क्षणभंगुर जीवन .... !

क्षणभंगुर जीवन .....!

✍©️जया पाटील 



तृप्ती आणि पंकज दोघेही कॉलेज पासूनचे मित्र मैत्रिण होते परंतु ही मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांनाही समजलं नाही. दोघांना एकमेकांचा सहवास आवडत होता. दोघांनाही आयुष्यभराचे साथी होण्याची इच्छा होती. दोघांच्या घरचेही तृप्ती आणि पंकजला जवळून ओळखत होते, बाकी कोणतीच अडचण नव्हती पण ग्रेजुएशन होऊन सहा महिने झाले तरी पंकजला मात्र नोकरी मिळालेली नव्हती. पंकज अजूनही कमावत नाही मग तो तृप्तीचा सांभाळ कसा करणार...?  रोजचा उदरनिर्वाह कसा करणार...? हीच एक तृप्तीच्या बाबांची चिंता होती त्याचमुळे  तृप्तीच्या बाबांचा या लग्नाला नकार होता.


पंकजने महिन्याभरात काही तरी पैसे कमवून दाखवावे तर मला विश्वास पटेल की पंकज तृप्तीचा सांभाळ नीट करू शकेल अशी अट तृप्तीच्या बाबांनी पंकजला घातली.पंकज मात्र नकार ऐकून घेऊ शकला नाही. पंकजने देखील ती अट मान्य केली. प्रयत्नांची पराकाष्टा करून त्याने छोटी का असेना पण नोकरी मिळवली कारण तृप्तीवर त्याचे जीवापाड प्रेम होते. शेवटी तृप्ती आणि पंकजच्या हट्टापुढे दोघांच्याही घरचे नमले.  


पंकज आणि तृप्तीचा मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. दोघांचाही संसार सुरु झाला. पंकजचा पगार कमी होता पण तरी देखील तृप्ती  समाधानी होती, पंकजचे तिच्या सोबत असणेच तिला खुप सुखावत असे. पंकजचे मात्र या उलट होते , छोट्या गोष्टीत समाधान मानणे त्याला माहीतच नव्हते. त्याने आणखीन जास्त पगाराची नोकरी शोधायला सुरु केली . त्यासाठी त्याने  भरपूर मेहनत देखील केली. पंकजच्या मेहनतीला यश आले, त्याला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली त्या दरम्यान तृप्ती देखील घरातून काही ऑनलाईन कामे करतच होती. पंकजने एक मोठे घर विकत घेतले. छानशी कार घेतली. त्यांना एक गोड मुलगा झाला. त्यांचा संसार अगदी आनंदाने बहरून गेला. सगळ्या गोष्टींचे सुख पंकज आणि तृप्तीला मिळाले. सगळ्या घरात फक्त आनंदी आनंद होता.  


पंकजची महत्वाकांक्षा मात्र अजूनही संपत नव्हती, अजूनही पुढे जायचेय, प्रगती करायचीय म्हणून तो खुप मेहनत करत होता परंतु कामाच्या गडबडीत तृप्ती आणि त्यांच्या मुलाला मात्र त्याला पुरेसा वेळ देता येत नव्हता. तृप्ती त्याला सतत सांगत असे की आपण सोबत वेळ घालवूया. जगण्यापुरते लागणारे पैसे आपल्याकडे आहे, त्यात देखील आपण खुप सुखी राहू शकतो परंतु पंकज मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत नसे. 


तृप्ती देखील आता आजारी राहत असे. सतत काहीना काही दुखणे तिच्या मागे लागलेले असे. नेमका काय प्रॉब्लेम असेल असे म्हणून तृप्तीने बॉडी चेकअप करायचे ठरवले.


ती पंकजला म्हणाली ....... पंकज, आज काल खुप अस्वस्थ वाटत असते एकदा डॉक्टर कडे जाऊन येऊया का...? तु येशील ना माझ्या सोबत ..?


पंकज :- तृप्ती तु जाऊन ये ना एकटी , माझी ना खुप महत्वाची मिटिंग आहे ..प्लीज ...पुढच्या वेळेस मी नक्की येईल.


तृप्ती हिरमुसली आणि डॉक्टर कडे निघुन गेली.तृप्तीला मात्र माहीतच नव्हते कि तिच्या नशिबात अजून काय वाढून ठेवलेय. तृप्तीचे संपूर्ण चेकअप झाल्यावर डॉक्टरांनी तिला केबिन मध्ये बोलावले. तिचे रिपोर्ट पाहताना डॉक्टर थोडे चिंतेत असल्यासारखे वाटले.  


