झेलम (जगा वेगळी प्रेम कथा )
© सौ अनघा बेडेकर
महेश अगदी मोजक सामान घेऊन बस स्टँड वर उतरला
. पाहिलीच पोस्टिंग या छोट्या शहरात मिळाली होती . इथे कोणीच ओळखीच नसल्यामुळे , राहण्यासाठी
जागा मिळवण्या करता बँकेत काम करणाऱ्या कोणा स्थानिक व्यक्तीची मदत घ्यावी लागणार
होती . त्यामुळे सुरुवातीला तरी मोजकच समान आणलं होत त्यानी . जागेची सोय झाली की
पुढच्या आठवड्यात घरी जाऊन येणार होता तो . आता तर बँकेत जावं मग दुपारच्या
सुट्टीत एखाद लॉज बघावं जागा मिळेतो कुठं तरी का होईना डोक टेकायला जागा तर हवी.
बस वेळेत पोचल्या मुळे तो पण बँकेत लवकर पोचला , फक्त
चपराशी आला होता बँकेत , अजून बाकी कर्मचारी वर्ग यायचाच होता . उघडून साफ सफाईच
काम चालू होत . " "नमस्कार मी महेश जोशी , आजच इथं रुजू व्हायला
आलो आहे . तुम्ही कोण ? " " मी चपराशी आहे साहेब बँकेत , राजु नाव
आहे माझं . अजून साहेब लोकांना यायला पाच दहा मिनिट तरी लागतील , बरोबर दहा वाजता
येतात सगळे ."
" हो मी पाहिलाच दिवस असल्या मुळे लवकरच्या बसनी निघालो ,
लवकर पोचलो , अजून राहायच्या जागेची सोय झाली नाही , म्हणून एकदम इथंच आलो . आता
दुपारी जेवणाच्या सुट्टीत बघेन काही सोय होते आहे का ? तस तोवर राहण्या सारखं जरा
बर असं लॉज आहे का इथं आसपास . " " अहो लॉज कशाला साहेब , मी जागाच
मिळवून देतो की तुम्हाला . तुमच्या आधीचे साहेब त्यांना पण मीच जागा शोधून दिली
होती . किती मोठी हवी जागा . म्हणजे घरचे पण येणार आहेत ?, कि एकट्या साठि हवी .
" " अहो एकट्या साठीच हवी , वडील अजून नोकरी करतात , ते आणि आई बदलीच्या
गावी . मी एकटाच राहणार इथं " " बर अजुन लग्न नाही झालं वाटत तुमच
" " छे हो पहिलीच पोस्टिंग ही मिळाली आहे आणि लग्न कुठलं इतक्यात अजून
भरपूर अवकाश आहे त्याला . " " मग एक , दोन रूम असल्या तरि चालतील म्हणता
" " होय चालेल , बाकी संडास बाथरूमची , पाण्याची सोय चांगली हवी , जागा
लहान असली तरी चालेल . " " संध्याकाळी घेवुन जातो साहेब , माझ्या घरा
पासून जवळच आहे एक वाडा , म्हणजे तसा वाडा नव्ह , पण मोठ घर आहे. तुम्हाला हवी ती
सोय पण आहे . फक्त भाड थोड जास्त लागेलं." तस इथुन पंधरा मिनिट चालव लागेल .
तुम्हाला रिक्षा हवी का ? की पायी जायच ." " पायीच जाऊया रस्ते पण
लक्षात येतील म्हणजे . " राजुनी बॅग घेऊन सायकलच्या मागे कॅरिअर वर लावली ,
" तुम्ही मला अहो जाहो नका करू साहेब , साधा चपराशी मी , सगळ्यां सारखं राजुच
म्हणा " गप्पा मारत म्हणण्या पेक्षा , राजुची बडबड ऐकत घर इतक्या लवकर आलं .
बाहेरून तरी वाडा म्हणावं अस काही वाटत नव्हतं ,जुन्या पद्धतीच घर होत , बाकी सोयी
कशा आहेत कोण जाणे . मालकीण बाईंशी ओळख करून दिली , जुजबी चौकशी झाल्यावर चला जागा
दाखवते म्हणाल्या " पण भाड एक रुपया पण कमी करणार नाही हो . अस सगळ्या सोयी
असलेलं घर या गावात तुम्हाला मिळायच नाही . "
एक जिना चढून वर गेल्यावर
गच्चीच्या टोकाशी दोन खोल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला , नहाणीघर , उघडून बघितलं
सांगितल्या प्रमाणे नवीनच बांधकाम केलेलं दिसत होत , त्यामुळे चांगल्या स्थितीत
होत सगळं . " पाणी मात्र जपून वापराव लागेल हं . ही वरची टाकी एकदा भरली की
दोन दिवस मोटर लावणार नाही , त्याआधी पाणी संपवलत तर ती खाली तिथ विहीर आहे ,
तिथून आपापल आणावं लागेल आधीच सांगते . सारखी मोटार लावणार नाही . विजेच बिल येत
मग भरमसाठ . " जागा आवडली होती महेशला , त्यानी पण फार घासाघिस न करता एक
महिन्याच भाड आगावु दिल . जागा तर मिळाली आता जेवणाची सोय ? त्याच्या मनातलं
ओळखल्या प्रमाणे राजु म्हणाला " साहेब जेवणाची नका काळजी करु मी दोन तासात
येतो परत , डबा आणुन देतो घरून . उद्याच मग बघु नाही झाली सोय आणि आवडला तुम्हाला
माझ्या बायकोच्या हातच जेवण , तर माझ्या कडेच डबा लावा . नाहीतर दुसरी खाणावळ पण
आहे गावात ती दाखवून देईन . " जेवण तर चांगल होत , राजु कडेच डबा लावावा येता
जाता आणुन पण देईल . अनपेक्षित रित्या पहिल्या दिवशीच त्याची राहणं , खाण दोन्ही
गोष्टी इतक्या सहज मार्गी लागल्या .
प्रवास , दिवसभर बसुन अवघडल्या सारखं झालेल .
