अंजू
© Velvet Kavisha
एकदा मैत्रिणीला फोन केला. उचलला नाही. यावेळी खरंतर ती घरी असते. चहापाणी ही झालेलं असतं तिचं. फोन का बरं उचलत नाही. पुन्हा फोन केला तरीही नाही उचलला. शीऽऽऽ काय वैताग आहे. आपल्याला एखाद्या मैत्रिणीशी खुप बोलावंसं वाटतं आणि ती फोन उचलत नाही म्हटल्यावर त्रागा होतोचं... खरं तरं ही माझी अशी मैत्रीण आहे की, मी काढलेली आठवण तिच्यापर्यंत पोचते, जाणवते आणि ती लगेच कॉलही करते. पण आज केलेला फोन ही उचलत नाही म्हटल्यावर आधी राग आला नंतर काळजीही वाटली.
डोक्यात चित्र विचित्र विचार सुरू असतानाच तिचा कॉल आला. उचलल्याबरोबर "पार्लरमध्ये आहे. करते गं call तुला" म्हणत तिने फोन ठेवला. मला हुश्श झालं. थोड्या वेळात तिचा फोन आला...
"अग, फेशियलचं क्रीम लावलेलं चेहऱ्यावर. म्हणून बोलता नाही आलं तुझ्याशी... पण तीन-चार मिस्ड् कॉल पाहिले आणि कॉल केला." तिने फोनवर स्पष्टीकरण दिलं.
"कुठे अंजूकडेच गेली होतीस का?? ..... बरी आहे का ग ती...???" मी सहज चौकशी केली.
"अंजूकडे नाही. अंजू गेली ना गं..! कँन्सरने. चार वर्षे झाली. " ती.
"बापरे... काय सांगतेस.?? पण कँन्सर कसा काय..?? " मी.
"गर्भाशयाचा कँन्सर झाला होता. निदान होईपर्यंत तिसऱ्या स्टेजला गेलेला... खुप हाल झाले ग तिचे.. " मैत्रिणीने सांगितलं आणि अंजू माझ्या डोळ्यासमोर आली...
अंजू ब्युटिशिअन होती. दिसायला शिडशिडीत, नाजूक आणि खुप सुंदर. गोरेपणा तर अतोनात. "मस्तानी कदाचित अशीच दिसत होती असेल" असं उगाचच वाटून जायचं तेव्हा. नाजूक आवाज, अदबशीर वागणं, बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास. सौम्य तरीही बिनधास्त वागणं बोलणं. घरीच पार्लरच सेटअप. छान रिस्पॉन्स होता. कस्टमरला ही परवडणारे दर. Bridal make up मध्ये कोणी हात नाही धरणार तिचा... नवऱ्याचं जेन्टस् पार्लर.. दोन मुले. सुखवस्तू कुटुंब..
ती कलकत्याची. म्हणजे बांगलादेशच्या बॉर्डरवरची. मुंबईत कोणत्यातरी नातेवाईकांकडे होती राहायला. तिथेच ओळख होऊन प्रेम झालं. मग लग्न. नवरा महाराष्ट्रीयन. अशी थोडक्यात माहिती.
माझं लग्न ठरलेलं. मेक अपचा खर्च नवऱ्याने दिलेला. मला बजेटमध्ये चांगली पार्लर वाली शोधायची होती. जी होम सर्विस देईल. चौकशी करताना मैत्रिणीच्या मैत्रिणीने "अंजू"चं नाव सुचवलं.
मी आणि माझी मैत्रीण तिच्याकडे गेलेलो. तेव्हा तिला पहिल्यांदा भेटले. एकदम मधाळ आणि लाघवी बोलणं. नवरीच्या घरी जाऊन मेकअप करण्यावर तिचा भर. आम्ही भाड्याने राहायचो. रुम लहान होती. घरी पाहुणे ही येणार होते. त्यामुळे अंजूच्या घरी जाऊन सगळं करायचं ठरलं. मैत्रीण माझ्यासोबत होती. माझ्या लग्नासाठी तिने पाच दिवस रजा टाकलेली.
सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तीन दिवस मी अंजूच्या घरी. फेशियल,ब्लीच, वॅक्स, मेहंदी, मेक अप ट्रायल.. बाब्बो... तीन दिवसांत असं बरंच काही बाही करत होतो. तिन्ही दिवशी माझी मैत्रीण होती माझ्यासोबत.
अंजुला बऱ्याच मैत्रिणी होत्या. या तीन दिवसांत मैत्रिणी घरी येऊन गेल्या. एका बाजूला माझं सगळं करत असायची. आणि दुसरीकडे गप्पा रंगायच्या. गप्पांमध्ये विषय खतरनाक.
"अरे वो बंदा फुल्लं बॉडी बिल्डर यार.... क्या है यार वो... उसके पिछे बुलेट पें बैठती हुॅं तो इतनीसी दिखती हुॅं रे.."
"कभी मिलवा भी दे उसीसे ." म्हणत दुसरीने डोळा मारला.
"तुझे वो ××× पता है क्या..? खारीगांव में जीम नहीं क्या उसकी.... हां... पुॅंछ रहा था 'कोई है क्या' कर के..?? इंटरेस्टेड रहेगी तो बता दे.." तिसरी.
आणि मग "अरे वो नहीं क्या", "अरे वो तो", "अरे वो ना" करत त्यांच्या गप्पा होत राहायच्या.
देवा रे देवा !!! यांच्याकडे बरेच "वो" 😂😂 पण आपल्याला काय त्यांच्याशी... ज्याचं त्याचं आयुष्य आहे... ज्याला ज्याच्यात सुख मिळतंय तसं जगतो जो तो... कसं ही जगेनात का.... आम्हां काय त्याचे..!!
खरंतर माझे कान पकले होते. पण करता काय राव... एकतर वाजवी दरात पार्लर उपलब्ध झालेलं. आणि दुसरं म्हणजे माझं लग्न होतं ना. आपल्याला काय आयुष्य नाही काढायचं इथे. तीन दिवसांचा तर प्रश्न आहे. असं स्वतःला समजावत केलं सहन कसं बसं.
तिसऱ्या दिवशी अंजूला काय झालं काय माहिती नाही. माझी माहिती विचारली अगदी सहजच. नवरा काय करतो. जॉब कुठे करतो. माहेरचं, सासरंच विचारलं. नेहमीप्रमाणे मला जेवढं सांगायचं असतं तेवढंच सांगितले. बाकी माहिती नाही सांगून टाकलं.. तुम्ही विचारलंत आणि मी सगळं सांगितलं असं होतं नाही.
"अच्छा है रे.. अभी तेरे गलें में लायसेन्स आ जाएगा ..।" अंजू.
"हां".... मी
"तुझे कुछ problem नहीं बाद में..." अंजू.
" हँ..?? " मी.
मंगळसुत्र घातल्यावर काय प्रॉब्लेम नसणार होता. मला तिचा प्रश्न कळलाच नाही. आई वडील ही धनाची पेटी सांभाळतात परकी म्हणून. साधारण मंगळसूत्र गळ्यात असलेली बाई पाहून तितकंस कोणी फंदात पडत नाही. अशी समज असलेली मी. हॅं नंतर "हां" असं म्हणत गप्प बसले.
"अरे, हम एकदम secure हो जाते है शादी के बाद..।" अंजू ने सांगितलं.
"हां".... मी.
"मतलब कुछ भी करने का और पति के नाम पे डाल देने का.." तिने तिचं म्हणणं पुढे रेटलं.
आता हिच्या "कुछ भी" मधलं कुछ कुछ माझ्या लक्षात आलं. दोन दिवस इतक्या चर्चा ऐकल्या होत्या त्यांच्या. त्यामुळे सोपं गेलं समजायला.
च्यामारी!! एवढं अगाध ज्ञान.... ते ही मला.??
अहो, मी तीच बाई आहे, जी या बाबतीत दोरीलाही साप समजते. कोणत्याही पुरुषाला हाक मारताना "भाऊ" म्हटल्याशिवाय आपलं तोंड उघडत नाही. अजूनही एखाद्या मैत्रिणीने.. " ए तुझा भावोजी बघ, विचारतोय येतेस का फिरायला.." असं गमतीत म्हटलं तरी धडकी भरते मला...
