नीता
(लग्नबाह्य संबंध- Extra marital affair)
© Velvet Kavisha
नीता एका खेडेगावात लहानाची मोठी झालेली. शिक्षण बारावी. गावाहून लग्न करून ती मुंबईत आलेली. नीता २१ वर्षांची तर सुहास २४ वर्षांचा. नेव्हीमध्ये कामाला. निता सासुसोबत राहायची. सासू फार चांगली होती. पन्नाशीच्या आसपास वय. स्मिता आणि सुहास दोनच मुलं त्यांना. सहा वर्षांपूर्वी स्मिताचं लग्न झालं. तिलाही दोन मुलं आहेत.
सासरे रेल्वे पोलिस दलात नोकरी करत होते. चार वर्षांपूर्वी हार्ट ॲटॅकने गेले. त्यांना जाऊन तीन वर्षे झाली आणि तिच्या सासुबाईंनी सुहाससाठी मुलगी पाहायला सुरुवात केली. बऱ्याच मुलींना नवरा बाहेरगावी असला तरी चालणार होतं पण त्या सासूसोबत राहायला तयार नव्हत्या. त्यांना लग्नानंतर सुहाससोबत राहायचं होतं. आणि ते शक्य नव्हतं.
नीताला, तिच्या घरच्यांना सगळं मान्य होतं. परिस्थिती बेताची होती.
गावीच लग्न झालं आणि आठ दिवसांनी नवीन जोडप्यासह तिघेही मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर अठराव्या दिवशी सुहास ड्युटीवर निघून गेलेला. पहिल्या सहा महिन्यांत पाहुणे रावळे झाले. निताही छान मनसोक्त महिनाभर माहेरी राहून आली.
पुन्हा सहा महिन्यांनी महिनाभर रजा घेऊन सुहास आला. लव्ह बर्डस् सगळीकडे फिरले. दोघांनीही छान जगून घेतलं. सुहासने एक एक क्षण वेचून घेतला. रजा संपवून सुहास ड्युटीवर रूजू झाला.
घरात पुन्हा दोघीच सासूसून. दोघींचं कामं ते किती असणार घरात. कामं लवकर संपायची. दिवसभर घरात बसून नीता कंटाळायची. टीव्ही आणि सिरीयल्स तरी किती बघणार.
मग दोघी संध्याकाळी भाजी मार्केटमध्ये. येताना तबेल्यातून दूध आणायच्या. थोडं चालून सोसायटीच्या गार्डनमध्ये बसायच्या. मैत्रिणींशी, आईशी तेव्हाच गप्पा व्हायच्या नीताच्या. रात्री साडेआठला जेवणं झाली की भांडी घासून दोघी निवांत. दहाला टिव्ही बंद करून झोपायच्या.
सासूला वाटलं, आपला मुलगा देशसेवा करतोय. आपली सूनबाई दिवसभर घरात कंटाळून जात असेल. उर्मिलेचं जगणं आलंय जणू सूनेच्या वाट्याला. पैशाची काही कमी नव्हती. सासुलाही चांगली पेन्शन मिळत होती. सासूने स्टेशनजवळच्या नर्सिंग इंन्स्टिट्युटमध्ये नीताला ॲडमिशन घेऊन दिली. तेवढीच रमेल त्यात असा विचार केला.
नीता नियमितपणे घरचं सगळं आवरून जाऊ लागली. तिलाही शिकण्यात मजा वाटे. अठरा जणांची बॅच होती. काही ब्रदर्सही कोर्स करणारे होते. सगळ्यांशी छान गट्टी जमली. नीता छान रमली. तीन महिन्याच्या ट्रेनिंग नंतर नीताला आणि तिच्या बॅचमेटला एका हॉस्पिटलमध्ये ड्युटी सुरु झाली. ही ड्युटी इन्स्टिट्युटकडूनच होती.
इन्स्टिट्युटमध्ये तीन महिन्यांत जे शिकवलं होतं, ते आता प्रॅक्टिकली करायचं होतं. बॅचमेट सोबत होती म्हणून नीता ही बिनधास्त होती.
