भय इथले संपत नाही .... !

#भय_इथले_संपत_नाही ...... !

✍©️जया पाटील 


रिया आणि अर्जुन दोघेही कॉलेज पासूनचे प्रिय मित्रमैत्रिण ... ! 


दोघांची मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांना देखील समजले नाही. दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने दोघांनीही साधे पणाने विवाह केला. 


आपले करियर बनवण्यासाठी दोघेही आपल्या गावापासून खुप दूर जीवाची मुंबई करत मुंबई शहरात आले.


प्रयत्नांती दोघांनाही चांगली नोकरी मिळाली. 

रिया आणि अर्जुन दोघेही खुप हुशार आणि मेहनती होते. आपल्या स्व:कष्टावर दोघेही खुप प्रगती करत होते. वेळोवेळी त्यांना बढती मिळत होती. सगळेच छान चालू होते. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळत होते.


दोघांनीही एक टुमदार घर घेतले , त्यांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण मात्र आता सुरु झाले होते कारण रिया गर्भवती होती. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होता. थोड्याच दिवसांनी रिया ने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी वेद ठेवले. वेदच्या बाललीलांमध्ये रिया हरवलेली असायची परंतु सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर रियाला पुन्हा ऑफिस जॉईन करायचे होते.  


दोघांच्याही घरून वेदला सांभाळण्यासाठी कोणीही येऊ शकेल असे कोणीही नव्हते. 

शेवटी रिया ने वेदला सांभाळण्यासाठी घरीच एक मावशी ठेवल्या. त्यांचे नाव शांता ....


वेदला त्यांच्या कडे सोपवण्यापूर्वी रियाने त्यांची फारशी चौकशी मात्र केली नाही. फक्त वरवर असलेल्या माहितीच्या आधारे तिने त्यांना कामावर ठेवले.


वेद देखील शांता मावशींसोबत खुप छान राहत होता. त्याला देखील त्यांचा लळा लागला होता. आपल्या वेदला इतके छान सांभाळल्यामुळे रिया देखील शांता मावशींवर खुप खुश होती. 


वेदला मावशी इतक्या छान पद्धतीने सांभाळतात त्यामुळे रिया त्यांना अगदी घरातल्या माणसासारखीच वागणूक देत होती. खाण्यापिण्यापासुन ते टीव्ही पाहण्यापर्यंत सगळी मुभा रिया ने शांता मावशीला दिलेली होती. वेद खुश होता त्यामुळे रिया पण खुप खुश होती.


रिया ऑफिस मधुन आल्यानंतर लगेचच रियाला बिलगून खेळत असे. दिवसामागून दिवस जात होते परंतु हल्ली मात्र वेद पूर्वी सारखा हसरा खेळता राहत नव्हता. तो सतत खुप शांत दिसत होता. रियाला त्याच्यात बदल जाणवला, तिने शांता मावशीला पण विचारले पण त्यांनी काहीतरी छोटे मोठे कारण सांगून वेळ मारून नेली.  


दिवसेंदिवस वेद खुप बधिर झाल्यासारखा वाटू लागला. रियाने या गोष्टीचा तपास लावायचा ठरवलं.


दुसऱ्या दिवशी रिया मुद्दामहून शांता मावशीला सांगून गेली की ,


शांता मावशी , आज मला यायला खुप उशिर होईल. कंपनीत खुप काम आहे. अर्जुन पण  बाहेर गावी गेला आहे कामानिमित्त ... त्यामूळे उशिरा पर्यंत थांबा आणि वेद ची काळजी घ्या.


असे सांगून रिया निघुन गेली. पण तिने घराच्या मेन लॉक ची चावी सोबत नेली , शांता मावशीला ना सांगता चोरून नेली एरवी दोघीही चावी ती घरीच ठेऊन जात असे. तिने अर्ध्या दिवसाची रजा घेतली आणि अर्जुनला पण हाफ डे घ्यायला सांगितला. दोघेही ठरवल्याप्रमाणे घरी आले.


स्वतःजवळच्या चावी ने दरवाजा उघडून ते दोघे  आत आले तर शांता मावशी छान पैकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या.  


रिया त्यांना विचारू लागली वेद कुठेय म्हणून ...? पण त्या उत्तरे देतांना उडवाउडवी करू लागल्या. पोलिसांची धमकी दिल्यावर त्यांनी कबुली दिली. 


