सुखाचा किनारा .. !
✍©️जया पाटील
श्रावण महिन्यातील एक सुंदर दिवस , ऊन पावसाचा खेळ खेळणार्या पाऊसाच्या सरी , चोहिकडे पसरलेली हिरवळ , अगदी मन प्रसन्न करणारे वातावरण पण या मन मोहुन टाकणार्या वेळी आर्याच्या डोळ्याच्या कडा मात्र पाण्याने ओलावल्या होत्या. ती जुन्या आठवणीत हरवली होती. तिच्या आणि अतुलच्या सुंदर आठवणी तिच्या डोळ्यापुढे तरळत होत्या.
अतुल तिच्याच कॉलेजात शिकणारा एक हुशार मुलगा होता. क्लासेसच्या निमित्ताने भेट झाली , नोट्सच्या देवाणघेवाणीतुन बोलायची सुरुवात झाली. दोघांचे विचार आणि मनं जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली.
गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघून हसणे , डोळ्यांच्या खाणाखुणा होणे , क्लासेस मधे आल्यावर दोघांनी एकमेकांना शोधणे. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासुन लग्नाच्या आणाभाका घेणे. अतुलने केलेला प्रपोज , आर्याच्या नकारातुन बदललेला होकार , त्याच्या सोबतची संध्याकाळ , त्याचा हात हातात घेऊन , त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तासनतास घालवलेला वेळ , त्याच्या सोबत सतत केलेल्या गप्पा , बडबड , सगळं काही आर्याच्या डोळ्यासमोर होते.
त्याला मारलेली पहिली मिठी , त्यातुन झालेला शहारे आणणारा त्याचा स्पर्श. तिचे रुसणे आणि त्याचे मनवणे अशा एक ना अनेक कितीतरी आठवणी तिच्या भोवताली गर्दी करत होत्या.
कधिही मर्यादा न ओलांडणार्या आर्या-अतुलचे प्रेम कोणालाही मोहात पाडेल असे होते.
दोघांमधेही प्रेमाची कबुली घरी देण्याची हिंमत नव्हती कारण त्यांना नकाराची खात्री होती आणि अखेर दोघांनीही घरच्यांच्या आनंदासाठी पुढे चालायचे ठरवले.
आर्याचे अखिल बरोबर वर्षभरा पुर्वीच लग्न झाले. अखिल सोबत असताना पण अतुलच्या आठवणी आर्यासोबत होत्या. अखिल तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा परंतु आर्याला मात्र नेहमी अखिलचा गुन्हेगार असल्यासारखे वाटायचे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतांनाच अखिल तिथं आला, त्याने हळूच आर्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,
' काय गं... , कुठे हरवली माझी लाडकी बायको आर्या ...?
राणीसाहेब...आज कुठल्यातरी आठवणीत रमलेल्या दिसताय , मला पण सांग की इतकं लकी कोण आहे की ज्याच्या आठवणीत तु आजही हरवतेस.
काहीही उत्तर न देता आर्या तिथुन निघुन गेली पण तिच्या डोळ्यातलं पाणी मात्र अखिलने अचूकपणे टिपले.
अखिल देखील तिच्या पाठीमागे निघाला. त्याने पाठमोरी असतानाच तिला हळूच मिठीत घेतले. त्याच्या या वागण्याने आर्या भांबावली , मिठी सोडवायचा प्रयत्न करु लागली पण अखिलने मात्र मिठी आणखीनच घट्ट केली , आपले ओठ त्याने आर्याच्या कपाळावर टेकवले आणि मग तो बोलु लागला.
आर्या , तु माझं पहिलं प्रेम आहेस , कदाचित तुझ्यासाठी मला जे वाटले , जे जाणवले ते कधीच दुसर्या कोणासाठी कधी वाटले नाही. तुझ्यासाठी मात्र मी तुझे पहिले प्रेमच असावे अशी माझी जबरदस्ती नाही.
माझ्याआधी तुझ्या आयुष्यात कोणी होते याबद्दल मी तुला कधीही विचारणार नाही कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याहुनही जास्त विश्वास आहे की तु माझ्या या प्रेमाला समजुन घेशील.
ज्या गोष्टी घडुन गेल्या त्या आपल्या हातात नव्हत्या पण यापुढे तुझ्यावर प्रेम करणे माझ्या हातात आहे ते मी नक्कीच करेल.
तुझ्यासाठी कोण जास्त महत्त्वाचं आहे हे जाणुन घेण्यापेक्षा तु माझ्यासाठी खूप मोलाची आहेस , हेच मला तुला सांगायचं आहे.
आर्याला प्रेमाचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगत होता. अतुलच्या प्रेमाच्या आठवणीत ती अखिलच्या प्रेमाची प्रतारणा करत होती. अतुल तिचा भूतकाळ होता आणि त्यासाठी अखिल म्हणजे तिच्या वर्तमान काळाला दुखवणे चुकीचे होते कारण घडलेल्या गोष्टींमध्ये अखिलची काहीही चुक नव्हती. तिला खऱ्या प्रेमाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजला होता.
तिची नाव खऱ्या अर्थाने सुखाच्या किनार्यावर येऊन ठेपली होती म्हणून आर्याने अखिलला आणखीनच घट्ट मिठी मारली.
अतुलला मात्र अत्तराच्या सुगंधी कुपी प्रमाणे आपल्या हृदयात जपुन ठेवले अगदी मुल्यवान आणि सुंदर आठवण म्हणून ........!
तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.
धन्यवाद !🙏
सदर लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे लेख शेयर करायचा झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अश्याच नवीन साहित्याचे वाचन करण्यासाठी आमच्या " वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
फोटो साभार - pixels
✍©️जया पाटील.

0 Comments
Please do not enter any spam link in the comment box