दोन नंबरची पोरं हुश्शार




दोन नंबरची पोरं....हुश्शार..!!!
© Velvet Kavisha

एक ओळखीच्या काकु नुकत्याच गावाहून आलेल्या. त्यांना भेटायला जायचं. नवरा पेट्रोलला पैसे देतो पण गाडी घेऊन नाही देत. निरीक्षण करत फिरते तर गाडी ठोकेन ना म्हणून. 😀

मग काय मैत्रीणीला घेतलं. तिच्या गाडीवर गेलो. काकूंची चौकशी केली. चहा पाणी झाल़ं. घरादाराच्या गप्पा मारुन झाल्या आणि बोलता बोलता गप्पा पोरांवर आल्या. मी नेहमीप्रमाणे सगळ्यांना सांगते तसं बोलले.  

"मोठी शांत आहे हो माझी, पण धाकटीने फेस आणलाय तोंडाला. खुपच आगाऊ आणि उचापती करत असते..." मी.

"अग सगळ्यांची पहिली मुलं शांतच असतात. नवीनच लग्न झालेले तुम्ही. सगळं कसं गोड गोड सुरु असतं घरात.  कोणाचं काय तर कोणाचं काय चाललेलं असतं. एकमेकांची ओळख पुरती होत नाही तोवर बाळाची चाहूल लागते.  तुम्ही would be आईबाप. शांतपणे सगळंच समजून घेत असता. तोच गुण मोठ्या मुलांमध्ये उतरतो.  

नंतर फार विचारबिचार करून तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार करता. ही दोन नंबरची पोरं फार आगाऊ होतात कारण तुम्ही जूने, जाणते आणि अनुभवी झालेले असता." काकू बोलून थांबल्या आणि माझं विचारचक्र सुरू झालं.....

हो. खरचं आहे की हे.... पहिल्या वेळेस चाहूल लागते तेव्हापासून डॉक्टरांकडे फेऱ्या सुरु होतात. आईवडील म्हणून दोघेही नवीन असतात. खुट्टं जरी झालं तरी दवाखाना. तिथे सांगितले जातं. या दिवसांत हे असंच होतं असतं. आईवडील, आजी आजोबा, आत्या, मावशी, मामा आणि घरचे सगळे हळवे. साहजिकच पहिलं मुलंही तसंच हळवं, शांत, साधं,समजुतदार आणि थोडसं घाबरट. 

पहिल्या बाळाचा अनुभव गाठीशी. मग दुसऱ्या बाळाच्या वेळेस हे असंच होतं या दिवसात म्हणून मुळात आई वडील आणि आजीआजोबा सगळेच बिनधास्त. तोच बिनधास्तपणा दुसऱ्या मुलांमध्ये उतरतो....!!

लक्षात आलं की दोन नंबरची मुलं ८५%  घरांमध्ये आगाऊच असतात की. दोन मुलांमध्ये साधारण चार ते सहा वर्षांचं अंतर. मोठा दादा किंवा दिदी. त्यांना प्रचंड आनंद होतो, आपण मोठे दादा, दिदी झालो त्याचा. मग स्वतःचं सगळं बाळाला द्यायला तयार होतात. अगदी प्रेमाने सांभाळतात. छोट्याशा बाळाला आपली खेळणी, गमतीजमती, डान्स दाखवून होतं. मोठं पिल्लू आपल्या भावंडाला मोठं होताना पाहत असतं. त्यामुळे ते फारच समजूतदार बनत जातं.  

त्याच्या उलट दुसरं पिल्लू अगदीच दबंग. नाजूक पावलांनी दिदी / दादाला लाथा मारण्यापासून खेळायची झालेली सुरुवात. "आपल्या बाळाला खेळवं हां.'  म्हणत आईने उरकलेली कामं. बाजूला बसून मोठ्या बाळाने लहानाची घेतलेली काळजी. बाळ मोठं झालं की त्याच्यासोबत कोणते खेळ खेळायचे याची मोठ्या बाळाने पाहिलेली स्वप्नं. दुडू दुडू चालत.. दा--द्दा...दा---द्दा... दी---द्दी...दी---द्दी म्हणत त्यांचे ओढले जाणारे केस. नाजूक हातांनी तबला वाजवल्यासारखी थोपटली जाणारी टाळू. त्याच्या पाठीवर रेलणं. त्याला चावणं. त्याचे नाक, कान ओढणं. डोळ्यात बोटं घालणं. दादा/ दिदीसाठी सगळं भारी. धाकट्याच्या हक्काचं आणि यात फसलेलं मोठं भावंड...

