प्रेमाला वय नसते
सौ.ज्योती प्रशांत सिनफळ
नेहा आणि केशव नेहमी प्रमाणे बागेत मस्त हसत, गप्पा मारत एकाच प्लेट मधील भेळ खात होते. भेळ खाऊन झाल्यावर नेहा केशवचा हात हातात घेत त्याला म्हणाली, केशव मला कधीकधी भिती वाटते, आपण चुकीचे नाही ना वागत.
त्यावर केशव नेहाला म्हणतो, मला तु आवडतेस, तुला मी आवडतो, आपले दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आपल्या दोघांना एकमेकांचे विचार पटतात. आपल्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो. तु आणि मी दोघेही सज्ञान आहोत. आपण कोणावरही अवलंबुन नाही. आपल्यावर कोणाचीही जबाबदारी नाही. आपल्याला एकमेकांशी लग्न करायचे आहे ह्यात काय चुकीचे आहे ? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना.
त्यावर नेहा केशवाला म्हणते, माझ्यापेक्षाही माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणुनच मी तुझ्याशी लग्न करणार आहे; पण केशव आता आपण दोघेही तरुण नाही आहोत.
आपल्या दोघांची आधी लग्न झाली आहेत आणि मी एक घटस्फोट घेतलेली पन्नाशीची बाई आहे आणि तु साठ वर्षांचा विदुर आहेस. आपल्याला मुल व नातवंडे आहेत. आपले हे नाते समाजाला तर मान्य नाहीच; पण आपल्या मुलांना पण मान्य नाही. ते आपल्या प्रेमालाच विरोध करत आहे, तर लग्नाला कुठे परवानगी देणार आहे ? तु मला व्हॅलेंटाईन डे ला फुल आणि भेट वस्तु दिली त्यावरुन आपल्या दोघांच्या घरी किती आकांडतांडव झाला होता, माहित आहे ना तुला. तसेच काल आपण होळीला एकमेकांना रंग लावुन जोडीने फोटो काढले हे पण कोणाला आवडले नाही. कॉलनीत सगळ्यांच्या घरी तीच चर्चा चालु आहे.
त्यावर केशव नेहाला म्हणाला, नेहा लोकांचा विचार नको करुस. ते बोलतच राहणार आणि मुलांचा विचार करायचा म्हटलं तर त्यांना कुठे आपली काळजी?” आपली मुले मोठी झाली आहेत ते त्यांच्या आयुष्यात रमली आहेत. मी माझ्या मुलीशी, जावयाशी बोलणार आहे, आपल्या नात्याविषयी तु पण बोलुन घे, तुझ्या मुलाशी व सुनेशी.
नेहा काळे एक घटस्फोट घेतलेली पन्नास वर्षाची स्त्री आहे. ती पुण्यात तिचा मुलगा अनिल आणि त्याची बायको रीटासोबत राहते. नेहाला तिच्या नवऱ्याने ती चाळीस वर्षांची असताना घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले. त्यावेळी तिचा मुलगा अनिल अठरा वर्षांचा होता. नेहा फॅशन डिझायनर होती. नेहाने नोकरी करत, एकटीने आपल्या मुलाला वाढवले.
केशव कुलकर्णी बासष्ट वर्षांचा विदुर आहे. तो मुबंईत बॅंकेत मॅनेजर होता. केशवच्या बायकोचे कॅन्सरने दोन वर्षापुर्वी निधन झाले. केशव बायको गेल्यानंतर मुलीच्या घरी पुण्यात राह्यला आला होता. केशवची मुलगी प्राचीचा फ्लॅट नेहा ज्या कॉलनीत राहायची त्याच कॉलनीत होता. कॉलनीतल्या हास्यकल्बमध्ये नेहा जायची तिथे केशव पण जायला लागला. केशवचा स्वभाव विनोदी होता. त्याच्या विनोदी व खेळकर स्वभावामुळे तो लवकरच हास्यकल्बमधील लोकांना आवडु लागला. नेहा मुळातच अबोल होती आणि नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर अजुनच अबोल झाली. ती कल्बमध्ये जास्त कोणाशी बोलायची नाही. हास्यकल्बमध्ये व्यायाम करायची आणि घरी जायची; पण केशवचा विनोदी व खेळकर स्वभाव नेहाला आवडु लागला आणि ती हास्यकल्बमध्ये व्यायाम झाल्यानंतर थांबु लागली. हास्यकल्बमधील खेळ, कार्यक्रम व सहली मध्ये सहभाग घेऊ लागली. केशवच्या घरामध्ये मुलगी आणि जावई त्यांच्या आय. टी. कंपनीच्या नोकरीत व्यस्त आणि त्याचा नातु त्याच्या कॉलेज विश्वात रममाण असे.
