अनपेक्षित भाग एक
लेखिका- सविता किरनाळे
“आहना मॅम शाॅट इज रेडी.” स्पॉटबॉयने आहनाला सांगितले. मेकअप आर्टिस्टने शेवटचा टचअप दिला आणि आहाना सेटकडे चालू लागली. हीरो नील आपल्या गेटअप मध्ये तयार होता. पाहता पाहता आहना आपल्या भुमिकेत शिरली.
“हमारी शादी क्यूँ नहीं हों सकती मीत, दो सालसे हम रिलेशनमें हैं, तूने कितने वादे किये थे मुझसे, कितने ख़्वाब देखें थे हमने, अपने घर के, बच्चोंके और अब तुम कहते हों भूल जावो मुझे, इज इट इवन पॉसिबल?”
“तुम समझ नहीं रहीं हो आयशा, मेरे पापा हमारे इस रिश्तेके ख़िलाफ़ हैं, उन्होंने साफ़ कह दिया हैं कीं या तो मैं तुम्हें छोड़ दूँ या जायदादको हमेशा के लिए भूल जावू।”
“और तुमने जायदाद चुन ली, मीत। अच्छा हुआ अभी तुम्हारा असली चेहरा सामने आ गया,वरना तुम्हारे होने वाले बच्चेको मैं यें कैसे बताती कीं तुम्हारा बाप तो रणछोड़ निकला।” शब्दाशब्दातून तिरस्काराचे फुत्कारे टाकत आहना बोलत होती.
“शॉट ओके, कट.” डिरेक्टरचा आवाज आला आणि आहना लगेच भुमिकेतून बाहेर आली. डिटेक्टरच्या बाजूच्या खुर्चीत बसून ती आणि नील स्क्रीनवर शॉट पाहू लागले. एकदम मस्त अभिनय केला होता दोघांनी. दोघांची एकत्र अशी ही चौथी फिल्म होती. आधीच्या तीनही फिल्मने चांगला बिजनेस केला होता. सर्व प्रोड्यूसर, डिरेक्टर यांची ही फेवरीट जोडी होती. नुसत्या यांच्या नावानेच वितरकांच्या अक्षरश: उड्या पडायच्या सिनेमावर, प्रेक्षकांच्या तर विचारूच नका.
बावीशीची आहना होतीच इतकी सुंदर, जणु देवाने हिला मुद्दाम वेळ देवून घडवले असावे. अतिशय प्रमाणबद्ध शरीरयष्टी, नेटके प्रमाणबद्ध अवयव, गोरापान अंडाकृति चेहरा, किंचित अपरं नाक, मोठे डोळे, सुंदर गुलाबी ओठ, नितळ कांती आणि यावर कडी म्हणजे फिल्मइंडस्ट्रीला शोभणारी पाच फूट आठ इंच अशी सणसणीत उंची. आणि हे सर्व नैसर्गिक बरं का, कोणतीही सर्जरी न करता तिला हे रूप लाभलं होतं. करोडो लोकांच्या दिलकी धडकन होती आहना. तिची आई राधिकाही तिच्या काळातील नंबर वन अभिनेत्री होती. तिने लहानपणापासूनच आहनाला आपल्या तालमीत तयार केले होते. ती मुलीची मेंटॉर होती. आपल्या अनुभवाच्या जोरावर तिने आहनाला अनेक मौल्यवान सल्ले दिले होते, जे नेहमीच तिच्या कामी आले होते. म्हणून आहना आईचे सल्ले तंतोतंत आचरणात आणायची.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असतानाच राधिकाने आपल्या मुलीला सांगितले होते, “हे बघ बेटा, हीरोईनचे करियर खूप कमी काळाचे असते. तेवढ्या कालावधीतच लोकांच्या मनावर राज्य करायचे असेल तर तू तीन गोष्टींपासून नेहमी दूर रहा, ड्रिंक्स, ड्रग्स आणि प्रेमप्रकरण. लोकांना स्वच्छ, निर्मळ चारित्र्याची अभिनेत्री भावते. अशा अभिनेत्रींचे करियर जरी संपले तरी त्या कधीच विस्मरणात जात नाहीत.”
