नवरा, भोवरा आणि चंद्र...
© Velvet Kavisha
साखरपुड्याचा दिवस. मुंबईत चाळीत राहायचो. रुम वन प्लस वन. समोरासमोर चाळी. दोन चाळींच्या मधल्या जागेत खुर्च्या मांडलेल्या. पाहुणे येऊन तिथेच बसले. चहा पाणी सुरु होतं. मैत्रीणी आलेल्या. आम्ही सगळ्या वरच्या रुममध्ये. गप्पा टप्पा आणि बरंच काही.
त्यातली एक एकदम खास मैत्रीण.
तिने फक्त "त्याचा" फोटो पाहिला होता. त्यामुळे "जीज्जू" नामक प्राणी प्रत्यक्ष पाहण्याची खूपच उत्सुकता. तिने विचारले. "कुठला ग मुलगा". माझी तयारी बियारी सुरु. बहिणींने खिडकीतून दाखवला. तिने पाहिला आणि मला ओढतच नेलं खिडकीत.
"हाच ना मुलगा??" तिने विचारलं
मी "हो" म्हटलं...
"काय डोळे झाकून होकार दिलास.?" ती तावातावात
"अग काय झालं?" मी.
"बघ त्यांच्या डोक्यात, दोन भोवरे आहेत" ती.
"मग??" मी.
"अग मग काय ?? ज्यांना दोन भोवरे असतात त्यांची दोन लग्न होतात.. तुला माहिती नाही काय..??" तिने रागातच विचारलं.
आता लग्न जमवताना नीट चौकशी वगैरे करून सगळं ठरवलेलं. हातीपायी नीट आहे. कुटुंबात वाढलेला आहे. नोकरी आहे. घर आहे हे पाहिलेलं. आता हिच्या म्हणण्यानुसार केसांचे भोवरे पाहायचे तर मुलाला "वरून पाहायचं" राहून गेलं.
आणि समजा पाहिलंच असतं तरी काय करणार होतो म्हणा... !!! दोन भोवऱ्यांचा महिमा हिच्या तोंडूनच पहिल्यांदा ऐकला...
"आता ग काय करायचं ??" मी घाबरून विचारलं.
चांगली तीस बत्तीस स्थळ धांडाळून, पुर्ण शोधमोहीमेची पंचवार्षिक योजना झाल्यानंतर वयाच्या "सव्वीशीला" एका matrimonial साईटवरून माझं लग्न जमलेलं. आधी साखरपुडा आणि महिन्यानंतर लग्न. दोन भोवरे आहेत म्हणून नकार कसा देणार हो!!! ते ही साखरपुड्याच्या दिवशी..??
मुहूर्तावर साखरपुडा झाला. पाहुणे गेले. सगळे बसलेलो. कार्यक्रमाची सांगता झालेली. सगळे खुश. माझ्या डोक्यात "भोवऱ्याचा फेरा." काय करावं कळेना. नवरी होऊ घातलेल्या मुलीचे कान हलके असतात. काय खोटं काय खरं.
बोटातल्या अंगठीकडे लक्ष गेलं. घसा खाकरत आईला म्हटलं.
"आई, दोन भोवरे आहेत ग त्यांना. असं ऐकलंय की ज्यांना दोन भोवरे असतात त्यांची दोन लग्न होतात..." मी
"कोणी सांगितले...??" आईचा प्रतिप्रश्न.
"अग ती सीमा म्हणत होती मघाशी..." माझं स्पष्टीकरण.
देवा देवा...!!! आईने इतकी खरडपट्टी काढली की ढाक्की टिक्की झाली माझी. कानात गरगर भोवरे फिरताहेत असं वाटलं.
आईचं बरोबरच होतं म्हणा. तिने सगळे सोर्स कामाला लावून, खुप चौकशी करून मुलगा चांगला आहे याची खात्री करून घेतली. नंतरच फायनल केलेलं.
