गोष्ट लग्नाची आणि जन्मपत्रिकेची

गोष्ट लग्नाची-जन्मपत्रिकेची..!!


© Velvet Kavisha



तेवीस लागलं आणि आईने लग्न जमवण्यासाठीची धावपळ सुरू केली.  मी ताईकडे राहायला. ताईने ही दोघाचौघांना सांगितले.  काही लोकं फुलटाईम हेच काम करतात. उपवर मुलंमुली शोधायच्या आणि सोयरीक जुळवायची. त्यांनी ताईकडे जन्मपत्रिका मागितली. कोकणात अजूनही पन्नास टक्के लग्नं पत्रिका न बघताच करतात. विवाहमंडळात नाव नोंदवलतं तर मग तिथे पत्रिका कंपल्सरी.


"पत्रिका नाही हो काका." ताई म्हणाली.


"काढावी लागेल. मंगळ आहे का पाहुया तुझ्या बहिणीला. माझ्याकडे मांगलिक दोन मुलं आहेत." काकांनी सांगितले. हे गणित वेगळंच. 


आता माझ्याच लग्नाच्या बाजारात मला हे लोक तोंड नाही उघडू देणार नाहीत. Would be bride ना मी.. 😃😃
  


"काका, मंगळ बिंगळ काय हो बोलता? सोन्यासारखी बहिण आहे माझी. आधी पत्रिका तर बघू. तुमच्या ओळखीत आहेत का कोणी गुरुजी..??  असतील तर सांगा. काढून घेऊ. इथे नाही जुळली तरी अजून दहा ठिकाणी सांगून ठेवलंय. कोणी ना कोणी मागेलच." ताईने काकांना सांगितले
(मंगळ असणाऱ्या मुलाला मंगळ असणारी मुलगी शोधतात हे शास्त्र तेव्हाच कळलेलं.)


काकांनी पत्रिकेची फी आणि गाडी भाड्याचे पैसे घेऊन चिंचपोकळीला जाऊन पत्रिका काढून आणली. माझ्या अंदाजानुसार त्यात मंगळ कडक बांधून आणला होता. सुरवातीपासूनच जन्मपत्रिकेच्या बाबतीत माझी स्वतःची अशी खास मते आहेत. मला ग्रहताऱ्यांचं अप्रुप. ते स्वतःभोवती फिरतात, सूर्याभोवती फिरतात. इतकं सगळं करून पुन्हा पत्रिकेत येऊन काम करायचं. म्हणजे काय खायची कामं आहेत होय...
 


बिच्चारे!!! आता मंगळ ग्रहाची पत्रिका काढली तर त्यात माणूस घुसलाय राहूकेतू सारखा असं येईल का हो?? जाऊ दे. उगाच सिरीयस विषयावर थट्टा नको.


आमच्या वाडीत नवीनच भटजी आलेले. मामांनी दिलेल्या मस्त दोन दुभत्या म्हैशी होत्या आमच्याकडे.  घरून मी दुध पोचवायला जायची त्यांच्या घरी. तेव्हा मला कळलं काकी "तिसरी पत्नी" होत्या काकांच्या. आधीच्या दोघी वारलेल्या. काकींना आठ वर्षे मुलबाळ नव्हतं. तेव्हा पहिला प्रश्न पडला पोराबाळांच्या पत्रिका पाहून शांती करायला सांगणाऱ्या भटजी काकांना त्यांच्या पत्रिकेत तीन लग्न आहेत ते कळलं नाही का???


पुढे पुढे प्रश्न वाढतच गेले. बारा राशी, सत्तावीस नक्षत्रे, ग्रहतारे सगळे लिमिटेड आणि माणसे अनलिमिटेड.  म्हणजे कितीही लोकसंख्या वाढली तरी बारा राशीतच बसणार.  म्हणजे जगात फक्त बारा स्वभावाचे लोक असायला पाहिजेत. बरं नंतर शास्त्रज्ञांनी नेपच्यून, प्लूटोचा शोध लावला. ज्यांनी आधी पत्रिका काढली त्यांच्या पत्रिकेत हे दोघे नाहीत.


त्याच लोकांची रिपीट पत्रिका काढली तर त्यात हे दोघे हजर. विचारलं ही. पण कोणी उत्तर दिलं नाही. काही लोकांनी समजावून सांगितलं. पटल्यासारखं वाटलं तेव्हा, पण नव्हतच पटलेलं.
 


गेल्या वर्षी लेकीला घेऊन नेहरू तारांगणला गेलेले. तिथे सायंटिफिक माहिती ऐकताना कळलं की राशी कशाच्या आधारावर बनवल्या आहेत. आणि महत्त्व ही पटलं. 


मांगलिक दोन मुलांपैकी एकाशीही माझी सोयरीक जुळली नाही. त्यांनी पत्रिकेसोबत वेळ तारीख सगळं घेतलेलं. त्यांच्या भटजींनी सांगितले असेल त्यांना... नकाराचं कारण होतं- - पत्रिका जुळत नाही.


ताईला सुचेना काही. काय बरं करावं. तिचं डोकं बधीर झालं. कारण आजपासून पंधरा वर्षांपूर्वी पत्रिकेतला "मंगळ" वाईटच होता. आता ठीक आहे थोडं भारत त्यावर मंगळयानं सोडतोय. ताईला खुप विचारांती एक खूप विचित्र प्रश्न पडला "पत्रिकेत मंगळ आहे की टाकला गेलाय???" 


मी म्हटलं- - "कदाचित टाकला गेलायं."


"पुन्हा पत्रिका मांडायची का चांगल्या भटजींकडे?? थोडासा खर्च होईल. पण करु. शंका निरसन होईल.." ताईने समजुतीचा मार्ग काढला.


झालं.... खरचं पुन्हा पत्रिका मांडली. त्यात सौम्य मंगळ. म्हणजे जास्त त्रासदायक नाही. काही काळच त्याचा इम्पॅक्ट वगैरे. भटजींनी नीट समजावून सांगितले. कोणत्या राशीची मुलं चालतील. कोणतं नक्षत्र असलं पाहिजे. सगळं सगळं व्यवस्थित सांगितले. ताईला हुश्श झालं.


माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्या ते सगळीकडे कळलंच. बाजूच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एकाने हिम्मत केली. मला म्हणाला "खुप दिवस सांगेन म्हणतोय. तु मला आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर."..


आयला डायरेक्ट प्रपोज!! अपने आशिक गली गली में है और हमें खबर तक नहीं.. 🤔🤔 धत्त तेरे की..!!


"ठीक आहे. सांगते विचार करून उद्या." मी वेळ मारून नेली.


आता प्रेमवीरांच्या बऱ्याच जाती आहेत. काय सांगावं त्याला?? ताईला सांगितले सगळं. ताई म्हणाली "तुला काय वाटतं..??"


"मुलगा बरा आहे पण यांच्या भागात हुंडा पध्दती आहे. यांना सगळं माहेराहून लागतं. आता प्रपोज करेल आणि नंतर मला आईवर सोडून देईल. आईच्या पदराला बांधलेला नको. व्यक्ती आणि आई म्हणून आईवर प्रेम करणारा असावा. त्यांच्याकडच्या सासवा म्हणजे #भस्म्या रोगाने पिडीत. "आवा दे. आवा दे" म्हणत अख्खं आपलं घर लुटतील. कर्ज काढावं लागेल आणि मी तिथे सुरुंग लावून येईन. शिवाय आपल्या त्यांच्या पध्दती वेगळ्या. आपलं कोकण भारीय. ना हुंडा ना देणंघेणं. ना पत्रिकेत शे दोनशे ते हजार बाराशे नावं. लग्नाचा खर्च अर्धा अर्धा. बाकी साड्यां दागान्यांचं काही टेन्शन नाही. तुमची मुलगी लग्न करून नेतोय म्हणजे तुमच्यावर उपकार नाहीत तर गरज आम्हांला ही आहे ही भावना.
 

वेस बदलली की शास्त्र, रितीरिवाज बदलतात. तर पूर्णपणे वेगळ्या भागात जाऊन तिकडंच शिकण्यात वेळ वाया घालवण्याचा मुर्खपणा निदान मी तरी करणार नाही. बाकी मी ठरवेन त्याच्यावर प्रेम करण्याची कुवत माझ्यात आहे. डोळस प्रेम म्हणतात त्याला.."😊😊 मी माझं स्पष्ट मत मांडले. 


आता त्या मुलाला नकार द्यायला हवा. पण चांगल्या शब्दांत. काही मूलं हळवी असतात. विचार करता करता नेहमी प्रमाणे डोकं चाललचं ताईच आणि माझं...
 