त्याच्याशी बोलायला घरात कोणालाही वेळ नव्हता.
एकदा हास्यकल्बची सहल महाबळेश्वरला गेली होती. केशव व नेहा पण सहलीला गेले होते. महाबळेश्वरच्या सहलीत नेहाने स्वत: केलेली कविता म्हटली, तेव्हा केशव तिला म्हणाला, तुम्ही कविता छान लिहता, आवडली मला तुमची कविता. हे ऐकुन नेहा खुप आनंदी झाली. नेहा केशवला म्हणाली, आज मी खुप वर्षांनी माझी कविता म्हटंली, मी लग्नाच्या आधी कविता करायचे, मला बक्षीसही खुप मिळाली आहेत, पण नंतर आयुष्याची गणितं सोडवण्याच्या नादात मी कविता लिहीत होते हेच विसरून गेले, पण तुमच्या खेळकर व विनोदी स्वभावामुळे आयुष्यात करण्यासारखे खुप आहे हे समजले. मी माझ्या जुन्या, वाईट गोष्टींमध्येच अडकले होते. त्याचा त्रास खर तर मलाच होत होता. धन्यवाद केशव, सॉरी मी तुम्हाला एकेरी नावाने हाक मारते; पण तु माझ्या आयुष्यात आला आणि माझे दुःखी आयुष्य आनंदी झाले. मी इतके दिवस फक्त मुलासाठी व सुनेसाठी जगत होते, पण तुझी ओळख झाली आणि मी स्वत:साठी जगु लागले. तु म्हणतोस तसं जग खुप सुंदर आहे. आपल्याला आवडत त्या गोष्टीत आपले मन रमवलेतर जगणे खुप आनंदी होते, म्हणुन तर मी आज माझी कविता सर्वांसमोर सादर करु शकले. मी खरं म्हणजे तुझ्या प्रेमातच पडले आहे; मला तु खुप आवडायला लागला आहेस. तु बोलतोस तेव्हा फक्त ऐकत रहावे वाटते. तुला माझे बोलणे आवडणार नाही; पण माझ्या मनात जे आहे ते मी बोलले. ह्याचा अर्थ असा नाही की तु पण माझ्यावर प्रेम करायला हवे. मी पण तुला आवडलीच पाहिजे.
नेहाचे बोलणे ऐकून केशवला धक्काच बसला. त्याने कधीच विचार केला नव्हता. ह्या वयात त्याच्या कोणी प्रेमात पडेल आणि त्याला समोरून सांगेल मी तुझ्या प्रेमात पडले आहे.
सहलीवरुन आल्यावर नेहाच्या स्वभावात व वागण्यात एकदमच बदल झाला. नेहाचा अबोल स्वभाव जाऊन ती सगळ्यांशी बोलायला लागली. आपल्या मनातील भावना कवितेत मांडु लागली. केशवच्या आवडीचे पदार्थ बनवुन त्याच्या घरी नेऊ लागली. केशवला पण ते आवडु लागले. केशवची बायको गेल्यापासून त्याने त्याच्या आवडीचे पदार्थ खाल्लेच नव्हते.