आईचं म्हणणं पटलं. बुध्दी आणि मनाच्या तडजोडीत भोवरे सोडून बोला ठरलं. पण मैत्रिणीने सांगितलेलं काही डोक्यातून जाईना. माझा तर मोठाच problem झाला. अंधश्रद्धा निर्मूलनाची पुरस्कर्ती मी इथे श्रद्धा ठेवून बसलेली. आखिर दिल का मामला था ना..!! .
लग्न झालं. त्यांना हसत हसत तर त्यांच्या घरच्यांना आडून आडून विचारून झालं. यांचं कुठे अफेअर होतं का वगैरे वगैरे... न जाणो "खोया खोया प्यार" म्हणत कोणी यायचं अचानक आणि धुतल्या तांदळासारखा हा रोज धुवून घ्यायला लागायचा. पण छे काही उपयोग नाही झाला. आधी तर काही नव्हतं. म्हणजे पुढे काही ???
जाऊ दे. जो होगा वो देखा जाएगा. और जो नहीं देखा जाएगा उसको भी देख ही लेंगे...।
तसा एखादा problem मी जास्त दिवस ठेवत नाही. भोवरे सोडून दिले आणि विसरूनही गेले थोड्या दिवसांत...
लग्नानंतर एकदोनदा वर स्वर्गाला हात लावून आलेय. एकदा तर oxygen लावावा लागला. तेव्हा डॉक्टर म्हणाले. "डोळे झाकू नका थोडावेळ उघडे ठेवा... "
उघडेच आहेत हो. फक्त पापण्या जड झाल्यात. आता डॉक्टरांना कोण सांगणार?? डोळे झाकले की भोवरे दिसतात ते. मी कायम डोळे उघडे ठेवायला तयार आहे. देवाच्या मनात काय आहे काय माहिती..!!! बरं वाटलं आणि घरी आल्यावर पुन्हा भोवरे विसरले.
घरात दोन नणंदा होत्या. त्या खुप मदत करायच्या. त्यांची लग्न झाली. आमच्या घरातली चिमुकली पावलं आली. लेकींचं करून घरचं करताना आम्ही सासू सून दमू लागलो. बाई ठेवली कामाला. पण तिने वात आणला. शेवटी आई म्हणाल्या 'दोघी मिळून करु झेपेल तसं. नाहीतर ही आपल्याला पत्रावळीवर जेवायला लावेल ' मग काय दोघीच करु लागलो.
लहान लेकरू. त्यातच एकदा पाहूणे आले घरी. जेवणं झाली. पाहुणे निघून गेले. सगळा पसारा आवरला. सिंकमध्ये भांड्यांचा ढीग. मी लांबून खुप वेळ पाहिलं भांड्यांकडे. पर इश्क होना नामुमकीन. देवालाही म्हटलं, "तुला जर न्यायची इच्छा असेल तर आताच घेऊन जा. भांडी घासण्यापुर्वी. भांडी घासून झाल्यावर आलास तर मी येणार नाही." सगळं करून झालं. 'धरणी माते पोटात घेशील तर बरं' असा विचार ही येऊन गेला.
मनाचा मोठा हिय्या करून कशीतरी भांडी घासून काढली आणि गड सर केल्याच्या अविर्भावात हात पुसत बाहेर आले. तेवढ्यात आरामखुर्चीत रेलून बसलेले हे आणि एवढे दिवस नजरेआड केलेले ते दोन भोवरे दिसले...
झालं आधीच भांड्यांनी वैताग दिलेला त्यात त्यांच असं मस्त बसणं आणि मला भोवरे दिसणं. सगळं एकच झालं आणि डोकंच सटकलं
"तुमच कुठे extra marital affair आहे काय हो ???" असं तावातावाने विचारले त्यांना...
"आज डोक्यावर पडलीस की भांग घेतलास जेवणाच्या आधी..??" त्यांनी हसून विचारले.
"हे बघा, हसू नका. तुमचं तसं काही असेल तर इकडे तिकडे फिरत राहू नका. तिला सरळ घरी घेऊन या.." मनात विचार केला भांड्यांची तरी कटकट जाईल. भांडी घासून घेण्याएवढ्या सिनिअर असणार आपण. अय्यो डायरेक्ट "जुदाई" मुव्हीतली श्रीदेवी. आग लागो त्या विचारांना. पण आता तर बोलून झालंय.
त्यांना कळलं. गडबडलयं काहीतरी.
"अग काय झालं तुला?? काहीही बोलू नकोस. मला कोण पसंत करणार आहे आता?? मी असा काळासावळा. तु म्हणून पसंत केलसं" नवरोबा पवित्रा बदलत म्हणाले.
बाब्बो...!! इतकं कौतुक....!!! आणा आता अख्ख्या बिल्डिंगची भांडी गोळा करून. बसते घासत संध्याकाळ पर्यंत. काय बोलणार राव आता. ते भोवरे विसरले पुन्हा मी...
तीन वर्षांपूर्वी सहज डोक्यात पाहिले त्यांच्या...
"अरे , अहो हे काय???"
"काय झालं..?"...
"तुमचे भोवरे गायब झाले...!! बीच में डॉलर बाजू में झालर झालं की राव..." उत्सुकता, आश्चर्य सगळंच एकदम.
"बरं झालं ना. तुझं टेन्शन गेलं. एकवेळ टक्कल परवडेल आता..." ते हसून म्हणाले.
मागे कोणीतरी म्हणालं होतं की, टेन्शनमुळे टक्कल पडतं.. पण मी यांना टक्कल पडण्याएवढा कुठे त्रास दिलाय. उगाच आपलं काहीतरीच. ते जरा घाबरायला होतं ना आतल्या आत. तसंच झालेलं.
आता त्यांना काय सांगणार..!! स्त्री सगळं शेअर करेल पण नवरा नाही... !!! असो
त्या टक्कलातही आनंद आहे. भोवरे तर गेले.
कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है..। गेल्या तीन वर्षात घरचा चंद्र वाढता वाढता वाढे झालाय. संकष्टीला चंद्रोदय बघायला टेरेसवर जायची गरज नाही..... 😂😂😂😂
बाब्बो.... आता कोणी म्हणतंय की, टक्कल असणं हे भाग्यवान असण्याचं लक्षण आहे. 🙆♀️🙆♀️ आता काय करावं.... घुमाव वस्तरा...🤣🤣🤣
वाचकहो,,,, बऱ्याचदा लग्न जमल्यावर, लग्न होत असताना केल्या जाणाऱ्या विधी, शास्त्र प्रांतानुसार वेगवेगळ्या असतात. मुलीच्या मनाचा खूप गोंधळ उडालेला असतो. माहेर सुटतानाचं दुःख आणि सासरची ओढ या हिंदोळ्यावर ती हिंदकळत असते. अशावेळी काही बाही सांगून तिच्या मनाच्या गोंधळात भर टाकू नये. कधी कधी संसार फुलण्याआधी कोमेजून जाऊ शकतो अशाने.
वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. हलक्याफुलक्या पद्धतीने काही मांडण्याचा प्रयत्न केलाय. वाचून सांगा जमली का नीट.
सदर लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.
© Velvet Kavisha

7 Comments
खूप सुरेख लिहिलं आहेस गं
ReplyDeleteअगदी च वेगळा आणि सिरियस मुद्दा छान हसतखेळत मांडला आहे
तुझं लिखाण खूप भारी असतं ❤️❤️
Thank you so much ❣️
Deleteअसती एखादी भिंगरी तर गरागरा फिरवून आपटली असतीस ग बये.. भांडी घासायला काय भांड्यांसारखी रगडली असतीस.. काय समजलीव..
ReplyDeleteगंमत सोड पण असे नमुने असतात बरं.. छान लिवलयं..
वर्षा , नेहमीप्रमाणे मस्तच
ReplyDeleteMajja ali bhovare baghatana, sorry vachtana 😇😇
ReplyDeleteछान लिवले ग....काय समजलिव
ReplyDelete💞
खूप छान. विनोदी शैलीने लिहले.हसत हसत वाचल
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box