#आईची_गरज_मुलगा_आणि_मुलगी _दोघांनाही सारखीच_असते .... !
✍©️जया पाटील
विश्वासराव , पत्नी पुष्पा , त्यांची दोन मुले रिया आणि निखिल अगदी सुखाने ओतप्रोत असलेला संसार ... सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहणाऱ्या प्रत्येकाला सुखावून टाकत असे. दोन्ही मुले अतिशय गुणवंत , अभ्यासात हुशार आणि संस्कारी होती. मुले हीच आईबाबांची संपत्ती असते त्यामुळे आपल्या दोघीही मुलांना पाहून विश्वासराव आणि पुष्पाताइ कृतकृत्य होत असत.
हळूहळू मुले मोठी झाली. निखिलचे लग्न झाले. तो त्याच्या संसारात स्थिर स्थावर झाला. सून देखील अगदीच मनासारखी मिळाली होती पुष्पा ताईंना ...मनमिळाऊ , बोलकी अगदीच त्यांना हवी होती तशीच ....
निखिल नोकरीच्या निम्मिताने बाहेरगावी राहत असे , मग सुट्टीत रिया आणि पुष्पाताईंना घेऊन विश्वासराव निखिलकडे जात असत. कुटुंबासोबतचा वेळ म्हणजे पर्वणीच जणू ...सगळेच मिळून खूप एन्जॉय करत असत.
आता विश्वासराव आणि पुष्पाताईंना नातवंड खेळवायला हवी होती. त्या दरम्यान त्यांनी रिया साठी देखील वरसंशोधन सुरु केले होते. दोघीही मुलांचे संसार स्थावर झाले की आपण मोकळे असे विश्वासरावांना मनोमन वाटत होते. सगळ्या जबाबदाऱ्या पर पडल्यावर सगळा वेळ फक्त पुष्पाला द्यायचा. कामाच्या व्यापात राहून गेलेला सगळा आनंद तिला नव्याने द्यायचा असे स्वप्न ते पाहू लागले होते.
निखिलच्या बायकोने गोड बातमी दिली आणि विश्वासराव आणि पुष्पाताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचा दरम्यान रियाचे लग्न ठरले. तिला देखील सुशिक्षित आणि योग्य जोडीदार मिळाला. चारो तरफ खुशिया ही खुशिया ... असा माहोल विश्वासरावांच्या घरात होता.
काही दिवसांनी रियाचे लग्न झाले. निखिलला एक गोड मुलगा झाला. एकच वेळी दोन आनंदाच्या बातम्या देवाने पुष्पाताईंच्या झोळीत टाकल्या होत्या. सारे काही खूपच छान चालू होते. मुलीचा सुखाचा संसार , सद्गुणी जावई , नातवाच्या चेहऱ्यावरचे गोड हसू पाहून विश्वासराव आणि पुष्पाताई दोघेही प्रचंड आनंदी होते.
विश्वासरावांच्या घरात प्रेम , पैसा , आपुलकी , समाधान , सद्गुणी मुले सगळेच काही अगदी आलबेल होते. कोणालाही त्यांच्या परिवाराचा हेवा वाटेल असाच त्यांचा परिवार ... दृष्ट लागण्यासारखा .... पण म्हणतात ना सगळी सुखे आपण एकाच वेळी नाही उपभोगू शकत.. दुःखाचा सामना ही प्रत्येकाला करावाच लागतो अं त्या शिवाय सुखाची किंमत कळत नसते. तसेच काहीसे विश्वासरावांच्या परिवारात झाले.
नातूचा पहिला वाढदिवस म्हणुन पुष्पाताईंची खूप तयारी सुरु होती. दिवाळीला आईबाबांना भेटायला निखिल आणि रिया येऊन गेले होते आणि त्यानंतरच्या दोनच दिवसात पुष्पाताईंना ह्रिदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ....एका क्षणात सारे होत्याचे नव्हते झाले ... सुखाने भरलेला त्यांचा परिवार ..उध्वस्त झाला होता. विश्वासरावांचे आयुष्यभर पुष्पाताईंसोबत जगण्याचे , त्यांना संपूर्ण वेळ देण्याचे स्वप्नील स्वप्न अर्ध्यातच भंगले होते. पुष्पाताईंची दोन्ही मुले त्यांच्या प्रेमाला पारखी झाली होती.
