचे.पण तुझी आठवण झाली नाही असा एक क्षणही गेला नाही..कारण तू इथे माझ्या हृदयात वसली आहेस.तू जवळ नसूनही मी कायम तुझी जवळीक अनुभवत होतो.तुला समजले की नाही मला माहीत नाही,पण तुझी गुलाबी ओढणी मी माझ्यासोबत नेली होती.रोज रात्री झोपताना मी ती माझ्या अंगावर पांघरायचो.तुला आठवते,आपली पहिली भेट? तेव्हा तू जो गुलाबी ड्रेस घातला होतास तशीच तुझी छबी माझ्या मनात ठसली आहे.तीच गुलाबी ओढणी मी सोबत नेली होती".

  "अच्छा.. माझ्यासाठी पण तो ड्रेस त्यामुळेच खास आहे.आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी तू नव्हतास..पण तोच गुलाबी ड्रेस घालावा म्हणून मी कित्ती शोधली होती ओढणी..तुला आठवतेय का..आपण ठरवून विडिओ काॅल वर केक कापला होता बघ..इकडे मी अन् तिकडे तू.. एकाचवेळी...तेव्हा मी हा ड्रेस घातला होता,पण ओढणी न सापडल्याने पांढरी ओढणी घेतली होती".

  "बरं बरं..मग आता ओढणी चोरीची काय शिक्षा देताय राणी सरकार ? हा चोर तुमच्यासमोर उभा आहे"...

  यावर त्याच्याकडे कृतक कोपाने पहात कविता म्हणाली," शिक्षा तर दिलीच पाहिजे या चितचोराला...पण आधी आत तर ये.दारात उभे राहूनच सहा महिन्यांचा कोटा पूर्ण करायचाय का"?असे म्हणत तिने हलकेच त्याच्या गालांवर आपले ओठ टेकवले.
  तिच्या हळुवारपणे घेतलेल्या या गालावरच्या चुंबनाने तो अधिर झाला व तिच्या ओठांवर ओठ टेकवत त्याने तिचे दीर्घ चुंबन घेतले.यानंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत असे विरघळून गेले की त्यांना स्थळकाळाचेही भान उरले नाही.

  सकाळी ब्रेकफास्ट करताना त्याने सौम्या बाबत कविताला सगळे सांगितले.ते ऐकून कविता म्हणाली,"त्या तुमच्या सौम्याला मी काही पाहिलेले नाही,पण तिला माझ्या वतीने thanks म्हण".

  "thanks?का बरं"?

  "अरे, तिच्यामुळे तर तुला पंधरा दिवस सुट्टी घेऊन जाऊया असे वाटले ना..आणि तिच्यासारखी सुंदर युवती स्वतः हून तुझ्या जवळ आली होती,पण तू निग्रहाने तिला दूर सारलेस.तू तिच्या जवळ गेला असतास तरीही मी समजून घेतले असते..पण तुझा निग्रह आणि तुझी माझ्याबाबतीत असलेली एकनिष्ठता या प्रसंगामुळे दिसली. म्हणून thanks..and love you so much honey"! असे म्हणत ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली...इति हेमा उवाच..
सौ.हेमा पाटील.



disclaimer 

सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहेया कथेतील आशयविषयमांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहेयातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाहीया कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेतपरवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.  


Post a Comment

0 Comments