सतरंजीवर पडल्या पडल्या केव्हा डोळा लागला , कळलंच नाही महेशला . चुकून खोलीच दार
उघडच राहिलं होत . बाहेरून छान थंड वाऱ्याची झुळूक आली , सोबत रातराणीचा मादक गंध
. डोळे उघडले तर समोर एक सुंदर मुलगी उभी , अतिशय रेखीव चेहरा , मोठे डोळे काहीतरी
बोलत होती काय ते काही कळत नव्हतं , पण आवाज फार गोड होता . अर्धवट जाग आलेली आधी
तर त्याला वाटलं स्वप्नच पडलंय आपल्याला . तर हळुवार स्पर्श झाला दंडला . आता
मात्र टक्क जागा झाला महेश उठून बसला . ' अरे स्वप्न नाहीये की स्वप्नांतलिच
सुंदरी प्रत्यक्षात ...'
" अहो हे अंथरुण , पांघरूण द्यायला आले आहे . आणि प्यायच पाणी इथे या
छोट्या सुरईत ठेवलं आहे . गच्चीत झोपणार असाल तर दाराला कुलुप लावून झोपा . इथ
चोऱ्या होतात . थोड सावध झोपा बाहेर झोपलात तरी . " एवढं बोलून ती सुंदरी
काही समजण्या , उमजण्याच्या आतच निघून गेली .
तिच्या पैंजणांचा आवाज तेवढा नंतर पण
किती वेळ कानात रुंजी घालत होता .आता नीट गादिवर पांघरूण घेऊन झोपला महेश , खाली
कुठंतरी रेडिओ वर गाणी चालु होती ती ऐकत पुन्हा केव्हा डोळा लागला कळलंच नाही
महेशला . मधेच स्वप्न पडत होती . ती सुंदर मुलगी , कधी पडका वाडा त्यात ती विहीर ,
कधी सुनसान रस्ता मधेच दचकून जाग आली . नवीन जागा असल्यामुळे अस होत असेल . परत
झोपला महेश . जरा उन्ह वर आल्यावरच जाग आली त्याला . काहीतरी धोपटल्याचा आवाज येत
होता . गडबडून उठला तो ब्रश करत खाली डोकावला तर एक तरुण मुलगी ओझरतीच त्याला
जातांना दिसली . अचानक तिनी वर पाहिलं ' ओह तिच रात्रीची सुंदरी , म्हणजे
रात्री स्वप्न नव्हतं पडलं ही मुलगी खरच आली होती वरती . पटपट आवरून अंथरुण गोळा
करून ठेवलं त्यानी . तेवढ्यात जिन्यावर पाऊलांचा आणि पैंजणाचा आवाज आला . ती चहा
घेऊन आली होती . दोन कप होते ताटात . एक त्याच्या हातात देऊन , दुसरा अर्थात
तिच्या साठी असणार . " धन्यवाद सांगा , तुमच्या आईला . " " तिचा
काय संबंध ,चहा मी स्वतःहून आणला आहे आणि पांघरूण पण . तुम्ही एवढीशी बॅग घेऊन
आलेला दिसलात , तेव्हाच मला वाटलं... थोडा वेळ गप्प बसुन त्याच निरीक्षण करत होती
ती अगदी उघड नाही पण त्याच लक्ष नाही अस दिसलं की ती त्याच्या कडे पाहते आहे हे
त्याला कळल होत .
अनोळखी सुंदर मुलगी स्वतःहून त्याच्याशी बोलायला येत होती .
त्याच्यात स्वारस्य दाखवत होती . छान वाटत होतच , नवल पण वाटत होत . छोट्या गावात
असं मनमोकळ वागण त्याला थोड नवल वाटत होत .काय बोलाव त्याला सुचत नव्हतं , काही
विचारायला जावं आणि नाही आवडल हिला तर ... म्हणुन गप्पच होता तो . चहा संपला तसा
त्याच्या हातातला कप काढून घेतला तीन . त्याच्या कडे पाहून हसली आणि निघून गेली .
जातांना तोच पैजणांचा मंजूळ आवाज . तिच्या विषयी उत्सुकता वाढवणारा , ओढ लावणारा
.
राजु जेवणाचा डबा बँकेतच घेऊन येणार होता .
थोडी भूक लागल्या सारखी वाटली , बिस्किटचा पुडा होता खरा त्याच्या कडे . मघाशी
लक्षात नाही आलं . चहा सोबत खाता आली असती . तिला पण देता आली असती . अरे नाव तर
विचारलंच नाही तिच , मघाशी बोलायला सुरुवात इथून करता आली असती की , इतक का
गोंधळायला झालं तीला बघितल्यावर , गोंधळ म्हणण्या पेक्षा डोक काम करण बंदच झालं
जणु . चला लवकर आवरून निघाव , बाहेर कुठ नाश्ता करावा . अंघोळ करून पटपट तयार झाला
. खाली आल्यावर त्यानी आसपास पाहिलं कुठ दिसते आहे का ? पण नाहीच दिसली ती
त्याला मन थोड खट्टू झालं .
संध्याकाळी गेट उघडुन आत आला , आसपास कुठ ती दिसते
आहे का ? बघत होता तर ," कोण पाहिजे साहेब ?" बाई विचारत होती " अं
, नाही कोणी नाही . " तेवढ्यात मालकीण बाई बाहेर आल्या , तुम्हांला कामाला
बाई हवी असेल तर ही आहे , बघा लावायची असेल तर सांगा . झाडू मारण, कपडे धुत जाईल .
" " लागली तर सांगेन . " मोघम बोलून महेश निघाला . बोलतांना घरात
डोकावला , तरी नाही दिसली ती .जिना चढतांना विचार तिचेच होते , मन नाही म्हटलं तरी
थोड खट्टू झालच त्याच . दिवसभर काम करताना सुद्धा त्याला तिची आठवण येत होती .
सारख अस वाटत होत की ती त्याच्या आसपासच आहे . फक्त त्याला दिसत नाहीये .
जेवायला रोज राजुच्या घरीच जायच होत .
त्याच्या कडेच डबा लावला . कधी हवं तर डबा आणून देईन म्हणाला . पण पाच मिनिटांच्या
अंतरावर घर आहे , घरीच येत जा जेवायला . म्हणजे गरम जेवायला मिळेल . रोज डबा आणून
देण त्रासाच वाटतं असावं अस वाटून महेश पण ठीक आहे म्हणाला . जेऊन रूमवर आला तर
खोली छान आवरुन ठेवलेली . अंथरुण घालून ठेवलेलं . मंद रातराणीचा गंध येत होता .
पुन्हा त्याला वाटलं ती आसपास असावी अस . कपडे बदलुन गादीवर आडवा झाला . डोक्यात
तिचेच विचार .तिचा चेहरा नीटसा आठवत नव्हता त्याला . विचार करता करता डोळा लागला
असावा का ? .
पायरव जाणवला कुणाचा , पैजणाची छुम छुम ,त्यामागोमाग
येणारा रातराणीचा गंध , तिचा मोहक आवाज गुंगल्या सारखं झाल त्याला . डोळे जडावले .
कोणी तरी कपाळावर हात फिरवत होत . त्यानी डोळे उघडले तिच होती . बावरून उठला तो
इतक्या जवळ बसली होती ती . त्याच्य चेहऱ्या वरचे भाव पाहून हसू आलं तिला आणि तो
थक्क होऊन हसणाऱ्या तिच्याकडे पहात राहिला .इतकी लोभस दिसत होती ती . स्वच्छ सुंदर
नितळ कांती मोठे डोळे , केसांची बट आली चेहऱ्यावर हळूच त्यानी ती दूर केली . तशी
लाजली ती . पण लगेच धीट पणे त्याच्या कडे पाहायला लागली . तिच्या मांडीवर त्याच
डोक ठेवलं , हळुवार पणे त्याच्या केसातून तिची बोट फिरत होती . तिचे मोकळे लांबसडक
केस हवेनी उडून कधी त्याच्या चेहऱ्यावर येत होते . ते दूर सारून तो तिच्याकडे
बघायचा तेव्हाच तिच मिश्किल हसू , चेहऱ्या वरचे लाजरे भाव आणि तरीही धिटपणे
त्याच्या नजरेला नजर मिळवणारी ती . रातराणीचा गंध , तिच्या बांगड्यांची किणकीण आणि
त्याच्या केसात सावकाश फिरणारी तिची बोट ,तिच्या नजरेत अडकलेली त्याची नजर . अशा
धुंद वातावरणात केव्हा झोप लागली त्याला कळलंच नाही . बघितलं तर आठ वाजलेले . घाई
घाईन उठून सगळं आवरलं . गच्चीतून आशेनी खाली पाहिलं , निघताना पण कोणाच्या लक्षात
येणार नाही अशा बेतान बघितलं घरात , पण नाहीच दिसली त्याला ती . उदाससा तो सरळ
तसाच गेला ऑफिसला . आज सकाळी नाश्ता करायला विसरला , खूप भूक लागली , डबा यायला
उशीर झाला तसा थोडा चिडला तो राजुवर . नंतर चुक लक्षात आली तस सॉरी म्हणाला .
" आज गडबडीत नाश्ता करायला विसरलो रे , त्यामुळे भूक लागलेली . म्हणुन जरा
चिडचिड झाली . " याला विचारावं का तिच्या विषयी , पण ती म्हणजे कोण तिच नाव
पण तर नव्हतं माहित त्याला ." हो का ? पण नाश्ता का बर नाही केला " राजु
विचारत होता . आता याला काय उत्तर देणार की ती दिसली नाही सकाळी , मन उदास
झाल , नाही वाटलं खावंसं . गप्पच बसला तो . बर याला विचारावं तिच्या विषयी तर तिच
साध नाव नाही माहित . काल पण कस बर विसरलो विचारायला . आता आज जर आली तर विचारेन .
आली तर ? तिच्या न येण्याची कल्पनाच करू शकत नव्हता तो . नवल वाटलं त्याला दोनच
दिवस तर झाले तिला भेटून अजुन तिच साधं नाव माहित नाही मला आणि एवढी ओढ वाटते आहे
तिच्या विषयी . यालाच प्रेम म्हणत असावेत . " "काय झाल साहेब कशाचा
विचार करताय .उद्या पासुन येईल डबा वेळेवर , आज बायकोची तब्येत जरा बरी नव्हती
म्हणुन , आणि तुम्ही रागावल्याच मला एवढं वाईट नाही वाटलं टेन्शन नका घेऊ "
डबा आवरून राजु निघून गेला.
रोज रात्रीची ती यायची , किती तरी वेळा त्यानी जाग
राहण्याचा प्रयत्न केला असेल . ती येते तेव्हा आपण अर्धवट झोपेत असतो म्हणुन बोलण सुचत
नसावं , काही विचारलंच जायच नाही . अर्थात जे विचारायच होत ते व्यवहारी प्रश्न
होते . जागेपणी सुचणारे . प्रेमात पडलेल्या माणसाला त्याच काय . मनानी तिच्याशी
झालेली जवळीक . एकमेकांना वाटणारी एकमेकां विषयीची ओढ , हे एवढं पुरेसं वाटतं त्या
जीवाला . ती आली की तिचा गंध , तिचा स्पर्श , तिची जवळीक . आताशा तर ती खुप
धीट झाली होती . एकमेकांच्या मिठीत कधी रात्री गच्चित चांदण्याच्या प्रकाशात धुंद
होऊन जागवलेल्या रात्री . कधी रात्र सरे ,ते कळत पण नसे . सकाळी उठल्यावर मात्र ती
गायब असे . कितीदा वाटलं तिच्याशी बोलाव . थांबत जा नं सकाळ पर्यंत , नाहीतर मला
उठवत जा , कधी जातेस कळत पण नाही मला . पण तेच हे सगळे व्यवहारी जगात परतल्यावरच
सुचण . दिवस कसे भरभर जात होते कळत नव्हतं त्याला . दोन आयुष्य एकच वेळी जगत होता
जणु तो . एक दिवसाच व्यवहारी जगातलं ,जागरूक अवस्थेतलं आणि दुसर जग रात्रीच कधी
अंधार तर कधी चंद्र चांदण्यांचा शीतल प्रकाश देणार ,ज्यात ती होती . ती आणि तो बस
दोघेच फक्त , त्या दोघांचंच होत ते जग , अगदी स्वप्नवत , ज्याचा दुसऱ्या जगाला
पत्ता पण नव्हता .
आज बँकत काम भरपूर होत . निघायला उशीर झाला होता .
इथं रुजू होऊन वर्ष होत आलं , इतक जास्त काम करायची वेळ नव्हती आली आता पर्यंत .
