लेक माहेराचं सोनं👰👰

लेक माहेराचं सोनं....


✍©️जया पाटील 



पूजा आणि मैथिली दोघी अगदीच जीवाभावाच्या मैत्रिणी. लहानपणापासूनच दोघी शेजारी शेजारी राहत होत्या. त्याचमुळे दोघींच्या कुटुंबांचे देखील एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पूजा आणि अखिल अशी दोघी भावंड होती. मैथिली आणि स्मृती ह्या दोघी बहिणी होत्या.  


लहानपणापासूनच या सगळ्यांची एकमेकांसोबत अगदी मनापासूनची गट्टी होती. पुजाच्या आईला देखील मैथिली आणि स्मृती दोघीही पूजा इतक्याच प्रिय होत्या. मैथिलीच्या आईची देखील पूजा, मैथिली आणि स्मृती पेक्षा जास्त लाडकी होती. 


हळूहळू दिवस पुढे जात होते पण या सगळ्यांची मैत्री मात्र दिवसागणिक घट्ट होत होती. अखिल ग्रॅजुएशन होऊन चांगल्या नोकरीला लागला. पूजाने देखील फॅशन डिझायनर म्हणून करियर सुरु केले. मैथिलीने इंजिनीरिंगची पदवी घेतली आणि आय टी क्षेत्रात चांगल्या पदावर कामाला सुरुवात केली. कंपनी कडून पुढील प्रोजेक्ट्सच्या कामासाठी मैथिली अमेरिकेला रवाना झाली. स्मृती इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षात  शिकत होती. 


पूजाच्या लग्नासाठी तिचे आईबाबा वरसंशोधन करू लागले आणि मग वेळ आली आईबाबांचे घर सोडून दुसऱ्या घरी जाण्याची.....  

पूजाचा विवाह सर्वयोग्य रोहन सोबत अगदी थाटामाटात पार पडला. मैथिलीची आई आणि पूजाची आई दोघांनीही अगदीच जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या लेकीला निरोप दिला. 


पूजाने लवकरच सगळ्यांना गोड बातमी दिली. नवीन पाहुण्याच्या आगमनाच्या वार्तेने पूजाच्या माहेरचे आणि सासरचे सगळेच अगदी खुश झाले. तिच्या सासरी तिचे डोहाळेजेवण कौतुकात करायचे ठरले. पूजाने सगळ्यांना आवर्जून बोलवले.  


मैथिलीच्या आईला देखील पूजाने सांगितले.....


काकू .....माझ्या ओटीभरणाला नक्की यायचंय हं..!  


मैथिली तर अमेरिकेत असल्यामुळे नाही येऊ शकणार पण तुम्ही आणि स्मृती नाही आल्यात तर मात्र रागावेल हं मी तुमच्यावर ......


माझ्या माहेरची सगळी माणसं माझ्या आनंदात सहभागी असलीच पाहिजे......!


डोहाळे जेवणासाठी पूजाच्या सासरच्यांनी खुप सुंदर तयारी केली होती. पूजाची आई, मैथिलीची आई, स्मृती, सगळेच ठरलेल्या वेळेप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले.


पूजा आपल्या  सासरच्यांसोबत  सगळ्यांची ओळख करून देऊ लागली. मैथिलीच्या आईची  देखील तिने रोहनच्या घरातील सगळ्यांसोबत ओळख केली.  


ओटीभरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पूजाची आणि मैथिलीची आई दोघीपण पूजाकडे पाहून खुप खुश होत्या. लाडक्या लेकीचा कौतुक सोहळा पाहून दोघीही भरून पावत होत्या. मैथिलीच्या आईने पूजा आणि मैथिली मध्ये कधीच फरक केला नव्हता. त्यामुळे दोघीही पूजा साठी अगदी मनापासून खुश होत्या.  


लेकीचे कौतुक पाहून मैथिलीच्या आईचे डोळे अगदी भरून आले होते आणि म्हणूनच तिची ओटी भरण्यासाठी ओटीचे ताट घेऊन त्या पुढे सरसावल्या आणि तितक्यातच रोहनच्या आत्याने त्यांना रोखले. 


थांबा मैथिलीची आई .. , इतक्या मोठ्या झाल्या तरी इतकं पण समजू नये का तुम्हाला ....? 