त्या नाक्यावर भीक मागणाऱ्या भिकार्यांना वेदला भाड्याने देत होत्या. त्याला गुंगीचे औषधं देऊन सकाळी पासुन सायंकाळपर्यंत त्याला भिकाऱ्यांना द्यायचे आणि रिया यायच्या आत त्याला घरी आणायचे.


त्या गुंगीच्या औषधामुळे वेद मानसिक रित्या कमकुवत होत होता. लहान मुलांना पाहून भिकारी जास्त भीक मिळवू शकता त्यामुळे मुले मिळवण्यासाठी त्या लोकांची एक मोठी गँग होती. शांता देखील त्या गँगचीच एक सदस्य होती. 


अर्जुन ने ताबडतोब पोलिसांना बोलवून शांता मावशीला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि शांताने वेदचा पत्ता सांगितला त्यानुसार त्यांनी वेदला त्या भिकाऱ्यांकडून परत आणले आणि सगळ्यांना तुरुंगात टाकले.


झालेल्या घटनेमुळे रियाला खुप मोठा मानसिक धक्का बसला होता. वेदला धरून ती फक्त रडत होती आणि त्याची माफी मागत होती.  


वाचकहो ,


आईबाबांच्या,आजीआजोबांच्या छायेत मुल सुरक्षित असे जरी म्हटले तरी सगळ्याच कुटुंबात मुलाच्या संगोपनासाठी आजीआजोबा असतील असे नाही. पालकांपैकी एकाने घरी रहाणेही नेहमीच शक्य होइल असे नाही. काहींना ते आर्थिक दृष्ट्या खरोखर परवडणारे नसते. 


आईवडील दोघांनीही नोकरी करणे आर्थिक आधारासाठी गरजेचे आहे परंतु आपल्याला मुलांना एखाद्या पाळणाघरात ठेवताना किंवा घरीच मावशी जवळ ठेवताना त्यांची पूर्णपणे चौकशी मात्र नक्की करा.  


त्या एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त नाहीत ना ...! या गोष्टीची पण एकदा खात्री करून घ्या. 


घरी येऊन देखील आपल्याला मुलाच्या वागण्या बोलण्याच्या सगळ्यां गोष्टीचे निरीक्षण करायला शिका. काही संशयास्पद आढळल्यास लगेच कारवाई करा.


सगळीच पाळणाघरे अथवा मुलांना सांभाळणार मावशी वाईट असतील असे माझे मत मुळीच नाहीये. त्यामुळेच पाळणाघरातील व्यक्तीं कडे किंवा घरी मुलांना सांभाळणार्या मावशींकडे अजिबात लक्ष न देणंही बरोबर नाही आणि अगदीच शंकासुर बनुन फिरत रहाणंही..!


दोघीही गोष्टी तितक्याच हानिकारक आहेत.


पैसा कमवणे ,आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे जितके महत्वाचे आहे तितकेच आपल्या मुलांचा भक्कम आधार बनणे देखील तितकेच महत्वाचे आहे. 


मुलांना आपल्या जवळ येऊन मनातली बाब कुठलीही अढी न ठेवता सांगता येण्या इतपत आपला विश्वास वाटलाच पाहिजे. 


मुख्य म्हणजे सर्व पालकांनी मुलांशी रोज भरपूर बोलले पाहिजे. याने बरेच प्रश्न सुटतात.

पाळणाघराला लंच टाईम मधे , ऑफिसमधून लवकर येउन , हाफ डे घेउन सरप्राइज व्हिजिट देत रहावे. यामुळे तुम्ही कधीही येउ शकता हा धाक राहतो.  


मुलांना गुड टच बॅड टच शिकवलंच पाहीजे.

अगदी मुलगा मुलगी दोघांनाही.....!


त्यांना रोजच्या पाळणाघरातल्या , शाळेतल्या घडामोडी विचारुन घेतल्या पाहिजेत. आजकाल असे हॅन्ड बँडस निघाले आहेत जे मुलांच्या मनगटावर बांधता येतील किंवा सीसीटीव्ही आणि इतर उपकरणाच्या आधारे देखील अशा गोष्टी  घडण्याच्या शक्यता आपल्याला कमी करता येऊ शकतील.


तुमच्या माझ्या सारख्या प्रत्येक पालकाची एकच अवस्था आहे , कुठे कुठे नक्की जीव जाळायचा हेच कळत नाहीये आताशा....... !

मुलांच्या काळजीचे भय काही संपत नाही.


त्यामुळे सुजाण पालकांनो , जागरूक राहा आणि आपल्या लाडक्या फुलांना जपा.


तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixabay / pixels



✍©️ जया पाटील







Post a Comment

0 Comments