आता मार्च एन्ड आहे त्यामुळे असंच होणार बघा या महिन्यात , आता जेवूनच जा साहेब
रूमवर , परत परत जा या नको . आज खर म्हणजे खुप थकायला झाल होत त्याला , पण तीला
भेटायची उत्सुकता , आज तिला नक्की नाव विचारायच आणि काय काय बोलायच त्यावर विचार
करत करत रूमवर पोचला केव्हा कळलंच नाही .
आज सगळं शांत वाटत होत . तिची उपस्थिती
पण नव्हती जाणवतं . आजचा दिवसच वाईट गेलाय . सकाळ पासून
तिला बघण्यासाठी जीव आसुसलाय आणि ती मात्र दिसायला तयार नाही . कालच त्यानी एक बुलेट
विकत घ्यायची ठरवलं , सेकंड हॅन्ड आहे , पण त्याच्या कमाईची पाहिलीच मोठी खरेदी .
तिला गाडीवर फिरायला घेऊन जायच दूरवर , पण तिची आई ती घेऊन जाऊ देईल का ? कोण जाणे
, आज वर्ष होत आलं त्याच्या आणि तिच्या मैत्रीला , मैत्री म्हणता येईल का ? तिच्या
अनुपस्थितीत त्याला खुप गोष्टी खटकायच्या , विचित्र वाटायच्या तिच्या बाबतित पण
... जेव्हा ती समोर असे तेव्हा मात्र सगळे जर- तर ,शंका - कुशंका , पडणारे प्रश्न
जणु आपोआप विरघळून जायचे . इतके दिवसात साधं तिच नाव विचारणं जमलं नव्हतं त्याला
बाकी तर दूरचीच गोष्ट . अक्षरश: गारुड होत तिच त्याच्या मनावर . तिच्या वासा -
श्वासात ,गंध - स्पर्शात , त्या डोळ्यांच्या खोल डोहात तो कधी कसा विरघळून जात असे
, त्याच त्यालाच कळत नसे .
विचार करता करता केव्हा झोप लागली कळलं नाही
त्याला . काल ती आलीच नाही का ? की मला झोप लागुन गेली आणि ती आली तशी निघुन गेली
? कोण जाणे सकाळ पासून तो सारख खाली डोकवून बघत होता ती कुठ दिसते आहे का ? शेवट
उशीर व्हायला लागला तसा तयार होऊन निघाला . बघू संध्याकाळी नाहीच दिसली तर सरळ
घरात जाऊन विचारू . आज तो सगळे पैसे देणार होता आणि गाडी त्याला मिळणार होती . आज
संध्याकाळी मी जेवायला येणार नाही . त्यानी राजुला गेल्या गेल्या सांगून टाकलं .
आज त्यानी ठरवलंच होत , तिला घेऊन बाहेर जेवायला जायच आणि लग्ना विषयी पण स्पष्ट
विचारायच .
एकदा ती हो म्हणाली की घरी सांगायच आणि मग पुढे ... दिवा स्वप्नात
रंगुन गेला तो . एवढ्यात ज्याची बुलेट घेणार होता तो आला . सगळा व्यवहार पूर्ण
झाला . " साहेब गाडी एकदम उत्तम स्थितीत आहे . तरी पण तुम्ही म्हणालात म्हणून
सर्व्हिसिंग करून दिली आहे . पैशाची गरज नसती नं तर विकलीच नसती बघा मी "
राजुला पैसे देऊन नारळ आणि पेढे आणायला पाठवलं त्यानी . खर म्हणजे गाडीची पुजा
तिच्या हातून करायची इच्छा होती त्याला , पण अजुन तिच्या विषयी कोणालाच काहीच
सांगितलं नव्हतं त्यानी . तेव्हा आधी पुजा करायची साहेबांची सुचना त्याला मानावी
लागली . आजच्या दिवस अर्ध्या दिवसाची रजा द्या म्हणाला तस साहेबांनी पण
मोठ्या मनानी त्याला सुट्टी दिली .
आता घरी जायच आणि तिला घेऊन निघायच , आधी एखाद्या मंदिरात मग
ती म्हणेल तिथ . मग जेवण करूनच रात्री घरी परत आपल्याच विचारात तो गाडी
चालवत होता रस्ता जरी सवयीचा होता , तरी गाडी सवयीची नव्हती आणि आपल्याच विचारात
गुंग असल्या मुळे समोरून येणारी सायकल रिक्षा आधी त्याला दिसली नाही , की तो
वाजवत असलेली रिंग त्याला ऐकू आली नाही . गल्ली छोटी होती ओरडण्याचा आवाज ऐकू आला
आणि तो सावध झाला , अचानक समोर सायकल रिक्षा आणि बाजुला पायी जाणारी मुल , गाय या
सगळ्यांना चुकवण्याच्या नादात त्याची गाडी जोरात एका घराच्या भिंतीवर आदळली आणि तो
उंच हवेत उडाला आणि दाणकीनी रस्त्यावर आपटला . मोठा आवाज झाला तसे आजुबाजूच्या
घरातुन लोक धावत आले . त्याची गाडी स्पीड मध्ये होती , आणि चालवतांना त्याच अजिबात
लक्ष नसावं ,जेव्हा लक्षात आल गाडी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात.. सगळं इतक पटकन
झालं .
लोक आपसात एकमेकांना माहिती देत होते . तो उठून उभा राहिला , त्याला काही
कळत नव्हतं इतका तो गोंधळला होता . पडला तर जोरात होता , पण कुठ लागलं नसावं कारण
दुखत अजिबात नव्हतं . तेवढ्यात त्याच्या खांद्यावर स्पर्श झाला , त्याचा दंड पकडला
, तोच तो ओळखीचा स्पर्श त्यानी बघितलं तिच उभी होती त्याच्या बाजूला . खुप आनंद
झाला त्याला त्याही स्थितीत , आज जवळ जवळ दोन दिवसांनी दिसली होती ती त्याला
. पण तिच्या चेहऱ्यावर दुःखी भाव होते . त्यानी तिचा हात थोपटला मी ठीक आहे मला
काही झालं नाहीये , काळजी करू नको तो म्हणाला . अचानक तो ओढला गेला . त्यानी तिचा
हात घट्ट पकडला काय होतंय त्याला कळत नव्हतं...
