व्हाॅटसअप स्टेट्स आणि गोंधळ
हल्ली माझ्यातला बिनधास्त पणा वाढला आणि मी काढलेले फोटो दणादण whatsapp status ला ठेवू लागलेयं.. मी कोणाच्या पत्रिकेत घुसलेयं काही कळतं नाही बुवा... सगळ्या मैत्रिणी बिघडल्या हो माझ्या...
एकीने फोटो पाहून "पायात फेंगडी दिसतेसं की ग" असा मेसेज टाकला... मेसेज वाचला आणि पटकन स्वतःचेच पाय पाहिले दोन्ही. अगदी अनोळख्यासारखे.
ताईला फोन केला...
"काय ग ताई, मी पायात फेंगडी आहे का ग ???" मी
"फेंगडी म्हणजे???.." ताई
"अग पाय वाकडे आहेत का माझे, ते सांग.." मी
"कोण बोललं तुला..." ताई.
"अग आजचा फोटो पाहून मैत्रीण म्हणाली असं.." मी
"तु त्यांना तोंडावर नाव ठेवतेस, तुझ्याच मैत्रिणी ना त्या तुला कशा सोडतील..?? आता लावला ना डोक्याला भुंगा...?? भोगा आपल्या कर्माची फळं...हा हा हा हा.. 😂😂 " ताई..
बाब्बो!!! ही ताई म्हणजे ना.. मला ही चांगलं म्हणतेय की वाईट काही कळतंच नाही बुवा... एरव्ही माझ्याबद्दल हिला वाटणारा अभिमान अशावेळी कुठे बरं जात असेल....
"ते जाऊ दे ग, तु मुद्द्याचं बोलं.." मी
"हो वाटतात थोडेसे... पण फेंगडी म्हणण्याइतपत नाहीत... आमचे पण तसेच आहेत.. पण साडीत झाकून जातात... तु त्या 3/4th घालतेस ना त्यामुळे लक्षात येतात..." ताई
"जाऊ दे मग सगळ्यांचेच आहेत... म्हणजे खानदानी फेंगडेपणा हा..." मी
"खानदानी कसला..? आजीच्या कमरेवर बसून sight seeing करत फिरायचो ना!! त्याचा परिणाम हा.." ताई
आता हिला रिप्लाय तर द्यावाच लागेल. त्याशिवाय झोप कशी येईल आपल्याला... आणि पोटात मळमळत राहिल ते वेगळंच...
"तू फोटो आणि कँप्शन कसं आहे ते सांग.. ते पाय सोड.. कुठे पाय धरून बसलीस माझे ...?? वाकडे आहेत पण वाकडे नाही पडत बाई ते... चाळीस वर्षे साथ दिलीय त्यांनी... तेढे है पर मेरे है। आजीची कृपा. आजी गेली पण पाय आहेत अजून.." मी
असो...
मैत्रिण आहे तिला सगळं माफ.... पण काय करावं राव आता स्वतःकडे पाहताना पाय फेंगडे वाटून राहिले बाब्बो...
दुसरा किस्सा...
गणपतीसाठी लेक आत्याकडे जायचं म्हणून रडू लागली. "तुम्हांला नसेल यायचं सोडायला तर मी ताईमावशी सोबत जाते. मावशी मला आत्याकडे सोडेलं". नात्यांची सांगड घालून तिने फुल प्लॅन बनवलेला.
"तिला एकटीला पाठवण्यापेक्षा तु ही जा की सोबत दोन तीन दिवस राहून या." आई बोलल्या.
एखाद्या दिवशी कधी एकटं घरी राहायची वेळ आली की कंटाळवाणे होऊन जातं. त्यांचा चिरंजीव दिवसभर कामावर. त्यामुळे आईंना तीन दिवस एकटं ठेवून जायला मन तयार होईना. शेवटी तिला एकटीला पाठवायचं ठरलं. झालं मग - - मी, तिचे पप्पा आणि आजी कसेबसे तयार झालो पाठवायला. नऊ वर्षात पहिल्यांदाच तिला आमच्याशिवाय पाठवतं होतो. ते ही राहायला. दोनतीन दिवस.
