हे काय वाटून राहिलं बाब्बो...!!!



हे काय वाटून राहिलं बाब्बो...!!!

© Velvet Kavisha

सासुबाई आणि मी दुपारच्या जेवणानंतर निवांत बसलो होतो. टीव्हीवर जितेंद्र आणि हेमामालिनीचा "दुल्हन" सिनेमा लागलेला. आता सिनेमांचा आणि माझा तसा फारसा संबंध नाही. पण जितेंद्र आणि अनिल कपूर दोन्हींची मी एकदम diehard fan. खान मंडळींचा तेवढासा काही संबंध येत नाही. हम आपके है कौन, दिल, हम साथ साथ है, फना, कभी खुशी कभी गम असे काही अपवाद आहेत. 

हम आपके दिल में रहते है, हमारा दिल आपके पास है, वेलकम, नायक  हे अनिल कपूरचे सिनेमे खुप वेळा पाहून झालेत. जितेंद्रचा जुदाई, एक ही भूल ऑल टाइम फेवरेट. 

मूडमध्ये कधी टीव्ही लावला की जितेंद्रचा अनिल कपुरचा कोणताही पिक्चर लागला की स्टोरी, पिक्चरचं नाव कशाशी काही संबंध नाही.  त्यांचे पिक्चर बघायला सुरुवात. अर्धा तर अर्धा. काही समजेल ते समजेल. नाही ते नाही. अगदी तोंड उघडं टाकून बघणार. आजही तशीच बघत होते...
पिक्चर बघताना सासुबाईंना म्हटलं. "किती भारी आहे ना ही जोडी. जितेंद्र हेमामालिनी. एकदम मस्त... दोघेही किती अनुरुप वाटतात न् एकमेकांना." 

"अग जितेंद्रने हेमामालिनीला मागणी घातलेली लग्नासाठी. पण ती धर्मेंद्राच्या प्रेमात होती ना. नकार दिला तिने याला..." सासुबाईंनी माहिती पुरवली..

अरे देवा!! काय बोलायचं हिला. कुठे त्या धर्मेंद्राच्या नादाला लागली.  'अगर अपने जितेंद्र से शादी होती तो कम सें कम बच्चे तो देखने जैसे होते दोनों के...'. अरे बापरे! हे काय भलतचं वाटून राहिलं ना राव!! 🤦🤦
------------------

अशाच कधीतरी एकदा गप्पा सुरू असताना लेखिका मैत्रिणींचा विषय निघाला. "अहो आई, बऱ्याच जणी रात्री लिहायला बसतात. शांतता असते ना सगळीकडे तर लिहायला सुचतं. एकहाती लिहून होतं सगळं. सगळ्याच निशाचर झालोय.."

आता आमच्या आईंचं अख्खं बालपण आणि अगदी लग्न होईपर्यंतचे दिवस पृथ्वीराज कपूरच्या बंगल्यात गेलंय. त्यांचे बाबा माळी होते बंगल्यात. जुहूला जानकीकुटीरमध्ये. आईंचं लग्न पण पृथ्वीराज कपूरच्या स्टुडिओत झालंय. आजुबाजुला सगळी फिल्मिस्तानची लोकं. राजकपूरची पांढरीधोप चिल्लीपिल्ली त्यांनी खुप जवळून पाहिलीत. 
शबाना आझमी खेळायला यायची आईंसोबत.  तिचे वडील कैफी आझमी मोठे लेखक...

मैत्रिणींना निशाचर म्हटलं आणि आईंना कैफी आझमी आठवले.  त्या म्हणे, "अग ह्या लेखक लोकांना रात्रीचं सुचतं लिहायला. ते कैफी आझमी होते ना, ते नेहमी रात्रीचं बंगल्याबाहेरच्या लॉनवर बसायचे टेबल खुर्ची टाकून. एका हातात सिगारेट, टेबलावर भरलेले हार्डड्रिंक्सचं ग्लास असायचं. कधी जाड्या मेणबत्तीचा उजेड किंवा कधी बंगल्यातून येणाऱ्या लाईटचा प्रकाश.  फेऱ्या मारत, शिलगावलेल्या सिगारेटचे झुरके आणि घोट घोट पित एक एक ओळ लिहून काढायचे अगदी सकाळपर्यंत."

बाब्बा !! काय भारी लेखक हो हे. नाहीतर मी स्वयंघोषित लेखक. दिवसभर कामं करताना काही तरी सुचतं. आमटी फोडणीला टाकली की उकळी येईपर्यंत एखादा पॅराग्राफ लिहून काढते. पुढची कथा डोक्यात घोळवत ठेवून टप्प्याटप्प्याने कथेचा एक भाग लिहून काढते. त्यात मुलांची शाळा, नाश्ता, खाणं जेवणं, आपला नाश्ता जेवणं खाणं, आलागेला, पाहुणे पै सगळं त्यातचं. नाही म्हणायला लिहिता लिहिता दोन-चार वेळा काळा चहा ढोसून झालेला असतो.  