एकदा हास्यकल्बमध्ये व्यायाम करताना नेहा पडली. त्यावेळी तिला केशव आणि हास्यकल्बमधील सभासदांनी तिच्या घरी सोडले. तेव्हा तिला लागलेले बघुन तिचा मुलगा ती कशी पडली? तिला कुठे लागले ? हे विचारायचे सोडुन, उलट सर्वांसमोरच नेहाला ओरडुन म्हणाला, काय हौस आहे घराबाहेर जाऊन व्यायाम करण्याची, व्यायामाच्या नावाखाली नुसत्या सहली, खेळ आणि कार्यक्रम करता तुम्ही. आता डॉक्टरचा खर्च होणार, घरातील कामे कोण करणार ? तुझ्याजवळ कोण बसणार ? हे सर्व ऐकल्यावर नेहाच्या डोळ्यात पाणी आले; पण तिने सर्वांसमोर अश्रु काढले नाही. केशव व इतर सभासदांशी नेहाचा मुलगा काहीही बोलला नाही.
नेहा पडल्यामुळे पाच, सहा दिवस हास्यकल्बमध्ये आली नाही. त्यामुळे केशवला करमत नव्हते आणि त्याला नेहाच्या घरी तिची तब्येत विचारायला पण जाता येत नव्हते. नेहाला फोन लावला; पण तिचा फोन बंद येत होता. केशवला काय करावे ते समजत नव्हते. त्यावेळी त्याला जाणवले, की तो पण नेहाच्या प्रेमात पडला आहे.
पंधरा दिवसांनी नेहा काठी टेकत हास्यकल्बमध्ये आली आणि केशवच्या चेहऱ्यावर हसु आले. तिला बघीतल्यावर तो लगेच तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला, कशी आहेस तु? पाय बरा आहे का तुझा ? फोन का बंद ठेवला होतास? किती काळजी वाटत होती तुझी ? हे ऐकून नेहाला खुप बरे वाटले. नेहा म्हणाली, मी आता बरी आहे. फोनचा बॅलन्स संपला होता. आज भरेल मी फोनमध्ये बॅलन्स.
नेहाला केशवच्या डोळ्यात तिच्या बद्दलचे प्रेम, काळजी बघुन खुप आनंद झाला. केशवने त्यादिवशी दुपारी फोनवर नेहाला दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये माझ्याबरोबर जेवायला येणार का म्हणुन विचारले ? नेहाने हो म्हणुन सांगितले.
दुसऱ्या दिवशी नेहा आणि केशव कॉलनी मधुन वेगवेगळ्या रिक्शा करुन हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेलमध्ये गेल्यावर केशवने नेहाला गुलाब देऊन त्याचे पण नेहावर प्रेम आहे हे सांगितले. हे ऐकुन नेहा लाजली. इथुन नेहा आणि केशवची प्रेमकथा चालू झाली.
दोघेजण कॉलनीतुन वेगवेगळ्या रिक्शा करुन हॉटेलमध्ये जेवायला, सिनेमा,नाटक बघायला, फिरायला एकत्र जात होते. वेगवेगळ्या रिक्शामधुन वेगवेगळ्या वेळी घरी येत होते. त्यामुळे कोणालाही त्यांच्या प्रेमाविषयी कळले नव्हते. व्हॅलेंटाईन डे ला केशवने सगळ्यांसमोर नेहाला फुल आणि भेटवस्तु दिली आणि लोक त्यांच्या प्रेमाविषयी चर्चा करु लागले. हास्यकल्बमधील काही लोक केशव व नेहाला म्हणाले, ह्या वयात असे प्रेमाचे चाळे करणे तुम्हाला शोभत नाही. तुमच्यामुळे तरुण पिढी व लहान मुलांवर काय संस्कार होतील. तुम्ही आता हास्यकल्बमध्ये येऊ नका. हे ऐकल्यावर नेहा आणि केशवला वाईट वाटले.
आता नेहा आणि केशवच्या प्रेमाबद्दल सगळ्यांना कळले म्हणुन दोघेजण सगळ्यांसमोर एकाच रिक्शाने बाहेर फिरायला, नाटक,सिनेमा बघायला जात होते. कॉलनीमध्ये सगळेजण त्यांना लैलामजनु म्हणून चिडवु लागले.
एके दिवशी नेहाने तिचा मुलगा अनिल आणि सुन रीटाला, ती आणि केशव कुलकर्णी एकमेकांवर प्रेम करतात. दोघे लवकरच लग्न करणार आहोत, हे सांगितले.
हे ऐकताच नेहाची सुन रीटा अनिलला म्हणाली, बघ अनिल मी तुला म्हणाले होते. आई, त्या केशव काका सोबत फिरायला जातात, सिनेमाला जातात. त्यांच्यासाठी घरातुन वेगवेगळे पदार्थ बनवुन नेतात. सोसायटीत चर्चा चालु आहे, आई आणि केशव काकांच्या प्रेमप्रकरणाबद्दल; लग्नाबद्दल; पण तुला माझे खरे वाटत नव्हते. आता बोल.
अनिल आईला म्हणाला, अग आई ह्या वयात तुला असे वागणे शोभते का? लोक काय म्हणतील ? आपल्या समाजात सगळे आपल्याला हसतील. आई तुझे वय आहे का परपुरुषाच्या प्रेमात पडायचे? लग्न करायचे. थोड्याच दिवसात तु आजी होणार आहेस.
तुझ्या नातंवडावर त्याचा काय परिणाम होईल ह्याचा तरी विचार करायचा.
नेहा आपल्या मुलाचे विचार ऐकून गालातल्या गालात हसते आणि मुलाला म्हणते, मी परपुरुषाच्या प्रेमात पडले हे तुला आवडले नाही, तु म्हणतोस लोक काय म्हणतील, तुला माझे वय दिसते आणि तुझ्या वडीलांनी दहा वर्षापुर्वी परस्त्रीच्या प्रेमात पडुन लग्न केले. ते तुला चालले. त्यावेळी तु वडीलांना नाही म्हणालास, नका करु प्रेम, नका करु लग्न. का ? तर ते पुरुष आहे त्यांनी काही केले तरी समाजाला चालते, मी स्त्री आहे, एक आई आहे म्हणून मी परपुरुषावर प्रेम करायचे नाही. मी पुनर्विवाह करायचा नाही. कुठल्या काळात जगतो आहेस अनिल तु? अरे मला पण मन आहे. मला पण कोणाची तरी सोबत हवी असते. माझ्या मनातील मला कोणाशी तरी बोलावेसे वाटते ?
त्यावर अनिल आईला म्हणतो, अगं आई मी आणि रीटा आहोत की तुझ्या सोबत. तु तुझ्या मैत्रीणीशी बोल मनातल. त्यासाठी केशव काका कशाला हवे आहेत ? अग आई त्यांच्याशी मैत्री ठेव. मला काही प्रॉब्लेम नाही; पण त्यांच्याशी लग्न करायचं तुझ्या डोक्यातुन काढ.
ह्यावर नेहा अनिल आणि रीटाला म्हणते, मी आणि केशव एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही लग्न करणार आहोत. तुम्हाला आवडले नाही तरी.
इकडे केशव आपल्या मुलीला व जावयाला म्हणाला, तो आणि नेहा काळे एकमेकांवर प्रेम करतात आणि ते एकमेकांशी लग्न करणार आहे.
तेव्हा त्याची मुलगी केशवला म्हणते, बाबा आईला जाऊन दोन वर्ष झाले नाही आणि तुम्ही नेहा काकुंच्या प्रेमात पडुन त्यांच्याशी लग्न करत आहात. तुमचा हा निर्णय मला आणि तुमच्या जावयाला अजिबात आवडला नाही. ह्यापुढे तुमचा आणि आमचा सबंध संपला. मला माझ्या प्रॉपर्टीमधील हक्क द्या आणि मग तुम्हाला काय प्रेम, लग्न करायचे ते करा आणि तुमची राहण्याची सोय तुम्ही दुसरीकडे करा. हे ऐकुन केशवच्या डोळ्यात पाणी आले.
केशव मुलीला म्हणाला, तुला माझ्या प्रापर्टीमधील हिस्सा मी मेल्यावर मिळेल.
केशवचा मुंबईत फ्लॅट होता. केशव आणि नेहा मुंबईला गेले. तिथे केशवने नेहाशी रजिस्टर लग्न केले आणि दोघांचा संसार चालु झाला.
सौ.ज्योती प्रशांत सिनफळ
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box