म्हणूनच आहनाला न कसले व्यसन होते न तिच्या नावाने खमंग बातम्या प्रकाशित व्हायच्या. तिला अजिबात कशाचा गर्व नव्हता. खऱ्या अर्थाने ती एक परिपूर्ण स्त्री होती. तिचे वडील चित्रपट वितरक आणि गाजलेले मॉडल होते. अगदी मणीकांचन योग होता आहनाच्या नशीबात. इंडस्ट्रीमध्ये अशी कुजबुज होती की राधिका ही आहनाची खरी आई नाहीच कारण दोघींच्या दिसण्यात जमीनअस्मानाचा फरक होता. आहनाचा फक्त रंगच तेवढा वडीलांवर गेला होता. कधी कधी तिलाही शंका येई की खरंच हे आपले जन्मदाते आहेत का पण दोघांचे आपल्या लेकीवर निरातिशय प्रेम होते म्हणून ती ही शंका झटकून देई.
आताही शॉट संपल्यावर आहना आपल्या व्हॅनिटीवॅनमध्ये गेली तर राधिका तिच्यासाठी ज्यूसचा ग्लास हातात घेवून तयारच होती.
“किती थकलं गं माझं लेकरु,” म्हणत तिने आहनाच्या गालावरून हात फिरवला आणि ज्यूस हातात दिला.
“काय ममा तू पण, फक्त दहा मिनिटाचा तर शॉट होता आणि तू आठ तासाचा असल्यासारखी रिअॅक्ट करते आहेस.” आहना हसून म्हणाली.
“तुला नाही कळणार आईचे मन,” राधिका बोलली आणि मॅगझिन वाचू लागली. तिच्याकडे टक लावून पाहताना आहनाला तिच्यात आणि स्वतःमधला फरक जाणवला. राधिकाही गोरी होती पण तिचा चेहरा गोल होता, नाक एकदम धारदार आणि डोळे घारे होते. आहनाच्या दोन्ही पालकांच्या पुर्ण वंशावळीचे डोळे घारे होते आणि फक्त हिचे मधाच्या रंगाचे. तिला असे एकटक पाहताना पाहून राधिकाचे तिच्याकडे लक्ष गेले आणि तिने विचारले, “ काय पाहतेस बेबी इतकं?”
“ममा मी खरंच तुझी आणि डैडची मुलगी आहे ना ग?”
“आता हे काय नवीन!” राधिका वैतागून म्हणाली पण अगदी सेकंदभरासाठी तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते की आपल्याला भास झाला अशी आहनाला शंका आली. तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि तिचे लक्ष या प्रकारावरून उडाले. तिची बेस्ट फ्रेंड नताशाचा फोन होता. ‘आता परत काय घोळ घातला हिने’ असा विचार करत तिने कॉल अटेंड केला. वीस मिनिटाने कॉल संपला तर नेक्स्ट शॉटसाठी बोलावणे आले.
तो शॉट संपल्यावर नील तिच्या मागे मागे येवू लागला. त्याला काही विचारायचे असावे. आहना मागे वळली आणि तिने त्याला विचारले, “ yes Neel, do you want something?”
“Umm, Aahana I was just wondering if you have some free time in the evening, we can have dinner together, tonight. We have worked so much lately so just for little relaxation.”
“Oh so sweet of you but I am sorry, I am preoccupied tonight, got some other plans.” गोड हसत आहना म्हणाली. खरंतर तिचा तसा काहीच प्लान नव्हता पण तिला नीलसारख्या बड़े बापकीं बिगड़ी हुईं औलाद पासून दूरच राहायचे होते. कारण नील कितीही चांगला अभिनेता असला तरीही इंडस्ट्रीमध्ये त्याचे रेप्यूटेशन काही जास्त चांगले नव्हते. त्याच्यासोबत आपले नाव जोडले जावे अशी अनेक अभिनेत्रींची इच्छा होती अपवाद फक्त आहनाचा. नीलला नाही ऐकण्याची सवय नव्हती. वरकरणी हसून जरी ‘इट्स ओके वुईल सी नेक्स्ट टाईम’ असं म्हटलं तरी मनातून तो आहनावर चिडला होता. पाहू किती आखाडतेस, नीलला इग्नोर करण्याचे परिणाम तुला भोगावे लागतील असा मनाशी त्रागा करत त्याने तिला जावू दिले.
दिवसभरचे शूट संपवून आहना आपल्या भल्या मोठ्या सीफेसिंग बंगल्यात आली. फ्रेश होवून आपल्या चाहत्यांच्या सोशलमीडियावरील कमेंट्सना उत्तर देत बसली. एका वेबसाईटवर तिच्याबद्दल काहीबाही लिहिले होते, या महिनाभरातील ही तिसरी वेळ आहे आपल्याबाबत इथे अफवा पसरवण्याची. ‘याबाबत पीआर टीमसोबत बोलले पाहिजे,’ तिच्या मनाने नोंद घेतली. अशाच कमेंट्स स्क्रोल करताना एका मुलीच्या कमेंटवर ती थबकली. ‘मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुमचे सर्व चित्रपट मी आवर्जुन पाहते,’ अशी नेहमीची टिपिकल कमेंट होती ती. पण आहनाचे लक्ष वेधून घेतले होते ते कमेंट करणारीच्या प्रोफाईल फोटोने. ती मुलगी बरीचशी तिच्यासारखी दिसत होती. फोटोवरुन जास्त काही समजत नव्हते पण नाक, चेहऱ्याची ठेवण तशी वाटत होती.
आहनाने लगेच त्या मुलीचे प्रोफाईल उघडले. रोशनी भिसे नाव होते. ती भराभर फोटो पाहत गेली. जशी जशी आहना जास्त फोटो पाहत होती तसे तिच्या लक्षात आले, की काळीसावळी, जेमतेम पाच फूट दोन इंच उंची असलेली रोशनी डिट्टो आहनासारखी नव्हती दिसत पण जर एखाद्याने मामुली एडिटिंग केले तर सहज आहना म्हणून खपून गेली असती. तिच्या माहितीवरून हे समजत होते, की ती गरीब कुटुंबातील मुलगी होती, शिक्षणही फारसे झाले नसावे. स्मार्टफोनच्या स्वस्ताईमुळे शंभर टक्के तरुणाईच्या हाती स्मार्टफोन आले आहेत आणि स्मार्टफोन आहे म्हटल्यावर सोशलमीडियावर अकाउंट असणे जवळजवळ अनिवार्य झाले आहे. रोशनीची ही अशीच केस होती.
‘या जगात एकसारख्या चेहऱ्याच्या सात व्यक्ती असतात म्हणे’ नाहीतर सगळ्या स्टार्सचे डूप्लिकेट असतातच ना, ते थोडीच त्यांची भावंडं किंवा रक्ताचे नातेवाईक असतात असा विचार करून तिने तो विषय सोडून दिला. पण नियतीला काही दूसरेच मंजूर असावे. आत्ता सोडून दिलेला विषय नंतर आयुष्यभरासाठी तिची पाठ पुरवणार होता याची आहनाला अजिबात कल्पना नव्हती. काही मेल चेक करून, दुसऱ्यादिवशीचा आपला दिनक्रम पाहून आहनाने आयपॅड बंद करून ठेवला आणि ती झोपायला गेली. थोड्याच दिवसात आपली झोप उडणार आहे याचा तिला काहीच अदमास नव्हता.
क्रमशः
उर्वरित भागांच्या लिंक खालीलप्रमाणे 👇
Image- pexels
©️सविता किरनाळे

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box