यांना राग का येतो...🤔🤔

#यांना_राग_का_येतो?


©️Velvet kavisha 





माझ्या मैत्रिणींचे वेगवेगळे ग्रुप आहेत. मोठ्या मुलीच्या शाळेतील मुलांच्या आया, ट्युशनला येणाऱ्या मुलांच्या आया, छोटीच्या स्कूलच्या मुलांच्या आया, माझ्या स्वतःच्या मैत्रिणी , माझ्या बहिणी by birth मैत्रिणी, लग्नानंतर नणंदा मैत्रिणी आणि आता फेसबुकवरच्या नवीन मैत्रिणी...मी समृध्द आणि परीपूर्ण अशा मित्रत्वाच्या नात्याने..तरीही त्यातल्या काहीच खास अशा.

 

दोन वर्षांपूर्वी लिखाणाला नवीनच सुरुवात केलेली. एकीचा मेसेज 


"आता काय लिहिणार आहेस?" ती.


"अग romance/ drama under लिहावं म्हणतेय". मी.


"लवली.. असं लिही ना अंगावर शहारे यायला हवेतं."--ती


"म्हणजे भयकथा लिहू का गं?" माझा भाबडा प्रश्न.


"झक् मार काय लिहायचे ते लिही" ती.


"रागावू नकोस बाई. मस्करी केली असं समज. रोमँटिक वाचून रोमांच उभे राहतात. आणि भयकथा वाचून..... टांगा हरिकिर्तन करतात गं.." मी 


"अग म्हणजे वाचताना उडू उडू झालयां असं फिलिंग आलं पाहिजे. तु बाबा कदमच्या कादंबऱ्या वाचल्यास??" ती.


"नाही बा.." मी.


"मग चंद्रकांत काकोडकर..??" ती


"नाsss..." मी.


"वि.स..??" ती.


"वीस काय एक पण कादंबरी नाही वाचली मी..!!" मी.


"आली मोठी लेखिका. जीव दे जा त्यापेक्षा." मी आज लायब्ररीत जाणार आहे. घेऊन येते एखादी कादंबरी. घरी येऊन घेऊन जा." ती.


"बरं बरं.. नक्की." मी.


येते म्हटलं तिला पण जायला जमलंच नाही. तिला म्हटलं "रोमँटिक पॅराग्राफ तेवढे फोटो काढून पाठव." तिने पाठवले आणि मी वाचले. 


बापरे इतकं लिहावं लागतं रोमँटिक स्टोरीत. मला माझ्या बुद्धीने सुचलं होतं थोडंफार काही ते ही मनातल्या मनात वारलं.  


दोन दिवसांनी पुन्हा मेसेज "कुठंवर आली लव्हस्टोरी?? मी सांगितले ग दोघी तिघींना आणि आपल्या ग्रुपवर पण टाकलयं. तु रोमँटिक काही ट्राय करणार आहेस." मैत्रीण


"अग काळे (तिच आडनाव सावंत), कोणी सांगितले तुला नसते उद्योग?  मला जमेल असं वाटतं नाही लिहायला. ट्राय बिय काय?? मी लिहिणार होते." मी


" हे बघ तु लिहिणार आहेस की नाही तेवढं सांग. जमेल तुला. अपनी जान हैं तु! जहाँ हाथ लगाया सोना ही निकला है आजतक"..ती. आयला हे कधी झालं. ही स्तुतीची नवीन पध्दतबरं का....!!


"लिहिते गं बाई, पण खूप होप्स ठेवू नकोस हां" मी


पहिला भाग टफ करत लिहून मोजक्या मैत्रिणी आणि नणंदेला पाठवला. सोबत मेसेज जोडला. "वाचून सांगा जमलाय का.."


"आयला काय भारी लिहिलंय गं. इमेज spoiler ठरणार..." एक मैत्रीण. ही भिती की आनंद?? काहीच कळत नाही.

 

दुसरीचा फोन. "त्या category तला वाटतोय. पण जास्त ताणू नको." 


तिसरी "ते tatto लिहिलंस ती काय भानगड?" 


"अग एका मैत्रिणीच्या मानेवर पाहिला होता तो इथे घेतला" मी.