हॉस्पिटलमध्ये घडणारे किस्से रोज सासुबाईंना येऊन सांगायची. कधी ईमर्जन्सी तर कधी डोकं खाणारे पेशंट. सिनिअर स्टाफचं ज्युनिअर्सशी वागणं आणि बरंच काही. दोघींच्या गप्पा रंगायच्या. नीता खुप खूश होती. सासू ही स्वत:वर खुश.
थोडे दिवस गेले आणि नीताचं वागणं बदललं. फोनवरचं बोलणं वाढलं. तासन् तास बोलण्यात जाऊ लागला. सासूने एक दोनदा विचारलं तर इन्स्टिट्युटमधल्या मैत्रिणींशी बोलते म्हणून सांगितलं. एक दोनदा खरंच मैत्रिणी होत्या. सासूबाईंशी बोलल्या ही त्या.
नीता मात्र दिवसांगणिक बदलत होती. "आज या मैत्रिणीकडे, उद्या त्या मैत्रिणीकडे, कधी इन्स्टिट्युटमध्ये थांबवलं, कधी हॉस्पिटलमध्ये. अशी कारणे देऊन घरी उशिरा येऊ लागली. सासूने खरं मानून विश्वास ठेवला.
सुहास सुट्टीत घरी आला. नीताचं वागणं त्याच्या लक्षात आलं. मित्र-मैत्रिणी असतील असं वाटून त्याने दुर्लक्ष केलं. आपल्याशिवाय एकटी राहते. मित्र मैत्रिणींमुळे एकटेपण कमी होईल तिचं. त्याने निताला महिनाभर सुट्टी घ्यायचा आग्रह केला. तिने पंधरा दिवसांची रजा घेतली.
नीता त्याच्या येण्याने तितकीशी खुश वाटली नाही. आपल्याला टाळतेय की काय असं वाटू लागलं. त्याने आपल्या मनाचे खेळ सगळे म्हणून स्वत:लाच दोष दिला.
एकदा त्याला झोपेत मधूनच जाग आली. नीता बाजूला नव्हती. तिचा कानोसा घेत तो किचनपर्यंत आला आणि तिचं बोलणं कानी पडलं. "अरे तो थोडे दिवस आहे इथे. तोवर जास्त बोलता येणार नाही तुझ्याशी. एकदा का तो गेला की मग मी तुझीच आहे..."
हे ऐकताच तो दचकला. खुप मोठा शॉक होता त्याच्यासाठी. तरीही काही न बोलता रोजच्यासारखा वागत राहिला. एक दिवस तिचा मोबाईल वापरायच्या निमित्ताने घेत त्याने एक app विकत घेऊन इंस्टॉल करून hide केलं. त्या app मुळे त्याला तिच्या फोनचं रेकॉर्डिंग मिळणार होतं. सुट्टी संपली तशी तो ड्युटीवर निघून गेला.
नीताचं बेताल वागणं अधिकच वाढलेलं. सासूच्याही लक्षात येऊ लागलं पण त्यांनी दुर्लक्ष केलं.सुहास दोन दिवसांची सुट्टी घेऊन आला. न कळवता. तिच्या हॉस्पिटलमध्ये गेला तर ती ड्युटी संपवून घरी गेली सांगितलं.
घरी पोचला तर ती घरी नव्हतीचं. ती खूप वेळाने घरी पोचली. सुहासकडे सगळं रेकॉर्डिंग होतं. त्याने थेट तिला प्रश्न केला. - - "तुझं नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील रोहन नावाच्या मुलासोबत अफेअर आहे का..?? तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा Lodge वर गेलेले आहात. इन्स्टिट्यूटमधून सुट्टी घेऊन."
त्याच्या अंदाजानुसार ती नाहीच म्हणाली आणि "तु काही ही बोलतोय. तुझ्याकडे काय प्रुफ आहे ते सांग.." म्हणू लागली. त्याने मोबाईलमधील app काढून त्यावरचं रेकॉर्डिंग ऐकवलं. तिच्या मोबाईलमध्येही दाखवलं. मोबाईल नंबर, वेळ, duration आणि आवाजासहीत.
ती गप्प राहिली. काहीच बोलली नाही. तिला ह्या ॲपबद्दल काहीच माहिती नव्हतं. सुहासकडे तर सगळेच प्रुफ होते. त्याने खुप आरडाओरडा केला. " तु फसवलंस, विश्वासघात केलास. एका सैनिकाची पत्नी तु. आम्ही देशसेवा स्विकारली तरी माणसंच ना आम्ही. उद्या तुझ्या माहेरी फोन लाव. त्यांना बोलावून घे. विचारतो त्यांना." असं आणि बरचं काही बोलत ढसाढसा रडू लागला. रडता रडता कपाटातून ड्रिंक्स काढून घेत एकामागे एक ग्लास रिकामे करत सुटला. जिथे पित बसला होता तिथेच झोपला. बेशुद्ध पडल्यासारखा.
नीताला भीती वाटत होती. गावाहून आई वडील आणि मध्यस्थ आले तर काय होईल आपलं. तिने रोहनला फोन करून सगळं सांगितलं. त्याने तिला आयडिया दिली.
त्याप्रमाणे नीताने सुहासच्या मोबाईलवर त्याचे फिंगरप्रिन्टस् घेऊन मोबाईल ऑन केला. त्यातलं app, त्याचा user id आणि details बदलले. सगळी history "permanently delete" ऑप्शनवर क्लिक करून never need to recovery ऑप्शन निवडला. ॲप डिलीट केलं. स्वतःच्या मोबाईलमधूनही सर्व डिलीट केलं. स्वतःसाठी सगळं सेफ केल्याची खात्री झाल्यावरच ती झोपली.
सकाळी सुहास उठला ते निश्चय करूनच. हिला डिवोर्स द्यायचाच. त्याआधी तिच्या घरच्यांना बोलावून घेतलं. सगळ्यांसमोर नीताने माझं काहीच चुकलं नसल्याचं सांगितलं. सुहासने प्रुफ दाखवायचा प्रयत्न केला पण असफल. सगळं गायबच. सुहासला आणि त्याच्या आईला दोष दिला गेला.
नीताने डिव्होर्स साठी होकार दिला. मात्र डिव्होर्ससाठी तिने लग्नाचा खर्च, दागिने आणि काही रक्कम मागितली. सुहासकडे दोनच पर्याय होते. एकतर जे मागतेय ते देऊन डिव्होर्स घ्यायचा किंवा नीताला माफ करून संसार पुढे रेटायचा.
दुसरा पर्याय त्याला स्वत:लाच नको होता. एवढ्या मोठ्या फसवणुकीनंतर नीता सोबत संसार करणं अशक्य होतं. त्यामुळे दागिने, पैसे यांची पुर्तता करून डिव्होर्स झाला. एकतर विश्वासघात. त्यात चोर तो चोर आणि वर शिरजोर. आजुबाजूला, गावी सगळीकडे बातमी पसरली. कुजबुज सुरुच.
नीताचं पुढे काय झालं ते कळलं नाही. सुहास मात्र खचला. चार वर्षे झाली या गोष्टीला. पण विश्वासघाताने पोळलेला सुहास दुसरं लग्न करायला तयार नाही. बापाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले मायलेक कोसळले. सुहासची आई चिंताग्रस्त. बीपी आणि शुगरचा त्रास सुरु झाला. एका फसलेल्या क्षणांत दोन आयुष्य उध्वस्त झालीत. सुहासच्या आईचा एकच ध्यास आता. सुहासचं दुसरं लग्नं. लग्न म्हणजे सुहासला तो जुगार वाटतोयं.
वाचकहो, ही कथा एका मैत्रीणीने सांगितली आणि मी लिहिली. नावं आणि संदर्भ बदलला आहे आशय मात्र तोच.
माझं मत विचाराल तर नीताने संयम दाखवणं गरजेचं होतं. शरीर, इंद्रिये वेळोवेळी बंड करून उठतीलही, पण त्यापेक्षा ती एक वीरपत्नी होती याचं भान असणं गरजेचं आहे. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणेचं उचित नाही का...??? माझं मत तुम्हांला पटलंच पाहिजे असं नाही. तुमचं मत काही वेगळं असू शकतं. तुमच्या मताचा नक्कीच आदर आहे...
©Velvet Kavisha
साहित्यचोरी हा गुन्हा आहे, तेव्हा कथा आवडल्यास लिंकसहितच शेअर करा.
फोटो गुगल साभार
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box