जीवनसाथी .. भाग 1
✍©️जया पाटील
आपल्या डोक्यावर दहा-बारा लाकडाच्या मोळ्यांचा भार घेऊन रखमा बाजारात विकायला निघाली . दिवस मावळतीला आला पण तरी तिच्या मोळ्या मात्र फार काही विकल्या गेल्या नाही , निराश होऊन रखमा घराकडे निघाली . आज कसेपण करून शहराकडे जाण्यासाठी नवऱ्याला तयार करायचं असे मनाशी ठरवूनच ती घराकडे जायला निघाली .घरी पोहोचल्याबरोबर माय ...भूक लागली म्हणून तिची मुले तिच्या भोवती गलका करू लागली .
थोड्या वेळाने किसन म्हणजे रखमाचा नवरा पण घरी आला . किसनला रखमा ने पाणी दिले आणि बोलू लागली ....
मी काय म्हनती धनी .., आपण बी शहराकडे जाऊया ...,चार पैकं बी गावतील ....,पोरास्नी खायाला भी येळेवर गावलं ...,चांगलं शिकाया भेटेल ...,गणू भावोजी सांगत व्हतं....लयी काम हायती शहराकडे......
किसन रखमाला सांगू लागला...... अगं रखमे....
शहरातील माणसं लई कोत्या मनाची हायती ...,आपल्या सारख्या साध्या माणसाचा ठाव लागायचा नाही शहरामंधी .....
किसनचा नकार ऐकून वेगवेगळ्या चार गोष्टी सांगून रखमा त्याला शहराकडे नेण्यासाठी त्याचे मन वळवू लागली .शेवटी रखमाच्या हट्टापुढे किसन ने हात टेकले आणि शहराकडे जाण्यासाठी तो तयार झाला.
किसन ने आपल्या चुलत भावाला म्हणजे गणुला त्यांच्या येण्याबद्दल कळवले. आपल्या झोपडीतील तुटपुंजा सामान आणि आपली दोघी मुले सांभाळत मजल-दरमजल करत ते मुंबईला गणुकडे पोहोचले .
आता हे आपल्या कडेच कायम राहणार की काय अशी शंका मनात आल्याने गणुची बायको पारू त्यांच्यासोबत फार काही बोललीच नाही. दोन-तिन दिवसात गणुने आपल्या मालकासोबत बोलून किसनला काम मिळवून दिले .आपल्या घरातून किसनच्या कुटुंबाचा भार कमी व्हावा म्हणुन पारूने रखमाला चार घरी धुणी-भांड्याची कामे मिळवून दिली .किसनने एक छोटी खोली भाड्याने घेतली. किसन आणि रखमाचा शहरातील नवा संसार सुरु झाला .
किसन आणि रखमा दोघेही आपापल्या कामात प्रामाणिक आणि मेहनती होते. त्यामुळे मालकांना त्यांचे काम आवडू लागले .दरम्यान रखमाला एका मोठ्या साहेबांकडे काम मिळाले .मालकीण बाई रखमाच्या कामावर खूपच खुश होती.कामाव्यतिरिक्त मालकीण बाई रखमाला आपल्या मुलांचे जुने कपडे ,खेळणी आणि इतर वस्तु देखील देत होती .जुन्या वस्तुंना पाहूनसुद्धा रखमाची मुले खुश होत होते .दिवसा मागुन दिवस लोटत होते .सगळेच काही अगदी सुरळीत चालले होते .
एक दिवस नेहमीप्रमाणे रखमा काम करण्यासाठी मोठ्या साहेबांकडे गेली. त्या दिवशी मोठ्या साहेबांव्यतिरिक्त घरात कोणीच नव्हते. रखमा नेहमीप्रमाणे साफसफाई करू लागली. साहेबाचे लक्ष मात्र रखमा वरून हटत नव्हते. कमनीय बांध्याची , गव्हाळी , साधी-सुधी रखमा त्याच्या मनात भरली होती. वासनांध नजरेने तो रखमा कडे पाहत होता. रखमाला साहेबाच्या वागण्यात वेगळेपण जाणवले पण तिकडे लक्ष न देता ती आपल्याच कामात गुंग झाली. कामात गुंतलेल्या पाठमोऱ्या रखमाला मोठ्या साहेबाने घट्ट पकडले. त्याच्या त्या राक्षसी पकडीतून सुटका करून घेण्याचा रखमा प्रयत्न करू लागली. खूप प्रयत्न करून रखमा आपली अब्रू वाचवून तिथून पळून जायला यशस्वी झाली.
घरी जाताना तिच्या मनात एकच गोष्ट चालू होती की ती तिच्या सोबत घडलेला प्रसंग किसनला कशी सांगणार अथवा सांगितली तरी धनी आपल्यावर विश्वास ठेवेल का ....? अशा एका ना अनेक शंका तिच्या मनात येऊ लागल्या पण दुसऱ्या कुणाकडून ही गोष्ट किसनला समजण्यापेक्षा आपणच सांगायचं , त्याचा परिणाम काहीही झाला तरी चालेल असे रखमाने मनाशी ठरवले.
घरी पोहोचल्यावर किसन आज रखमाला लवकर घरी परतलेला दिसला ..., त्याला घट्ट मिठी मारून रखमा रडू लागली आणि रडता रडता बोलू लागली ....
धनी .....मला चुकीची समजु नगा सां...... पण मोठा सायब लय वंगाळ माणूस हायती ...आज त्याने माया सोबत जबरदस्ती करू पायली..... पण मायं नशीब थोर म्हणून म्या सुटून पळून आली .....धनी ......
आणि रखमा धाय मोकलून रडू लागली. सगळ्यात प्रथम किसनने रखमाला शांत केले आणि मोठ्या साहेबाला जाब विचारायचं ठरवले.
दुसऱ्या दिवशी किसन आणि रखमा घडलेली हकीकत मालकीण बाईला सांगण्यासाठी बंगल्यावर गेले. आपल्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मालकिणीला रखमाच्या कोणत्याच गोष्टीचा विश्वास नव्हता. रखमा पैशासाठी हे सगळेच बिनबुडाचे आरोप लावते आहे असे तिचे मानणे होते.
दहा हजारांचे एक नोटांचे बंडल किसनच्या अंगावर फेकून मालकिणीने त्यांना चालते व्हायला सांगितले. ते पैशाचे बंडल परत करत किसन बोलू लागला ...
मालकीणबाई ....पैका नग सां......माया रखमेच्या अब्रूला असं पैकात तोलू नगा सां......मले तुमचा एक पैका बी नग...... असे बोलुन किसन आणि रखमा तिथून निघाले.
क्रमश:
किसन मोठ्या साहेबाला शिक्षा मिळवून देऊ शकेल का ...? आपल्या रखमाला न्याय मिळवून देण्यासाठी किसनचे पुढचे पाऊल काय असेल जाणून घेण्यासाठी पुढचा अंतिम भाग नक्की वाचा.
भाग 2 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
वरील कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !
धन्यवाद!🙏
सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
फोटो साभार - pixels
✍©️ जया पाटील

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box