विश्वासरावांच्या आई , भाऊ, वहिनींनी आणि बहिणींनी विश्वासराव , निखिल आणि रियाला सांभाळले. एकत्र कुटुंब पद्धतीची खरी किंमत संकटातच कळते . मानसिक आधार किती महत्वाचा असतो हे आपल्या लोकांच्या साथीने कळते. घरातल्या आपल्या माणसांच्या प्रेमाने अर्थातच आजी , आत्या , काका- काकू सगळ्यांच्या आधाराने रिया आणि निखिल पुन्हा सावरले.
रियाचे लग्न होऊन फक्त काहीच महिने झाले होते. त्यामुळे आईच्या मृत्यू नंतर प्रत्येकाच्या तोंडातशब्द होते ...
रियाला ...पुष्पाताईंच्या लेकीला माहेरपण हवे होते. आई नसली की माहेरपण संपते. आताच लग्न झाले आणि आई गेली तिच्या बाळाला तरी पाहायला हवे होते आईने ...
त्यावर आत्या काकू सगळ्यांचे देखील एकच मत होते ....
आम्ही सगळ्यांनी मिळून रियाचे कितीही माहेरपण केले , तिला कितीही जीव लावला ..तरी आई ती आईच असते ... तिच्या बाळंतपणात , तिच्या सुखदुःखासाठी तिची आई हवीच होती ...तिच्या माहेरपणासाठी तरी रियाची आई जिवंत हवी होती.
पण या सगळ्यात निखिल मात्र दुर्लक्षित होता. सगळे लोक त्यालाही प्रेम लावत होते पण आईच्या माहेरपणासारखे नाही. त्यालाही आईच्या प्रेमाची गरज आहे , हे कधी कोणाच्या लक्षातच येत नव्हते. त्याचा संसार स्थावर आहे , त्याला एक गोड मुलगा आहे हे जाणून सगळे त्याच्या साठी आनंदी होते ...पण आईच्या श्राद्धाच्या दिवशी आईच्या फोटोची पुजा करताना हळूच कोणाचे लक्ष नसताना आपले पाणावलेले डोळे पुसणारा निखिल कोणालाही समजतच नव्हता
गप्पा मारताना जेव्हा चुकून निखिलच्या बायकोकडून पुन्हा पुन्हा ....माझी आई अशी करते , तशी करते बोलले जायचे त्यावेळेस तिलाही न सांगता आपल्या डोळ्याच्या ओलावलेल्या कडा हळूच पुसणारा निखिल आपल्या दुःखाची जाणीव देखील कोणालाही होऊ द्यायचा नाही.
आईला जाऊन वर्ष पूर्ण झाले. सगळे पुन्हा दिवाळीला भेटायला आले. रियाला अश्रु अनावर झाले पण आपल्या बहिणीला आणि वडीलांना सावरण्यासाठी निखिलने पुन्हा आपले अश्रु आतच गिळून घेतले.
आपल्या कडे पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यामुळे मुलगी सासरी जाते , परक्या घरी जाते त्यामुळे तिला माहेरपणाची आवश्यकता असते हे मला मान्य आहे. मी स्वतःही एक स्त्री आहे त्यामुळे माहेरपणाचे , आईच्या प्रेमाचे महत्व मी चांगलेच जाणून आहे पण मुलांना लग्नानंतर माहेरपण नको असते हे मात्र मला मान्य नाही.
आजकाल कामानिमित्त मुलं देखील घर सोडून बाहेरगावीच स्थायिक असतात त्यामुळे घरी येऊन मिळणारा तो विसावा , आईचे प्रेम , घरातील जिव्हाळा मुलांनाही हवाच असतो. आईच्या प्रेमाच्या वेळेस मुलगा आणि मुलगी , किंवा लग्नाआधी , लग्नानंतर अश्या कुठल्याही टर्म्स कंडिशन नसतात ...कोणाच साठी नाही .....
लग्नानंतर असू दे किंवा लग्नाआधी मुलगा असो वा मुलगी आईच्या प्रेमाची गरज दोघांनाही सारखीच असते.
तुम्ही माझ्या मतासोबत सहमत आहात की नाही जरूर कळवा.
लेख आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळेच तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box