तिलाही आमची खुप आठवण येईल तिकडे तेव्हा काय करेल ?? लगेचच आणायला जावं लागेल. आम्हांला तर करमणारच नाही. आपल्याला कसं कळेल तिला आठवण येतेय ती!!! तुम्हांला माझं डोकं माहिती आहे न!! नेहमीप्रमाणे चाललं. मी माझ्या whatsapp ला स्टेस्टस् ठेवला.." बघ तुला माझी आठवण येते का??" तिला समजावून सांगितले की तुला आमची आठवण आली की तु आत्याच्या मोबाइलवरून स्टेट्स खाली 'हो' लिही आणि पाठवून दे...
व्वा!! काय आयडिया सुचली आपल्याला... मी स्वतःवर खुश..
दिवसभर फक्त माझ्या स्टेटस् वर कमेंट्स.. "तुला कसं विसरणार गं" - भावनिक मैत्रिणी... "आज दादाशी काही बिनसलंय का??" - काळजीत नणंदा. त्यांनी आईंकडून खबर काढून घेतली...
"आज काय सकाळी सकाळीच सौमित्र घुसला की काय डोक्यात?? काय झालयं??" - बहिणी...
"वहिनी ठीक आहे ना सगळं??" - नवऱ्याचे मित्र.."
"तुला विसरणं निदान मला या जन्मात तरी शक्य नाही " - इति नवरा... किती वाटतं आहे सगळ्यांना आपल्याबद्दल... खुप बरं वाटलं...
खरी गंमत तर पुढे आहे... शाळा, काँलेजचा, office च्या मित्रमैत्रिणींचा whatsapp ग्रुप बऱ्याचजणांचे नंबर एकमेकांकडे... सगळ्यांना स्टेटस् दिसलेला..
ग्रुपमधल्या मैत्रिणी -"तु आधी होतीस तशीच आहेस...आम्ही नाही विसरलो तुला.. तुझा स्टेटस् आवडला मस्त आहे." - - - - - -
" काय सांगू तुला??..कधी विसरलोच नाही"....
"तुम्हें हम भूल जायेंगें ये तो हो ही नहीं सकता"...
"तुझ्या आठवणीशिवाय आजही दिवस जात नाही माझा"...
"आठवण यायला आधी विसरावं लागतं ना ??"---
दोन चार मित्रांचा रिप्लाय... 🤦🤦
छे! हे भलतचं झालं की राव...डीपी पाहिले. काही टोटल लागेना... 🙆🏻♀️🙆🏻♀️
एक खास मित्र त्याला सगळे screenshot पाठवले.. Caption मध्ये "कोण कोण आहेत रे हे ??" विचारले...
तो वैतागला. म्हणाला--"तुझे निद्रिस्त आशिक आणि कोण असणार???"
हँ! पुलाखालून इतकं पाणी गेलेलं आहे और मुझें खबर तक नहीं...अरे देवा..!!🙄🙄
"अरे, पण मग मला कसं माहित नाही???" मी.
"कसं माहिती असेल?? कधी लक्ष दिलंस का कोणाकडे?? एकतर सटकलेलं टाळकं तुझं. घाबरायचे सगळे. कोण बोलणार??" आयला
"अरे मग तु ही कधी काही बोलला नाहीस???"-- मी.
"कसा बोलणार?? मी ही त्यांच्यातलाच एक.." तो ही मस्करीच्या मूडमध्ये.
बोंबला... "तु मरत का नाहीस रे आताच.." मी (ही बोलायची पध्दत फक्त. )
छे! आता कोणाला काही बोलायची आणि विचारायची ही सोय नाही..."मुलाबाळांना आणि वहिनीला नमस्कार सांग हो." सगळ्यांना रिप्लाय. एक एक स्माईली टाकून संभाषण संपवलं...