आजूबाजूच्या लोकांनी पोलिसात कळवलं , पोलिसांची
गाडी आली त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी गाडीत ठेवलं , त्याचा नीचेष्ट देह
पाहून बहुदा तो मेला असावा , असंच सगळ्यांना वाटलं . अचानक तो थांबला आपण कसे काय
आणि कुठ ओढले गेलो त्याला काही समजेनास झालं होत .त्यानी अजूनही तिचा हात घट्ट
धरला होता . त्यानी बाजूला बघितलं तो एका गाडीत होता आणि त्याच्या बाजूला ती ,
अचानक त्याच लक्ष तिथ ठेवलेल्या स्ट्रेचरवर गेल . स्ट्रेचर ? आणि त्यावर ... भयानक
धक्का बसला त्याला , ' 'तिथे तिथे मी ' तो तिला हलवून हलवून सांगत होता . जखमी
अवस्थेत पडलेल्या स्वतःलाच बघुन जबर धक्का बसला होता त्याला .तो इतका जखमी होता ,
तरी त्याला दुखत कस नव्हतं आणि मुख्य म्हणजे तो स्वतःला अस बाहेरून बघितल्या सारखं
कस काय बघू शकत होता . त्याच्या एकाही प्रश्नाच उत्तर त्याला मिळत नव्हतं . ती
मात्र त्याचा हात धरून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत होती .
आता तो ऑपरेशन टेबलवर होता . त्याला शुद्धीवर आणण्या
साठी बहुतेक शॉक देत होते का ? एक.. दोन.. तीन.. आकडे मोजले जायचे आणि एक झटका
दुसऱ्या की तिसऱ्या , कोण जाणे कितव्या झटक्याला तो पुन्हा अचानक खेचला गेला .
तिचा हात सुटला आणि त्याच्या डोळ्या समोरच ती जशी विरघळून गेली . त्याला तिला आवाज
द्यायचा होता , तिला थांबवायच होत पण कस ? त्याला तिच नाव तरि कुठ माहित होत .
छोटासाच काळ पण त्यातला कण अन कण , क्षण अन क्षण , अगदी प्रत्येक निमिष त्याला
स्पष्ट जाणवत होता , जणु त्याच्या पुरता तो अगदी संथ गतीने चालला होता . अचानक
वेदनांच एक मोहळ उठलं त्याच्या शरीरात . त्यानी एक दीर्घ श्वास घेतला , वेदनांनी
त्याचा चेहरा वेडावाकडा झाला . तशी ऑपरेशन थेटर मध्ये धावाधाव झाली . पुढचे उपचार
, ऑपरेशन आणि ते सगळं काही जे त्याला जिवंत ठेवण्यास आवश्यक होत . त्यासाठी
डॉक्टर, नर्सेस सगळ्यांनी अथक प्रयत्न केले आणि अक्षरश: त्याला मरणाच्या दारातून
खेचून आणलं . त्याचे आई बाबा त्याच्या बेडच्या बाजूला उभे आहेत आणि डॉक्टर त्यांना
सांगत आहेत . अर्धवट ग्लानीत ऐकलेली ती वाक्य . झाल्या घटनेचे मधेच त्याला आठवणारे
काही क्षण जे त्याच्या मेंदूनी टिपले होते . अगदी अपघात झाल्यावर त्याच्या जवळ
आलेली ती , तिथ पासून ते परत तो शुद्धीत येत होता तेव्हा क्षणात हवेत विरघळून
गेलेली ती . बेशुद्ध अवस्थेतलं त्याच बोलण ऐकून कोणालाच संदर्भ लागत नव्हता आणि
आता काही विचाराव तर . आता आत्ताच कसला ताण द्यायला अस वाटत होत . त्यावेळी अचानक
हजर होऊन त्याला आधार देणारी ती , त्याला भेटायला मात्र येत नव्हती . त्याला तिला
खुप काही विचारायच होत पण ....
हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला की लगेच आई बाबा
त्याला घरी घेऊन गेले . दीर्घ मेडिकल लिव्ह मिळाली त्याला . प्रयत्न करून बाबांनी
स्वतःची पोस्टिंग होती त्या गावी बदली पण करवून घेतली . आज रिलीव्ह होण्यासाठी तो
परत आला होता . आई बाबा पण बरोबर येतो म्हणाले पण आता मी बरा झालो आहे . एक किंवा
दोन दिवसांच तर काम आहे . मी एकटाच जाऊन येतो म्हणून हट्टानी तो एकटाच आला . त्याच
दिवशी त्याच सगळं काम करून तो परत जाऊ शकत होता पण...
" राजु मला रूमवर जाऊन माझं सामान वगैरे आणायला
हवं" " अहो कशाला साहेब मी आणुन देतो की तुम्हांला . " त्यानी परत
त्या गल्लीत जाऊ नये उगीच ते सगळं आठवुन त्रास झाला तर , अस वाटत होत राजुला . पण
महेश ऐकायला तयार नव्हता . शेवट राजु त्याला घेऊन गेला ." मी थांबतो इथ साहेब
. तुम्ही जाऊन सामान घेऊन या मग माझ्या घरी जेवायला जाऊ . मग रात्रीच्या गाडीला
बसवून देतो मी तुम्हांला ." " नको , तु मला डबा आणुन दे . मी आज इथंच
राहणार आहे . उद्या जाईन परत . सगळं भाड्याचा वगैरे हिशोब चुकता करून ." इथं
कशाला राहता आणि एक दिवस काम तर झालं आहे तुमच . तुमचे घरचे काळजीत असतील
." " सांगितलं आहे मी त्यांना . उद्या येणार म्हणून ." आता राजुचा
नाईलाज झाला . तो निघून गेला . घरमालकीण बाई आवाज ऐकून बाहेर आल्या . मधल्या काळात
इथं राहत नव्हता तरी आज पर्यंतच सगळं भाड द्यावं लागेल . त्यांनी आधीच सांगितलं .
" होय उद्या पर्यंतच देईन आज मी इथंच राहणार आहे .उद्या जाईन सामान घेऊन
.
जवळ जवळ अख्खी रात्र जागुन काढली महेशनी पण ती काही
आली नाही. दोन महिन्यां पूर्वी त्या दिवशी पाहिलं ते शेवटच . विचारण्या , बोलण्या
सारखं खुप काही होत . पण ती यायला तर हवी . एकदा वाटलं खाली जाऊन दार वाजवून
विचारावं तिच्या विषयी पण ... विचार करता करता मध्यरात्र झाली , मग पाहाट झाली .
