असू दे की काळा तो...

असू दे की काळा तो...

© Velvet Kavisha

"वर्षा, डोकं फिरलंय माझं." 
माझ्या मैत्रिणीचा फोन आला... 

"का ग बाई??
काय झालयं डोकं फिरायला तुझं.." मी विचारलं..

ही माझी अगदी खास मैत्रीण. 
वाटलं झुरळ वगैरे आलं असेल उडून अंगावर आणि नेहमीसारखी सांगत असेल.. 
मी प्रत्येक वेळी मैत्रिणीला नव्याने ऐकते... 
तरीही बऱ्याच गोष्टी पाठ झाल्यात माझ्या.. 
एकंदर सुर पाहता हे झुरळाचं काही नसावं असंही वाटलं.. 
हल्ली दोन सेकंदात ही मी फार विचार करु लागलेय बुवा..

" अग, मी डीपीला नवऱ्यासोबतचा फोटो ठेवलेला." ती

" स्वतःच्या नवऱ्यासोबतचाच ठेवलेलास ना.?? 
मग झालं तर... 
मी तर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडलेला फोटो ठेवते डीपीला.. 
त्यात काय इतकं..." 
मी नेहमीच्या थट्टेत...

" अग तसं नाही गं, 
एका मैत्रिणीने ' मेसेज' केला..., 
म्हणाली, "तुझा नवरा शोभत नाही तुला.." 
ती रडण्याच्या बेतातचं.

आयला matter सिरीयस आहे... 
कोणी बरं माती खाल्ली असेल....

आता ही माझी मैत्रीण पंचेचाळीशीची... 
लग्नाला चांगली वीस वर्षे झालीत. 
दिसायला एकदम 'मृणाल कुलकर्णी'च. 
इतकं वारेमाप सौंदर्य. 
मेकअपशिवाय ही खुप सुंदर दिसते.
 
मस्त पाहून, सवरुन मध्यस्थांमार्फत लग्न झालेलं. नवरा 'अजय देवगण'. 
पण एकदम काळजीवाहू सरकार. 
बायकोला जीवापाड जपतो. 
तिचा ही तितकाच जीव त्याच्यात अडकलेला. एकदम " एक दुजे के लिए " वाली जोडी. 
मैत्रिणी चिडवतो तिला बऱ्याचदा "तोतामैना की जोडी" म्हणून. 
तो कर्तबगार category मध्ये मोडणारा. 
सुख म्हणून लोकं ज्याच्याकडे पाहतात त्या सगळ्या वस्तू घरात...
  

तुम्ही तिला काही बोला, 
शिव्या घाला, 
मस्करी करा... 
काही प्रॉब्लेम नाही. 
फक्त तिच्या नवऱ्याला कोणी काही बोलायंच नाही.
मग फुल्ल ढाक्की चिक्की.  
विषय कट् म्हणजे कटच...

आगाऊपणात हातखंडा असणाऱ्या मैत्रिणी आम्ही..!!! 
पण कोणाच्या नवऱ्याबद्दल काही विचारायचं असेल तर 
"काय ग तुझे निळकंठ मास्तर बरे आहेत ना ..??" 
मी बोलताना नकळत 
"अगं हा बाबा" असं म्हणते नवऱ्याचा उल्लेख करताना. 
मैत्रिणींना ते पाठ झालंय. 
"तुझ्या बाबाने आज तूला येऊ बरं दिलं" असं चिडवलं जातं. 

बाकी मैत्रिणीला चिडवताना 😜😜 आपण सुटतोच. 🤭🤭
तुम्ही काय आम्ही काय..🤗🤗
"अगं आज गुडघे खुप दुखताहेत." 
असं कोणी सिरीयसली म्हटलं की, 
"कशाला इतके आपटून घ्यायचे रात्री." 
असं बोललं की दुखणं गायब. 🤭🤭

"काय झालं काय माहिती. ओठ बघा ना किती तडकलेत." एका मैत्रिणीची व्यथा.
"आधी ते अडकलेत म्हणून ते तडकलेत" दुसरीने तिची कथा सांगितली ..😉😉

"जा बाई जा. आज तुझा विकेंड आहे." किंवा ऑफिस टूर वरून आठ दहा दिवसांनी कोणाचा नवरा घरी आल्यावर " घ्या आता दिवसाचे पडदे लावून.." 😜😜 असं बोललं की ती ही वैतागले.
 

हां तर मुद्दा असा की.. ही सगळी मस्करी मैत्रिणींपुरती... 
पण त्यांच्या नवऱ्यांना मात्र फुल्लं respect देणारचं. 
मैत्री आपली आहे. 
त्यात नवऱ्यांना कशाला आणायचं मध्ये. 
कोणाच्याच नवऱ्याला कोणी नाव नाही ठेवत... कारण आम्ही सगळ्याच काजोल आणि ते सगळेच "अजय देवगण"... 

खरंतर स्त्रीचं "सौंदर्य" 
रुप आणि सुस्वभावात,
 
तर पुरुषाचं "सौंदर्य" मन, बुद्धी, कर्तृत्व 
आणि संस्कारात असतं. 
असं कुठेतरी वाचलेलं आणि पटलेलं सुध्दा आहे... 

आपल्याकडे काळ्याकुट्ट पोराला सुध्दा लग्न करताना गोरीच बायको हवी असते.
 
