शिव्या_सुटणार_कधी

शिव्या सुटणार कधी...??

© Velvet Kavisha

काल संध्याकाळी एका मैत्रिणीचा फोन आला. "काय झालं ग सकाळी..?? तो भाजीवाला सांगत होता. जाम राडा केलास. घाण घाण शिव्या घातल्यास. अग अशा शिव्या देऊ नये ग. आपली पुण्याई कमी होते त्याने." 

हा भाजीवाला पण कलाकार एकदम. त्याच्याकडे आज दिवसभरात जेवढ्या मैत्रिणी आल्या, त्यांना तर सांगितलंच. पण ज्यांचे फोन नंबर आहेत त्यांना ही फोन करून सांगितलं. कर्म माझं. शिव्यांसहीत आज मला फेमस केलं याने.
 

"शिव्या देऊ नये. पाप लागतं त्याने." असं सारखं सांगतात मोठी माणसं. आईला शिव्यांचं अगदीच वावडं. मला मात्र शिव्यांचं अप्रुप.  शिव्यांची क्रेझच म्हणा ना लहानपणापासून. तिसरीत असताना मैत्रिणीकडून शिकून घेतली आणि मोठ्या बहिणीवर ताजी ताजी try केली. तिने आधी मला बदड बदड बदडलं. मग आईला नाव सांगितले. आईला आधीच शिव्यांची चीड. आई भाकऱ्या थापत होती.
चुलीत मस्त जाळ पेटलेला. तिने चुलीतलं पेटतं लाकूड घेतलं. "तुझं आता तोंडच भाजून ठेवते म्हणजे पुन्हा शिव्या घालणार नाहीस" म्हणत एका हाताने कान पिरगळला. दुसऱ्या हातातलं कोलित तोडांपाशी आणलं. "क्रेझ मरो पण कोलित आवर" अशी परिस्थिती माझी. तेव्हापासून भारीतल्या भारी शिव्या ही मी कोणाला दिलेल्या नाहीत... तशाच ठेवल्या माझ्याकडे. देवा शप्पथ...!!
 

तर झालं असं की....
सुट्टीचा दिवस. लेकीचा ब्लड रिपोर्ट घ्यायला दोघे निघालो. रिपोर्ट घेऊ, आपला नेहमीचा गुळाचा चहा घेऊ, बाईकवर थोडं भटकून घरी येऊ. प्लॅन फुल्लं रेडी. पण तुम्ही ठरवलं आणि तसंच झालं असं होत नाही. नेमकं तेच झालं आज. 

आता आमचा complex हायवेला आहे. गेटमधून बाहेर पडून down side रस्ता cross केला. आमचा "बाबा" डिवायडरजवळ थांबला.
इकडे तिकडे पाहून up ला गाडी cross करणार एवढ्यात. काहीच कळलं नाही. मी आणि तो दोघेही दाणकन् रस्त्यावर. गाडी अंगावर.  त्याला बरंच लागलं तरी त्याने मला उचलून आधी बाजुला घेतलं. माझे दोन्ही मेंदू हललेच. एक गुडघ्यातला आणि दुसरा डोक्यातला. 

मी डोकं हातात धरलं. नवरा धास्तावला. आधीच या बाईचं डोकं खतरनाक. आणि आता त्यालाच धक्का लागलेला.
बरं वायदा सात जन्मांचा. डोक्याला काही झालं तर आपलं कठीणच आहे.. भिरभिरलेल्या डोक्याने ही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट दिसले मला. Accidentally होतं म्हणून  accident ला accident म्हणतात हे तेव्हाच कळलं...

नवऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या पायाला बऱ्यापैकी लागलेलं. अक्षरशः फुगे आल्यासारखे दिसत होते. आणि रक्ताची धार लागलेली.
  हातांनाही लागलेलं. ते सगळं पाहून भिरभिरलेलं टाळकं सटकलंच. "हमें कुछ हो जाए तो हमं बर्दाश्त कर सकते हैं, पर उन्हें कुछ हो जाए तो गयी दुनिया जहन्नुम में...!"

प्रचंड राग आला. रागात नेहमी गडबड होते माझी. शिव्या, डायलॉग आणि इंग्लिश एकदम top क्लासचं निघतं ना रावंं तोंडातून. ना मला त्यातलं काही कळत ना समोरच्याला... शिव्या, इंग्लिश आणि डायलॉग. जे आले ते बोंबलून झालं.
 

हे जे ॲक्सिडंट झालं,  त्यात एकतर समोरच्याची पल्सर गाडी. त्यावर चार सीट. चालवणारा जवळजवळ पट्रोलच्या टाकीवर. आणि हे तर काहीच नाही म्हणून डिवायडरला घासून wrong side ड्रायव्हिंग. अशावेळी त्याला गाडी कंट्रोल करता येणं फार कठीण. खरंतर मला त्याला धोपटून काढावंस वाटलं "घे घवाचा, घे तुपाचा" म्हणत.
पण मी जन्मतःच शक्तिमान असल्याने अशी अघोरी कृती करणं टाळते. मग सगळाच्या सगळा भार तोंडावर येतो. 

आमच्या कल्याणात मागे मोदी येऊन गेले. हेलिपॅड बाजूलाच बनवलेलं. अनिल कपूरच्या नायक पिक्चरची अनुभूती. दोन दिवसांत चकाचक. फुटपाथसुध्दा धुवून काढलेले.
हे दीड दोन फुटी चिकणे डिवायडर तेव्हाचेचं. त्यात तीन चार फुट उंच झाडं लावलीत. Wrong side ने येणारा रस्त्याच्या पलिकडून आला, तरच दिसणार. डिवायडरच्या बाजूने आला तर अजिबात नाही दिसत. नेमकं तेच झालं. 

३०० च्यावर घरं असलेला जुना complex आमचा.
बरीच मंडळी आली. त्यात भाजीवाला, चहावाला, पान टपरीवाला, भंगार घेणारा, पंक्चंरवाला, सायकलवाला. असे सगळे वाली गोळा झाले. त्याला समजावलं. सगळा गोंधळ. कोण काय बोलतो तर कोण काय सांगतोय. समोरचा ऐकायला तयार नाही. म्हणे "मी हाॅर्न दिला होता. यांनी ऐकला नाही." च्यायला ह्याच्या..

शेवटी गुप्ताजींनी लीड घेतला. समजावताना गुप्ताजी बोलले.." देखो, आपको हमने कुछ बोला नहीं, ना गाली दी है, ना मारा है। हम वो भी कर सकते थे, फिर भी आपको समझा रहें है..| " 

"आप आने के पहले madam ने बहोत गाली दी हैं। " तो  म्हणाला ..

"अच्छा...?? वो तो होना ही था | अगर साहब को लगेगा तो , वो गाली देगी ही ना..। साहब के गाडी का पिछला सीट कभी खाली नहीं मिलेगा आपको।  madam रहती ही है । शुक्र मानो की मैं आया, नहीं तो पुलिस आती थी मेरी जगह..।" गुप्ताजीं आवाज चढवत बोलले. 

आयला हे गुप्ताजी नक्की समजवताहेत ना त्याला..?? काही काय बोलत सुटले.
विचार करता करता कळलं.. खरचं की!! मी फक्त यांच्या ऑफिसला, मित्रांच्या मैफिलीत, सलूनमध्ये, आणि गाडीच्या सर्विस सेंटरमध्ये जात नाही.. गुप्ताजींचं काहीच होऊ शकणार नाही कारण त्यांची निरीक्षण शक्ती "तेज" आहे... असो.

नंबरप्लेट पडायची होती गाडीला. आणि तिची अशी काशी झाली. गुप्ताजींनी दमदाटी देऊन गाडीचा खर्च म्हणून १०,०००/- रुपये घेऊन दिले.
आपल्याला बुवा पैशांपेक्षा माणसाचं मोलं. नवऱ्याला काही झालं असतं म्हणजे. गाडीच्या इन्शुरन्समध्ये गाडीचं काम होऊन जाईल. काही लागलेच वरून तर या दहा हजारातून देऊ. आणि उरलेले पैसे आपण त्या माणसाचे परत द्यायला हवेत. Sorry पण म्हणायला हवं. रागाबरोबर इतक्या शिव्या घातल्यात त्याला. शिवाय गाडी कशी चालवायची यावर एक लेक्चर द्याव लागेल ते वेगळंच...
🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️

बाब्बो.... दिवसभर सोसायटीत एकच चर्चा. ३०/४० च्या स्पीडने गाडी चालवणाऱ्यांचं ही accident होतं. आणि माझ्या शिव्या. सोफिस्टिकेटेड भांडणाचे क्लास लावायच्या विचारात आहे तेव्हापासून. कारण चेहऱ्यावरून मी सोफिस्टिकेटेडच दिसते...😜😜


त्यानंतर एकदा एका वैतागलेल्या मैत्रिणीने मेसेज केला.
"असा वैताग आलाय ना मला. किती केलं तरी मेलं यांच काही संपत नाही. सारखं टुमणं सुरूच असतं. आता मला वाटतं, तसचं मी वागणार. बाकी मग दुनिया गेली भो×त."  

मैत्रीण उचकटलेली. तिला समजवायला हवं. म्हणून म्हटलं. "ए बाई, एकदम शांततेने घे. तुझ्या घरच्या भानगडीत दुनियेला कुठे घेतेस मध्ये. तु दुनियेत राहतेस. दुनिया तुझ्याकडे राहत नाही. तिला भो×त जाऊ दे म्हणतेस. त्यापेक्षा तू जा ना भो×त. म्हणजे दुनियेचा संबंध नाही काही."
 

"मला कशाला सांगतेस जायला त्यापेक्षा तूच जा ना म्हणजे डोकं तरी खाणार नाहीस." म्हणत ती अजूनच उचकटली. 

"बरं बाई, तू एकटी नको जाऊस. मैत्रिणी आहोत ना. आपण दोघी जाऊ चल."  मी समजुतीच्या सुरात समजावलं. खुप जीवलग मैत्रीण आहे माझी ती.
 

पुढच्या मिनिटाला मैत्रिणीचा फोन. "अग मुर्ख, कुठे दोघींनी जायचंय.?? त्यापेक्षा जीव दे जा." 

आयला..!!  हिला काय झालं मध्येच. फेफरं आलं की काय. मैत्रिणींवर कधीही रागावू शकतो आपण म्हणून घरच्यांवरून डायरेक्ट माझ्यावर बंबार्डिंग.. नो बेबी नो.. कुल डाऊन..!!
 

"तू म्हणालीस तिकडे - भो×त" मी रागावर खुप ताबा मिळवत. 😊😊

"अग अडाणी, ती शिवी आहे. ×× म्हणजे ब्ला ब्ला ब्ला ब्ला ब्ला... एरवी शिव्या घालत फिरत असतेस ना...? एवढं माहित नाही तुला ... ??" 🙄🙄 ती त्याच तावात.
 

अय्यो..!! असं कसं झालं?? ही शिवी आहे हे मला माहीत कसं नाही..🤔🤔 मला आमच्या मालवणी शिव्या सगळ्या येतात. त्यात अजून मी स्वरचित शिव्यांची भर घातलीय. बऱ्या पडतात. हाताशी ठेवायला. केव्हाही रागाबरोबर वापरता येतात पटकन.

म्हणजे, ××× जाणे ही शिवी आहे ??
मला वाटलं आम्ही ते मालवणीत "खय जातसं गो ..? " असं विचारल्यावर, "मसणात जातयं. येतंस..? " असं सांगतो. आणि "चल जाऊ दोघी' म्हणतो. तसलंच असेल काहीतरी. पण नाही हो. हे वेगळंच प्रकरण. आता माती खाल्लीय तर निस्तरायला हवी ना..??

"अग ही शिवी आहे.  हे खरंच माहिती नाही गं मला!!" मी

"दुनियादारी पिक्चर पाहिलास पूर्ण.??" तिने विचारले.

"हो. दोन वेळा. एकदा थिएटरमध्ये आणि एकदा टीव्हीवर. पण त्याच काय इथे....?? " मी शांत राहत विचारले. 

ही माझी मैत्रीण आहे. दुर्गुण जुळल्यामुळे झालेली मैत्री आहे ही. दुनियेतून उठवून दुनियादारीत बसवेल मला. एकतर आधीच डोकं फिरलेलं आहे तिचं. त्यामुळे आता मला फुल्ल left to right पडू शकते. त्यामुळे मी फार काळजी घेत बोलले.
 

"त्यात डायलॉग नाही का..? 'तेरी मेरी यारी मग ××× गेली दुनियादारी...!! त्यात जे ××× आहे ते हेच आहे.." तिने बऱ्यापैकी शांत होत सांगितले.. कदाचित तिला कळलं की मी मस्करी करत नसून, खरंच मला ही शिवी माहिती नाहीय.

"हो का..?? बरं. बरं. कळलं आता. यापुढे लक्षात ठेवीन मी या शिवीला. " म्हणत मी फोन ठेवला.
 

आता तुम्हीच सांगा. ते दुनियादारीत हा शब्द वापरताना "बीप"  वापरलाय. मग मला कसं कळणार ते काय बोलले तेव्हा बीप वाजलाय.. 🤦🤦

तुम्हांला म्हणून सांगते. असे बरेच किस्से घडले तरी एक समाधान आहे मनाला. वेगवेगळ्या प्रांतातल्या मैत्रिणी आहेत म्हणून नवनवीन शिव्या तरी कळून राहिल्या ना रावं....🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️

बाब्बो...!! तीन दिवस झाले. नुसता डीपी दिसला तरी दोघी ही हसतोय.... 😂😂🤣🤣 ती तिच्या घरी आणि मी माझ्या घरी... 😎😎

शेवटी काय तुम्हांला डॉक्टरेट मिळालेली असली तर तुम्हांला सगळं येतंच असेल असं नाही. जगात बरंच ज्ञान आहे. हेच खरं..!! 🙃🙃

सुरुवातीला क्रेझ वाटणाऱ्या शिव्या आता माझं "वेपन" बनल्या आहेत. उगाचच किळसवाणे स्पर्श, नजरा या शिव्यांनीच वरमतात. असो. कथा आपल्या आपल्या...🙆🏻‍♀️🙆🏻‍♀️ 

©Velvet Kavisha

शेअर करो बड़ी सिद्दत सें... लिंकसहितच.

Post a Comment

0 Comments