रात्रभर जागलेल्या त्याचा अचानक डोळा लागला . कोणीतरी उठवत होत . खडबडून जागा झाला
तो . समोर पाहिलं तर मोलकरीण उभी होती . " साहेब आज तुम्ही जागा खालि करणार
नव्ह . म्हणुन मालकीण बाईंनी पाठवलं आहे . तुम्हाला काही मदत हवी असलं तर , मग मला
साफ करून घ्यायच आहे वरच . " हं ठीक आहे , तुम्ही जा खाली जाताना मी सांगेन
तुम्हाला . " थोडी घुटमळली ती " तस नाही साहेब इथं वर त्यांच पण सामान
आहे नं . तर त्यातलं काही तुम्ही , लई खडूस हाय वो ती बया . मला पण चांगल नाही
वाटत पण तुम्ही सामान आवरताना मला इथंच थांबायला सांगितलं हाय तीन . तिच पाय
दुखतात म्हणुन नाही आली स्वतः ती बया . ", राग आला महेशला पण काय करणार
.कोपऱ्यात खणात रचून ठेवलेल त्याच सामान काढायला गेला आणि अचानक एक फोटो फ्रेम
पडली खाली . काच फुटली होती तरी तशीच उचलून घेतली त्यानी . सरळ करून बघितलं तर....
ती ... तिच होती फोटोत आणि खाली लिहिल होत स्व.कु.झेलम आणि पुढ तारीख आणि वर्ष .
तो ज्या दिवशी इथं राहायला आला होता बरोबर तिच तारीख 13 एप्रिल 1983 ला रुजू झाला
होता तो आणि त्याच दिवशी इथं राहायला पण आला होता आणि फोटो फ्रेम मध्ये 13 एप्रिल
1982 हे अस लिहिल होत , याचा अर्थ काय ? तो पुरता चक्रावला , एकवर्ष आधीच , म्हणजे
तो जिला भेटला , बोलला , जिच्या प्रेमात पडला ती .. ती.. जे त्याला जाणून घ्यायच
होत ते हेच नव्हतं का ? या मधल्या कळत तो जेवढा त्या वर्षभराच्या काळाचा विचार करत
असे तेव्हा त्याला खर म्हणजे हे उत्तर मिळालं होत . नव्हतं का ? त्यांनी स्वतःलाच
तो प्रश्न केला . पण म्हणूनच तर सत्य काय ते कळण्यासाठीच तर तो इथं राहिला होता नं
. मन म्हणत होत सगळं खोट निघु दे किंवा खर असलं तरी एकदा किमान एकदा तरी शेवटच ती
भेटु दे पण... मागेच उभी होती शांता साहेब काही बोलत नाही पाहून शेवटी तिच म्हणली
" धाकल्या ताई आहेत त्या , म्हंजी होत्या . तुम्ही यायच्या एक वर्ष आधीच
विहिरीत पडुन... " तिच नाव ?" " झेलम ताई .त्त्यांच्या बाबांनी
ठेवलं होत . मिल्ट्रीत होते ते . कुठल्या तरी नदीच नाव हाय म्हण ते . ताईच बारस
झालं आणि लवकरच साहेबाला ड्युटीवर जावं लागलं . तिकडच गोळी लागून गेल ते .
छोट सहा महिन्याच लेकरू होत ते . तिच्या पायगुणा मुळच अस झालं , अस मोठ्या बाईंनी
लावून घेतलं मनाला आणि मग जो दुसवास स्वतःचीच पोटाची पोर पण सावत्र असल्या सारखं
वागायचि ही बाई तिच्याशी .झेलम ताई अगदी नक्षत्रावाणी सुंदर होत्या
नात्यातल्या कोणी मागणी घातली ,झेलम ताई पेक्षा वयानी मोठा होता पण आई पुढ बोलायची
हिंमत नव्हती पोरीत म्हणुन झाली तयार ,आता आईच्या जाचातून तरी सुटलं अस वाटलं होत
आम्हाला . पण इकडं यायला निघालेल वऱ्हाड बस दरीत कोसळली . नवऱ्या मुला सकट , बरेच
लोक मेले . मग तर काय बाईंनी अपशकुनी म्हणुन रोज बोल लावावे . एक दिवस सकाळी
कामाला आलो तर ताई गायब हायेत , घरात नाही म्हणुन कळलं . सगळीकडं शोधा शोध झाली ,
पण नाही सापडल्या . अन शेवटी या मागच्या विहिरीत ... कोणी म्हणत पाय घसरून पडली
असल , कोणि म्हणत आईच्या जाचला कंटाळून आमहत्या केली . कोणी म्हणत आईनीच .... खर
खोट देव जाण . पण पोर तर गेली , टिपूस नाही काढलं बघा आई म्हणवणारीन डोळ्यातून ,
ना कसली पुजा घातली . बिचारीची एक इच्छा पुरी केली नाही माय म्हणवणारीन . "
त्याला जवळपास रोज भेटणाऱ्या तिच आयुष्य इतक वेदनादायी होत . पाणी आलं
त्याच्या डोळ्यात . " पहा साहेब तुम्ही तर लेकराला भेटला बी नाहीत तरी
तुम्हाला नुसतं ऐकून वाईट वाटलं . आणि सख्खी आई असून तिच्या डोळ्यात
पाण्याचा थेंब नाही ."
कसबस स्वतःला सावरलं महेशनी . तिचा फोटो तरी सोबत
न्यावा अस त्याला वाटत होत पण समोर शांता बाई उभी असल्यामुळे त्याला ते पण शक्य
झालं नाही . खर म्हणजे घरमालकिणिच तोंड पण पाहायची इच्छा नव्हती त्याची . हिशोब
चुकता करून लगेच तिथुन निघाला तो . आयुष्यात पहिल्यांदाच कोणाच्या प्रेमात पडला
होता तो आणि ती ....
भाड चुकत करून गेट बाहेर पडला तर समोरच राजु उभा होता
." निघालात साहेब ? " " हो " स्वतःच्याच विचारात गुंग
उदास दिसत होता महेश . वाईट वाटलं राजुला त्याला तशा अवस्थेत बघुन . पहिल्यांदा
भेटला माणुस तेव्हा कसा आनंदी होता . गोरापान , उंच , अगदी रुबाबदार होता आणि
त्याला अशा अवस्थेत उतरलेला चेहरा . जखमांचे व्रण दिसत होते ,कपाळावर , हातावर
." साहेब आता इतक्यात बस नाही . एक पहाटे होती , ती गेली . घरी चला माझ्या
जेवण वगैरे करा . थोडी विश्रांती घ्या मग जावा ." " अरे नको तुला उगीच
त्रास कशाला ? " " त्रास नाही साहेब , मला तज्यड बोलायच पण होत . इथं
नाही बोलता येणार . चला नं घरी ." त्याच सामान राजुनी सायकलला अडकवलं
त्याच्या बरोबर चालत घरी आला .
" तुम्ही जेव्हा बेहोशीत होता नं साहेब , तेव्हा
कोण्या मुली विषयी बोलायचात , नाव नाही घेतलत कधी पण बहुतेक ती मुलगी तुम्हाला
इथंच भेटली अस लक्षात आलं माझ्या ." तो काही सांगतो आहे का स्वतःहून याचा
अंदाज घेत होता राजु . थोडा वेळ शांततेत गेला . महेशनी त्याला , खोलीत रहायला
गेल्या दिवशी त्याची झालेली पहिली भेट , तिथ पासून , काही गोष्टी वगळुन ,जे जे
घडलं ते सांगितलं . " तुम्ही मला तेव्हाच सांगितलं असत नं , तर . माझंच चुकलं
मी त्या दिवशी तुम्हाला रूमवर सोडून आलो , त्यादिवशीच ही म्हणाली . अहो सज कशाला
नेलत त्यांना तिथ राहायला , आज वर्ष झाल नव्ह का ताईला जाऊन . मला वाटतं त्याना आज
दुसरीकड राहायला सांगा . उद्या पासून जावा म्हणावं . पण मी विचार केला तुम्ही
शहरातून आलेली माणस अशा गोष्टीं वर तुमचा विश्वास नसणार . म्हणुन नाही बोललो मी या
विषयी तुमच्याशी ." "नेमक त्याच दिवशी तुम्ही तिथं . काय पुजा बिजा पण
नव्हती घातली हो , तरुण वयात गेलेली पोर , सगळ्या इच्छा अधुऱ्या राहिल्या तिच्या .
लग्नाच्या दारात उभी होती आणि ..." थोडा वेळ तिघेही सुन्न अवस्थेत बसुन होते
. राजुला त्याची बायको काही खाणा खुणा करून सांगत होती . तो संभ्रम अवस्थेत होता ,
बोलाव की बोलू नये . शेवटी बायकोनी भरीस घातल्यावर बोलला " एक गुरुजी आहेत
साहेब गावात लयी हुशार आहेत . यातलं सगळं कळत त्यांना . तुमचा अपघात झाल्यावर
ही आणि मी गेलो होतो गुरुजी कडे . ते म्हणले त्या मुलीच श्राद्ध वगैरे पण काही केल
नाहीये . त्रास तर होणारच . तुमच्यावर जीव जडला होता . आता जिवंत असती तर लग्न
केलच असतत की , तर तुम्हीच जर गुरुजी सांगतात ती पुजा केलीत तर . मुक्ती मिळेल हो
बिचारीला . तसाही तिचा पण जिवं जडला होता तुमच्यावर म्हणजे मनोमन तीन तुम्हालाच
..." महेशनी रोखुन बघितलं राजु कडे तसा तो चपापला आपण जरा जास्तच बोललो अस
वाटलं त्याला . थोडा वेळ महेश शांत बसला . " शेवटची गाडी कधी आहे इथुन .
म्हणजे ती पुजा आजच करून मी जाऊ शकेन का ?" तो तयार झाल्याच पाहून बर वाटलं
त्या दोघांना .
पुजा वगैरे करून बस स्टँड वर आला महेश . राजुनी सोडलं
त्याला .समोर उभ्या बस मध्ये जाऊन बसला . खुप दुःखी होता तो . सारखा फोटोतला तो
चेहरा आठवत होता त्याला . ती जर आज जिवंत असती तर , जगातली सगळी सुख मी तिला दिली
असती . ज्या प्रेमाची ती हकदार होती आणि त्यापासून तिला वंचीत ठेवलं तिच्या आईनी .
पण तो काय करू शकत होता ? काहीही नाही .तरी आज गुरुजींनी पूजा करवून घेतली
त्याच्या कडून . अल्प का होईना काहीतरी करू शकलो आपण तिच्या साठी अस वाटलं त्याला
. काही वर्षा पुफवी हे जर कोणी म्हणलं असत कर तर ,अर्थातच विश्वास नव्हताच त्याचा
या गोष्टींवर पण आज , आज त्यानी स्वतः जे अनुभव घेतले होते . तो नाकारू शकतच
नव्हता हे सगळं .आठवत होती ती त्याला निरनिराळ्या रूपातली , आता तिला कधीही बघु
,भेटु शकणार नव्हता तो .अपघाता नंतर त्यादिवशी हॉस्पिटल मध्ये शेवटचे ते काही क्षण
,तो शुद्धीत येत होता तेव्हा तिची व्याकुळ नजर आणि ओठांवर स्मित हास्य बस तिचा तो
चेहराच त्याला अधिक आठवतो आता आणि एकदम तिच दिसेनास होण ,जणु वातावरणात विरघळून
गेली ती . तेच तिच शेवटच दर्शन , हुंदका आला कंठाशी , धायमोकलून रडावं वाटत होत
त्याला . कुठून तरी तिनी यावं , त्याला घट्ट मिठी मारावी . यावेळी तो तिचा हात
सुटू देणार नव्हता हातातून पण...अश्रू ओघळले . बसुन राहिला तो तसेंच डोळे मिटुन
अचानक रातराणीचा तोच चिरपरिचित गंध आणि
घुंगरांची छुम छुम ऐकू आली . डोळे उघडून बघितलं तर सिट वर त्याच्या बाजूला एक
मुलगी बसली होती . पण ती ती नव्हती त्यानी डोळे मिटून घेतले . डोळे मिटून येणारा
गंध , घुंगरांचा नाद आणि वळणावर बस मध्ये शेजारी होणारे निसटते स्पर्श , डोळे
मिटून सगळं अनुभवत होता तो . ती तर आता कधीच मिळणार नव्हती त्याला .
घरी पोचला , दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती . "
लवकर उठ रे सकाळी पाहुणे यायचे आहेत . " आईनी सांगितलं तो इतका थकला होता की
कोण वगैरे काही विचारायच त्राणच उरलं नव्हतं त्याच्यात .
लग्नासाठी एक मुलगी सांगून आली होती . ते लोक यायचे
होते . " अग पण इतकी काय घाई आहे . " " अरे मुलगी छान आहे
दिसायला . अगदी आपल्या घरात रुळेल अशी . मावशीच्या ओळखीतल आहे कुटुंब . पत्रिका
वगैरे पण जुळली म्हणुन तुला फोटो वगैरे दाखवायला सवडंच नाही मिळाली . आज आता
प्रत्यक्षच बघ .
पाहुणे आले , तस आईनी आवाज दिल्यावर तो ही बाहेर येऊन
बसला . रातराणीचा मंद गंध , त्यानी खोल श्वास भरून घेतला आणि समोर बघितलं तर ..
तिच .. कालची बस मधली मुलगी तिनी पण त्याला ओळखलं होत , तोच मुलगा जो पूर्ण
प्रवासात डोळे मिटून बसला होता . दोघांच्या चेहऱ्यवर ओळखीच हसु होत . तिच्या
बांगडीला घुंगरू लावले होते . दरवेळी ती पदर सावरायची तेव्हा तिच गोड रुण - झुण ,
तो नाद , तिच मोहक हास्य आणि रातराणीचा गंध . अत्तर होत म्हणे जे तिला खुप आवडत ,
म्हणुन ती लावते . बोलण्याच्या नादात तिची आई सांगत होती . इथं मिळत नाही . "
कुठेसं तिच्या वडिलांना मिळालं होत आणि तिला इतका आवडलं आता तिच्या साठी आणतात ते
. आमच्या दारात रातराणी आहे . लावू नये म्हणतात सापाची वस्ती असते वगैरे पण ही
लहान होती तेव्हा यांनी आणलेलं कुठूनस ते रोप रुजल अंगणात आणि आता हिच्या मनात .
" आपण जरा जास्तच बोललो असं वाटून झेलम ची आई शांत बसली . हो झेलमच नाव होत
तिच , नदीच नाव , वेगळं नाव ठेवायच या आवडी पायी ठेवलं तिच्या बाबांनी
.
नाही म्हणावं असं काहीच नव्हतं तिच्यात . आई बाबांना
आवडली तशी त्यालाही आवडली होती ती . लग्न ठरलं , तस कधी खरेदी निमित्तान अधून मधून
गाठी भेटी होत होत्या त्त्यांच्या . अशाच एका भेटीत तिनी त्याला विचारलं . त्या
दिवशी बस मध्ये म्हणजे राग मनु नका प्लिज पण तुम्ही खुप दुःखी , उदास वाटत होतात ,
काही झाल आहे का ? महेशनी तिच्या कडे पाहिलं हिला सगळं खर सांगाव ? ही विश्वास
ठेवेल की नाही माहित नाही पण .. आणि अगदी सुरुवाती पासून त्यानी तिला सगळं
सांगितलं ," तिच नाव पण झेलमच होत " थोडा वेळ दोघंही शांत बसले होते .
" अद्भुत आहे सगळं आणि आश्चर्यकारक सुद्धा , हलकस स्मित करून म्हणाली ती
" म्हणजे शेवटी तुमच्या नशिबात ही नाही तर ती झेलमच होती म्हणा की "
" हं झेलम , एक नदी जी सगळ्यांच आयुष्य समृद्ध करते आणि स्वतःच दुःख त्या
अवखळ लाटांच्या आड लपवते , खळाळत वाहते ." " आताशा तिचा चेहरा पण
मला नीटसा आठवत नाही .पण एक ठसा आहे माझ्या मनावर , तो ही धुसर होत चालला
आहे . " " हं , कारण त्याची जागा आता ही झेलम घेत आहे . हो नं "
त्यानी मान डोलवली , हे सहजच बोलले मी , पण खर सांगू काळ हे औषध असत प्रत्येक
गोष्टीवर आणि कोणतीही गोष्ट सकारण घडत असते . मला वाटत तुमच तिच्या संदर्भातलं
कर्तव्य तुम्ही पूर्ण केलत . म्हणुन आता तिची स्मृती पुसट होते आहे. लेट हर गो .
जाऊद्या तिला अडकवु नका तुमच्यात." तो कौतुकानी बघत होता तिच्याकडे "अस
काय बघताय." "किती समंजस आणि हुशार आहेस तु , मी भाग्यवान आहे . माझ्या
आयुष्यात झेलम आली आहे ,आभासी नाही , खरी खुरी ." त्यानी तिचा हात हातात
घेतला . त्यावर ओठ टेकले लव्ह यु " तिचा लाजरा चेहरा न्याहाळायचा होता त्याला
पण ती त्याच्या मिठीत शिरली ...' महेश आणि झेलम ' तर अशी त्याची प्रेम कथा सुफल
झाली .
समाप्त
© सौ अनघा बेडेकर
सदर कथा
अक्षरधन आणि
वेलवेट कविशा यांनी
आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील
आहे. या
कथेतील आशय,
विषय, मांडणी ही
सर्वस्वी लेखकांची आहे.
यातून कोणाच्या भावना
दुखावण्याचा हेतू
नाही. या
कथेचे हक्क
लेखकाकडे कायमस्वरूपी आणि
वेलवेट कविशा यांच्याकडे
३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव
आहेत. परवानगीशिवाय कुठेही
प्रकाशित करू
नये.
disclaimer
सदर कथा
अक्षरधन आणि
वेलवेट कविशा यांनी
आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील
आहे. या
कथेतील आशय,
विषय, मांडणी ही
सर्वस्वी लेखकांची आहे.
यातून कोणाच्या भावना
दुखावण्याचा हेतू
नाही. या
कथेचे हक्क
लेखकाकडे कायमस्वरूपी आणि
वेलवेट कविशा यांच्याकडे
३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव
आहेत. परवानगीशिवाय कुठेही
प्रकाशित करू
नये.

4 Comments
मस्त
ReplyDeleteधन्यवाद
DeleteSuspense कथा सारखी . छान
ReplyDeleteखूप आकर्षक मांडणी... उत्कंठा वाढविणारी कथा...
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box