बाकी तुम्ही मला दादा कोंडकेंसारखं व्दि-अर्थी बोलायला सांगाल तर पक्के हरणार...
हे अंजूच म्हणजे काहीच्या काहीच ना राव... माझ्या मैत्रिणीसाठीही हे सगळं नवीनच... तिने अंजूला सांगितलं.. " अंजू इसके साथ ऐसी बातें मत कर.. उसको पसंद नहीं... गाली खायेगी तु.... तु काम सें काम रख।".... विषय संपला.
त्यानंतर अंजू मला कधीच काही बोलली नाही. लग्नात आलेली. माझं सगळा मेकअप, साडी सगळं करून बाकी असलेले पैसे घेऊन निघून गेली. "चाय से किटली बढियाँ " तशी परिस्थिती. बऱ्याच नातेवाईकांनी अंजूला पाहून "कुठून पकडून आणलीस गं ही पांढरी पाल" म्हणून ही विचारलं...
तुम्हांला सांगते. तिच्या घरात फॅमिली फोटो पाहिलेला. त्यावरुन नवरा बरा होता दिसायला. तिच्या मैत्रिणी बऱ्यापैकी चांगल्या घरातल्या वाटल्या. पण "अरे, वो बंदा" वाला हा घोळ काही केल्या लक्षात येईना. शेवटी ज्यांच्या घरी राहायला होतो, त्या काकूंना सगळं सांगितलं.
काकू म्हणाल्या - " या जेवल्यानंतर भुक लागणाऱ्या बायका. घरच्या थाळीत यांच पोट भरत नाही. मग ही मंडळी good - better-best थाळी शोधत फिरते. थाळी सगळीकडे सारखीच. थोडी सजावट वेगळी असेल इतकंच. यांचा शोध थांबत नाही आणि यामध्ये बरीचशी hotels मालकासहीत उध्वस्त होतात. " (काकूंनी वेगळ्या भाषेत सांगितलं होतं.. इथे मी सोप्या भाषेत लिहिते जरा... म्हणजे या बायका समाधान शोधण्यासठी कोणत्याही थराला जाणाऱ्या. यांच्या वावटळीत जो पुरुष येईल तो घरादारासहित उध्वस्तच. ) मी शॉकात.
म्हणजे हा "Extra marital relationship"चा मॉडर्न प्रकार. यात एकच अफेअर नाही. बरीच अफेअर्स वगैरे. Extra पेक्षा पण Extra. काय बोलायचं.
मी मैत्रिणीला सांगितले. तिलाही हे नवीन. ती फक्त महिन्यातून एकदा eyebrows आणि दोन महिन्यात फेशियल करायची. तेवढाच तीचा संबध पार्लरशी... पण तिच्या लक्षात आलं. पार्लरच्या नावाखाली हल्ली बरेच प्रकार सर्रास चालतात. यात अविवाहित मुलींपेक्षा बायकांना वापरलं जातं. अर्थात त्यांच्या मर्जीनेच.
माझं लग्न झालं आणि मग रुमसुध्दा बदलली. त्यामुळे त्या बाजूला जाणं झालं नाही. मैत्रीण मला माझ्या ऑफिसबाहेर भेटायची. लग्नानंतर मी अंजूला पुन्हा भेटले नाही कधी. आज अचानक तिच्याबद्दल ऐकुन सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
कँन्सरने कशी काय गेली. उगाचच उत्तर मिळाल्यासारखे वाटलं. आणि त्यातूनही प्रश्नच उभे राहिले.
कदाचित देवाने शिक्षा दिली असेल का..?? की उध्वस्त संसारांचे शाप..?? की सत्वशील स्त्रियांचे आक्रोश...
बाब्बो.... पहिल्यांदा असं झालं की, कथेला नाव सुचत नव्हतं. "भुकेलेल्या बायका", "अशीही भूक" अशी दोन-चार नावं सुचल्यानंतर कथेची नायिका "अंजू" म्हणून कथेलाही तेच नाव दिलं.
© Velvet Kavisha
साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तेव्हा नावासहीतच शेअर करा.
फोटो गुगल साभार
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box