एक कळलं की "किती संयमित होती आपली पिढी. समोरची मुलगी भाव देत नाही तर स्वतःचं प्रेम मनात ठेवून एकप्रकारे त्या मुलीचा आदरच केला होता ना त्यांनी.." त्या ही परिस्थितीत पुन्हा थोडं बरं वाटलं...
नवरा घरी आला..त्याला सगळं सांगितले - त्यांना म्हणावं "race मेरें सें है।" इति नवरा.... याच तर भलतच काहीतरी... डोक्यावर हात मारून घेतला. झालयं काय सगळ्यांना!! असे का बिघडले एकसाथ सगळे!!
शेवटी वैतागलेल्या डोक्याने सकाळपासून silent असलेल्या मैत्रिणीला फोन केला. सगळं सांगितलं.
"तुला नको त्या उचापत्या करायला सांगतं कोण?? कशाला असे स्टेटस् ठेवायचे.?? लेकीसाठी ठेवलेसं तर तिने किती वेळा रिप्लाय दिला?? ते भावोजी चांगले आहेत म्हणून नाहीतर लागली असतीस कामाला बरोबर.. त्यांनी काही वेगळा अर्थ घेतला असता म्हणजे काय केलं असतंस??? तुझा स्टेटस् पाहिला तेव्हाच तुला फोन करणार होते.. पण तुला तुझ्या कर्माची फळे मिळू देत... तोपर्यंत सुधरणार नाहीस... म्हटलं तुला कधी सुचतयं ते पाहू.... स्टेटस् डिलीट कर तो आधी"
निद्रिस्त ज्वालामुखी उसळलेला.... आयला हिने तर पार one to का 4 केलं की आपलं.... झाप झाप झापलं.... स्टेटस् डिलीट....
आपला हा शहाणपणा आगाऊपणा सहीत कधी आला आहे आपल्याकडे... शोध घ्यायला हवा एकदा.
शोध जाऊ दे सध्या.... आता माझं डोकं वेगळाच विचार करतयं... ज्या मुलीसाठी स्टेटस् ठेवून इतकं रामायण घडलं... तिला तर आठवण ही नाही. मस्त रमलीय खेळात आणि नवीन जागेत... मुलांना नव्याची ओढ - नवीन माणसे, नवीन ठिकाण याचं अप्रुप.. व्यवस्थित राहतात ते... Adjust करतात बरोबर स्वतःला.. आणि आम्ही पालक मात्र त्यांना पदराला बांधून ठेवतो...
रात्री आत्याने धरून बांधून विडिओ call लावून दिला तिला... दोन तीन वाक्ये बोलून पळून गेली खेळायला...
पप्पाला गहिवरून आलं लेकीसाठी... फिर अपना स्टाईल याद आया--"अरे बापू, मायुस होने का नहीं, बच्चे बड़े हो रहें है। दुनिया जानना चाहते है, उन्हें जखड के नहीं रखेंगें। चलों! थोडी आदत हम भी अभी सें डाल लेते है जानेमन खुद कों..." मनाची चलबिचल आणि समजुतीची शांतता...
माझ्यात खुप सुधारणा झालीय आता... ठरवून टाकलं लगेच दुसऱ्याला काही विचारायचंच नाही आठवण वगैरे... त्यापेक्षा मी स्वतःचा फोटो स्टेटस् मध्ये ठेवून त्याला "आज फिर खुद पे प्यार आया है" असं caption द्यायच्या विचारात आहे...
फक्त एकदा मैत्रिणीला विचारावं म्हणतेय... नाहीतर यावेळी ती अगदी पळवून पळवून मारेल मला..(सासरची मंडळी थोडी तरी घाबरतात माहेरच्यांना) पण या मैत्रिणीं माहेरच्यांना ही घाबरत नाहीत ना बाब्बो !!!
© Velvet Kavisha
1 Comments
😂😂भारी
ReplyDeletePlease do not enter any spam link in the comment box