कारण बाईचं सौंदर्य "गोरेपणात" असं समजतात लोकं. 
काळ्या रंगाचा न्युनगंड मनात. 
त्याचा फायदा कंपन्यांनी घेतला. 
अख्खी एक इंडस्ट्री त्यावर चालतेयं... असो.

गोरा, काळा, सावळा हा वर्ण आहे. 
अवगुण किंवा गुण नाही. 
मिरवायला किंवा लपवायला.
 
आणि मला विचारालं तर मी म्हणेन 'नवरा' या संबोधनात येणारी व्यक्ती ही दाखवायची नसून समजून घ्यायची असते..  
दाखवायला तो काय शो पीस आहे काय...??? 
इथे स्वभाव समजून घेता घेता काळ्याचे पांढरे होऊन पुन्हा दर महिन्याला काळे होऊ लागलेतं.
 
एवढं एक नक्की कळलं की एखाद्याला समजून घेतांना रंगाचा काहीच संबंध नसतो... 

मलाही असाच अनुभव आलाय.
एकदा नवऱ्या सोबतचा फोटो डीपी ठेवला. 
नवीनच झालेल्या मैत्रिणीचा मेसेज. "तु मस्त दिसतेस... 
भावोजी सावळे आहेत वाटतं.." 
डोकंच फिरलं.
 
कोणाच्या पार्टनरबद्दल कसं काय बोलतात बुवा बिनधास्तपणे लोकं..?? 
माझं अख्खं आयुष्य ज्याला तुम्ही काळा म्हणताय त्या माणसाने तोलून धरलंय. 
पण हे कोणाला सांगण्यात काहीच अर्थ नाही. 

आता ह्या बायका काळ्याला सावळा म्हणतात माहिती आहे मला.
 
तिचा डीपी पाहिला आणि घोळ लक्षात आला. आताच हिला काही सांगितले नाही तर झोप नाही लागणार बाई आपल्याला...
And झोप is must for good health... 

"हो .. अग सावळे नाहीत काळे आहेत ते... 
पण छान आहेत. 
आवडतात मला... 
तुझा डीपी पाहिला. 
छान आहात दोघंही...
 
तुमचं बरं आहे बुवा. 
दोघेही गोरे असल्यामुळें लाईट बीलाचा खर्च वाचतोय तुमचा. 
सगळीकडे तुमचाच उजेड असेल. 
नाहीतर आम्हांला झिरो बल्बचं तरी बील येतचं बाई."

डोकं शांत ठेवून रिप्लाय दिला...
तिने 😊 इमोजी टाकून विषय संपवला..

हल्ली मी सल्ला द्यायच्या आधी समोरच्याची मनस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करते.. 
नाहीतर होतं काय की,  
आपल्याला कोणी problem वर सोल्यूशन मागतं आणि आपण असे सल्ले देतो की,  
समोरच्यासाठी आपण दिलेलं सोल्युशन नवीन प्रॉब्लेम होऊन बसतं... 
बरं आपण ज्याला प्रॉब्लेम समजतो, 
ते बऱ्याच जणांच routine असतं... 
आताच अशा सिच्युएशनमधून गेलेय मी... 
त्यामुळे मी एकदम शहाणी झालेयं..

आता जिने फोन केला त्या मैत्रिणीला जेवढं मी ओळखते त्यावरून तिने काही मेसेजवालीला सोडलं नसणार हे नक्की... 

"मग गं... तु काही बोलली नाहीस का तिला..?? सुनवायचं ना चांगलं..."  मी

" अग बोलली ना मी.. चांगलं ××××× ××××× ×××× ×× असं बोलले.. आणि whatsapp ला ब्लॉक करून टाकलं (तिने जे सांगितले ते अजिबात सांगण्यासारखं नाही.. अगदी मेसेंजरवर सुध्दा)

" बरं केलसं की मग... असचं वागायचं..." मी

"असं कसं कोणी माझ्या नवऱ्याबद्दल बोलू शकतं..? ही कितीशी ओळखते त्यांना आणि मला?? काही बोलायच्या आधी लोकं विचार करत नाहीत का गं..??  वाईट वाटलं... म्हणून तुला फोन केला.. तुझ्याशी बोललं की बरं वाटतं.." ती.

माझ्याशी बोललं की बरं वाटतं..??? 🤔🤔...

आयला हे म्हणजे काहीच्या काहीच ना रावं... बऱ्याच जणींना अजून मी बोललेल्या एका वाक्याचं संदर्भासह स्पष्टीकरण देतांना कधीकधी पुरवणीही जोडावी लागते मला....

काही मैत्रिणी जवळच्या.. त्यांच्याशी सगळंच शेअर केलं जात आणि त्या ही एकमेकींच्या पार्टनर बद्दल आदराने बोलतात...

आता परवा एका मैत्रिणीची ऍनिव्हरसरी होती म्हणून फोटो ठेवला माझ्या स्टेटसला... दोनतीन मेसेजेस आले मला.  " ती खुप छान आहे.. त्याच्यापेक्षा..." 

असु देत की मग... संसार छान करताहेत ना दोघं मग काय फरक पडतो...

मी काय म्हणते....आपण आपल्या घरचं पाहावं ना रावं... कशाला कोणाला नावं ठेवत फिरायचं.. ते ही त्यांच नात एकमेकांना पुरक, संलग्न आहे हे न पाहता... 

बाब्बो...!!! या वैचारिकतेचं काय बरं करावं??  काहीच कळत नाही ना रावं..🙆🙆🤦🤦


© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments