संडेचे फंडे...
© Velvet Kavisha
रविवारची सकाळ जरा जास्तच निवांत असते. डोळे उघडून पाहिलं. "मी या घरची राणी..!! माझ्या राजाला 'शोभते' नाही हो..."शोधते". कारण बाकीचे कधीच उठलेले.. अंथरुणातून गायब.
रुद्रा रुद्रा..!! नऊ वाजले. अंथरुणाची ताटातूट होत नाही तोवर मैत्रीणीचा फोन. ही मैत्रीण नेहमी तिला फोन करून 'ती आहे की गेली' ते चेक करते म्हणे. फोन ठेवून आतल्या खोलीत डोकावलं तर पोरांच्या खेळण्यांच्या पाचसहा गोण्या, रद्दी, नको असलेले कपडे, भंगार आणि त्याच्या बरोबर मध्यभागी "राजा" सापडला. बाजूला कपाट जणू दोन्ही हात पसरून आलिंगन द्यायच्या बेतात. उघडलेला बेड तर काय म्हणतोय तेच कळेनासं..
एरवी झोप मिळत नाही म्हणून वैतागणाऱ्या राजाच्या डोक्यात सुट्टीच्या दिवशी काय "केमिकल लोच्या" होतो काही कळत नाही. सकाळी साडेसहा सातपासून उठून गाडगे महाराज प्रसन्न. "एक पाऊल स्वच्छते की ओर". सोबत पोरं मदतीला.
"अरे, काय काढून बसलात तुम्ही..?? ते ही सकाळी सकाळी..!! सुट्टीच्या दिवशी." ती.
"अग, तु एकटी किती करणार म्हणून पप्पा म्हणाले, आज आपण मम्मीला मदत करू. आम्ही पप्पांना मदत करतोय. तु पण ये चहा घेऊन." मुलांनी उत्साहात सांगितले.
पप्पा जुनी खेळणी टाकण्यासाठी बाजूला काढतोय, तर पोरं ती पुन्हा खेळायला घेताहेत. जिथला पसारा पुन्हा तिथेच राहतोय. पोरांनी कपड्यांवर ही उड्या मारून सगळा सावळा गोंधळ घातलेला.
तिची अलका कुबल झालेली... "दुभंगली धरणी माता, फाटले आकाश गं.." म्हणत. काय करावं..?? या उपसून ठेवलेल्या ढिगात उडी मारून जीव दिला तर जाईल का..?? या विचारात 'येते' म्हणालेली ती.
हे आवर ते आवर करत साडेबारा झालेले. स्वयंपाकात खिचडी करू आणि लोणचं पापड घेऊ... तिने बेत सांगितला तसं पोरं आणि राजा उखडले. "संडे के दिन कोई खिचडी खाता है क्या सिमरन..?? आज तो मासे ही मंगते है...।" आता मात्र 'कधी संपणार नाही तुझा वनवास गं' फील.
आयला, हे काय रावं. एकतर अनप्लॅन्ड साफसफाई विदाऊट परमिशन. निदान जेवणात तरी compro करा. पण छे..! मग काय गाठलं फिश मार्केट. तीन प्रकारची मच्छी घेऊन घरी. साधारण दुपारचा दिड वाजलेला.
कोलंबी हो. सोलायला वेळ लागतो. राजा मदतीला. सगळी मच्छी साफ करेपर्यंत दोन वाजलेले. फिश फ्रायची जबाबदारी राजाने उचललेली. मध्येच पोरांची फर्माईश "मम्मा ती कोलंबी आपण खाल्ली तशी BBQ करून दे ना प्लीज. त्या सळ्या पण आणून ठेवल्यात ना आपण." अशावेळी ती स्वतःला शक्यतोवर शांत ठेवण्याचाच प्रयत्न करते. नाहीतर रागात स्वतःच BBQ व्हायची पाळी with smoke..
मध्ये रद्दीवाला रद्दी घेऊन गेला. संस्थेचे लोक येऊन कपडे आणि खेळणी घेऊन गेले. Watchman जूनं टेबल घेऊन गेला. एका बाजूला हे असे येणारे जाणारे आणि त्यांचे फोन. दुसरीकडे स्वयंपाकाशी दोन हात.
"भुक लगी है। खाना दो" चा पोरांनी दिलेला नारा. तिने त्याच्याकडे पाहिलेलं. "काळजी नको करूस. पोरांना मी भरवतो." म्हणत त्याने अस्वस्थ तिला आश्वस्त केलं.
कोकणातल्या लोकांचं भात आणि मासे मुख्य अन्न. त्यामुळे "नो पोळी, भाकरी टुडे". फक्त भात आणि मासे. तिची अनाउन्समेंट.
"जास्त नको करुस पोळ्या. सगळ्यांच्या ताटात एक एक येईल एवढ्या कर फक्त." सगळ्या तोंडातून एकच फर्माइश. देवा..! नेणार असशील तर आताच ने... नंतर नको. नंतर काही मी यायची नाही. तिची देवाशी हमरीतुमरी.
ती आणि तो जेवून उठेपर्यंत चार वाजले. जेवून बडीशेप तळहातावर घेऊन दोघे बसले. थोडं निवांत. तेवढ्यात "धाप्प्" आवाज आला. पोरांमधल्या छोट्याने उडी मारलेली. दोन्ही ओठ फुटलेले. नवीन अध्याय सुरु झालेला. सगळे उपाय करुन झाले तरी रडणं काही कमी नाही. तिनेही छोट्यासोबत रडायची तयारी केलीच होती, तेवढ्याच त्याने छोट्याला घेतलं. फिरवलं. शांत झालेला छोटू झोपला तरीही झोपेत हुंदके सुरुच.
साडेपाचपर्यंत "हा खेळ रडण्याचा." आता भांडी बाकी होती. बाहेरचं एक काम करून तिला आईकडे जायचं. सगळं आवरून ती रात्री साडेनऊला घरी आली तर पोरं आणि पोरांचा पप्पा जेवून झोपलेले.
किती सुखी प्राणी हा. साडेनऊला झोपला ही. घोरतोय चांगला ढाराढूर. जाऊ दे. तिने ही थोडंस खाऊन, आवरून झोपायला गेली.
त्याला असा पालथा, अस्ताव्यस्त झोपलेला पाहून तिच्या मनात विचार आला आणि तिची सकाळपासूनची चिडचिड नाहीशी झाली. वाटलं, किती करतोय हा. काय लागतं खरंतर एका माणसाला. याचं तर फक्त पंधरावीस हजारात भागेल. तरीही दिवसरात्र कष्ट करतोय. कुटुंबासाठी. लग्न ही त्याची एकट्याची गरज नव्हे. जसं त्याने केलं आपल्यासोबत तसं आपणही केलयं त्याच्यासोबत.
सकाळी इतका पसारा त्यानेच काढला तरीही जेवायला बसेपर्यंत सोबत थांबला. मुलांना सांभाळलं. मैत्रिणी तर "लकी आहेस" म्हणतात. पण तिच्या डोक्याचं आणि मनाचं गठबंधन होतं नाही एखादवेळेस. तो असा झोपलेला आणि त्याच्याबाजूने असं बरंच काही वाटलेलं. तिने हाताची बोटं नकळत त्याच्या केसांत फिरवली...
तेवढ्यात, कोणीतरी तिला गदागदा हलवत होतं. तिने डोळे उघडून पाहिलं समोर तो. "काय झालं गं?? झोपलेल्या लेकीच्या केसांत हात का फिरवतेस.?? सहा वाजलेत. रविवार आहे. झोपू दे तिला शांतपणे. तुला काही स्वप्न पडलं का..?? " त्याने पुढे विचारलं. तिने "हो" म्हणत आपलं स्वप्न त्याला सांगितलं.
तिने झोपलेल्या मुलींकडे पाहत.."आपल्याला तर दोनच मुली ना..?? मग स्वप्नांत तुझ्यासोबत चार पोरं दिसत होती. आणि तू थोपटून झोपवलेला तर छोटू होता. एरवी पोरांना झोपवायचा तुला कंटाळा येतो. त्या छोटूला तू सहज झोपवलंस." म्हटलं.
"ए बाई, तुझ्या स्वप्नाशी आणि त्या पोरांशी माझा काहीही संबध नाही हां... उगाच स्वप्नात काही बाही बघत बसशील आणि माझ्या माथी मारशील. आता नीट ऐक. जसं स्वप्नांत झालेल्या धनलाभातून आलेले पैसे स्वप्नातल्या बँकेतच भरायचे असतात. तसंच स्वप्नांतील पोरं स्वप्नातंच. त्याचा सत्याशी काही ही संबंध नाही. आणि माझ्याशी तर अजिबातच नाही. तुलाच हौस पोरांची." त्याची ही बऱ्यापैकी सटकली असावी...
"बरं बरं.. कळलं मला. साडेसहाचं वाजलेत आणि आज संडे आहे तर मी झोपते तासभर आता.." ती म्हणाली तसं तो उचकला.
"एक बाई,,, आता अजिबात झोपू नकोस. ढाराढूर झोपशील आणि स्वप्नं कंटिन्यु करशील. ती दोन पोरं कोणाची त्याचा शोध लावशील. उगाच आणखी दोन पोरं माझ्या रेशन कार्डवर चढवशील... 😂
morning walk ला चल त्यापेक्षा. मस्त फिरून येऊया आज."
बाब्बो...!! याचं आपलं काहीतरीच. मी कशाला शोध लावायला जातेय मरायला.... स्वप्नं पण काय भयानक पडतात ना रावं.. स्वप्नं नेहमी स्वप्नंच असतात ना... पण अशा मजेदार स्वप्नांमुळे "टांग खिचने" में बहोत मज्जा आती है रे बाब्बा...🤗🤗🤗
पहाटेची स्वप्नं खरी होतात असं म्हणतात.. ते खरंच असेल आजच्या संडेचे फंडेच होतील ना रावं....🤭🤭😜😜
©Velvet Kavisha
नावाशिवाय शेअर करू नका..

2 Comments
Sunday ची धावपळ आणि ठरलेले प्लान बदलणे हे घरोघरी असले तरी तुझे वर्णन भन्नाट आहे.
ReplyDeleteथँक्स डिअर....
DeletePlease do not enter any spam link in the comment box