तिसरीचाच चार तासांनी फोन. " कोणती ग तुझी मैत्रीण.. तुझं अख्खं फेसबुक अकाउंट पालथं घातलं. नाही सापडली." (आयला ही म्हणजे नगच आहे बाई.) 


चौथी मैत्रीण "काय ग? आधी श्रावण भक्ती बिक्ती आणि आता डायरेक्ट रोमँटिक!!अं अं" 


पाचवी मैत्रीण एकदम शहाणं बाळ "काही लोकांना बोल्ड वाटू शकतं. पण आपल्या लिखाणावर ठाम राहायचं"


देवा नशीब रे माझं! आगाऊ मैत्रिणींसोबत थोड्या धीर देणाऱ्याही मैत्रिणी दिल्यास मला. त्यांच्यामुळे कथेचा शेवट तरी झाला. नाहीतर ओम फट् स्वाहा झालं असतं.


ती कथा जिला डोळ्यासमोर ठेवून लिहिली.. तिचा मेसेज "माझ्या अख्ख्या आयुष्याचा सिनेमा पाहिला मी." कथा सार्थकी लागल्याचं समाधान झालं.


आपल्याकडे बाबा मैत्रीचा बटवा आहे. त्यात निवडक मैत्रिणींचा भरणा. या अशा मैत्रिणी की ज्यांना कधी सांगावं लागत नाही "कोणाला सांगू नको म्हणून." वेळेला त्याच धावून येतात. घरात कोणी आजारी पडलं किंवा काही फायनान्शियल गडबड वाटली तर पैसे घेऊन हजर.


मी 'नको ग होईल adjust' म्हणून टाळते. कधी मनातील राग यांच्यापैकी कोणावर तरी निघतो. कधी भांडावसं वाटलं, काही मांडावसं वाटलं तर याच असतात साथीला. यांच्यापाशी कधी मन भरून येत तर रितं होतं.


कधी मुलींना शाळेतून आणायला सांगा, कधी सलाईन लावलेल्या आईच्या बाजूला बसायला सांगा, काही वस्तू आणून द्यायला सांगा..त्यांना सांगा फक्त. माझ्यासाठी काहीही करतील. मला तर तुम्ही ओळखताच...रस्त्यावर चालणाऱ्या माणसाची आपण मदत करतो मग या तर मैत्रिणी. इनकें लिए तों अपनीं जान न्योछावर!!!


आमचा ट्रेनचा ग्रुप. 8.41 मिडल - कल्याण सीएसटी फास्ट .  त्या मैत्रिणींचा whatsapp ग्रुप बनला. छान गमतीजमती होत असत तिथे. फॅमिली फोटोज, ट्रिपचे फोटोज, रिसॉर्टचे फोटोज, पुजेचे, गणपतीचे, दिवाळीचे, सगळ्या सणांचे फोटो असतात तिथे. मोजून आठजणी होतो ग्रुपमध्ये. आधी सातच होतो एका वर्षापूर्वी आठवी आली.

 

तर्रर्र... एकदा सुषमाने नवऱ्यासोबतचा फोटो टाकला. ती हनिमूनला गेलेली लग्नानंतर तेव्हाचा. टायटॅनिक पोझ बिझ. एकदम मस्त रोमँटिक शोमँटिक. बाकीच्यांनी कौतुक केलं. म्हणून मी ही  "दोन्ही खुळे छान दिसताय... लव्हली 😍😍 👌👌👌" असा कौतुकाचा मेसेज केला आणि तिला राग आला. तिचं आडनाव "खुळे" त्याला मी काय करणार...


हेमा - - ही म्हणजे अजबच प्राणी. खाताना, जेवताना पाहिलं की वाटतं हिला तेवढ्यासाठीच पृथ्वीवर पाठवलं आहे. एकदम वजनदार व्यक्तीमत्व. कंसात हत्तीचं पिल्लू कंस पुर्ण. हे ती स्वतः ची म्हणते. तिने एक मस्त फोटो शेअर केला. रिसॉर्टला गेली होती तेव्हाचा एकदम रोमँटिक फोटो शेअर केला. नवरा झुल्यावर बसलेला आणि हिने पाठीमागून त्याच्या गळ्यात हात टाकलेले. त्याची जिराफाची मान जवळजवळ दबली गेलेली. मी 😍 👌👌 ह्या इमोजीसहित "फोटो  मस्तच फक्त "मी प्राण तुझा" च्या पुढे "घेईन" असं लिह गं.... असा रिप्लाय दिला आणि तिला राग आला... का ते नाही कळलं. फोटोवर तर तिनेच टेक्स्ट टाकला होता. "मी प्राण तुझा" म्हणून....