मुलींच्या आईने ओटी भरू नये. ज्यांना मुलगा असतो ना..त्याच बाईने म्हणजे मुलाच्या आईने ओटी भरावी.....


अपशकुन करायला निघाल्या.....! उद्या काही बरे वाईट झाले म्हणजे....?


आतापर्यंत आल्हाददायक असलेल्या वातावरणात निरव शांतता पसरली. मैथिलीची आई मागे सरकली त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पुजाने हे सगळे बोलणे ऐकले आणि मग मात्र पुजा त्यांना थांबवून म्हणाली ...


थांबा काकू ..... माझी ओटी तुम्ही भरणारच....आणि रोहनच्या आत्याकडे पाहून ती बोलू लागली ...


आत्या , काय म्हणाल्या तुम्ही ...? काकूंना मुलगा नाही ..


अहो पण , मुले देखील बजावणार नाही अश्या कर्तव्य बजावणाऱ्या मुली आहेत त्यांना......


मी आणि मैथिली सोबत वाढलो. माझे आईबाबा ठणठणीत असल्यामुळे माझ्यावर कुणाची जबाबदारी नव्हती पण मैथिली .....ती बारावीत असताना तिच्या बाबांना अर्धांगवायूचा झटका आला आणि तिच्या बाबांची नोकरी कायमची गेली पण मैथिली आणि स्मृती खचून गेल्या नाहीत. काकूंना त्यांच्या कामात आणि घरात दोघीही बहिणींनी साथ दिली. 


आपल्या गायिका होण्याच्या स्वप्नाला फाटा देत मैथिलीने इंजिनीरिंग करून आय टी क्षेत्रात नोकरी मिळवली. तिच्या बाबांच्या नावावर असलेले सगळे कर्ज तिने फेडले आणि स्मृतीच्या शिक्षणाचा भार देखील तिने स्वतःवर घेतला...

अशी मुलाची कुठली वेगळी कर्तव्य असतात की जी पार पाडण्यात मैथिली फक्त मुलगी होती म्हणून कमी पडली....?


माझ्या मते अजिबात नाही .. ती तिच्या आईबाबांचा एका मुलापेक्षा जास्त मोठा भक्कम आधार बनली. कदाचित अखिल दादा आणि रोहन सुद्धा त्यांची जबाबदारी इतकी उत्तमरीत्या पार पाडू शकणार नाहीत. 


जनक राजाला देखील सीतेचा अर्थात जानकीचा अभिमान होता, आपण सीतेची पुजा करतो आणि तिचेच प्रतीक असलेल्या मैथिलीचा एक मुलगी म्हणून अपमान करतो...?


मग पूजाने रोहन आणि आपल्या सासूसासऱ्यांना उद्देशून विचारले....आई .., उद्या रोहन आणि मला मुलगी झाली तर तुम्ही तुमच्या नातीचा, रोहन तु तुझ्या मुलीचा असा अपमान सहन करू शकशील....?


एक स्त्री असून एका स्त्रीचा अपमान तुम्ही सहन करू शकणार आई ...?


पूजाच्या सासरचे आधीपासून खुप चांगल्या विचारांचे होते, त्यांना पूजाचे बोलणे पटले होते..

रोहनच्या आत्याला देखील आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता त्यांनी देखील मैथिलीच्या आईची माफी मागितली.


मैथिलीच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पूजाच्या डोक्यावर हात फिरवून त्या म्हणाल्या .... 


लग्नानंतर देखील सासरची होऊन देखील   सासरसोबत माहेरचा मान फक्त एक मुलगीच ठेवून शकते म्हणूनच लेक खऱ्या अर्थाने माहेराचं सोनं असते ..... माझ्या अश्या लेकीला उदंड आयुष्य दे . खुप खुप सुखी ठेव हीच आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना.... 🙏🙏🙏


कथा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच मी वाट पहाते तुमच्या प्रतिसादाची ....!


धन्यवाद!🙏


सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


अशाच प्रकारचे नवनवीन लेखन वाचण्यासाठी आमच्या  "वेलवेट कवीशा " या फेसबुक पेजला  नक्की फॉलो करा. 



फोटो साभार - pixels



✍©️ जया पाटील 












 





Post a Comment

2 Comments

  1. खुप छान संदेश देणारी सामजिक कथा. असे बदल घडणे अत्यावश्यक आहेत.

    ReplyDelete

Please do not enter any spam link in the comment box