ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात आहे .. भाग 2 अंतिम

 ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात आहे .. भाग 2

✍©️ जया पाटील 


 

भाग 1 वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇

👉 ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात आहे .. भाग 1


मागील भागात आपण पाहिले की शोभाताई आणि त्यांच्या सुनांमध्ये वादविवाद घडवून आणण्याचा मंजूताईंचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असल्यामुळे मंजूताईंच्या मनातील असूया आणखीनच वाढीस लागली आणि कुठल्याही परिस्थितीत मी शोभा आणि तिच्या सुनांमध्ये विवाद घडवेलच असा त्यांनी मनाशी निश्चय केला. आता पुढे .....


दिवसामागून दिवस पुढे जात होते. मंजूताईंचे  शोभाताईंच्या वागण्यावर अगदीच बारीक लक्ष होते , त्या फक्त संधीच्या शोधात होत्या .. कधी एकदा मला शोभाची चूक लक्षात येईल आणि मी रश्मी किंवा प्रतीक्षा दोघांच्याही मनात शोभा विषयी दुस्वास निर्माण करेल असा मनोमन त्या सतत विचार करत होत्या.


शेवटी घरात कितीही प्रेम असलेल्या तरी कधीतरी आपल्याकडून अनवधनाने काहीतरी विपरीत घडते आणि अश्याच छोट्याश्या गोष्टीचा चुकीचा फायदा मंजूताईं सारख्या वाईट प्रवृत्तीचे लोक उठवतात. तसेच काहीसे शोभाताईं सोबत पण झाले. 


एक दिवस रश्मी आणि प्रतीक्षा दोघी ऑफिसला काम नसल्याने घरी होत्या. नेहमीप्रमाणे आपापले काम संपवून त्या एकमेकांसोबत गप्पा करत होत्या आणि दिलखूलास हसत होत्या त्याच वेळेस मंजूताई तिथे आल्या.


अग मंजू, ये ना बस ... , आमच्या मस्त गप्पा रंगल्या आहेत , तु देखील जॉईन हो आम्हाला ... शोभाताई मंजूताईंना म्हणाल्या.


हो ना काकू .. मज्जा येईल .. बसा तुम्ही मी आलेच तुम्हाला पाणी घेऊन ..रश्मी बोलता बोलता स्वयंपाकघरात गेली.


प्रतिक्षाचे मोबाईल वर ऑनलाईन शॉपिंग साईट पाहणे सुरु होते , त्यात तिला गर्द जांभळ्या रंगाची साडी खूप आवडली आणि ती लगेच शोभाताईंना उत्साहात त्या साडीचा फोटो दाखवत म्हणाली ...


आई , ही साडी पहा ना.. किती सुंदर आहे .. तुम्ही आम्हाला दिवाळीला साडी घेतात ना.. तर अशीच घ्या.. चालेल ना तुम्हाला ..


तशीच साडी शोभाताईंनी त्यांच्या एका रीसेलर मैत्रिणीकडे पण पहिली होती आणि प्रतिक्षाने दाखवलेल्या साडी पेक्षा कमी किंमतीत ..


शोभाताईंनी मनोमनी विचार केला , प्रतीक्षाचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात ..मी ही साडी तिला गिफ्ट देऊन तिला सरप्राईज देईल ..


अग प्रतीक्षा .. सध्या राहू दे बाळ , साडीचे आपण  नंतर पाहू ..


प्रतीक्षा म्हणाली .. ठिक आहे आई ... पाहूया नंतर ..


प्रतिक्षाच्या मनातील नाराजी मंजूताईनी अचूक हेरली. आणि त्याचाच गैरफायदा उचलायचा असे त्यांनी ठरवले.


प्रतिक्षाच्या ऑफिसचा एक फोन आल्याने प्रतीक्षा  तिथून उठून तिच्या रूम मध्ये गेली आणि रश्मी सगळ्यांसाठी चहा बनवून घेऊन आली. सगळे बसून गरमागरम वाफाळलेल्या चहाचा आनंद घेऊ लागले.  


त्याचवेळेस रश्मीला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. तिचा लहान मुलगा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि तिचे मिस्टर बाहेरगावी असल्यामुळे तिला काही पैश्याची गरज होती. रश्मीने फोनवरची सगळी घटना शोभाताई कानावर घातली. त्यांनी ताबडतोब रश्मीला कपाटातून दहा हजार रुपये काढून हॉस्पिटलला जाण्यासाठी सांगितले.


आपला ऑफिसचा कॉल संपवून प्रतीक्षा परतत असताना तिने रश्मीला शोभाताईंच्या कपाटातून पैसे काढतांना पाहिले परंतु रश्मी ते पैसे का घेत आहे याची मात्र कल्पना तिला नव्हती. प्रतीक्षाने याबाबतीत काहीच रश्मी आणि शोभाताईंना विचारले नाही. 


हीच खरी संधी मंजूताईनी साधली. दुसऱ्या दिवशी मंजू ऑफिसला जाण्यासाठी निघाली तेव्हा वाटेत तिला थांबवून मंजूताई सांगू लागल्या ..


काय ग प्रतीक्षा .. , किती विश्वास ठेवतेस तु शोभा आणि रश्मी दोघांवरही .. पण शोभा तिने मात्र फरकच केला तुमच्या दोघांमध्ये .. तु एक साडी मागितली ती सुद्धा घेऊन दिली नाही तिने तुला ..आणि रश्मीला मात्र एका शब्दावर दहाहजार रुपये दिले तेही एक प्रश्न देखील न विचारता ....


नाही हो काकू .. आई आणि रश्मी ताई तश्या नाहीत , तुमचा काही गैरसमज झाला असेल असे बोलून प्रतीक्षा ऑफिसला निघुन गेली.


ऑफिसला पोहोचल्यावर मात्र प्रतीक्षाच्या डोक्यात फक्त मंजूताईंचे बोलणे चालू होते. रश्मी ताईने सुद्धा मला काही सांगितले नाही की दहाहजार रुपये तिने का घेतले ? इतकी परकी आहे का मी त्या दोघींसाठी ..?


खरच आईंनी माझ्या आणि रश्मीताईत फरक केला का ? हा एकच प्रश्न तिला सतावत होता. तिने स्वतःला कितीही समजवायचं ठरवले तरी शोभाताई आणि रश्मी तिला चुकीच्या वाटत होत्या कारण आज तिच्या मनातील मंथरा जागे झाली होती.


संध्याकाळी ऑफिस संपवून प्रतीक्षा घरी आली. कोणासोबतही न बोलता ती रूममध्ये निघुन गेली. तिचे जेवण , चहा सगळे तिने आज रूम मधेच घेतले.


शोभाताईंना वाटले की ऑफिसचा ताण असेल म्हणूनच आराम करत असेल म्हणूनच त्यांनी देखील तिला सगळ्यांसोबत बसण्याचा आग्रह केला नाही. आता मात्र प्रतीक्षाचे असे वागणे रोजचेच झाले. आता तिच्या अश्या वागण्यामुळे घरातील वाद वाढीस लागले.  


रश्मी आणि शोभाताईंनी प्रतीक्षाला अनेकदा विचारले की अचानक काय प्रॉब्लेम झाला की तु आम्हाला इतकी दुरावलीस. तुझ्या मनात काही गैरसमज असतील तर आमच्यासोबत मोकळेपणाने बोल परंतु प्रतिक्षाने मात्र काहीच  सांगतले नाही.


काही दिवसांनी गौरी-गणपतीचा सण सुरु झाला. आणि मंजूताईंकडे हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला रियाने शोभाताई , प्रतीक्षा आणि रश्मी तिघांनाही आमंत्रित केले. शोभाताई आणि दोघीही सुना मंजूताईंकडे गौरी दर्शनाला गेल्या. नेहमीची त्यांची  एकी आणि आजचा त्यांच्यात झालेला बदल रिया ने अचूक हेरला. तिला जाणवले की कदाचित आमच्या आईंच्या चुकीमुळे यांच्यात काहीतरी बिनसले आहे कारण रिया मंजूताईंच्या स्वभावाला पूर्णपणे ओळखून होती.  


दुसऱ्या दिवशी रिया ऑफिसला जाताना प्रतिक्षाला भेटली. रियाने प्रतिक्षाला विचारले.


प्रतीक्षा , काल शोभाकाकू आणि रश्मीताई बाबतीत तु मला थोडीशी नाराज दिसलीस .. काही प्रॉब्लेम झाला आहे का ? 


विषय टाळायचा म्हणून प्रतीक्षा म्हणाली ..अग रिया , काही नाही झाले .. सगळे काही ठिक आहे.


खोटे बोलु नकोस प्रतीक्षा .., तुला नाही जमत ते .. तुला हलके वाटेल ..मला एक चांगली मैत्रिण म्हणून सगळे काही सांग ..रिया प्रतिक्षाला म्हणाली.