सगळे झोपले की थोडी शांतता मिळते. दिवसभर लिहिलेलं वाचून, एडिट करून, फायनल करायला गेलं की कळतं.  दिवसभर जे लिहून काढलयं ते आणि कथेचं नाव अजिबात मॅच होत नाही. मग नावासाठी पुन्हा लिहा आणि लिहिलेल्या कथेसाठी नवीन नाव शोधा. अशी नुसती तारेवरची कसरत आमची.....!!

कैफी आझमींबद्दल ऐकल्यापासून मी तर एकदम भारावूनच गेले हो. मला आता रोज मी कैफी आझमींसारखं लेखक झाल्याची स्वप्नं पडून राहिली ना बाबो..!!! एका हातात सिगारेट, एका हातात ग्लास, नाका तोंडातून धूरररर.. सगळं कसं एकदम सांग्रसंगीत..🤗🤗 लिखाणासाठी नाही पण इतर तामझामासाठी मला कैफी आझमी व्हायचं आहे.... 
शीट् हे काय काय वाटून राहिलं रे बाबा... आणा रे तो काळा चहा कोणीतरी... 🙆‍♀️🙆‍♀️
-----------------

मला तसं बरंच काही काही वाटत असतं. 
नवीन लग्न झालेली एखादी पोरगी चार सहा महिन्यांनी आपल्याला पाहून ओढणी पोटाकडे ओढू लागली की समजावं....आई होण्याची चाहूल लागलेली आहे नुकतीच तिला...😜😜

एखादी मुलगी घरी न जाता बिल्डिंगखाली उभी राहून फोनवर बोलत असेल तर ती नक्कीच तिच्या boyfriend शी बोलत असणार...😘😘

सहावी सातवी आठवीत जाणारी मुलगी आरशासमोर उभी राहून केसांची बट वेगवेगळ्या पध्दतीने काढून स्वतःला आरशात निरखून पाहत असेल तर कोणीतरी नुकतचं प्रपोज केलयं मॅडमना...💕

कॉलेजकुमारीने वाढदिवसानंतर एखादे भारी गिफ्ट मैत्रिणीने दिलं असं सांगितलं तर समजून जावं, ते बॉयफ्रेंडने दिलेलं आहे...🎁

टोकदार शूज आणि शर्टाला डायमंड/ पर्ल बटणं लावून फिरणाऱ्याला तुम्ही मल्टीलेवल मार्केटिंगवाला (chain system marketing) समजायला हरकत नाही...🙆

मी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना ओळखतो असं कोणी सांगितल्यावर... मी ही त्यांना चांगली ओळखते असं बिनधास्त सांगावंस वाटतं...👊👊


कोणी खोटं बोलत आहे असं वाटत असेल तर एकच करा. त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या. जी वाक्ये तो फास्ट आणि पटकन बोलून संपवेल ती खोटी समजा. बाकी खरं बोलताना माणूस घाबरत नाही...🤞🤞

एका शाळेत टिचरला पाचसहा वेळा चक्कर आली. मुलांनी आपापल्या पालकांना सांगितले. पालक धास्तावले. टिचर अर्ध्यातूनच सोडून गेली तर काय करावं. माझं गणित कामी आलं. काही झालं तरी टिचर काही एप्रिलच्या आधी शाळा सोडत नाही. कारण माझ्या अंदाजित हिशोबाने जूनमध्ये डिलिव्हरी होणार होती...🤦

एखाद्या मैत्रीणीबद्दल उगाचच आपुलकी वाटून मैत्रीचे बंध निर्माण होतात. तर एखादी सुरुवातीपासूनच खटकते. कारण तिच्याबद्दल आतून वेगळेच वाटतं. 


कधीं कधीं वाटतं काय भारी माणसं भेटली आहेत आपल्याला आयुष्यात.🤗🤗 तर कधी वाटतं हे सगळे antique पीस आपल्याच नशीबी का बरं.. 🤔🤔

जो दुकानदार वाजवी दरात वस्तू विकतो असं वाटून तिथे जावं तर सगळ्यात जास्त तोच महागडा असतो. जो डॉक्टर चांगला ओळखीचा असतो तो आपला मेडिक्लेम पाहून बील फाडतो. 
खुप वाटतं आहे सांगावं असं. पण जाऊं दे आता...

ये तो ट्रेलर है. असं बरंच काही वाटत असतं मला. सगळे ठोकताळे. सगळा विचारांचा बाजार. खरेही होतात हे अंदाज. त्यामुळे confidance अजून वाढलाय.
पण हे सारखं सारखं काही बाही वाटून राहिलयं तो एखादा आजार तर नसेल ना बाब्बो....🙆‍♀️🙆‍♀️
तुम्हाला काय वाटतं...🤔🤔

© Velvet Kavisha
सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. शेअर करताना लिंकसहीत करा. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा आहे. निनावी किंवा स्वतःच्या नावावर खपवू नका... 



Post a Comment

2 Comments

  1. Khup chan baboo!!!!! Amatila this ani deta deta lekhala pan mastch phodani basali ☺👍

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box