ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात आहे .. भाग 1

 ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात आहे .. भाग 1 

✍©️जया पाटील 



अग ऐ ...शोभा ...आटोपलं की नाही तुझे.. घरात चांगली सून आहे  तरी सगळी कामे पुढेपुढे करून तुलाच करायची असतात ... करू द्यावे की जरा काम त्यांना पण ... 


शेजारच्या मंजुषाताई  ...आपली शेजारीण शोभाची खबरदारी घेत होत्या...


आले ग मंजू ... इतकी काय घाई झालीय तुला , अग रश्मीला पण शाळेत जायचे आहे किती धावपळ होईल पोरीची ...आपल्याला काय भिशीच्या कार्यक्रमाला तर जायचेय ..चालते थोडा फार उशिर .... शोभाताई घरातून बाहेर येतच बोलु लागल्या.


अग किती समजुतीने वागशील ग शोभा , आजकालच्या मुलींना आपली किंमतच नाही अजिबात .. आमची रिया माहितीये ना तुला ... तिच्यासाठी काहीपण केले तरी तिला सासूचे कौतुक नाहीच ...मंजुषाताई 


अग रिया पण खूप समजूतदार आहे ग ..मंजू , कधीतरी होतात चुका .... मग काय त्याच गोष्टी धरून ठेवायच्या का ?  आपलीच मुले आहेत ग ती .. त्यांना आपण नाही समजून घेणार तर मग कोण समजून घेणार ..?


तूच समजून घेत बस ... मला नाही जमायचे असे तुझ्यासारखे ...सुनेच्या पुढे पुढे करणे .. मंजुषाताई वैतागत शोभाताईंना सांगू लागल्या ..


अग त्यात .. पुढे पुढे करणे कुठे आले मंजू .. आपल्या मुलींना काम करताना पाहून त्यांना त्रास होताना पाहून आपल्या जीवाची कशी घालमेल होते ग .. मग सून म्हणजे पण कोणाचीही तरी लाडाची लेकच असते ना .. मग तिला थोडी मदत केली तर बिघडले कुठे ... ?  शोभाताई मंजुषाताईंना समजावणीच्या सुरात सांगत होत्या. 


तुझे उच्चविचार आणि समजूतदारपणा तुझ्याकडेच ठेव बाई शोभा .. मला नाही जमायचे ते .. 

चल आटप पटकन ..आधीच खूप उशीर झालाय आणि अजूनही आपण घरीच आहोत...


दोघीही वादविवाद संपवत भिशीच्या कार्यक्रमाला जायला निघाल्या.


शोभाताई आणि मंजुषाताई .. अगदी सख्खे शेजारी .. शोभाताई स्वभावाने अगदीच समजूतदार , सगळ्यांना समजून घेणाऱ्या , मायाळू , प्रेमळ , सगळ्यांचा चांगला विचार करणाऱ्या ...


त्याउलट मंजुषाताईंचा स्वभाव अगदीच विरूद्ध ... प्रत्येकात काहीतरी वाईट गुण पाहणे , कधीही दोन लोकांचे चांगले जमत असेल तर त्यांच्यात जाऊन वादविवाद घडवणे हा त्यांचा छंदच जणू ...


शोभाताईंना मंजुषाताईंच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती परंतु कितीही झाले तरी मंजू आपलीच शेजारी आहे , त्यामुळे शोभाताई मंजूताईंना सतत समजून घेत असे. 

शेजारधर्म समजून शोभाताई मंजूताईंच्या सगळ्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करत असत. त्यामुळे आजतागायत त्यांचे नाते टिकून होते.


मंजूताईंच्या या स्वभावाची पूर्ण कल्पना त्यांच्या सुनेला रियाला होती. रिया मुळातच खूप स्पष्टवक्ती आणि हुशार मुलगी होती त्यामुळे मंजूताईंची चूक ती लगेच त्यांच्या लक्षात आणून देत असे. रियाच्या या सडेतोड स्वभावामुळे मंजू ताईंचे तिच्या सोबत जमत नसे. त्यांच्यात सतत कुरबुर चालत असे.


याउलट शोभाताईंचा स्वभाव मुळातच खूप समजूतदार आणि त्यांची सून रश्मी ती देखील तितकीच गुणी. एका शाळेत शिक्षिका असलेली रश्मी खूप शांत आणि गोड स्वभावाची ..

प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय कोणाच्याही कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणारी ...  


त्यामुळे रश्मी आणि शोभाताई दोघांचेही खूप छान जमत असे. सगळ्या गोष्टी एकमेकांच्या सल्ल्याने करणे , कधीही रागराग न करणे त्यामुळे शोभाताईंचे घर अगदी भरलेले गोकुळ होते.


शोभाच्या घरात देखील सून आहे पण तरी त्यांच्या घरात इतकी शांतता कशी ..? 


रिया मात्र सतत माझ्या चुका काढत असते असे मनोमन मंजूताईंना वाटत असे. पण त्यात खरी चूक आपलीच स्वतःचीच आहे हे त्यांना जाणवतच नसे. त्यामुळे शोभाच्या घरात कसा वादविवाद घडवून आणता येईल अश्या संधीच्या मंजूताई सतत शोधात असत परंतु रश्मी देखील त्यांच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नसे.


असेच दिवस पुढे सरकत होते. त्याच दरम्यान शोभाताईंच्या धाकट्या मुलाचे लग्न ठरले. धाकटी सून प्रतीक्षा माप ओलांडून घरात आली. प्रतीक्षा देखील स्वभावाने चांगली होती. मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती पण ती देखील रिया सारखी स्पष्टवक्ती आणि क्रांतिकारी विचारांची होती.


प्रतीक्षा घरात आल्यानंतर शोभाताईंनी दोघीही सुनांना जवळ बोलवून त्यांना सांगितले ...


रश्मी आणि प्रतीक्षा .. तुम्ही दोघीही या घरच्या सुना असल्या तरी माझ्यासाठी दोघीही माझ्या लेकीच आहात. तुम्ही दोघीही जॉब करतात त्यामुळे दोघांच्याही जबाबदाऱ्या जास्त आहेत पण या कामाचा आपल्या घरावर परिणाम होऊ  नये म्हणूनच मी काही गोष्टी तुमच्या दोघींच्या सल्ल्याने आधीच ठरवून घ्यायच्या ठरवल्या आहे .... आपण एक कुटुंब आहोत म्हणूनच घरातील प्रत्येक व्यक्तीचे मत विचारणे मला गरजेचे वाटते.


रश्मी तुला सकाळी लवकर शाळेला जावे लागते म्हणूनच प्रतीक्षा  सकाळचा स्वयंपाक तु करायचा ..

आणि रश्मी प्रतिक्षाला रात्री ऑफिस मधुन येण्यास उशीर होतो म्हणूनच सायंकाळी स्वयंपाक तु करायचा आणि हो तुमच्या दोघांची मदतनीस ..... तुमच्या भाषेत काय म्हणतात ते assistant म्हणून मी आहेच की ...

चालेल ना तुम्हाला दोघींनाही ... ?


आणि हो कधी काही कामामुळे या वेळेवर तुम्हाला काम करणे शक्य झाले नाही तर आपण तिघीनींही आपल्या अडचणी एकमेकांसोबत शेयर करायच्या म्हणजे आपल्या अडचणी एकमेकांच्या मदतीने सोप्या होतील ...

काय मग जमेल ना.... ?


तुमच्यासारखी सोबत असेल तर नक्कीच जमेल आई .... रश्मी सांगू लागली ...


सासरचे सगळे काम सुनावर लादतात , सासू तर खूप खाष्ट असे लग्नापूर्वी ऐकले होते मी ... पण आपल्या घरी मात्र तसे नाही आहे आई ...

त्यामुळे तुम्ही ठरवल्याप्रमाणे आम्हाला जमेल नाही ...पळेल .... प्रतीक्षा बोलत होती.


तिघीही मनमोकळ्या हसल्या परंतु धाकटी सून आली तरी देखील शोभाच्या घरात इतकी शांतता कशी ..? 


मंजूताईच्या मनाची घालमेल वाढू लागली. खूप प्रयत्न करून पण रश्मी , शोभाताई आणि प्रतीक्षा तिघांमध्येही त्या वादविवाद घडवून आणू शकत नव्हत्या. त्यामुळे मंजूताईंची असूया आणखीनच वाढीस लागली. काहीही झाले तरी शोभा , रश्मी आणि प्रतीक्षा या तिघींमध्ये मध्ये मी वादविवाद घडवूनच आणणार असा त्यांनी चंग बांधला. 


मंजूताई त्यांच्या या वाईट प्रयत्नात यशस्वी होतील का ? रश्मी , शोभाताई आणि प्रतीक्षा यांच्या या सुंदर नात्याला पुढे काय वळण मिळेल जाणून घेण्यासाठी पुढचा अंतिम भाग वाचण्यास विसरू नका. 


पुढील भाग वाचा खाली दिलेल्या लिंक वर 👇


👉  ते पान पलटणे फक्त आपल्याच हातात आहे .. भाग 2 अंतिम 



तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ..... !


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील


Post a Comment

0 Comments