न राहवून सगळी हकीकत प्रतीक्षाने रियाला सांगितली. सगळे प्रकरण रियाच्या लक्षात आले आणि ती प्रतिक्षाला सांगू लागली ...


जी गोष्ट तु तुझ्या डोळ्यांनी पाहिली नाही त्यावर तु कसा विश्वास ठेवलास ? .. 


आपल्या मनाच्या आतल्या कप्यात ज्या आपल्या माणसांच्या चांगल्या आठवणी असतात , जे चांगले विचार असतात त्या लोकांवर विश्वास ठेवायच्या ऐवजी तु आमच्या आईंसारख्या मंथरेचे काम करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवलास. तु हे सगळे आताच शोभा काकुंसोबत बोलायला हवे.  


आयुष्य हे पुस्तकासारखे आहे . जे आपण वाचतो ते आपल्याला दिसते पण पुस्तकाच्या पुढच्या पानावर देखील काहीतरी लिहिलेले असते पण पुस्तकाचे ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात असते. तु आतापर्यंत पुस्तकाचे फक्त एकच पान वाचले आहेस पण आता पुस्तकाचे हे पान पलटून दुसरे पान वाचण्याची जबाबदारी फक्त तुझी आहे.


प्रतिक्षाला आपल्या वागण्याचा पश्चताप झाला आणि आज ऑफिसहून घरी गेल्यावर आईसोबत आणि रश्मी ताईंसोबत नक्की बोलेल असे तिने मनाशी ठरवून टाकले. सायंकाळी ऑफिस मधुन प्रतीक्षा घरी आली. तिला शोभाईंसोबत बोलायचे तर होते पण सुरुवात कुठून करावी हेच समजत नव्हते.


तितक्याच दरवाज्याची घंटी वाजली आणि प्रतीक्षाने दरवाजा उघडला. प्रतीक्षाचेच एक पार्सल आले होते. तिने पार्सल हातात घेतले आणि दरवाजा बंद केला पण तिचे त्या काळात कुठलेही पार्सल येणार नव्हते. प्रतीक्षा थोडीशी संभ्रमात पडली. तिने पार्सल ओपन केले तर त्यात तिला आवडलेलीच साडी होती आणि सोबत एक चिट्ठी होती. माझ्या लाडक्या लेकीस तिच्या वाढदिवसानिम्मित सप्रेम भेट. शोभा ...


प्रतिक्षाने ती चिट्ठी वाचली. तितक्यात पुन्हा एकदा दरवाज्याची बेल वाजली. दरवाजा उघडून पाहिले तर रश्मीची मैत्रीण दारात उभी. ती रश्मी आणि शोभाताईंचे आभार मानण्यासाठी आली होती. 


सगळे सत्य प्रतिक्षा समोर उलगडले होते. 

प्रतिक्षाला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता.  ती शोभाताईंना जाऊन बिलगली आणि रडू लागली ...


आई , i m really very sorry ...मी चुकले ...

Sorry , रश्मी ताई ..मला माफ करा ..माझ्या मनातील शंका मी क्लिअर करायला हव्या होत्या. आपल्या सगळ्यांचे ठरले होते की काहीही झाले तरी आपण एकमेकांसोबत बोलून आपला गुंता सोडवायचा ..


तुम्ही दोघींनीही प्रयत्न केला पण माझ्या चुकीमुळे हा गुंता आणखीनच वाढला. आता मात्र असे कधीच होणार नाही कधीही काही समज करण्याआधी मी तुमच्या सोबत नक्की बोलेल. मला माफ करा.


शोभाताई आणि रश्मीने प्रतिक्षाला मोठ्या मनाने माफ केले.


कथेचे तात्पर्य हेच की आपल्या देखील आयुष्यात मंजूताईंसारख्या अनेक मंथरा आणि शकुनी मामा असतात पण आपल्या माणसांविषयी गैरसमज करून घेण्याआधी त्यांच्यासोबत संवाद जरूर साधा. शेवटी कुठल्याही नात्यांमध्ये संवाद हा खूप महत्वाचा भाग आहे. आयुष्याचे पुस्तक वाचताना फक्त एक पान न वाचता पुढचे पान जरूर वाचा कारण पुढच्या पानावर काय लिहिलेले आहे हे जाऊन घेणे आपल्यासाठी तितकेच महत्वाचे असते आणि ते पुस्तकाचे पान पलटणे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते.😊😊🙏


सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील




Post a Comment

0 Comments