सत्वपरीक्षा....
✍©️जया पाटील
माझ्या मते तरी घरात अगदी मनापासून खळखळून हसण्याचा आवाज असला, नात्यांमधे प्रेम असले म्हणजे घरात सुख नांदत असते.
सुधाकर रावांचे देखील असेच सुखी ,समाधानी आणि आनंदी कुटुंब होते. विवेक आणि नितेश दोघी संस्कारशील मुले , समाधानी पत्नी लता .. घरात प्रत्येक गोष्ट एकमेकांना समजून केली जात असे. कोणाचीही दृष्ट लागेल असाच सुधाकर रावांचा सुंदर परिवार होता.
विवेक आणि नितेश शिकून दोघे खुप मोठे झाले.
विवेक इंजिनीरिंग करून आय टी क्षेत्रात काम करत होता. नितेश देखील ग्रॅजुएशन करून बँकेत नोकरीला लागला होता. सुधाकर रावांचे काटकसर करण्याचे दिवस आता संपले होते. सगळेच काही अगदी छान चालु होते.
सुधाकर रावांनी आता विवेकसाठी वधू संशोधन सुरु केले होते. मुलांचे लग्न झाले की सेवानिवृत्ती नंतर सगळं वेळ लता आणि नातवंडांना द्यायचा असे सुधाकर रावांनी मनोमनी ठरवून टाकले होते. विवेकसाठी त्यांनी अगदी सर्वगुणसंपन्न स्मृतीला पसंत केले. विवेकने देखील आपल्या वडिलांच्या शब्दांचा मान ठेवला आणि स्मृती सोबत विवाहास होकार दिला .
विवेक आणि स्मृतीचा विवाह खुप थाटामाटात पार पडला. लवकरच स्मृतीने गोड बातमी दिली. तिने छोट्याश्या परीला जन्म दिला. सुधाकर रावांनी बाळाचे नाव अन्वी ठेवले. सुधाकरराव आणि लता ताईंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या सुखापुढे त्यांना आभाळ ठेंगणे वाटत होते.
पण म्हणतात ना ... , कधीकधी आपल्या सुखाला आपली स्वतःचीच नजर लागते. एक दिवस लता ताईंनी नितेशला थोडे किराणा मालाचे सामान आणण्यासाठी पाठवले आणि तिथे त्याचा अपघात झाला त्यातच नितेशचा जागीच मृत्यू झाला. सुधाकरराव आणि लता ताईंवर दुःखाचे पहाडच कोसळले. नितेशच्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे असे त्यांनी मानून घेतले आणि त्याचमुळे लता ताईंच्या मनावर परिणाम झाला, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले.
सुधाकरराव, विवेक आणि स्मृती तिघेही लता ताईंना सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते परंतु त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. त्या घरातील कोणालाच ओळखत नव्हत्या. त्यांची जेवू घालण्यापासून इतर सगळी काम सुधाकरराव आणि विवेक दोघे करत होते. स्मृती देखील त्यांना अन्वीला सांभाळून मदत करतच होती.
पण एकदा संकटे येऊ लागली की एकापाठोपाठ येऊ लागतात. अचानक सुधाकर रावांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांचे दोघी हात पाय निकामी झाले. विवेक आणि स्मृती दोघांची खुप काळजी घेत होते पण नोकरी, छोटी अन्वी सगळे सांभाळून त्यांची दोघांची ओढाताण होत होती.
सुधाकरराव सतत स्वतःला अपराधी मानत होते, ते विवेकला नेहमी म्हणत असत...
विवेक........ , आम्ही आईवडील तुला काहीच सुख देऊ शकत नाहीये, आमच्यामुळे तुला फक्त आणि फक्त त्रासच होतोय.
विवेक मात्र नेहमीप्रमाणे म्हणत असे की , बाबा ,आपण एकच कुटुंब आहोत आणि कुटुंबातील एकमेकांचा , आपल्या आईबाबांचा कधी मुलांना त्रास नसतो. तुम्ही तर लहानपणापासून तळ हातांच्या फोडाप्रमाणे आम्हाला वाढवले कुठलीही अपेक्षा न करता, त्याच्या पुढे मी तुमच्या साठी जे करतोय ते काहीच नाहीय.
विवेकचे बोलणे ऐकून सुधाकरराव कृतार्थ झाले. स्मृती देखील विवेकची उत्तम साथ देत होती. परंतु नियतीपुढे कुणाचे चालत नाही.सुधाकर रावांची तब्येत खालावत होती, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लताताईंना त्यांच्या मानसिक असंतुलनामुळे तर सुधाकर रावांचा मृत्यू झाला हे देखील समजले नाही. त्यांना पूर्णपणे वेड लागले होते. दिवसेंदिवस त्यांची स्थिती आणखीच खराब होत होती.
नातेवाईक आणि इतर सगळेच लताताईंना वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये पाठवण्यास विवेकला सांगत होते परंतु विवेक ने ते कधीच मान्य केले नाही आणि त्यांचा अशा अवस्थेत देखील उत्तम सांभाळ केला. काही दिवसांनी मानसिक त्रास आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा देखील मृत्यू झाला. विवेक आज पूर्णपणे पोरका झाला.
आपल्याला सगळ्यांनाच वाटते की सत्वपरीक्षा ही फक्त एक स्त्रीच देते पण आपल्या भावाचा अकाली मृत्यू, आईचे वेडेपण, बाबांचा आजार सगळ्याच विवेकच्या परिक्षा होत्या, परंतु त्याने संकटांना न जुमानता आई वडिलांची खुप मनापासून सेवा केली आणि या सत्वपरीक्षेत तो पास झाला.
आई वडिलांना वाचवणे तर त्याच्या हातात नव्हते पण डोळे मिटताना सुधाकर रावांच्या डोळ्यात एक समाधान ,एक आत्मिक सुख होते, माझ्या पेक्षा नशीबवान आणि सुखी दुसरे कोणीही नाहीच कारण माझा विवेक सारखा मुलगा आहे असेच त्यांना वाटत होते. दुःखात देखील सुखाची वेगळी परिभाषा विवेकने त्यांना समजावली होती. त्याच्या आपुलकीने आणि प्रेमाने त्यांना एक अनोखे समाधान दिले होते.
सुधाकरराव आणि लता ताई आज जिथे कुठे असतील तिथुन आपल्या लाडक्या विवेकला फक्त आणि फक्त प्रेमाने भरभरून आशीर्वाद देत असतील.
तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box