डॉक्टरांनी तृप्तीला विचारले ,तुमच्या सोबत तुमचे मिस्टर आले असतील तर त्यांना देखील बोलवून घ्या,.. प्लीज..   


तृप्ती नाराजीच्या सुरत म्हणाली ...डॉक्टर , मी एकटीच आली आहे ...प्लीज , काही सिरीयस आहे का ..? तुम्ही मला सांगू शकता..


डॉक्टर बोलू लागले ..., तृप्ती मी तुमची चिंता समजु शकतो , परंतु तुम्हाला आता तुमची खुप जास्त काळजी लागणार आहे कारण तुमच्या दोघीही किडन्या फेल झाल्या आहेत. तृप्ती एकदम गंभीर झाली , रडू लागली पण तिने स्वतःला सावरले. घरी येऊन तिने कोणालाच काहीही सांगितले नाही. तृप्ती फक्त त्रास सहन करत होती.  


एक दिवस हॉस्पिटल मधून डॉक्टरांचा पंकजला फोन आला, त्यांनी तृप्तीच्या तब्येतीबाबत सगळे पंकजला सांगितले. पंकजला ते ऐकून धक्काच बसला.


तो तृप्तीला धरून रडू लागला ..... तृप्ती, मी तुला वाचवण्यासाठी हवे ते करेल ..आपण परदेशात उपचार घेऊ ...मी अजूनही पैसे कमावेल , आणखीन मेहनत करेल ......पण तुला माझ्या पासून असे दूर जाऊ देणार नाही.


तुझे प्रेमच मला जगण्यासाठी पुरेसे आहे,पंकज ! तृप्ती बोलु लागली ..


तुझ्या सोबत असताना मला माझा त्रास कधीच जाणवत नाही आणि जितके पण जगायचे आहे ते सगळे क्षण फक्त तुझ्याच सोबत घालवायचे आहे.


पंकज पुन्हा एकदा काम सांभाळून तृप्तीला वेळ देऊ लागला ....त्याच्या सहवासात तिची कळी पुन्हा फुलत होती ...शरीराने ती त्रासलेली असून सुद्धा पंकजच्या सोबतीने खुश राहत होती. तृप्तीला माहित होते की ती फार काळ जगणार नाहीये पण .... तिचे शेवटचे क्षण तिला फक्त आणि फक्त पंकज सोबत घालवायचे होते. हीच तिची शेवटची इच्छा होती.


थोडे दिवस सुटी घेऊन पंकजने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ऑफिस जायला सुरुवात केली. पुन्हा तो जोमाने कामाला लागला. 


एक दिवस अचानक तृप्तीचा फोन आला.

पंकज , आज लवकर घरी येशील का ...? प्लीज ....आज खुप अस्वस्थ होतेय ....


अग तृप्ती , गोळी घे ..आराम कर .... मी बॉसला सांगून लगेच निघतो...पंकजने तृप्तीला सांगितले.

घरी जाण्याची परवानगी घेण्यासाठी पंकज बॉस कडे गेला....पण आज बॉसचे डोके ठिकाणावर नव्हते. काम पूर्ण केल्याशिवाय कोणालाच घरी जाता येणार नाही असे त्याने फर्मानच सोडले.

पंकज अस्वस्थ होता..., पण त्याचा नाईलाज होता. तृप्ती कडे जाण्यासाठी तो काम पटापट संपवू लागला....काम पूर्ण करून तो घरी गेला ,पण ........


त्याच्या तृप्तीने त्याची वाट पाहत कायमचे डोळे मिटले होते....तृप्ती शिवाय पंकज अपूर्ण झाला होता....फक्त काही क्षण ........कमी पडले होते पंकज आणि तृप्तीची शेवटची भेट होण्यात .......

पंकज हमसून हमसून रडत होता आणि त्या क्षणांची मागणी देवाकडे करत होता ,पण ते क्षण कधीच परत येणार नव्हते ....


वाचकहो .., आज फक्त  इतकेच सांगावेसे वाटते आहे की आपल्याही आयुष्यात असे किती तरी क्षण येतात..पण आपल्याला त्यांची किंमत नंतर समजते.... म्हणूनच आज मला वाटते आहे ....


क्षणभंगुर जीवन हे .....

         आपण जाणूनबुजून विसरतो .....

का अमर समजून स्वतःला ........

          त्याच्याशी निष्ठुरपणे वागतो......?



तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ...... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments