#गोगा_स्पेशल
© Velvet Kavisha
प्रसंग १---
गोगा चार वर्षाचा. शाळेत ऍडमिशन घेणारच होते तर कोरोनाची एंट्री. आता थोडा तरी अभ्यास घ्यावा म्हणून मम्मीचा जीव वरखाली. पण गोगा खेळात आणि पाठांतरात हुशार. सगळी टायटल साँग पाठ. बोबड्या भाषेत. प्रॅक्टिकलची सगळी बोंब.
परवा मम्मी alphabet tracing book घेऊन बसलेली. A, B ,C ट्रेस करून झालेले. आता D ची पाळी. पुस्तक उघडलं, पेन्सिल हाती आली, मम्मीने हात पकडलेला आणि गोगाने भोकाड पसरलं. मला D काढता येत नाही....हँ s s s s s s हँ s s s s हँ...
मम्मी समजावून दमली. मी शिकवते हात धरून मग येईल. तु फक्त गिरव. मी तुझा हात धरते..."ना s s ही. मला D येतच नाही. हँ s s s s s s हँ s s s s हँ..."
मी गेले. " का गं रडतोय इतका..?"
"अहो, त्याला D काढता येत नाही म्हणून रडतोय. शिकलाच नाही तर येईल कसा...? मी हात धरून शिकवतेय तर ऐकत नाही. रडत बसलाय...." गोगाची मम्मी
" गोगा, तुला D येत नाही का काढायला...??" मी विचारले.
नाकाचा शेंबूड पुसत गोगाने "नाही" अशी मान हलवली.
"एक काम कर मग... इथे रिकामी जागा आहे तिथे तुला "येत नाही" तसा D काढून दाखव..." मी
तुम्हांला सांगते... गोगाने इतका सुंदर D काढला ना की काही विचारू नका...
म्हणजे पोरांना सगळ येत असतं. मोठी भावंड घरी असतात त्यांना पाहून शिकलेलं असतं. पण मम्मी समोर काही करायचं नसतं....
बाब्बो.... ही पोरं म्हणजे ना.. नाकी ९,१०,११,१२ सगळे आणतात. आपलीच आहेत करणार काय...😜
"बघा ताई, तुम्ही सांगितले आणि तुमचं ऐकलं याने. मी कधीपासून सांगतेय तरी ऐकत नव्हता..." गोगाची मम्मी कृतकृत्य...
आता हिला काय माहिती 'ताईंचे पांढऱ्याचे काळे उगाच नाही झाले कारण अनुभवाने आधी काळ्याचे पांढरे झाले होते ना....' 🙃🙃🙃
प्रसंग २ ----
थोड्या दिवसांपूर्वीची गोष्ट....
गोगा धुँवाधार रडतोय. त्याची आई समजावतेय. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. घरचे बऱ्यापैकी हैराण झालेले. अपनी एंट्री....
"का रडतोय.. बाळा..??" मी.
"आत्याला तरी सांग नीट... " मेटाकुटीस आलेली त्याची आई.
"मला कदम पाहिजेत... कदम, कदम कssदssम .." गोगा.
"वहिनी, काय मागतोय हा... हे कदम कोण..??" मी.
"काय माहिती..?? अर्धा तास झाला... नुसता कदम मागतोय.." ती
"अग..... मग त्यालाच दाखवायला सांग ना काय ते.... आधी घरभर फिरवून दाखव. नंतर चाळभर फिरा... गोगा एकदम गप्प रहा आणि जा मम्मीला कदम दाखव... " मी सांगितले
नशीब माझं... ऐकलं त्याने....
घरभर शोधून मग कदम फ्रीजमध्ये सापडले. त्याने टीव्हीत California almond ची जाहिरात पाहून "कदम" मागितले होते.... देवा देवा...हे बदाम म्हणजे कदम होते!!🤦🤦
काल पुन्हा गोगा...
पुस्तक उघडून बसलेला. मध्येच म्हणाला.. मला सगळं येतं. Onion म्हणजे कांदा. Chili म्हणजे मिरची. Bt I like sweet potatamus....
कालपासून त्याची मम्मी कन्फ्युज मोडमध्ये. नक्की काय आवडतं याला. Potatoes, sweet potatoes की hippopotamus... आणि घरचे म्हणतात "आईला कळायला हवं आपल्या मुलाला काय हवयं..."
बाब्बो....🤦🤦 यांची पोरं अशी भाषा बोलली असती म्हणजे कळलं असतं ना "दाल आँटे का भाव"...
प्रसंग ३ -----
गोगा आंघोळ करून आला. चाळीतलं घर आहे. तेवढ्यात हेलिकॉप्टरचा आवाज आला. गोगा दोन्ही खांद्यावर टॉवेल पसरवून बाहेर. जसंजसं हेलिकॉप्टर जात होतं तसं गोगा वर बघत चालत चाळीच्या एका टोकाला पोचला.
प्रत्येक चाळीत लहान पोरं घाबरतील असे एक तरी काका किंवा एक तरी काकू असतेच. तर असेच एक काका गोगाला ओरडले. काय नंगू फिरतोस सगळीकडे... ?? झालं,,,, गोगा तिथूनच बोंब मारत सुटला. "मम्मी तू चद्दी नाय घातली म्हणून काकांनी मला मारलं..... " हँ ssss हँ ssss हँ ssss हँ
प्रसंग ४ ----
गोगाच्या दिदीचा मराठीचा ऑनलाइन तास संपला. दहा मिनिटांची सुट्टी. दिदीला मराठीच्या अभ्यासातलं "नाच रे मोरा " शिकवलेलं टिचरने. दिदी खुश.
दिदीने गोगाला आवाज दिला... "ये तुला गाणं शिकवते..." आणि दिदीने तालासुरात सुरु केलं. तिच्यामागे "गोगा" ही सुरु झाला...
"नाच ले मोला, आंब्याच्या वनात नाच ले मोला नाच.., काला काला "बापूस" पिंजला ले..."
आणि बाजूच्या खुर्चीत बसलेला काळासावळा "बापूस" चारवेळा आरशात पाहून... पिसाटला रे....😂😂
बाब्बो..... आता मी घरी जाऊन लोळून लोळून हसणार...🙃🙃🙃🙃
© Velvet Kavisha
शेअर करणार असाल तर नावासहितच करा. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल... स्वतःच्या नावाने लिंग बदलून कॉपी पेस्ट करू नका. गोगाला नाव सांगेन तुमचं... त्याला लहानपणी थुंकता नाही यायचं.. मग तो तोंडातली थुंकी हातात घेऊन फेकायचा. तसचं करेल तो पुन्हा. हातात थुंकी घेऊन फेकून मारेल...

6 Comments
Very nice 👍
ReplyDeleteथॅंक्यु सो मच 🙏
DeleteKhupach mast...Maza hi 3.5 years cha mulaga aahe...Aamchya gharat pan ashyach gamatijamati hot astat tyachya mule😂😂
ReplyDelete😀😀
Deleteहे वयचं गोड असतं...
Apratim Sundar
ReplyDeleteThank you so much..
DeletePlease do not enter any spam link in the comment box