रेखा... कधी कधी मी सिरियसली ही बोलू शकते हे तिला मान्य नाही. एकदा ब्राह्मणाला पत्रिका दाखवून आली. त्यांनी सांगितलं तिला की, तुमच्या पत्रिकेत संकट आहे असं दिसतंय. सोमवारी गाईला काळे तीळ, तीळाच्या तेलाचा दिवा, शंकराला शिवमुठ आणि अमुकतमुक करा. असे काहीसे उपाय सांगितले. सोबतच "हे कोणालाही सांगू नका" असंही सांगितले. पण करता काय. ती धर्मराजाने दिलेल्या शापाप्रमाणे वागली...


रात्री सगळं आवरून एक वाजता ग्रुपवर आली. सगळ्यांना उठवून सगळी कहाणी सांगून "तुम्हांला काय वाटतं?? काय संकट येणार असेल गं पुढे...??" असं विचारलं. सगळ्यांनी आपल्यापरीने समजवायचा प्रयत्न केला. मी ही लिहिलं - -" अग गुरुजींनी तुला कोणालाही सांगू नकोस सांगितले आहे ना... मग तु आम्हांलाही सांगू नकोस"  झालं. तिला राग आला.  म्हणाली, " तुला मस्करी सुचते बघावी तेव्हा. मी किती टेन्शनमध्ये आहे माझं मला माहिती. खुपच ताण आला होता म्हणून सांगितले.  आता यापुढे तुम्हांला काही सांगणार नाही..."

 

देवा देवा..!! एकतर भविष्यात काय घडणार आहे याचा जास्त विचार करु नये. केलाच तर ब्राह्मण जे सांगतीलं ते श्रध्देने करावं. बाकीच्यांना विचारत फिरू नये इतकंच. त्यात राग येण्यासारखं काहीच नाही. 


जया - ही म्हणजे नाकावर राग. आमच्याच वयाची. तरीही ग्रुपमध्ये तिला सगळ्यां पिल्लू, बच्चा अशा म्हणायचो. नुकताच चष्मा बिष्मा लागलेला डोळ्यांवर.


एकदा सगळ्या सीट पकडून बसलो. वाटलं हिला आज उशिर झाला. ट्रेन चुकली हिला. ट्रेनने हॉर्न दिला तसं मी रेखाला म्हटलं "आज म्हातारी कुठे राहिली गं..??"  आणि पाठीत जोरात रट्टा पडला. मी अगदीच कळवळले. मागे पाहिलं तर जया. तिने चालती ट्रेन पकडली होती... आणि माझं तिला "म्हातारी" म्हणणं ऐकू गेलं होतं.  


आता ही सोलापुरी बेणं. उचकटली. म्हणाली, " माझी सासू जख्खड म्हातारी झालीय. माझे खुप हाल केलेत, खुप छळलं मला तिने. पण तरीही मी तिला कधी "म्हातारी" म्हटलं नाही अजूनपर्यंत...😫😫😫


आता ही आमच्या आठ वर्षे जुन्या ग्रुपमधली एक वर्ष जुनी मैत्रीण. एक वर्षापूर्वी पुण्याहून बदली होऊन मुंबईत आलेली. थोडी बम्बईया भाषेशी फारकतच तिची...


जयाला वाईट वाटलेलं. ते समजावल्यावर निघून गेलं. पण तिच्या रागाचं काही कळलं नाही बाब्बो. कारण आपण कधी ना कधी म्हाताऱ्या तर होणारच आहोत. मनाने कितीही तरुण राहिलो तरी चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतातच ना... त्या कुठे लपतात होय... दंडाची चामडी लोंबतेच की...🤭🤭 


आता काहीजणी साठीतही 😉😉😉 एव्हरग्रीन असतात ती गोष्ट वेगळी हां.....असो.


आता तुम्हांला सांगते. आम्ही मुंबईकर म्हणजे अशीच भाषा आमची. एक दिवसाने मोठ्या मैत्रिणीला ही आम्ही म्हातारी म्हणतो. आमच्या "शिव्यां" मध्येही "प्रेमच" असतं. चल वटक, हवा आन् दे, मर ग तू, तु भेट गं कसा तुझा जीव घेते बघ, खून करु का गं तुझा, किडनॅप करु का ग तुला?? कसा कस्सा मार खाशील गं.. अश्या छोट्या छोट्या वाक्यातून आमचं प्रेम दिसतं..  कधी सटकन् मारलेली टपली ही आमच्या प्रेमाचं प्रतिकच. आम्ही मैत्रीला एकदम पक्के असतो. एकतर मैत्री करत नाही आणि केली तर एकदम दिल से च....

 

बाकी धावत ट्रेन पकडणाऱ्या कोणालाही आम्ही पटकन खेचून आत घेतोच...


सहा महिन्यांपूर्वी भांडुपहून कल्याणमध्ये शिफ्ट झालेली मनिषा स्टेट बँकेत कामाला. प्रचंड attitude. वयाने थोडीशी सिनियर ही होती आम्हांला. हे बँकवाले म्हणजे जणू गव्हर्नरच्या रुबाबात. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही कोणालाच "अहो जाहो" करत नाही. एकतर तुम्ही जेव्हा आमच्यासोबत स्वतःहून येता तेव्हा तुम्ही आमच्या सर्वसमान असता.. मैत्रीण बनता. आणि मैत्रीत मोकळेपणा "एकेरी" बोलण्यानेच येतो. तसंही "अहो जाहो" करायला तुम्ही काही विहिणबाई नाहीत आमच्या. तुम्ही मोठ्या तुमच्या घरच्या. 'आम्हां काय त्याचे...!!' तिला अपेक्षा अहो जाहोची. असो.


तर ही मनिषा दोन दिवसांत गायब झाली. खुप दिवसांनी मला भेटली. हसली. म्हणाली, "मी आता फर्स्ट क्लासने जाते. मला गॉसिप आवडत नाही आणि एका दिवसात कळलं मला की तुम्हांला गॉसिपिंग आवडतं..." 🤦🤦


धत्त तेरी की....!!! दुसऱ्यांनी नाकारल्यावर त्यांना अशा कोणत्या तरी कारणांमध्ये अडकवून मला काही फरक नाही पडत म्हणत जगणं खुप सोपं नाही का...??? 🙆🙆🙆


आता हे सगळं इतकं झाल्यावर मी खुप अवलोकन केलं स्वतःबद्दल. कारण अजूनही रागावण्यासारखं काय हे काही मला कळलेलं नाही. मी विचार करतेय की नेमकं आपलं काय चुकलं??? मी यापुढे सुधरायचं ठरवलंय. सदाशिव पेठ, पुणे इथे शुद्ध, व्यवहार्य आणि मोजकंच बोलायचा क्लास लावायच्या विचारात आहे मी. चार पैसे गेले तरी चालतील. होऊ दे खर्च. काही हरकत नाही. पण माझ्यात सुधारणा होणं मस्टच आहे...😊😊


बाब्बो...!!!! एवढा माझा सरळसाधा स्वभाव, गोड बोलणं तरीही मैत्रिणींना राग येतो. आता तर मी क्लास लावणार आहे. मग यांचे पुणेरी टोमण्यात दिवस कसे निघायचे... 🤔🤔


जाऊ दे.. 


मैत्रिणी आहेत आणि मैत्रिणीला कसं झेलायचं ते त्यांना चांगले माहिती आहे....💞💞


वाचकहो, सगळ्या नात्यामधलं पवित्र नातं मैत्रीचं. तुमच्याकडे ही असेल ना असा मैत्रीचा बटवा?? तुमच्याही निर्भेळ मैत्रीचे अनुभव असतीलच ना.. तुम्हाला माझा लेख कसा वाटलां.


लिंकसहित शेअर करण्यास हरकत नाही. चोरी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल...


©Velvet Kavisha


 P.C - Google 

Post a Comment

3 Comments

  1. खरंच काही जण खूप sensitive असतात.. पण चलता है यार.. जिंदगी है थोडी खट्टी थोडी. मीठी

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box