दुसऱ्या दिवशी ऑफिस लॉबीत भेटले त्याला.

 

"तुझं नक्की प्रेम आहे माझ्यावर?" मी.

 "हो." तो.


"म्हणजे मग लग्न पण माझ्याशीच करणार असशील.?" मी.


"हो मग. म्हणून तर प्रपोज केलं ना तुला..??" तो.


"बरं ठीक आहे. ही पत्रिका आणि ताईचा पत्ता घे. पत्रिका तुझ्या घरी दाखव आणि त्यांना सांग कडक मंगळ आहे पोरीला. तरीही मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. घरचे काय म्हणतात ते सांग मला. आरामात सांगितले तरी चालेल. मी वाट पाहते. तुझ्या माझ्यावरच्या प्रेमासाठी मी एवढं करूच शकते.."  मी.


मंगळाला लोकं घाबरतात. साधारणपणे मंगळाच्या मुलीचं लग्न मंगळ नसणाऱ्या मुलाशी झालं तर त्या पोराचं "ओम फट् स्वाहा" होणार अशी अंधश्रद्धा. पुढे त्या ऑफिसच्या मजनूचा मिस्टर इंडिया झाला की काय कोण जाणे. पण दिसलाच नाही नंतर. कदाचित रस्ता किंवा ऑफिस बदललं असेल. 😛😛😜😜


मी स्वतःवर खुश आणि माझी ताई स्वतःवर. अगदीच काय काकांनी पैसे वाया नाही घालवले. पत्रिकेचा असाही उपयोग झाला म्हणायचा. लोकांनी गरीबाची पोर मार्गी लागावी म्हणून कसलीही स्थळ सुचवायला सुरुवात केली.


ना धड शिक्षण ना नीट नोकरी. कशीही मुलं स्थळ म्हणून सांगायचे. ताई खंबीर. म्हणाली लग्न उशिरा झालं तरी चालेल पण योग्य मुलगा मिळाल्याशिवाय नाहीच. या लोकांना एक स्थळ नको सांगितले तर दुसरं आणणार नाहीत. म्हणून मध्यस्थांना दुखवायचं टाळणं गरजेचं होतं. मग काय पायंडाच पडला. आपल्याला बऱ्या वाटणाऱ्या स्थळांना खरी पत्रिका आणि वर्णन ऐकून नको असलेल्या स्थळांना कडक मंगळाची पत्रिका. विषय कट्.
 


शोधाची पंचवार्षिक योजना राबविल्यानंतर माझी  मट्रिमोनिअल साईट्सवर प्रोफाइल टाकली.
नवीनच होती वेबसाईट. पहिलचं प्रपोजल फायनल. सगळी मंडळी चांगली.  बाविसाव्या वर्षी सुरु झालेला सिलसिला पाच वर्षांनी संपला. अर्थात ज्ञानात प्रचंड भर टाकून.
 


लग्नाआधी माझ्या सासऱ्यांनी गुणमिलनासाठी भटजींना पत्रिका दाखवलेली, तेव्हा कालसर्प आणि अतिगंड दोष सांगितला. शांती लग्नानंतर केली तरी चालेल म्हणाले. भटजींनी स्वतःची सोय पाहिली. म्हणाले "चांदीचे साप" लागतील. ते मी घेऊन येईन. पुजेचं सगळं सामान मी आणतो तुम्ही फक्त पैसे द्या..सासऱ्यांनी हो म्हटलं. भटजींनी गिऱ्हाईक बांधून घेतलं.
 

लग्न छान झालं. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण. पुजा पठण सुरू. हातात पाणी घ्या, डोळ्यांना पाणी लावा, शुध्दोदक समर्पयामि, उष्णोदक समर्पयामि, सुंगंधादि द्रव्यम् समर्पयामि सांगताना भटजींनी मध्ये मध्ये थांबत नवरदेवाला मट्रिमोनिअल साईडची अख्खी process विचारून घेतली. भटजींचं वय 33 आणि लग्न बाकी होतं. ताटात पाणी. हातात पाणी करत  नवऱ्याने माहिती दिली..🙄🙄


काय रे देवा हे भटजी पण. जे लग्न झालंय त्यांच्या लग्नाची पुजा तर पूर्ण करा आधी. मग पाहू की,,, न झालेल्या लग्नाविषयी... (आता त्या भटजींचा गेल्या बारा वर्षात एक डिवोर्स होऊन दुसरं लग्न झालयं.)


थोड्या दिवसांनी शांती करायची ठरली. भटजी स्वतःसोबत अजून एक भटजी घेऊन आले. सामान ही त्यांनीच आणलं. पुजा सुरु होऊन तासाभरात संपली सुध्दा. म्हणाले "दोष" गेला.
 


" हे बरंय..!! दोष गेला ते... नक्की गेला ना दोष.??" नवरा सायन्सचा विद्यार्थी त्याने विचारून घेतलं.


"हो. हो. म्हणजे काय..??" भटजी उत्तरले.


त्याने दक्षिणा काढून दिली. खिशातून माझी पत्रिका काढून त्यावर लिहून घेतलं. "दोषशांती केलेली आहे." न जाणो बाबांना पुन्हा नवीन भटजी भेटलाच तर दाखवायला बरं...

 
भटजींनी, पुजेचं विसर्जन कसं करायचं ते सांगितले. नवऱ्याला म्हणाले,"ते पूजेत मांडलेले चांदीचे साप उचलून मला दान करा. नवऱ्याला समजेना कृती काय आहे नेमकी..
                                     
 
"म्हणजे काय करायचं आहे??" त्यानें विचारलं. 


तसं भटजी म्हणाले, " ते साप घ्या आणि माझ्या हातात द्या. म्हणजे दानाचं पुण्य लागेल तुम्हांला.." 


त्याचं डोकं तीन चार वेळा गरगरलं. त्याला काहीच टोटल लागेना. बाबांकडे पाहिलं तर त्यांनी भटजींच्या "हो ला हो" केलं. झालं- - साप दानात गेले. "साप दानात देणारा मी एकटाच असेन..." त्याची खदखद. असो. हा विषय संपला.
 


माझ्या पंचवार्षिक लग्न जुळवणी योजनेत मागच्या दोन बहिणींच्या लग्नाला थोडा उशीर झाला. अजून उशीर व्हायला नको म्हणून मग युध्दपातळीवर शोधमोहीम सुरु झाली.
 

दोन्ही बहिणींच्या पत्रिका काढून घेतल्या. जुळवण्यासाठी कमी, तर बेधडक नकार देण्यासाठी. बहिणींना ही मजनू भेटलेच की. तेव्हा या पत्रिकेनेच तारलं. मलाही ही हळूहळू थोडं सांगता येऊ लागलं. नाडी आणि रक्तगट एक आहे.. अमुक राशी नक्षत्र, तमुक राशी नक्षत्राशी जुळत नाही वगैरे वगैरे. तिच्या छोट्या मुलीची पत्रिका काढली. नावराशीसाठी. भटजी म्हणाले ३६ हजार खर्च येईल. शांती करावी लागेल.
 

"भटजीबुवा  तुम्ही चार महिने आमच्याच पैशावर जगणार का??" तिच्या एका प्रश्नावर विषय कट्...


वाचकहो, जन्मपत्रिका काढायची की नाही??  पत्रिकेवर विश्वास ठेवायचा की नाही? पत्रिकेच्या नावाखाली लुटणाऱ्यांच्या किती आहारी जायचं हे आपलं आपण ठरवायचं. नाही का??? खुप लोकांना पाहिलंय पत्रिका पत्रिका करताना. आणि काही गुरुजी पाहिलेत कालसर्प शांतीसाठी चांदीचे साप दानात घेणारे. कोणतीच गोष्ट वाईट नसते पण आपण त्याच्या किती आहारी जातो त्यावर त्याची घातकता अवलंबून असते.


हा ब्लॉग लिहिताना थोडं दडपण आलं. कोणाचीही मने दुखवण्याचा , कोणाला कमी लेखण्याचा तसेच ज्योतिष विद्येचा अनादर करण्याचा हेतू तर अजिबातच नाहीय. 


तुमच्या कमेंट्स नक्की लिहा. फक्त वाद घालू नका. वाद घालण्याइतपत ज्योतिष शास्त्राचा माझा अभ्यास नक्कीच नाही.
सदर लेखाचे हक्क लेखिकेकडे राखीव. नाव आणि लिंकसहित शेअर करण्यास हरकत नाही.

© Velvet Kavisha

Post a Comment

0 Comments