वय दोन तीन वर्षांनी वाढतं दोघांचही. दादा दिदीच्याच सर्व वस्तू हव्या असतात पिटुकल्याला. त्याला आणलेलं काहीच नको. मोठ्यांचंच हवं सगळं. आमच्या घरात  दीदीची वस्तू दिदीला-तुझी तुला. दिदीने स्वतःहून शेअर केली तरच घ्यायची. नाहीतर दिदीला त्रास द्यायचा नाही. पण बऱ्याच घरी दादा दिदीला समजावून सांगितले जातं आणि शेंडेफळाची शेंडी अजून फुरफुरते....

मोठं पिल्लू बिचारं एका जागी बसून एकमार्गी शांतपणे खेळ मांडणार. निगुतीने खेळणारं. सोबत पिटुकलं पण सामावून घेतलेलं. खेळ एकदम रंगात आला की पिटुकलं मोठ्याची खोड काढणारच. मोठ्याने नाव सांगत त्रासाची तक्रार केली की पिटुकल्याला केव्हाच तरी आठवणार आणि मग वरच्या "सा" मधलं भोकाड... मोठ्याला आपला आवाज दबला जाण्याची भिती वाटून त्याने ही काळी पाचमध्ये "सा"  लावलेला. मोठ्याच्या रडण्यात छोट्याचं रडणं सगळे सूर एकवटलेले आणि एका हाती सगळं सांभाळू पाहणारी हवालदिल माय. खतरनाक सीन...

मोठ्या पिल्लांने काही गमतीजमती सांगायला सुरुवात करावी आणि तुम्ही ऐकत असाल तर पिटुकलं मध्येच येऊन तुमचं लक्ष स्वतःकडे वळवून घेणारंच. "एके दिवशी काय झालं माहिती हाय" म्हणत स्वतःच्या आठवणीतल्या कोणत्याही गोष्टी सांगायला सुरुवात करणार... "जरा थांब. दिदीचं सांगून झालं की तू सांग. दिदीने आधी सुरुवात केली ना सांगायला. तिचं झालं की तुझा नंबर.." म्हणत परिस्थिती सांभाळावी लागते.  

तुम्ही शांतपणे कुठे बसलेले असाल आणि तुम्हांला धाप्प् असा आवाज आला की समजावं. शेंडेफळानेच काहीतरी केललं असणार. शेंडेफळाचं वागणं पण कसं असतं ना. टेबल सरकवत नेऊन कुठे उंचीवर चढ. खिडकीतून उडी मार. वॉशिंग मशीनवर चढ. जीवाची पर्वा न करता उडी मार. असं चाललेलं असतं.  

त्यांना स्वतःच सगळं करायचं असतं. घरातील मोठ्या मंडळींची कॉपी करायची. वर थोरल्याला ज्ञान दान करायचं. आपल्याला सगळं येतंय या थाटात घरात वावरायचं. बापरे इतके उद्योग ना... सोबत मोठ्या पिल्लाची फरपट. वरून कांगावा असा की काही विचारु नका. थोरलं थोडं अस्ताव्यस्त करण्यात माहीर तर धाकटं तितकंच नीटनेटकेपणात हुशार.  

काकु बरोबरच बोलल्या की, सासरी आल्यावर आपलाही वेंधळेपणाच असतो ना. तो by default मोठ्या पिल्लांत उतरतो. दुसरं पिल्लू मात्र फुल प्लॅन करून आपण आणलेलं त्याला, त्यामुळे ते ही तसंच परफेक्शनिस्ट....

ही शेंडेफळं ना मला कधीकधी खाष्ट सासूबाईंच्या  रोलमध्ये दिसतात. एकतर वय लहान पण अक्कल नको तिथे चालते यांची. बरं धाकट्याचं घरातल्या सर्वांवर एकदम बारीक लक्ष. कधी पप्पा काही सांगायला मम्मीजवळ जाताना जरी दिसला तरी "पप्पा तू माझ्या मम्मीकडे का उभा राहिलास...?? तुला तुझी मम्मी आहे ना..??" असा आगाऊ प्रश्न धाकट्याचाच.  

कधीतरी पप्पाने बोलता बोलता मम्मीला हळूच डोळा मारावा अन् धाकल्याने  नेमकं तेवढंच पकडावं. रंगवून रंगवून सगळ्यांना सांगत सुटावं with action "पप्पाने ना मम्मीला डोळा मारला.." 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️ त्यात ही दोन नंबरची पोरं म्हणजे नाईट वॉचमन. इंटरवलला क्लायमॅक्स आणायचं कसब यांचच. 😜😜   

बरं आपण चुकून कधी यांच्या पुढ्यात चुकलोच. तर समजून जायचं की तुम्ही आयुष्यात फार मोठी चुक केली. कारण येणाऱ्या जाणाऱ्याला तुमची चुक एवढी रंगवून रंगवून सांगितली जाईल की तुम्हाला तुमच्या चुकीबद्दल पश्चातापच होईल. आणि कुठून झक् मारली आणि चुकलो असं होऊन जाईल....

सगळीकडे अक्कलहुशारी आणि आगाऊपणा. सगळ्या गोष्टी दादा/ दिदीसहीत घरातल्या सर्वांवर try करून झालेल्या. इतकं सगळं झालं तरी तुम्ही त्यांच्या दादा/दिदीला काही बोलूच शकत नाहीत. कधी बोलून दाखवा बरं. त्यांच्या परीने बरोबर बंदोबस्त करणार तुमचा. हे पाहिलं की मला मोठ्या पिल्लाची काळजी वाटतं नाही. कारण आपल्या मोठ्या भावंडासाठी झुंजणारं, भांडणारं कोणीतरी आहे या घरात. अगदी आपल्या मागेही.... हुश्श !!!!

"अहो काकू, पहिलं / दुसरं मुलं असं काही नसतं हो. मला एकच मुलगा आहे. तरी पण फार आगाऊ आहे...."  बराच वेळ गप्प असलेली माझी मैत्रीण बोलली.... आणि मी तंद्रीतून बाहेर आले.

"अग मग तुमचं लव्ह लग्न असेल..." त्यावर काकुंचे उत्तर. 

अरे हो च की मुळी, माझ्या मैत्रिणीचं लव्ह मॅरेजच आहे. काकुंचा अंदाज तंतोतंत एकदम.

अरे देवा!!! काकुंना काय म्हणायचं आहे नक्की.. ?? म्हणजे लव्ह मॅरेजवाले आधीच धीट झालेले असतात. असं म्हणायचं आहे का काकुंना..🤔🤔  काहीच लक्षात येईना. मी काकूंकडे पाहिलं. डाय खालचे अनुभवाने पांढरे झालेले केस शोधायचा अगतिक प्रयत्न केला. पण कसलं काय... काकुंचे विचार थोरच होते.  

बाब्बो....!! मी out of way  जाऊन खुपच वेगळा आणि सात्विक विचार केला की...🙆🙆 आणि काकुंचा track मात्र वेगळाच. आता तुम्हाला सांगते... तुम्ही काकूंच्या डोक्याने विचार करा किंवा माझ्या. दोन नंबरच्या वेळेस आपण मात्र धीट झालेले असतो. हे नक्की....

बाब्बो...!!! खोटं वाटतंय होय..?? मंग जावा तिकडं... आणि शांत बसून विचार करा..😜😜

©Velvet Kavisha

Post a Comment

1 Comments

  1. ताई फार सुंदर लेख मी ही शेंडेफळ पण तितका आगाऊ नाही हा पण जितक आपल्या लेखात आपण मांडलय ते काहींच्या बाबतीत तंतोतंत जुळतय
    फार सुंदर लेख

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box